कापसाचे झाड
कापसाचे झाड
विष्णूपंत जोशींचे व उस्मान खाटकाचे शेत एकमेकांच्या शेताला लागून होते. दोघांचीही शेती वडिलोपार्जित. दोघांनाही वारसाहक्काने मिळालेली. विष्णूपंताची चाळीस एकर जमीन आणि उस्मान खाटकाची तेवीस एकर. उस्मानच्या शेताच्या उत्तर दिशेचे शेत विष्णूपंताचे आणि उस्मानच्या शेताच्या बाकीच्या दिशेचे शेजारी मुसलमानच.
विष्णूपंताना दक्षिणेकडे उस्मान खाटीक, पुर्वेला व पश्चिमेला मराठ्यांचे व उत्तरेला नारायणराव कुलकर्ण्यांचे शेत.
सगळ्यांना सगळ्यांच्या शेतातून जाण्या येण्यासाठी अधिकार होता. म्हणजे वहीवाटीचा हक्क होता. बैलगाडी जाण्यायेण्या इतपत मार्ग शेताच्या कडेने सोडला होता.
सगळे शेजारी शेतकरी एकमेकांशी छान नातं बाळगून होते. सर्वांना शेजारधर्माची जाणही होती. अपवाद म्हणजे उस्मान आणि विष्णूपंत. या दोघांमध्ये छत्तिसचा आकडा. त्यांचे हे भांडण सुद्धा पिढीजात होते. दोघांना शेतासारखे वारसाहक्का अंतर्गत मिळालेले व ह्या दोघांनीसुद्धा त्यांच्यातील वडिलोपार्जित वैर त्यांच्या पुर्वजांच्या इतकेच तेवत ठेवले होते.
त्यांच्यातील भांडणाचे तसे कांही विशेष कारण नव्हते म्हणून ते कारण नसतानाही केंव्हाही कोठेही त्या दोघांमध्ये भांडण पेटायचे. हे दोघे पूर्ण गावासाठी करमणूक होते. सारखी एकमेकांची निंदा करायची आणि भांडण नाही तिथेही उकरून भांडणं काढायचे. आता अगदी ताजे भांडण कशाचे तर....सांगतो थोडे थांबा.
विष्णूपंतांच्या शेतात एक छान कापसाचे झाड होते. गावातील सर्व ब्राम्हण मंडळी ह्या झाडाच्या कापसाची बोंड घेऊन जात आणि त्या कापसाच्या बोंड्यातून निघालेल्या कापसापासून ते यज्ञोपवीत तयार करीत. श्रावणीच्या दिवशी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी सर्व ब्रह्मवृंद सामुदायिकरित्या उपकर्म करून यज्ञोपवीत बदलतं. म्हणून विष्णूपंताच्या शेतातल्या कापसाच्या झाडाला गावात विषेश आणि आदराचे स्थान होते. आता उस्मान खाटकाचे आणि विष्णूपंताचे यांच्यात पेटलेले अगदी ताजे भांडण त्याबद्दल.
परवा विष्णूपंतानी, उस्मान खाटकाच्या आणि त्यांच्या शेतात असलेल्या बंधाऱ्यावर बसून उस्मान खाटकाच्या शेतात उजव्या कानाला जानवे गुंडाळून बसून आरामशीरपणे लघुशंका केली. दुरून हा सगळा प्रकार उस्मान खाटकाने पाहीला.
उस्मान खाटकाला या लघुशंके मुळे भांडण्याचे जोरदार कारण मिळाले. तेव्हाच्या तेव्हा तिथेच दोघामधे खूप भांडण झाले. बाचाबाची झाली. शेजारपाजारच्या शेतातील मालक व कामगार मंडळी जमली. मग सगळ्यांच्या मध्यस्थीने ते भांडण सुटले. उस्मान खाटकाने ही घटना सगळ्या गावात पसरवली. जो तो विष्णूपंतांच्या लघुशंकेबद्दल बोलत होता. उस्मान खाटकाने नारायणराव कुलकर्ण्यांना लघुशंका करताना विष्णूपंत उजव्या कानावर जानवे का गुंडाळले होते हे विचारले व नकळत नारायणरावांनी ती अत्यावश्यक धार्मिक बाब असल्याचे सांगितले.
जानवे कानाला न गुंडळाता लघुशंका करताच येत नाही व केल्यास घोर पाप होते व तसे करणार्यास समाजातून काढून टाकले जाते, इत्यादी इत्यादी आणि अनावश्यक माहिती नारायणरावांनी उस्मान खाटकाला दिली.
नारायणरावांना उस्मान खाटकाच्या डोक्यात काय चालले आहे याचा अंदाजा आला होता, त्यानी पण मग जानव्याचे कानावर बांधण्याचे महत्व भरपूर तिखट मीठ लावून उस्मान खाटकाला सांगितले. ओघात विष्णूपंताच्या शेतातल्या कापसाच्या झाडाचे महत्त्वही अवाच्या सव्वा चढवून सांगितले.
उस्मान खाटकाने असा विचार केला की विष्णूपंताच्या शेतातील कापसाचे झाड कापून टाकले म्हणजे कापूस नाही.
कापूस नाही म्हणजे दोरा नाही आणि दोरा नाही म्हणजे जानवे नाही आणि जानवे नाही म्हणजे लघुशंका नाही. याच्या पुढचा कांही विचार उस्मान खाटकाने केलाच नाही.
उस्मान खाटकाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता रात्री अंधारात विष्णूपंतांच्या शेतातील एकूलते एक कापसाचे झाड कुर्हाडी ने तोडून टाकले.
जेव्हा विष्णूपंतांच्या गड्याने सकाळी शेतात गेल्यावर हा प्रकार पाहिला, तेव्हा तो आल्या पावली परत विष्णूपंतांच्या घरी गेला. जो प्रकार पाहिला तो जसाच्या तसा घरच्यांना सांगितला.
विष्णूपंतांच्या लगेचच लक्षात आले की उस्मान खाटका शिवाय हे काम इतर कोणाचेही असूच शकत नाही.
त्यांनी ही बातमी त्या गड्याला सगळ्या गावात पसरवायला सांगितली व स्वतः घाई घाईत आपल्या शेतात ते तोडलेले कापसाचे झाड पहायला गेले.
वाटेते जेवढी माणसे भेटली त्यांना ही बातमी देत व आपल्या बरोबर घेत ते शेतावर पोहोचले.
कापून पाडलेल्या कापसाच्या झाडाकडे पाहून विष्णूपंतांना खूप वाईट वाटले व ते थोडा वेळ तिथेच त्या झाडाकडे पहात बसले. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व मंडळींना पण खूप वाईट वाटले.
झाडाबद्दल बोलता बोलता मंडळींनी झाडाला लागलेली कापासाची सर्व बोंडे तोडून पार केली व पडलेल्या झाडाला बोडके करून टाकले.
तिथून ती सर्व मंडळी, चावडीवर सरपंचांकडे उस्मान खाटका विरुद्ध तक्रार नोंदवायला पोहोचली.
इकडे विष्णूपंतांच्या गड्याने ही बातमी दवंडी पिटवावी तशी सर्व गावात पसरवली.
गावकरीही म्हणाले चला कांही तरी नवीन करमणूकीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. गावकरी मंडळीनी अंदाज लावला की ही भानगड आता चावडीत येणार म्हणून सगळी गावकरी मंडळी हातातले काम सोडून चावडीवर पोहोचली.
बघता बघता चावडीवर झुंबड गर्दी जमली.
सरपंच होते. बाकीचे पंचही होते. ग्रामपंचायतीचे कर्मचारी होते. एकदम कोरम फुल होता.
विष्णूपंतही तिथेच होते.
उस्मान खाटकाला बोलवून आणण्यासाठी ग्रामपंचायतीचा शिपाई पाठवण्यात आला होता.
सगळेजण उस्मान खाटीक येण्याची वाट पाहत बसले होते.
वीस मिनिटात उस्मान खाटीक व त्याच्या बरोबर वीसपंचवीस लोक ग्रामपंचायतीमध्ये येऊन धडकले.
ग्रामपंचायतीत बराच वेळ विष्णूपंताचे व उस्मान खाटीक यांच्यात जोरदार भांडणे चालत राहिले. सर्व उपस्थित मंडळींनी आळीपाळीने दोन्ही पक्षा कडून बोलून भांडण चालू ठेवले व आपली करमणूक करून घेतली. हळूहळू लोकांना ह्या भांडणाचा कंटाळा येऊ लागला आणि लोक कमी कमी होत गेले.
सरपंचांना ह्याची सवय होती. ते आरामात बसून पान तंबाखू खात अगदी आवश्यकते पुरते लक्ष त्यांच्या समोर चालू असलेल्या भांडणात घालत होते. कधी हो हो तर कधी नाही नाही असे धोरण होते सरपंचांचे.
त्यानी मनोमन ह्या भांडणाचा निर्णय कसा करायचा हे ठरवले होते. ते योग्य वेळ आली की अपले अस्त्र बाहेर काढणार होते.
एक तासाभराच्या आत, वीस एक लोक सोडून बाकीचे सगळे लोक निघून गेले. सरपंचानी सर्वांसाठी चहा व बिस्किटे मागवली. चहापाणी बिस्किटे फस्त झाल्यावर सरपंचचनी बोलायला सुरवात केली.
सरपंच पक्के मुरलेले राजकारणी होते. पंचवीस वर्षापासून या गावाचे निर्विरोध निवडून येणारे या पंचक्रोशीतले ते एकमेव सरपंच होते.
त्यानी त्या दोघांची अगदी सौम्य व जवळकीच्या नात्याने अर्धा तास कान उघडणी केली.
दोघांना आपल्या चुकीची जाणीव झाली.
सरपंच म्हणाले तुम्हा दोघांच्या भांडणात निष्पाप कापसाच्या झाडाचा जीव गेला.
उस्मान खाटकाला जाणीव झाली व खूप पश्चात्तापही झाला.
सरपंचानी उस्मान खाटकाला विष्णूपंतांच्या शेतात पाच, त्यांनी तोडलेल्या कापसाच्या झाडाच्या जातीचेच पाच नवीन कापसाची झाडे लावण्याचा फर्मान दिला व सोबत हेही सांगितले की नवीन लावलेली पाचही झाडे मोठी होईपर्यंत त्यांची निगा व देखभाल उस्मान खाटकानेच करायची आहे.
झाडे मोठी होऊन कापसाची बोंड येतील तोपर्यंत गावातल्या सर्व ब्राम्हण मंडळींना दर श्रावणीला लागतील तेवढी यज्ञोपवीत तालुक्याहून उस्मान खाटकाने आधीच आणून द्यायची असे फर्मावले.
विष्णूपंताना बंधाऱ्यावर उस्मानच्या शेतात लघुशंका केल्याबद्दल पन्नास रुपयांचा नगदी दंड लावला.
दोघांनी हा न्याय मान्य केला. कागदपत्रे तयार झाली. साक्षीदारांच्या समोर सह्या झाल्या.
विष्णूपंतांनी व उस्मान खाटकाचने चहा बिस्किटे यांचा खर्च व उद्या या न्यायाची गावात दवंडी दिली जाणार होती, त्या दवंडी देणार्याचा पूर्ण दिवसाचा खर्च वाटून घेतला.
सरपंच व इतर पंचाना नमस्कार करून ते दोघे ग्रामपंचायतीच्या बाहेर पडले.
दोघांनी एकमेकांना केविलवाण्या पद्धतीने पाहिले आणि आपआपल्या मार्गाला लागले.
समाप्त.
ही एक तामिळ लोककथा आहे. मला ही लघु लोककथा श्री. शंकर नारयण कुळथु यांनी सांगितली होती. मी त्यात आवश्यक तो बदल करून सर्व वाचकांसमोर ठेवीत आहे.
