STORYMIRROR

Aparna Pardeshi

Abstract Others

2  

Aparna Pardeshi

Abstract Others

"झोका आठवणींचा"

"झोका आठवणींचा"

3 mins
41

माझे नाव अपर्णा परदेशी. मी मूळची खान्देशी आहे. जळगाव जिल्हा माझे माहेर. आमच्याकडे सासुरवाशीण स्त्रीला ओढ लावणारा सण म्हणजे आखाजी. "अक्षय तृतीया" ह्या सणालाच खानदेशात "आखाजी" असे म्हणतात. उन्हाळ्याच्या सुट्टीला आमच्याकडे आखाजीची सुट्टी असे म्हणतात. आखाजीचा सण लग्न झालेल्या मुलीसाठी हक्काचा आणि तिच्या आरामाचा सण असे मानले जाते. हया सणाला दिवाळी इतकेच महत्व आहे.


पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच नवविवाहित स्त्रियांना आखाजीची हुरहूर लागून जात असे. जसा सण जवळ यायचा तसे डोळे आपल्या भावाच्या किंवा वडिलांच्या येणाऱ्या वाटेकडे लागायचे. सासरी साधी बोलण्याचीही मुभा नसलेली सासुरवाशीण मुलगी कधी माहेरी जाऊ आणि कधी नाही अशा मनस्थितीत असायची. अक्षय तृतीयेच्या काही दिवसांपूर्वीच तिचे वडील किंवा भाऊ तिला घ्यायला येत असे.एकदाची सासरहून तिची रीतसर पाठवणी झाली की तिच्या आनंदाला पारावार उरायचा नाही. सासुरवाशीण मुलीचे माहेरी आगमन होताच तिचे कोडकौतुक सुरू होऊन जात असे.


पण माहेरी तिला सर्वात जास्त खुणावत असेल तर तो म्हणजे आखाजी सणाला खेळला जाणारा झोका. सर्वात आधी तर उंच अशा मजबूत झाडाला पक्क्या जाड दोराने झोका बांधला जातो. तो झोका म्हणजेच सासरच्या बंधनातून थोडे दिवस झालेल्या "मुक्ततेच प्रतीक."


वसंत ऋतूत पानाफुलांना आलेली बहर आणि त्यात आंब्यांचा हंगाम म्हणजे जणू काही पर्वणीच. त्या डोलणाऱ्या वाऱ्यासोबत तासनतास झोका खेळण्याचा उत्साहाला सीमाच उरत नसे. ह्या झोक्याच आकर्षण लहान मुलींप्रमाणेच सर्व वयातील स्त्रियांना असायचे. आपल्या माहेरच्या मातीला स्पर्श करत गगनचुंबी झोका घ्यायचा व आकाशाला भिडायचा प्रयत्न करायचा. थोडे दिवस का होईना मुक्त उडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असे गृहीत धरून तो आनंद मनमुरादपणे लुटायचा.


ह्या सणासाठी प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी येत असल्याने जुन्या मैत्रिणींची आवर्जून भेट व्हायची. एकमेकांचे सुख दुःख सांगून मन रीते होत असे. खरी गंमत तर तेव्हा असायची जेव्हा त्या मुली स्वतःला पूर्वीसारख अविवाहित समजून दंगा मस्ती करत एकमेकांना चिडवत झोक्यावर आधी कोण बसेल म्हणून वाद घालत बसायच्या. आपापसात गोंधळ सुरू झाला की मग कुणीतरी सुवर्णमध्य साधून तो वाद मिटवत असे. आता झोक्यावर कोण बसेल, त्या नंतर कोणाचा नंबर असेल असं आधीच ठरवून घ्यायच्या. तेव्हा वाटायचं की ह्यांच्यातील अल्लडपणा अजूनही टिकून आहे.


माहेरी आलेल्या सर्व सासुरवाशीण मुली झोक्याभोवती जमल्या की गप्पा गोष्टींना अक्षरशः उत यायचा. त्यांच्या बडबडीने परिसर दुमदुमून जायचा. मुलगी माहेरपणाला आली आहे म्हणून कुणी फारस त्यांना ओरडत नसे. उलट प्रौढ मंडळी कौतुकाने पाहत असे. थोड्या दिवसांसाठी वाट्याला आलेले सुख गोळा करणाऱ्या मुलींना कोण रागवेल बर. तसेही त्यावेळी मोठया व्यक्तींचा आदरयुक्त धाक सर्वच मुलींना असायचा. म्हणून त्यांनाही त्यांच्या सीमा माहित होत्या. जमलेल्या साऱ्याजणी चेष्टा मस्करी करत एकमेकांना झोका देत बसायच्या. झोक्यावर बसलेली मुलगी झोका खेळताना गाणे गात असे.त्यामुळे त्या गाण्याला हवेचा पण एका लयीत विशिष्ट सुर लागत असे.तिने गाणं म्हणायला सुरूवात करताच तिच्या मागे तिच्या जमलेल्या मैत्रिणी तिच्या गाण्याला साथ द्यायच्या. ह्याचं गाण्यांना पुढे आखाजीचे गाणे अशी लोकमान्यता मिळाली.


गाताना सासरचे गाऱ्हाणे गीतरुपात मांडले जायचे. नवरा, सासु, सासरे, दिर, नणंद यांच्या स्वभावाचे अनेक पैलू आपण म्हटलेल्या गाण्याद्वारे सांगितले जायचे. त्याचं गाण्यातून त्या मुलीची सासरची मंडळी कशी आहे किंवा तिला कसे नांदवले जाते हे कळत असे.झोक्यावर बसलेली मुलगी मनातलं सर्व गाता गाता बोलून मन मोकळं करायची म्हणजे परत सासरी गेली तरी मनात कोणतीच अढी न ठेवता सुरळीत संसार करू शकेल.


मला आठवतो त्यांच्यामध्ये लुडबुड करत मी खेळत असलेला झोका. लहान आहे म्हणून जरा ऐटीत बसायचं. एखाद्या ताईला मागुन जोरात झोका दे म्हणून जरा लडिवाळ सुरात विनवून बघायचं. पाय जमिनीवर टेकलेले नसायचे म्हणून मदत लागायची. अधांतरी असलेले पाय आणि दोन्ही हातांनी दोराच्या सहाय्याने घट्ट धरून बसायचं. ताईच्या हातांचा मागुन पाठीला धक्का लागताच हवेला चिरत वेगाने उंच उडायचं. तरंगणारे पाय आणि मनाला शहारे आणणारा वेग सगळं काही अद्भुत वाटायचं. त्यावेळी अस वाटायचं की आपण आकाशाला तर भिडणार नाहीत ना. क्षणभर जग विसरायला लावणारा अविस्मरणीय अनुभव असायचा तो. नंतर घट्ट दोर पकडुन हात जरा लाल झालेले असायचे. पण उडणाऱ्या पक्षासारखा अनुभव घ्यायचा असेल तर तितकं सोसावं लागेल. कुठेतरी अजूनही वाटत की मन त्याचं सुखद आठवणींमध्ये गुंतून पडलंय.


आखाजी म्हणजे दिवसभर झोका खेळून गप्पा गोष्टी रंगवत खापरच्या पुरणपोळीसह आमरसावर यथेच्छ ताव मारायचा हे लहानपणीच समीकरण मनात पक्क आहे. अजूनही आमच्या खान्देशकडच्या गावांमध्ये असेच झाडाला झोके बांधलेले दिसतील. माहेरी आलेली स्त्री त्या झोक्यावर बसून वाऱ्याचा झोतात झोके खात गाणे म्हणताना दिसली की समजायचं आखाजीला सुरूवात झाली. काळानुसार बरेच बदल होत गेले. पण झोका म्हटलं की माझ्या मनाच्या तळाशी माझ्या बालपणीची हीच एक सुंदर आठवण आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract