एक रम्य संध्याकाळ (अंतिम भाग)
एक रम्य संध्याकाळ (अंतिम भाग)
दोघेही बस मधून खाली उतरले. चौपाटीच्या दिशेने चालू लागले. चौपाटीच्या परिसरात चहा, ज्यूस, भेळ, पाणीपुरी, वडापाव, भाजलेल्या मक्याची कणसे, पॉपकॉर्न, नारळपाणी अशा बऱ्याच गाड्या अनुक्रमे लागल्या होत्या. त्याभोवती तरुणाईने चांगलीच गर्दी केली होती.
" तुला काही खायचे आहे का.?" क्षितिजरावांनी विचारले.
तिचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. ती फक्त समोर हरखून पुढे पुढे जात होती.
प्रणिकाला फक्त तो अथांग सागर खुणावत होता. दूरवर नजर पुरत नसेल इतका पसरलेला. फेसाळणाऱ्या समुद्राचा गर्जना करणारा आवाज संपूर्ण संध्याकाळ दणाणून सोडत होता. वर निळाशार आकाश आणि त्या खाली निळाशार समुद्र. दूरवर क्षितिज जिथे आकाश सागराला टेकलेले भासत होते. मधेच तो सूर्याचा लालबुंद गोळा हळूहळू खाली खाली सरकत होता. जणू काही स्वतःचा अंगाचा दाह कमी करण्यासाठी डुबकी मारायला जात असावा. सूर्याभोवती त्याची ललाटी पसरली होती. तोही लाल, पांढऱ्या, काळ्या, निळ्या, पिवळ्या रंगाची उधळण करत सागराच्या पाण्यात डुंबायला आतुर होत असावा.
ती ते विलोभनीय दृश्य पाहण्यात इतकी गर्क झाली होती की आजूबाजूच्या कोलाहलाचा तिला पूर्णपणे विसर पडला होता. ती तर हे ही विसरून गेली होती की आपल्या सोबत अजून कुणीतरी आहे.
प्रनिका तो फेसाळलेला समुद्र गर्जना करत लाटांवर स्वार होऊन त्या किनाऱ्यावर येऊन आदळत होता ते निरखून बघत होती. किती मज्जा येईल ना जेव्हा ह्या लाटा इथ पर्यंत येऊन माझ्या पायाला स्पर्श करून जातील. ती अजून पुढे जाऊ लागली. त्या समुद्री लाटा जिथं पर्यंत आपलं अंतिम अस्तित्व किनाऱ्याला दाखवत होत्या, तिथ पर्यंत ती जाऊन उभी राहिली.
पूर्ण वेगाने त्या लाटा स्पर्धा करत किनाऱ्यावर येण्यासाठी आतुर होत होत्या. सुरुवातीलाच खाली वर करत सर्व ताकद लावल्यानंतर हळूहळू अंगातल अवसान गळून किनाऱ्यालगत येता येता बिचाऱ्या जोर ओसरून दमत भागत वेग मंदावत किनाऱ्याला भिडायच्या. त्यांचा स्पर्श प्रनिकाला होत होता. ते लाटांवर आरूढ झालेले पाणी तिच्या पायांना भिजवत परत मागे सरत असे. ती स्वतःच्या पायांकडे बघत बसली होती. प्रत्येक लाटेगणिक वाळूचे बारीकसारीक कण तिच्या पायांवर नक्षी काढत होते. पायाखालची वाळू सरकली की तळपायाला गुदगुल्या व्हायच्या. आपण खाली पडू की काय अशी क्षणभर भीती पण वाटून जातं असे. त्या लगातार येणाऱ्या लाटा पाहून नंतर तर तिला असेही वाटू लागले की ही पायाखालची जमीन खचून आपण जमिनीच्या आत चालले जाऊ की काय. स्वतःच्याच विश्वात रममाण होऊन ती गालात खुदकन हसली.
किती वेळ ती तशीच उभी होती. क्षितिजराव काहीही न बोलता तिच्या मागे उभे होते. त्यांनी आजुबाजुला नजर फिरवली. दोघांना निवांत बसायला कुठे जागा मिळतेय का म्हणून ते चौफेर नजर फिरवत होते. थोड्याशा अंतरावर उंचच्या उंच थेट आभाळाला भिडणाऱ्या नारळाच्या गर्द हिरव्या झाडांची रांग त्यांना दिसली. त्या नारळी झाडांच्या कुशीत थोड्याशा उंचावर छोटेसे रेस्टॉरंट होते. रेस्टॉरंटच्या बाहेरच्या आवारात बाल्कनी मध्ये टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या. तिथे आरामात बसून खाता खाता संपूर्ण सागर किनारा निवांत न्याहाळता येऊ शकतो. इथेच प्रनिकाला जेवायला घेऊन जाऊया. तिथेच बसून दीर्घकाळ विसावत हा सागरी नजारा डोळ्यात साठवू शकतो ह्याची त्यांना खात्री पटली.
"प्रणू." त्यांनी तिला आवाज दिला.
तिने चमकून मागे पाहिले.
इतक्या वर्षानंतर इतक्या प्रेमळ आवाजात आपल्या जोडीदाराच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकणे. ते ही आपल्या मनपसंत ठिकाणी म्हणजे दुग्धशर्करा योगच.
" चल. त्या तिकडे बसू."
त्यांनी त्या नारळाच्या छोट्याशा वनराईत वसलेल्या रेस्टॉरंटकडे बोट दाखवत म्हटले. तिच्या अनुमतीची पर्वा न करता त्यांनी तिचा हात धरत तिकडचा मार्ग पकडला. ती मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या मागे मागे चालू लागली.
हॉटेल मालकाला एक वृद्ध जोडपे आपल्याकडे येताना दिसले. सोबतीने येताना कसले गोड दिसत होते दोघं. दोघांनी त्या रेस्टॉरंटमधल्या दर्शनी भागातील बाल्कनीत प्रवेश केला. त्यांना पाहून लगबगीने एक वेटर पुढे आला. त्याने त्यांना दोघांना बसायला मदत केली. दोघ जीव आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी ही सागर किनारी मावळत जाणारी संध्याकाळ बघण्यासाठी विसावले.
वेटर तिथेच ऑर्डर घेण्यासाठी उभा होता.
"प्रणू, आज तुझ्या आवडीच सर्व मागवू. सांग काय खायचं आहे तुला."
" माझं काही नाहीये. तुम्हाला हवं ते मागवा."
" अग अस काय करते. आजचा दिवस तुझा आहे."
" हो पण मला यातलं काही कळत नाही. मी कसं सांगू." ती तिथेच टेबल वर ठेवलेल्या मेनूकार्ड कडे बोट दाखवत म्हणाली.
" बरं. मी बघतो काय ऑर्डर द्यायची ते."
ते मेनू कार्ड हातात घेऊन वाचू लागले. जे पदार्थ कळत नव्हते. ते त्यांनी वेटर कडून समजवून घेतले. चटपटीत मसालेदार पदार्थ मागवण्यापेक्षा दोघांच्या तब्येतीला मानवतील असे कमी प्रमाणात तिखट व तेलकट नसलेले पदार्थ त्यांनी वेटरच्या सल्ल्याने ऑर्डर केले.
टेबलवर ठेवलेल्या फुलदाणीतील गुलाब त्यांनी हातात घेतला व प्रनिकाला देत म्हणाले.
"एका गुलाबाला गुलाब देतोय."
ते ऐकुन ती चक्क लाजली. कुणी आपल्याकडे बघतय का ह्या विचाराने गांगरून ती आजुबाजुला नजर फिरवू लागली.
"अग, पाहिलं तर पाहिलं लोकांनी. आता मला त्याची पर्वा नाही. इतकी वर्षे सर्वांचा विचार करून स्वतःला अडवत राहिलो. आता उरलेल्या सुरलेल्या जिवनात इतरांचा काय विचार करायचा. तू मला आणि मी तुला हे पुरेसे नाहीये का.?"
तिने चटकन ते फुल घेतले. लाजेची लाली तिच्या गालांवर चढली होती. ही लाजतांना अजूनही तितकीच सुंदर दिसते. जितकी नवविवाहित तरुणी लाजताना दिसते. ते तिला बघत हसून मनातल्या मनात स्वतःशी पुटपुटत होते.
दोघेही तो क्षण आपल्या मानत साठवून ठेवू पाहत होते. आज दिवसभरात घडलेल्या सर्व घडामोडी पाहता हा क्षण म्हणजे सोन्यासारख्या नात्याला चढलेली झळाळी.
ही त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ आज जरा वेगळ रूप घेऊन आली होती. त्यांच्या सहजीवनाला नावीन्य प्राप्त करून देत होती.
झाले गेले सारे विसरून इथून पुढे जुन्याच नात्याला नव्याने सुरु करुन सैल झालेली लग्नगाठ पुन्हा पक्की करायची अस निर्धार दोघांनी केला.
(समाप्त)
