STORYMIRROR

Aparna Pardeshi

Abstract Inspirational

3  

Aparna Pardeshi

Abstract Inspirational

एक रम्य संध्याकाळ (भाग 9)

एक रम्य संध्याकाळ (भाग 9)

4 mins
123

हळुच क्षितिजरावांनी तोंडातून शब्द बाहेर काढले. ते ही नमत्या आवाजात.


"प्रणिका तू फार गैरसमज करून घेतले आहेत. हे असलं काही माझ्या डोक्यात नव्हतं. त्यावेळी तुला कोणी दोष देऊ नये. तू मला ताब्यात ठेवलंय असं कोणी म्हणू नये म्हणून मी असं वागत होतो. तुला कोणी माझ्यामुळे बोललेल मला आवडलं नसतं. म्हणून मी तुझ्यापासून लांब राहत होतो." 


आपल्या वागण्यावर ते पांघरून घालायचा प्रयत्न करत होते.


"इतरांचा विचार केला. पण माझा कधी केला का.? शरीराने माझ्याजवळ जरी असले तरी मनाने तुम्ही माझे कधीच होऊ शकला नाहीत. आदर्श मुलगा बनण्याच्या दडपणाखाली स्वतःला नेहमी माझ्यापासून दूर लोटत गेलात. मला काय वाटेल याचा विचार न करता नेहमी तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना काय वाटेल ह्या विवंचनेत माझ्या पासून दूर होत गेलात. तनाने जवळ येत गेलो तरी तुम्ही मनाने पूर्णतः माझे कधीच होऊ शकले नाही. ज्या माणसाचा विश्वासाने हात धरून मी सासरचा उंबरठा ओलांडला त्याच माणसाने मला पावलोपावली परकेपणाची वागणूक जाणवू दिली. तुम्हीच मला आपलेसे केले नाही. मग उर्वरित कुटुंबाकडून मी काय अपेक्षा करणार होती सांगा.?"


"कदाचित त्या वेळची परिस्थिती वेगळी असेल. ठरवून किंवा जाणून बुजून मी अस वागत नव्हतो ग."


" त्याच कसं असतं ना. एकदाच लग्न झालं की, बायको आता आपली हक्काची आहे. तिच्याशी आपण कुठेही, कसेही, केव्हाही वागलो तरी ती कुठे आपल्याला सोडून जाणार आहे. आता आपण सांगू तसेच तिने राहायचे. आपण म्हणू तसेच तिने वागायचे अशी विचारसरणी बऱ्याच नवरे मंडळींची असते. तिला काय हवं.? तिला काय आवडतं.? हे त्यांच्या खिजगणतीत पण कधी नसते. हे सर्व फार पूर्वी पासून चालत आले आहे. वर्षानुवर्षे तीच विचारसरणी कानावर पडत राहिली की मग आपण ही त्याच विचारांच्या अधीन होतो. चूक बरोबरच्या फंदात न पडता ऐकीव गोष्टींवर आपला जास्त विश्वास बसतो. लहानपणापासून स्त्री बद्दलचे विचार वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकल्यानंतर आपणही त्याच मापात तिला तोलू लागतो. ह्या सर्व बाबींकडे पाहता तिच्या मनाचा विचारच कुणी करत नाही. किंबहुना तिने आवाज केला तरी परंपरा किंवा पिढीजात विचारसरणीच्या नावाखाली तिचा आवाज दाबला जातो."


" हो आणि मी ही त्याला अपवाद नाही." 


"शिवाय मूलबाळ झाले की आपण आपल्या मुलांमध्ये इतके रमून जातो की आपण नवरा बायको उरतच नाही. मुलांचे संगोपन, त्यांचे भावी जिवनाचे आराखडे बांधता बांधता स्वतःच त्यांची स्वप्ने जगायला लागतो किंवा आपली अपूर्ण स्वप्ने त्यांच्या कर्वी पूर्ण करवून घेत असतो. त्या नादात आपण कित्येक वर्ष फक्त मुलांचे आई वडील ह्या नात्याला न्याय देत असतो. त्याआधी आपण पती पत्नी आहोत हेच चक्क विसरतो."


"खरंय. चुकलं माझं प्रणिका. मला माफ कर. मी त्यावेळी तुला समजू शकलो नाही. पण आता मात्र मी जमेल तितक तुला खुश ठेवायचा प्रयत्न करेन. कृपया मागचं सगळं विसरून जा ना. आपण आपलं उर्वरित आयुष्य नव्याने जगू. तु स्वतःला चार भिंतीत कोंडून ठेवू नको. सतत मुलगा आणि सून यांच्या भोवती स्वतःचा विश्व तयार करू नकोस. तुझ्या अशा खूप इच्छा, अपेक्षा असतील. खूप काही करायचं राहून गेल असेल. ते सर्व आपण आता पूर्ण करू."


" त्याचा आता काय उपयोग"


" असे म्हणू नकोस. मला एक कल्पना सुचली आहे. आपण आपली बकेट लिस्ट तयार करू."


" ते काय असते.?"


" आपल्या अपूर्ण स्वप्नांची यादी. म्हणजे बघ. तुझी जी काही स्वप्ने पूर्ण व्हायची बाकी आहेत. त्यांची तू यादी बनव. जसे की मला तुला डेटवर घेऊन जायचे होते. मी आज तुला नेतोय. शिवाय एकदा तू मला बोलून दाखवले होते की तुला समुद्र किनारी माझा हात घेवून दीर्घकाळ बसायचे होते. ते माझ्या लक्षात होते. आज आपल्या दोन्ही इच्छा पूर्ण होतील. आपल्या बकेट लिस्ट मधली दोघांची एक एक इच्छा आज पूर्ण होईल. फार मोठ्या नाही पण आपल्या आवाक्यातल्या तूझ्या स्वप्नांची यादी मी नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करेल. तुझे जे जे करायचे राहून गेले आहे ते सर्व आठवून तू लिहून ठेव. मी ही तेच करेल. आपल्याला जमेल तसे आपण सर्व पूर्ण करायचा नक्की प्रयत्न करू."


त्यांच्या बोलण्याने तिच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले. मन नकारात्मक विचारांना बाजूला सारायला तयार होत होते. 


ती काहीच बोलली नाही. पण चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगत होते. तिचे मन वळवायला क्षितिजराव यशस्वी झाले होते.


" मान्य आहे की पूर्वीसारखे काही होऊ शकत नाही. अशा खूप गोष्टी तूझ्या मनात साचलेल्या आहेत. वेळेनुसार मी त्या बदलायचा नक्किच प्रयत्न करेल. शिवाय मागे जे घडून गेले ते मी पुसूनही काढू शकत नाही. पण त्या जागी नवीन सुंदर अनुभवांची शिदोरी तुला नक्कीच देवु शकतो. तू फक्त तुझ्या कोषातून बाहेर निघायचा प्रयत्न कर. आपण नवीन आठवणी नक्कीच निर्माण करु. विश्वास ठेव. त्या खूप सुंदर आणि दीर्घकाळ सुख देणाऱ्या असतील."


तिने त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.


इतक्या वर्षाचे मळभ दूर व्हायला वेळ लागेल. मी तुला कोशात जायला भाग पाडले तर मीच तुला यातून बाहेर काढेल. त्यांनी मनोमन ठरवले.


समुद्राचा आवाज जवळ जवळ येत होता. चौपाटी जवळ आल्याचे चिन्ह दिसत होते. 


खरं तर कोणत्याही गोष्टीची वेळ गेलेली नसते. मनात असेल ना तर माणूस वयाच्या कोणत्याही टप्प्यात नवीन सुरुवात करू शकतो. 


तुमचीही असेल एखादी बकेट लिस्ट.? लिहायला घेताय ना. की नुसती मनात दडवून ठेवणार आहात. अजूनही वेळ गेलेली नाहीये. 


बाकी आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्स द्वारे जरुर कळवा. भेटू पुढील भागात. धन्यवाद. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract