एक रम्य संध्याकाळ (भाग 8)
एक रम्य संध्याकाळ (भाग 8)
बिच आलं नव्हतं. बसचा प्रवास अजुन बराच बाकी होता. प्रणिका एकसारखं खिडकीबाहेर बघुन विचार करत बसली होती.
अजून असे किती आणि काय साठवून ठेवले असेल हिने मनात. हिला बोलतं करायला हवं.
" प्रणिका, खूप वर्षानंतर आपण असे आज जोडीने बाहेर पडतोय. मला असं वाटतंय की आज आपण एकमेकांशी आपल्या मनात आहे जे काही आहे ते सर्वकाही अगदी स्पष्ट बोलून टाकूयात. आज मनमोकळा संवाद साधूया. आतापर्यंत तुझ्या मनात जे काही साचले असेल. जे माझ्याकडून करायचे राहून गेले असेल. तुझ्या मनातल्या साऱ्या सुप्त इच्छा, अपेक्षा, आकांक्षा त्या सर्व तू मला आता सांग. कोणतीही भीडभाड न ठेवता, कोणत्याही दडपणाखाली न येता, तू मला सांगू शकतेस."
"तुम्हाला खरंच ऐकायचंय आहे.? "
"हो, म्हणून तर तुला घरापासून लांब घेऊन आलोय ना."
"उगाचच माझी मनधरणी करत नाहीये ना.?"
"नाही ग, मी असं कशाला करू. मला खरंच जाणून घ्यायच आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतील की ज्या अनावधानाने माझ्याकडून राहून गेल्या असतील. त्या सर्व आपण आत्ता पूर्ण करू."
"नाही ते आता शक्य नाही."
"का? अजूनही वेळ गेलेली नाहीये. करू शकतो आपण."
"हो. पण आता आपण त्या वयात नाहीये. तरुणपणाचा जो उत्साह असतो. तो ह्या या वयात कुठून आणु शकतो.?"
" जे शक्य आहे ते तर करू शकतो ना."
"नाही. आता काही फायदा नाही. त्या गोष्टींसाठीची वेळ टळून गेली आहे."
"तू सांगून तर बघ. कदाचित आता मी त्या गोष्टींमध्ये नव्याने सुधारणा करू शकेल."
"बर. तुम्ही इतका हट्ट करतच आहात तर मी आता तुम्हाला सांगून बघते .बघा तुमच्याने किती सुधारणा होईल ते."
"हो. सांग माझ्याने जितके होईल तितके मी करेल."
आता क्षितीजराव सावरून ऐकायला बसले.
"मला मान्य आहे की आपण एकत्र कुटुंब पद्धतीत राहायचो. पण कधी कधी वाटायचं घरातल्या सर्वांचं दिवसभर केल्यानंतर थोडा अमूल्य वेळ तुमच्यासोबतही घालवावा. मला जाणिव होती की तुमचे आई-वडील,भाऊ-बहिण तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. पण कुठेही मीही तितकीच महत्त्वाची होती हे तुम्ही दाखवायला विसरलात. खूप वेळा वाटायचं की, दिवसभराच्या कामाच्या रहाट गाड्यातुन, माणसांच्या गर्दीतून बाहेर लांब जावं. तुमच्या सहवासात थोडा वेळ घालवावा. पण असे कधी झालेच नाही. जेव्हाही आपण दोघांनी बाहेर फिरायला जायचं ठरवलं तेव्हा तेव्हा तुमच्या भावांची मुले मागे लागायची. तुमचं त्यांच्यावर प्रेम बघून मीही होकार द्यायची. फक्त आपण दोघं एकटे निवांत असे कधीच बाहेर गेलो नाही. नेहमी आपल्या सोबत कोणी ना कोणी असायचं."
"अस नाहीये प्रणीका. तू माझी आहेस. मला नेहमीच समजून घेशील. हे मला माहीत होते. मला माझी नाती सांभाळायला तू मनापासुन साथ देशील यात मला शंका नव्हती. म्हणून त्यावेळी अनावधानाने माझ्याकडून असे काही झाले असेल. शेवटी ते ही आपलेच कुटुंब होते ना."
तिने त्यांच्याकडे नाराजगी दाखवत एक तिरकस कटाक्ष टाकला व खिडकी बाहेर बघु लागली.
"बरं तू बोल. आज तुझा दिवस आहे ना. मी ऐकून घेईल. चुकलं माझं. तू बोलत रहा."
त्यांनी डोळ्यांनीच आर्जववजा विनंती करून तिला परत बोलते करण्यासाठी प्रयत्न केला. परत मधे बोलून तिला नाराज करणं चालणार नव्हतं. कित्येक वर्षे मनात दबलेली खदखद वाट फुटून बाहेर निघत होती. खूप काही दाटून आलं होत. आभाळ मोकळं व्हायला वेळ तर लागणारच होता.
"बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला सांगाव्याशा वाटायच्या. माझा आनंद, दुःख, माझी प्रत्येक भावना तुमच्याशी वाटून घ्यावीशी वाटायची. पण तुम्हाला माझ्याशी काही देणेघेणे नव्हते. सर्वांसमोर तुम्ही माझ्याशी फार परक्यासारखे वागायचे. घरात कुणी पाहुणे मंडळी आली की साधी ओळखही तुम्ही मला दाखवत नसत. तुम्हाला सतत भीती असायची की कोणी आपल्याला बायकोचा गुलाम म्हटलं तर. बायकोच्या तालावर नाचणारा नवरा म्हटलं तर. त्यामुळे माझ्यापासून नेहमी चार हात लांब राहायचे. तुम्ही घरात खाऊ आणला तर आधी तो सर्वांना वाटला जायचा आणि मग उरलेला माझ्या वाट्याला यायचा किंवा मिळायचा पण नाही. मला खाऊची अपेक्षा कधीच नव्हती. फक्त मला माझ्या माणसाने माझ्यासाठी काय आणलंय? तो माझा विचार किती करतोय? त्याच्या माणसांच्या गर्दीत तो मला किती महत्त्व देतोय? हे मला जाणून घ्यायचं होत. पण हळूहळू एक गोष्ट कळाली की तुमच्या आयुष्यात माझा नंबर नेहमी शेवटीच असेल. कालांतराने मी हे पण गोड मानून घेतल. तुम्ही सर्वांच्या वाट्याला थोडे थोडे गेलात. पण माझ्या वाट्याला येताना तुम्ही काहीच उरत नव्हता. आपल्यातला संवाद संपत चालला होता. नंतर तर मी स्वतःलाच समजावलं की माझा तुमच्यावर काहीएक अधिकार नाहीये. एक चांगला मुलगा, भाऊ, काका, मामा बनण्याच्या नादात तुम्ही एक चांगले "पती" कधीच बनू शकणार नाही. मन मारून मी ह्या सर्व गोष्टी नाईलाजास्तव स्विकारून घेतल्या. अर्थात त्याला काही पर्याय होता का..? इतरांसाठी असलेल्या गोष्टी नगण्य पण माझ्यासाठी त्यावेळी या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या होत्या. पण नंतर कळलं की आपल्याला एकट्याला असच मन मारून आयुष्य काढायचं आहे." तिच्या मनातली खंत बाहेर पडत होती.
क्षितिजरावांना काय बोलावं तेच कळेना. तिचं कोणतच म्हणणं खोडून न काढता आपण तिच सर्व बोलणं शांततेत ऐकून घेऊ असं त्यांनी ठरवलं. त्याशिवाय तिच्या मनात अजून किती आणि काय दडलेले आहे हे त्यांना कसं कळणार होते. त्यासाठी आता शांत बसणे महत्त्वाचे होते.
इतकी वर्षे आपल्या बायकोने मनात सर्व दाबून ठेवलं होतं. ते आपल्याला कळलं सुद्धा नाही. किंबहुना तिने जाणवू दिले नाही याची त्यांच्या मनाला चुटपुट लागून गेली होती.
तुम्हाला काय वाटतं, त्यावेळी कुणाचं चुकलं? लग्नाची बायको हक्काची असते म्हणून आपण नकळत तिला दुय्यम वागणूक द्यायला लागतो का.? तिच्या मनाचा विचार न करता कुटुंबात तिला शेवटच्या स्थानी पाहतो का.?
आपल्या बहुमूल्य अभिप्रायद्वारे आपले मत जरूर कळवा. भाग कसा वाटला ते ही सांगा. धन्यवाद.
