एक रम्य संध्याकाळ (भाग 3)
एक रम्य संध्याकाळ (भाग 3)
क्षितिजराव जेवणानंतर स्वतःच्या रूममध्ये निघून गेल्यावर मग सर्व एकदम निर्धास्त झाले. थोडा का होईना घरात त्यांचा दरारा होता.
"तरंग तुझ्या बाबांचं काही कळत नाहीये रे."
आई त्याला बोलली.
"हो ना. बाबा नीट सांगत का नाहीये. असा कोणता मित्र आहे जो थोड्याशा ओळखीवर सरळ घरी जेवायला बोलवत आहे. ते ही अस संध्याकाळी. आई-बाबा एकटे कसे जातील.?"
रायशा चिंतेच्या स्वरात म्हणाली.
"तुम्ही बायका पण ना. कशाला उगाच मनात शंका बाळगतात. बाबांच्या बोलक्या स्वभावामुळे झाली असेल कुणाशी तरी मैत्री. त्यात इतके घाबरण्यासारखे काय आहे आणि असेही बाबा सक्षम आहेत सर्वच बाबतीत."
तरंग निश्चिंत होत बोलला.
त्याच्या अशा बोलण्याने दोघी नरमल्या. त्याच म्हणणं त्यांना पटलं होत.
तो त्याच्या रुममधे शार्वीला घेवून निघून गेला.
"बर आई. तुम्ही आता जरा वेळ दुपारचा आराम करून घ्या. मी बाकीचे राहिलेले आवरून घेते. नंतर तुम्हाला बाहेर जायचं आहे ना."
रायशा सासूबाईंना उद्देशून म्हणाली.
" नको.चल. मी मदत करते. दोघी मिळून पटकन आवरून होईल."
" नका हो आई. काही काम नाहिये इतकं. जा तुम्ही. राहिलेले मी बघते सगळं. "
अस म्हणून रायशाने सासूबाईना पाठवून दिलं. प्रणिका पण थोडी दमली होती. असही आता फारस काम नव्हतं म्हणून तिनेही रायशाचे ऐकले.
"अग किती वेळ प्रणिका. मी केव्हापासुन वाट बघतोय तुझी.?"
क्षितिजराव तिला रुममधे आलेलं पाहून उत्साहाने बेडवर उठून बसले.
"हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय?"
क्षितिजरावांनी पिशवीतून एक सुंदरसा पंजाबी ड्रेस बाहेर काढला. प्रणिका ड्रेस पाहून अचंबित झाली.
"तुम्ही माझी फिरकी घेताय ना. सुनबाई साठी आणला ना. खरं सांगा.?"
"तिच्यासाठी कपडे आणायला तिचा नवरा आहे. तुझ्यासाठी तुझ्या नवऱ्याने आणलंय."
"अहो हे काय नवीन खूळ. ह्या वयात मी असले कपडे घालणं बरं दिसेल का.?"
"मी तुझ्यासाठी पूर्ण मार्केट धुंडाळत बसलो होतो. फार हौशेने घेतले आहेत."
थोडंसं निराश होत ते बोलले.
"अहो पण असं ड्रेस वर पहिल्यांदा बाहेर जायला मला अवघडून जाईल. जस माझं लग्न झालं तसे मी फक्त साडीच नेसत आली आहे. आता अचानक असा ड्रेस कसा घालू.? ओळखीचे लोक रस्त्यात भेटले तर काय म्हणतील. घरात सून आहे. तरुण मुलगा आहे. त्यांना काय वाटेल?"
प्रणिका अवघडून म्हणाली.
"आपली सुनबाई स्वतः ड्रेस घालते कारण तिला तिच्या नवऱ्याने तितकी मुभा दिली आहे. मला वाटते की मी पण आता तुला थोडीफार मोकळीक द्यावी. आधी जे झाल ते झालं."
"ह्या वयात असेल कपडे घालून फिरू का? ओळखीचे लोक, शेजारी पाजारी, ज्यांनी मला नेहमी साडी मधे पाहिलंय त्यांनी खिल्ली उडवली तर.?" प्रणिका अजूनही लोकांच्या नजरेतून स्वतःला बघत होती.
"काय वाईट आहे ह्या कपड्यांमध्ये?. चांगले अंगभर आहेत की. मला लोकांशी काहीएक देणंघेणं नाहीये. नव्या काळानुसार स्वतःला बदलत राहावं माणसाने. मी वाईट गोष्टींना कधीच दुजोरा देणार नाही. पण ज्या खरंच चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करायला हव्यात. नव्या युगानुसार चालणं कधीही योग्य, नाहीतर आपण पण काळाबरोबर मागे पडू."
तीच बोलणं ऐकून क्षितिजराव थोड चढ्या आवाजात बोलले.
"आपला समाज काय म्हणेल?" प्रणिका अजूनही नकारासाठी कारणे शोधत होती.
"हे बघ समाज म्हणजे आपण आणि आपण म्हणजेच समाज. याच समाजात दोन प्रकारची लोक राहतात. काही चांगली काही वाईट. लोकांच्या मतानुसार वागण्यापेक्षा आपल्याला काय योग्य वाटत ते करावं. चांगलं ते घ्यावे. वाईट ते सोडून द्यावे. आधुनिक काळानुसार स्वतःला बदलायला काय हरकत आहे. आयुष्यभर हाच तर विचार केला की याला काय वाटेल त्याला काय वाटेल आणि लोकांच्या ह्या वाटण्याच्या नादात आपण आपले जगणं विसरून गेलो. मला वाटतंय की तू एकदा स्वतःला आखलेल्या चौकटीतून बाहेर यावं. उगाच समाज आणि लोकांचे बहाने सांगत स्वतःला बंदिस्त करून ठेवू नकोस."
"अहो. पण मला सवय नाहीये असल्या कपड्यांची. मी कधीच घातले नाहीयेत. तुमच्या मित्राच्या घरी असं जायचं का?"
"म्हणूनच म्हणतो की जे कधीच केलं नाही ते आता करून बघ. काही प्रसंगी अधून मधून ड्रेस घालायला काय हरकत आहे. खर तर आपल्याकडे सर्वांना हवे तसे वागण्याचे, राहण्याचे आणि बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. काळानुसार काही चांगले बदल आत्मसाथ करायला काही हरकत नसावी. कुणी कोणते कपडे घालावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. फक्त तिथेही भान बाळगून वागणे केव्हाही चांगले. आपल्याला कोणत्या कपड्यात सोयीस्कर आणि आरामदायी वाटतंय ते कपडे घालावेत. मला वाटतं तू एकदा घालून बघावे. तुला सोयीस्कर वाटले तर राहू दे. नाही तर बदलून टाक. पण एकदा घालून बघायला तुला अडचण काय आहे."
"तुमच्याशी वाद घालून काही फायदा नाही. वादविवाद स्पर्धेत भाग घेत जा. पहिले स्थान पटकवाल. आणा तो ड्रेस इकडे. तुम्ही आतापर्यंत कधी काही कुणाचं ऐकलंय का.? जे आता माझा ऐकणार आहात."
प्रणिता तावातावाने बाथरूममधे तयार व्हायला निघून गेली.
आपला नवरा काही बाबतीत फार हट्टी आहे. एखादी गोष्ट त्याने ठरवली तर तो ती कोणत्याही परिस्थितीत ती पूर्ण करणार आणि त्या साठी स्वतःच म्हणणं पटवून देणार हे तिला माहीत होते. त्यांच म्हणणं ऐकण्याशिवाय तिच्याकडे पर्याय तरी कुठे होता.
काही बदल अनपेक्षित पण चांगले असतात. सहज अंगीकारणे एखाद्याला जमत नाही. पण तरीही थोडंसं एक पाऊल पुढे टाकून प्रयत्न करायला काही हरकत नाही. जर आपण त्या बदलांमुळे स्वतःला सहज स्वीकारले तर इतरही स्विकारतील यात शंका नाही. अट फक्त एकच. बदल नेहमी हिताचे असावेत.
