एक रम्य संध्याकाळ (भाग 7)
एक रम्य संध्याकाळ (भाग 7)
इकडे आई बाबा बाहेर गेल्यानंतर तरंग आणि रायशा घरात बसून विचार परामर्श करत बसले होते.
" अहो, ऐका ना. हे दोघं नक्की कुठे गेले असतील.?" रायशा तरंगला विचारत होती.
" माहीत नाही ग. बाबा काहीच कानोसा लागू देत नव्हते. मी घुमवून फिरवून खूप वेळा विचारून पाहिलं."
" हो ना. पण ह्या वयात आपल्याला कोणताच सुगावा लागू न देता असे कुठेही जाणे योग्य नाही ना. सांगून जायला काय हवं होत.?"
"हे बघ. ते आपल्याला काहीएक सांगायला बांधिल नाहीये. त्यांना हवं तेव्हा हवं तिथे ते जाऊ शकतात."
" हो पण आपल्याला सांगितलं असत तर काय बिघडलं असतं. आज मित्राचं नाव करून असे अचानक बाहेर निघून गेलेत. विचारलं तरी संपूर्ण माहिती न देता आपल्याला संभ्रमात टाकून गेलेत. हे सर्व चुकीचं आहे. त्यांच्या काळजीपोटी कशातच मन लागणार नाही आता. हे बाबा पण ना, कधी कधी कोड्यात वागतात."
"अग बाबांचं वागणं काही वेळेस कळत नाही. पण आपल्याला त्रास होईल किंवा आईला त्रास होईल असे ते कधीच वागणार नाही. त्यांना त्यांच्या जबाबदारीची पूर्णतः जाणिव आहे. उतारवयात अधूनमधून त्यांचं बालपण डोकावत असतं. तेव्हढ आपण समजून, उमजून, सांभाळून घेतलं पाहिजे. बाकी ते त्याचं निवृत्ती नंतरच आयुष्य मजेत घालवत आहेत. आपल्या कुणावर अवलंबून नाहीयेत."
" हो पण तरीही काही झालं म्हणजे? हे वय जीवाला जपण्याचं आहे. त्यांच्या तब्येतीच्या छोट्या मोठया कुरबुरी चालूच असतात. उगाच घरबसल्या काही संकट ओढवल म्हणजे? वास्तविक काही गरज नव्हती बाहेर जायची. पुढे काही चुकीचं घडलं तर त्याला कोण जबाबदार राहील. शिवाय आपण दोघं आपाल्या कामात व्यस्त असतो. त्यांना कोण बघणार.?" रायशा तावातावाने बोलत होती.
"तू पण ना कुठल्या कुठे विचार करत बसतेस. उगाच काहीएक घडलेलं नसताना नकारार्थी विचार डोक्यात घेवुन बसण्यात काय अर्थ आहे. आता पर्यंत काही झालंय का? कशावरून आज पण होईलच?"
" हे बघा. मला अस नव्हतं म्हणायचं. आपल्यात आणि त्यांच्यात खूप फरक आहे. पूर्वीसारखे ते दोघं तरुण नाहीयेत. त्यांना वयाच बंधनही आडव येत. तारुण्यात जशी आपल्या सारखी तब्येत असते तशी नाहीये आता त्यांची. अशी दगदग झेपणार आहे का त्यांना."
" मग हे अस तर कोणत्याही वयात होऊ शकत. म्हणून काय घराबाहेर पडूच नये का? जाणूनबुजून तर कुणी संकट ओढवून घेत नसत. पण एखादी अशी परिस्थिती निर्माण झालीच तर तिला शांत आणि संयम राखून कसं हाताळाव हे ही कळलं पाहिजे. असही पूर्ण आयुष्य आपण स्वतःला किंवा आपल्या माणसांना जपण्यातच घालवत असतो. मग काय आयुष्यभर आपण स्वतःला सुरक्षित राहण्यासाठी कोंडून ठेवायचं का.?"
"मला तस नव्हतं म्हणायचं."
"आपण तर रोज कामासाठी बाहेर पडतो. काहीही होऊ शकत. दुर्दैवाने आपल्यावर अशी परिस्थिती ओढवली तर ते काय आपल्याला टाकून देतील का?. ते आपल्याला कधीही, कोणत्याही गोष्टीसाठी मज्जाव करत नाही. मग आपण का करायचा.?"
" मलाही त्यांची तितकीच चिंता आहे. जितकी तुम्हाला आहे. मनातल्या काळजीपोटी सकारात्मक, नकारात्मक विचार थैमान घालताय. दोघांनी सुखरूप घरी यायला हवं. इतकंच मला वाटत. आता मनात जे आलं ते मी तुम्हाला बोलून दाखवलं."
" तुला काय वाटतं. बाबांनी ह्या सर्व बाबींचा विचार केला नसेल का?"
" हो पण आपल्याला कळायला हवं ना की दोघं कुठे गेलेत. नाहीतर राहून राहून मनात तोच विचार येईल. बाबांना काही विचारायची सोय पण नाहीये. ते येईपर्यंत त्यांच्या काळजीने जीवाला घोर लागून राहिल आता."
" त्याची काळजी करू नको ग. खर तर मीच त्यांच्या मागे मागे जाणार होतो. पण तो रिक्षाचालक ओळखीचा निघाला. मी त्या रिक्षावाल्या भावाला बोललोय की आई बाबांना सोडल्यानंतर लगेचच मला कळव. माझा नंबर देवून आलोय मी त्याला."
" हे बर केलं. पण नक्की सांगेल ना तो."
तेव्हढ्यात रिक्षाचालकाचा त्याला फोन आला. पलीकडचं सर्व ऐकून त्याने फोन कट केला.
" त्याने आई बाबांना बस स्टँडला सोडले आहे. हे दोघं नेमके कुठे जात असतील?"
तरंगला चालकाने जी माहिती दिली ती त्याने रायशाला सांगितली.
दोघंही विचारात पडले.
"काय आहे हे. आता काय समजायचं आपण." रायशाच्या तोंडून वैतागलेला सुर बाहेर पडला.
"तू थांब ना. बघू आपण. बाबांना पण आपली काळजी असेलच. कळवतील ते ही आपल्याला."
आणि त्याचवेळी क्षितिजरावांचा तरंगच्या मोबाईलवर मेसेज आला. त्याने तो मोठ्याने वाचला.
"बेटा तरंग. मी तुझ्या आईला आज चौपाटीवर फिरायला घेवुन चाललोय. तिच्यासाठी सरप्राइज होत म्हणून तुम्हाला पण सांगितलं नाही. आम्ही सुखरुप आहोत. काळजी करू नये."
मेसेज वाचून दोघांचा जीव भांड्यात पडला.
" मग स्पष्ट सांगून जायला काय हरकत होती. आपण नाही थोडीच म्हणणार होतो." रायशा निराशाजनक शब्दात बोलली.
"जाऊ दे. बघ बाबांनी स्वतःहून सांगितल ना. आता आपल्याला कळलय की नेमकं कुठे गेलेत ते दोघं. नको जास्त विचार करू. येतील ते त्यांचे त्यांचे. चल आता आपण आपापल्या कामाला लागू."
