दही वाळत घालणे.
दही वाळत घालणे.
रूकमाबाई म्हणजे उंची पुरी तगडी बाई. धरधरीत नाक. मोठे काळेभोर डोळे. भव्य कपाळ. कपाळावर दहा रुपयाच्या शिक्क्या एवढा कुंकवाचा टिळा. पांढरे शुभ्र छान एकसारखे शिस्तीत व ओळीत उभे असलेल्या मुलांसारखे दात. मानेच्या थोडे वर केसांचा भला मोठा अंबाडा बांधलेला व तो प्लास्टिकच्या जाळीने सुरक्षित केलेला. दांडगी बाई. कष्ट करायला उतरली तर बापे मंडळी तिच्या समोर हात टेकायचे. कितीही मोठे लुगडे आणले तरी रूकमा बाईला लहान पडायचे. रुकमाबाई काष्टा घोळ नऊवार लुगडे व गाठ मारायची चोळी घालायची. रुकमाबाईच्या कष्ट करून व रोज कमीतकमी पाच किलोमीटर पायी चालून टणक झालेल्या काळ्या पिंडर्या झाकणे कोणत्याहि ब्रांडच्या लुगड्याला शक्य झाले नव्हते. डाव्या पायात चांगले पंचवीस तोळ्याचे चांदीचे कडे. हातात पाटल्या, बिलवर, तोडे. उजव्या दंडावर सोन्याची वाकी. गळ्यात मंगळसूत्र, सोन्याचा चपलाहार, ठुसी, लक्ष्मीहार. कंबरेला साडीवर बांधलेला चांदीचा कंबरपट्टा. चांगले सोन्याचे घवघवीत कानातले. त्यांच्या वजनामुळे कानाच्या पाळ्या लोंबकळत होत्या. नाकात डाव्या बाजूला खड्याची मोरणी. पचपच तेल लावून घातलेला अंबाडा. कधीकधी बटबटीत कोणत्याही रंगाच्या गावरान फुलांचा अंबाड्यावर गजरा. पायात जुन्या टायरच्या चपला. रुकमा बाईचा रंग मात्र गड्द काळा. डोक्याला जास्त तेल लावल्याने चेहरा सदैव तेलकट. कर्नाटकातून लग्न होवून मराठवाड्यात आलेली. मराठी बोलताना कन्नड भाषेचे शब्द मराठीत सढळ जीभेने मिश्रण करायची. मराठी शब्दांचा उच्चारही हेल काढून कन्नड भाषे सारखा करायची.
रूकमाच्या लग्नाला आता वीस वर्षे झाली होती पण गावरान मराठवाडी भाषेनी काही तिला पूर्णपणे आपले करून घेतले नव्हते. रुकमाबाईला गावातले भले भले म्हणणारे पठ्ठे पहेलवानही घाबरायचे. रूकमाबाई म्हणजे अचाट शक्ती व धैर्य याचे ज्वलंत उदाहरण होती. एकदा एका पहेलवानाला तिने कंबरेवर लाथ मारली होती तर तो पहेलवान सहा महिने तिरपे चालायचा. बाजारातून निघाली तर दुकानदार रूकमाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचे. रूकमाचा नवरा तिच्या एकदम उलट. स्वभावाने अतिशय गरीब माणूस. प्रकृतिने किडकिडीत. रोड. विडी पिणारा आणि गायीसारख्या स्वभावाचा. नावसुद्धा गरीब स्वभावाच्या माणसाचे असते तसेच होते. त्यांचे सदाशीव नाव होते. सगळे सदाशीवांना सावकार म्हणून बोलवायचे. बाजारात एकदा कोणीतरी सावकाराची मित्र म्हणून काहीतरी थट्टा केली. ही गोष्ट रूकमाला कळाली. रुकमाने बजारात जाऊन सावकाराच्या त्या मित्राला बेदम मारले. कुत्र्याला जसे पळवून पळवून मारतात तसे मारले त्याला. संपूर्ण बाजारात कोणाचीही मजाल झाली नाही की मध्ये पडून त्या माणसाला वाचवावे. त्या माणसाची पोर मध्ये पडली नाहीत तिथे दुसर्यांची काय बिशाद होती. झाले काय की त्या दिवसापासून सावकाराची, लोकानी स्वप्नातसुद्धा थट्टा करणे सोडून टाकले. एवढी पार्श्वभूमी लिहिण्याचे कारण हे आहे की या प्रकरणानंतर हळूहळू रूकमाबाईला भांडायची सवय लागली.
सवय काय व्यसनच लागले म्हणावे लागेल. तिला रोजच्या रोज ताजे भांडण हे लागायचेच. गावातील लोक तिच्या या व्यसनाला कंटाळून गेली. भांडण उकरून काढायची तिला खोड लागली. सिंह जसा जंगलात शिकार हुडकायला निघतो तशी रूकमा भांडणासाठी पार्टी हुडकायला गावात फिरू लागली. वाढत वाढत तिचे भांडणाचे वेड एकदम पराकाष्ठेला गेले. दिवस रात्र ती फक्त भांडण काढण्याची कारणे शोधू लागली. ती घरातून बाहेर निघाली की गावात करफ्यु लागाल्यासारखे व्हायचे. रुकमाच्या घरी काम करणार्या गड्याला गाववाल्यानी फितवला होता. रुकमा घराबाहेर पडली की हा गडी माळवदावर जाऊन पांढरे धोतर झटकून माळवदाच्या कठड्यावर वाळू घालायचा. रुकमाबाई परत घरी आली की तो ते धोतर काढून टाकायचा. अशाने रूकमाला पाठोपाठ आठ आठ दिवस सावज मिळेनासे झाले. बिचारी कंटाळून जायची. तिची तडफड व्हायची पण काही इलाज नव्हता. तिलाही काही युक्ती सुचत नव्हती. बर कधी एखादा गाफील प्राणी भेटला तर तोही भांडायचा नाही. गावाचे धोरणच होत की रुकमाला उलट उत्तर द्यायचे नाही. ती जी म्हणेल ती पूर्व दिशा. रूकमाला एक दिवस विहिरी वरून स्नान करून परत येत असलेले गोविंददेव गावले. गरीब भिक्षुकी करणारा ब्राम्हण माणूस. रूकमा गोविंददेवाला शिकारी सावजाला जसे पाहतो तसे पहात होती. गोविंददेवाला घाम फुटत होता. गोविंददेव उगीचच अजिजी करत म्हणाला रूकमक्का माझे अजून आन्हिक व्हायचे आहे. मी जरा घाईत आहे. मला भूक पण लागली आहे. गोविंददेवाची ती तडफड पाहून रूकमाला बरे वाटले. गोविंददेव पुढे म्हणाले उपाशी ब्राम्हणाला अडवून धरण्यासारखे घोर पाप या जगात काही नाही. रुकमाला गोविंददेवाची दया आली. तिने गोविंददेवाची वाट सोडली, मागे वळून पाहते तर गोविंददेव अजगराच्या तावडीतून सुटलेल्या सस्यासारखा पळत होते. तिला ते दृश्य पाहून बेजान हसू फूटले. रूकमा वेगवेगळ्या वेळेवर बाहेर जाऊन येऊ लागली. रूकमाला कशाचाही फायदा होत नव्हता. रूकमाबाई अर्धा अर्धा तास शोध घेऊन घरी परत येऊ लागली. गड्याचे रुकमावर लक्ष असायचेच.
सावकाराचे एकट्याचेच गावात तीन मजली घर होते. गावात सगळ्यात उंच घर सावकाराचेच होते. गडी माळवदावर जाऊन गच्चीच्या कठड्यावरचे वाळत घातलेले धोतर काढल्यावर, गावातील दळणवळण सुरू होत असे. रुकमाला आता काळजी वाटू लागली होती. तिच्याशी कोणी भांडत नव्हते. मस्त तास दिडतासाचे भांडण होऊन आता कितीतरी दिवस झाले होते. घरातील मंडळीसुद्धा ती जे म्हणेल त्याला हो म्हणायची. रुकमाची सुनसुद्धा महाबिलंदर होती. सासूची भीती पण होती आणि तिला अद्दल घडावायची तीव्र इच्छासुद्धा होती. सून बारावीपर्यंत शिकलेली होती. तिच्या डोक्यात विचार आला की सासूला भांडण काढायचे कारण द्यावे. दुसर्या दिवशी ती सासूला म्हणाली, "शेजारणी कडून चुलीसाठी विस्तु मागुन आणा." रुकमा विस्तु आणायची प्लेट शोधू लागली. सूनबाई म्हणाली "प्लेटमध्ये विस्तु मागीतला तर भांडण कसे निघेल." सूनबाई म्हणाली "पदरात घेऊन या विस्तु." रूकमाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ती शेजारी रहाणार्या मालनबाई कडे पोहचली.
मालनबाईला रुकमाला आपल्या घरी आलेली पाहून छातीत धस्स् झाले. रुकमाने मालनबाईला अतिशय प्रेमाने चुल पेटली का म्हणून विचारले. मालनबाईच्या लक्षात रुकमाचा डाव आला नाही. मालनबाई गाफिल होती. ती म्हणाली, "पेटली की माय." रूकमा म्हणाली, "नक्कर विस्तु पायजे होता." मालनबाई म्हणाली "ने की माय त्यात कोनच अपरूप हाय." असे म्हणून चिमट्यात विस्तु पकडून मालनबाईने रूकमाला "प्लेट कुठ हाय" म्हनून विचारले. रुकमानी आपला पदर पुढे केला. "विस्तु हेच्यात घाला मालनबाई" म्हनून रूकमान पदर दाखवला. तेव्हा मालनबाईला रूकमाचा डाव लक्षात आला. रुकमाला भांडायची खमखूमी आलेली होती. विस्तू पदारत टाकला तर भांडण अन् नाही म्हनल तर बी भांडण. मालनबाई जाम अडकली होती. मालनबाईची सूनही फार हुशार होती. मालनबाईची सोडवणूक करण्यासाठी ती म्हणाली "अस कस करतेस गं अत्ते, म्या इरोबाला मागून घेतलया नव्ह का की वरीस भर इस्तु कोनासबी दिना म्हनून." मालनबाईला एकदम हायस वाटल. ती रुकमाबाईला म्हनली "बर झाल बाई माझ्या सूनेने वाचवल नाय तर केवढ मोठ पाप झाल असत माझ्या हातन्." मालनबाईने विस्तु परत चूलीत घातला अन रुकमा कडे हसून म्हणाली, "काय बी समजू नगस रुकमा देवाच हाय नाय तर म्या तर विस्तु काढलाच होता." रुकमाला काही भांडता आले नाही. घरी येऊन तिने सुनेला सांगितले, "मालनबाईच्या सूनेच्या लक्षात आपला डाव आला होता." सुनेने दुपारी गल्लीत उन आल्यावर घरासमोर परातीत दही वाळवत बसायला सांगितले. रुकमाला ही गोष्ट फार आवडली. सगळी कामे झाल्यावर दुपारी रुकमाने परातभर दही घरासमोर उन्हात वाळवायला ठेवले. कोणी तरी विचारावे की दही कशासाठी वाळवताय म्हणून, याची वाट पाहू लागली. पंधरा मिनिटात रुकमाबाईचे काम झाले. मालनबाईला रहावले नाही तिने न राहवून रूकमाला "दही का वाळवतीस गं?" म्हणून विचारले. रूकमा म्हणाली, "माझ दही आहे मी वाळवते नाही तर मोरीत घालते तुला काय करायचंय." शब्दाने शब्द वाढतच गेला व मालनबाईचे व रूकमाचे दोन तास जोरदार भांडण झाले. गल्ली सगळी भांडण पहायला उलथली. दोन तास सगळ्यांची करमणूक झाली. दोन तीन बोके मिळून परातभर दही खाऊन पसार झाले. मालनबाईच्या तोंडून पुन्हा निघाले, "रुकमा बोके दही खाऊन गेले की गं." पुन्हा दोघांची जुंपली. याला म्हणतात "दही वाळत घालून भांडण काढणे."
