STORYMIRROR

Aparna Pardeshi

Abstract Inspirational

3  

Aparna Pardeshi

Abstract Inspirational

एक रम्य संध्याकाळ (भाग 4)

एक रम्य संध्याकाळ (भाग 4)

4 mins
157

थोडया वेळानंतर क्षितिजराव आणि प्रणिका बाहेर जाण्यासाठी तयार झाले होते. आपल्या रुमच्या बाहेर येताच हॉलमध्ये शार्वी टीव्ही बघत बसली होती. तिचे त्यांच्याकडे लक्ष गेले.

"मम्मी, पप्पा आपली आजी बघा. किती ब्युटीफूल दिसतेय."

चिमुकल्या शार्विने जोरात ओरडून कार्टून बघता बघता टुणकन सोफ्यावरून उडी मारली आणि जाऊन आजीला बिलगली.

प्रणिकाने शार्विला उचलून गोड गोड पापे घेत विचारले.

"खरंच छान दिसतेय का मी.?"

" हो आजी एकदम ब्युटीफूल दिसतेय."

शार्वीने तिच्या कडेवरून उतरून सोफ्यावर झेप घेतली आणि परत कार्टून बघण्यात मग्न झाली.

तिचा आवाज ऐकून तरंग आणि रायशा लगबगीने आपल्या रूम मधून बाहेर आले. पाहता तर काय एक नवीन तरुण उत्साही जोडी जय्यत तयारीनिशी उभी होती.

त्याच्या बाबांनी चौकटीचा पिवळा शर्ट आणि काळी पँट घातली होती. पण खरी गंमत तर पुढे होती. नेहमीच साडी मधे दिसणाऱ्या आपल्या आईचा कायापालट बघून तरंग दंग झाला.

प्रणिकाने गडद पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. त्यावर एका बाजूने हलक्या पिवळ्या रंगाची ओढणी घेतलेली होती. दोघांनी पिवळ्याच रंगाचे कपडे घातले होते. असेही क्षितिजरावांना भडक रंगाचे कपडे आवडत नसे.

बाकी गळ्यात वाटीच मंगळसूत्र, कानात नाजुकसे झुमके, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर लाल रंगाची टिकली इतकचं रोजच्या सारखं होत. तीच साधंस राहणीमान असूनही ती नेहमीच सुंदर दिसायची. आज भरीस भर म्हणून कपड्यांचा हा आकस्मित बदल डोळ्यांना सुखकारक होता.

" काय रे. काही बोलशील का नाही.? " बाबांच्या आवाजात एक जरब होती.

" आ. हा. म्हणजे हो. आई तू या आधी का नाही वापरले असे कपडे? खरंच छान दिसतेय. रोज असेच कपडे वापरत जा. म्हणजे तुला घरभर सहजपणे वावरता येईल. ते सारखं सारखं साडी आवरण नको." तरंग एकदम काहितरी ओघात बोलून गेला.

प्रणिका केव्हापासून अवघडून खाली मान घालून उभी होती. तरंगच्या अशा बोलल्याने तिच्या चेहऱ्यावर आता समाधान झळकलं.

"आई, अहो किती मस्त दिसताय तुम्ही. नजर उतरवायला हवी तुमची. कोण म्हणेल तुम्हाला की तुम्ही आजी आहात म्हणून. तुमच्या वयालाही तुम्ही चक्क मागे टाकलं आज."

रायशा उत्साहाने प्रणिकाला बघून बोलली.

" बघ. मी बोललो होतो ना तुला. ऐकत नाही माझं."

तिला अवघडलेल्या अवस्थेत उभे असलेल पाहून क्षितिजराव म्हणाले.

हे ऐकून आता प्रणिकाची कळी खुलली.थोडा आत्मविश्वास पण वाढला.

"खरच बरी दिसतेय ना मी. की कपडे बदलून येवू." प्रणिकाने खात्री करण्यासाठी विचारले.

"अग आई, खूप सुंदर दिसतेय. राहू दे. मी तर म्हणतो अजून दोन चार जोड घेवून टाक." तरंग पटकन बोलून गेला.

" बाबांनी सरप्राइज गिफ्ट दिलंय वाटत. दुपारी त्यासाठीच बाहेर गेले होते का?" रायशा काहीस आठवून म्हणाली.

" हो. म्हणून यायला उशीर झाला. ते डिनर पार्टी थीम असल काही म्हणतात ना.? ते ठरलंय आमचं. म्हणून प्रणीकासाठी घाईघाईत कपडे आणायला गेलो होतो."

क्षितिजरावांनी स्पष्टीकरण दिले.

" ह्या बद्दल मला तुम्ही आधी काहीच का सांगितल नाही." प्रणिकाने अविश्र्वासाने त्यांना विचारले.

" हो मग तू येणार की नाही ह्याची मला खात्री वाटत नव्हती ना. ऐनवेळी शेवटच्या घडीला काहीतरी कारण काढून नकार दिला असता." क्षितिजरावांनी मनात बाळगलेली पुसटशी शंका बोलून दाखवली.

" बरं आई, जरा पाच मिनिटे येता का माझ्या सोबत आतमध्ये."

होकाराची वाट न पाहता रायशा सासूबाईना हात धरुन तिच्या रूममध्ये घेवून गेली.

"आता काय राहील ह्यांचं. आधीच उशीर होतोय." क्षितिजरावांनी थोडी भुणभुण केली.

"बाबा, हे आईसाठी अचानक असे कपडे का घेतले.? नाही म्हणजे चांगलंच आहे. पण अचानक मनात कसं आलं तुमच्या.?" तरंगच्या मनात प्रश्न उपस्थित झाला.

"अरे आमच्या पिढीतील लोकांना जुन्या रुढी परंपराना चिकटून रहायची इतकी सवय असते ना की नव्या गोष्टींना ते प्राधान्य देतच नाही. काहींनी तर आधुनिक वाईटच असतं अशी पक्की खूणगाठ मनाशी पक्की बांधून ठेवलेली असते. प्रश्न साडी किंवा ड्रेसचा नाहिये. प्रश्न सहजतेने वावरण्याचा आहे. एखादे कौटुंबिक कार्य असेल तर आपण संस्कृतीला जपूनच त्या अनुषंगाने कपडे घालतो. पण मित्रपरिवार किंवा त्या सलग्न छोटासा कार्यक्रम असेल तर स्वतःला नव्या ढंगात बदलायला काही हरकत नाहीये ना."

" तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे बाबा." तरंग बोलला.

पण तरीही काहितरी गौडबंगाल आहे हे त्याला राहून राहून वाटत होतं.

"अरे अजून किती वेळ लागेल. आवाज तरी दे आईला."

" येतील हो बाबा. असेल काही त्यांचं. बर बाबा जेवणासाठी तर उशिरा बोलावलं होत ना. संध्याकाळी निघणार होतात. अजून तर दुपारचे तीनच वाजताय .इतक्या लवकर का निघालेत तुम्ही दोघं?" तरंगने न राहवून विचारले.

" तू पण तूझ्या आईवरच गेलाय. मघापासून ती ही हेच विचारतेय. अरे त्यांनी लाख उशिरा बोलावले असेल पण आपण काय ऐन जेवणाच्या वेळी जायचं का.? आधी जाऊन त्यांना मदत दिली तर काय बिघडलं. नुसतं आयत खायलाच थोडी जायचं असत. आधी जाऊन आपली जमेल तितकी मदत करून खारीचा वाटा उचलावा माणसाने."

क्षितिजरावांनी अगदी मोलाचे बोल सांगितले.

" बरोबर आहे बाबा तुमचं. पाहुणे बनून ऐनवेळी जाण्यापेक्षा आधी जाऊन सहकार्य केले तर त्यांचा थोडा भारही हलका होतो आणि आपल्यालाही आत्मिक समाधान लाभते."

तरंग आपल्या अनुभवी बाबांकडून, त्यांच्या छोट्या छोट्या अनुकरणातून फार गोष्टी शिकत असे. तशीही त्याच्या बाबांची शिकवण असायची की आपल्या बारीसारीक आणि सामान्य वागण्यातून सुद्धा आपण इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो. म्हणूनच काय त्याचे बाबा त्याचे आदर्शच होते.

जुन्या आणि नव्या गोष्टींची सांगड घालून काळाबरोबर चालणे कधी ही योग्य नाहीतर माणूस कालबाह्य होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract