Sanjay Udgirkar

Inspirational

3  

Sanjay Udgirkar

Inspirational

देणारा

देणारा

4 mins
132


गंगाधरपंत शास्त्री व गोदाबाई म्हणजे सुमंतनगरा मधले फार मोठे प्रस्थ होते. राजदरबारी गंगाधरपंत हे राज पुरोहित म्हणून काम पहात असत. हे काम त्यांच्या घराण्यात पूर्वपार चालत आलेले. जसे राजा सुमंतआर्यला राज्य सिंहासन मिळाले होते तसेच गंगाधरपंताना राज पौरोहित्य मिळाले होते.  राजा सुमंतआर्य, हे त्यांच्या घराण्यातले बारावे राजे. त्यांच्या घराण्याचे आर्य राज्यावर अविच्छिन्न सातशे वर्षांपासून राज्य चालू होते. तसेच गंगाधरपंताच्या घराण्याचे सुद्धा अविच्छिन्न राज्य पौरोहित्य चालू होते. गंगाधरपंता नंतर मात्र त्यांच्या घराण्यापासून राजपुरोहीतचा मान जाणार होता. 


गंगाधरपंतांना अपत्य नव्हते. गंगाधरपंतांना सुमंतआर्याच्या राजवाड्यात सगळीकडे मुक्त प्रवेश होता. गंगाधरपंतांकडे कल्पने पलीकडेचे ऐश्वर्य जमा झाले होते. गंगाधरपंत व गोदाबाई अवर्णनीय ऐश्वर्याचे मालक असूनही फार साधे रहायचे. जेव्हा अपत्य होण्याच्या सर्व आशा संपल्या, मार्ग कुंठला तेव्हा त्या दांपत्याची धन-संपत्तीची आसक्तीही पूर्णपणे संपली. 


गंगाधरपंतांना त्यांच्या संपत्तीची योग्य ती विल्हेवाट सुद्धा लावायची होती. आर्यसुमंतच्या राज्यात सुबत्ता नांदत होती. पराकाष्ठेचे सुशासन होते. अतिशय कार्यकुशल न्याय व्यवस्था होती. आर्यसुमंतच्या राज्यात कोणी भिकारी नव्हता. गंगाधरपंतांचे चुलतभाऊ देवीदासपंत हेच गंगाधरपंतांचे जीवलग मित्रही होते. सल्लागारही होते व मार्गदर्शक पण होते. देवीदासपंताना गंगाधरपंताचा चेहरा पाहून मनातले कळत होते इतके त्यांचे नाते घनिष्ठ होते. 


एकदा गोदाबाई त्यांच्या धन ठेवायच्या खोलीची स्वच्छता करत असताना एका सोन्याच्या मोहरांनी भरललेली रेशमी कपड्याची पिशवी थप्पीतून घरंगळून गोदाबाईच्या पायावर पडली. सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या पिशवीच्या माराने गोदाबाईच्या उजव्या पायाची करंगळी तुटली. वैद्याला बोलवण्यात आले. वैद्य योग्य तो इलाज करून जाते झाले. गोदाबाई गंगाधरपंतांना अतिशय अजिजीच्या स्वरात म्हणाल्या की काहीही करा पण या उपयुक्त नसलेल्या व अति झालेल्या धनाला घरातून घालवा. गंगाधरपंतांना हे करण्यासाठी योग्य मार्ग सापडत नव्हता. शेवटी त्यांनी देवीदासपंतांना काहीतरी मार्ग सुचविण्यासाठी सांगितले. देवीदासपंत मजेत म्हणाले, "गंगाधरपंत सगळ्यात सरळ व सोप्पा राजमार्ग हा आहे की दर शुक्रवारी होणार्‍या राजसभेमध्ये आपण राजे सुमंतआर्याला जोडा फेकून मारा. ताबडतोब तुमची सर्व संपत्ती जप्त होईल." गंगाधरपंतांनी बरेच दिवस विचार करून ह्या मार्गाचा अवलंब करायचे ठरवले. गोदाबाईला या निर्णयाची माहिती दिली. गोदाबाईने सुद्धा होऊन जाऊ द्या म्हणून सहमती दर्शवली. 


दर शुक्रवारी होणार्‍या राजसभेमध्ये गंगाधरपंतांचे आसन सिंहासनाच्या खाली व राजाच्या सिंहासना जवळचे होते. गंगाधरपंत ज्या शुक्रवारी हे कांड करणार होते तो शुक्रवार उगवला. सहसा राजे सुमंतआर्य हे सकाळी अकरा वाजता राजसभेत यायचे व ही राजसभा राज्याची व जनतेची कामे पूर्ण होईपर्यंत चालायची. ह्या शुक्रवारी सुद्धा तेच झाले. राजे सुमंतआर्य बरोबर अकरा वाजता सिंहासनावर स्थानापन्न झाले. सुरुवातीची औपचारिकता संपल्यावर खरी राजसभा सुरू झाली. गंगाधरपंत उठले, पायातला जोडा हातात घेतला व राजाच्या दिशेने भिरकावला. तो जोडा जाऊन राजाच्या मुकूटाला लागला. राजाचा मुकुट डोक्यावरून खाली पडून घरंगळत सर्व सभेत उपस्थित असलेल्यांच्या मधून थोडा पुढे जाऊन थांबला. सगळी राजसभा आश्चर्यचकित झाली. असे काही होऊ शकते व ते आपल्या समोर होत आहे का? असा भाव सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. 


राजे सुमंतआर्याच्या शिपायाने धावत जाऊन तो घरंगळून थांबलेला राजमुकट उचलला, इकडे राजा रागाने लालबुंद झाले होता व त्याने तत्क्षणी गंगाधरपंतांना मनोमन मृत्यूदंड द्यायचे ठरवले. सगळी राजसभा भीतीने थरथरत होती.


ज्या शिपायाने तो राजमुकट उचलून दोन्ही हातात धरला होता, त्याच्या व सर्व सभेच्या देखत त्या राजमुकूटातुन एक काळाभोर हातभर लांब, अतिशय बारीक अंगाचा, अति जहाल विषारी व चपळ साप बाहेर पडला. त्या सापाने शिपायाला दंश केला व तो खाली पडला, ताबडतोब दुसर्‍या शिपायाने त्या सापाला भाल्याच्या टोकाने छेदले व तिथल्या तिथे जेरबंद केला. 


सगळी राजसभा हा जादूचा खेळ तर नाही ना अशा नजरेने समोर जे घडत होते ते पहात होती. 


ज्या शिपायास सापाने चावले तो शिपाई धडकन जमीनीवर पडला. त्याच्या तोंडातून फेस निघायला सुरू झाला व तो शिपाई दोन क्षणात सर्वा देखत गतप्राण झाला.


राजे सुमंतआर्य सिंहासनावरून उतरून धावत पळत गंगाधरपंता जवळ आले. त्यांनी चक्क गंगाधरपंतांच्या पायावर डोके ठेवून अश्रूनी त्यांच्या पायाला अभिषेक केला. सगळी राजसभा हे दृश्य पाहून गहिवरून गेली. सगळ्यांनी गंगाधरपंतांच्या सन्मानात गंगाधरपंताकडे पाहत दोन्ही हात जोडून नमस्कार केला. 


बाकीच्या शिपायांनी चटकन, मेलेल्या शिपायाचे प्रेत उचलले व राजसभेच्या बाहेर घेऊन गेले. 


राजे सुमंतआर्यांनी उभे राहून गंगाधरपंतांचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेऊन बोलायला सुरुवात केली, 


"गंगाधरपंत आज तुमच्यामुळे माझा प्राण वाचला. ह्या ऋणातून मी व आर्य राज्य कधीही बाहेर पडू शकणार नाहीत. ह्या दिवसा पासून आर्य राज्यात तुम्हाला माझ्या एवढाच मान मराताब राहिल. दर शुक्रवारी होणार्‍या राजसभेत तुम्ही स्थानापन्न झाल्यावरच बाकीचे सर्व सभासद आपआपल्या आसनावर बसतील. आज पासून या सभेत तुमच्या आधी सिंहासनावर बसण्याचा अधिकार आर्य राज्याचा राजाला सुद्धा असणार नाही." 


प्रधानमंत्र्यांना मी हा आदेश देत आहे की त्यांनी आत्ताच्या आत्ता गंगाधरपंताच्या घरी जावे व त्यांच्या घरी ह्या क्षणी जेवढे धन आहे ते चौपटीने सूर्यास्त होण्यापूर्वी वाढवावे.


एवढे बोलून राजे सुमंतआर्य राजसभेतून आपल्या महालात निघून गेले.


राजसभेतील इतर मानकरी सदस्य गंगाधरपंतांच्या जवळ येऊन त्यांचे अभिनंदन करत राजसभेतून जात होते. 


गंगाधरपंत सुद्धा राजसभेतून घरी पोहंचायच्या आधी प्रधानमंत्री त्यांच्या घरी हजर होते. त्यानी त्यांच्या धन ठेवायच्या खोलीचा ताबा घेतला होता. 


गंगाधरपंतांनी गोदाबाईला राजसभेत झालेला प्रकार जसा झाला तसा सांगितला. गोदाबाईने हे मान्य केले की देणारा जेव्हा द्यायचा विचार करतो तेव्हा त्याला काही आडवे येऊ शकत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational