पांथस्थ
पांथस्थ
गावात श्रीमंत म्हणून नावाजलेले ब्राह्मणाचे घर म्हणजे दिगंबंरपंत कुलकर्णी यांचे. कुलकर्णी म्हणजे गावाचे दिवाणजी किंवा पटवारी. गावाच्या शिवारात असलेल्या सर्व प्रकारच्या जमीनींचे रेकॉर्ड ठेवणे. महसूल वसूल करणे व सरकारी खजिन्यात जमा करणे. जमीनींचे रेकॉर्ड अदययावत ठेवणे. जमीनींचे मालक बदलले तर तसे जमीनीच्या रेकॉर्डमधे सुद्धा फेरफार करणे. ज्यांना आवश्यक असतील त्यांना या रेकॉर्डचे उतारे देणे. कुलकर्णी पद हे वंशपरंपरेने मिळतं आलेली वतनदारी. पुढे ही वतनदारी बरखास्त झाली व गावोगावी तलाठ्यांची नेमणूक झाली. दिगंबरपंताना कुलकर्णी वतन खालसा झाल्याचा आनंद झाला. त्यांचे व्यक्तिगत मत होते की कुलकर्णीपण म्हणजे या धसकट राव शिरा ××× असे होते.
घरात वडिलोपार्जित भरपूर जमीन होती. ददात म्हणजे काय असते हे दिगंबरपंताच्या कुटुंबियांना माहीतचं नव्हते. कुलकर्णी कुटुंबियांना जिथे एकाची आवश्यकता असायची तिथे त्यांना चार उपलब्ध असायचे. कुलकर्णी कुटुंबात लक्ष्मी नांदत होती.
त्याचे एकमेव कारण म्हणजे दिगंबरपंताच्या मातोश्री यशोदाबाई. सगळे गाव यशोदाबाईला फक्त अक्का म्हणून ओळखत असे. अक्काचे खरे नाव दोन्ही हातांच्या बोटा एवढ्या लोकांना माहीत असेल. लहान, मोठे, तरूण, म्हतारे, स्त्री व पुरुष सर्वजण यशोदाबाईला अक्का म्हणायचे. दिगंबरपंतांच्या घरी लक्ष्मीचा वास अक्कामुळे होता. दारात मागायला आलेल्याला रिकाम्या हाताने पाठवायचा नाही. हे व्रत अक्का या घरात साठ वर्षापूर्वी लग्न करून आल्यापासून पाळत आहेत.
यशोदाबाईंच्या आज्जीने त्यांना हा कानमंत्र दिला होता की भले घरचे लोक एखाद्या वेळी उपाशी झोपतील पण दारावर मागणारा आला तर तो रिकाम्या हाताने जाता कामा नये. यशोदाबाईंना हे व्रत पाळण्यासाठी सुरूवातीला खूप त्रास झाला. सासूरवाडीत याला प्रचंड विरोध होता. दिगंबरपंताचे वडील कृष्णाजीपंताचा मात्र यशोदाबाईला पूर्ण पाठिंबा होता.
होता होता सर्व घरातल्या सदस्यांनी अक्काचे हे व्रत मान्य केले व त्यासाठी कुटुंबाच्या एकूण प्राप्तीत विशेष सोय करून ठेवली.
गावातल्या व पंचक्रोशीतल्या ब्रम्हवृंदाना अक्काचा फार मोठा आधार होता. गावात कोणत्याही कामासाठी आलेला ब्राह्मण हा हक्काने अक्काकडे जेवायला जात असे. ते जेवण सकाळचे अथवा संध्याकाळचे असो. अक्का स्वतः सकाळचा स्वयंपाक करायच्या व जेवायलाही त्याच वाढायच्या. संध्याकाळचा स्वयंपाकाची जबाबदारी सुनांकडे होती.
मनोहर जोशी हे वृतीने पुराणिक. वर्षातील सहा महिने गावोगावी फिरायचे, गावातील एखाद्या देवाळात मुक्काम करायचा. कुण्या ब्राह्मणाच्या घरी जेवण मिळाले तर करायचे नाहीतर देवळाच्या अंगणात कोठेतरी चुल पेटवायची व दोनचार भाकरी हातावर थापून तव्यावर भाजायच्या नंतर त्याच तापलेल्या तव्यावर काही तरी भाकरी बरोबर तोंडी लावण्यासाठी भाजी करायची. देवळातील देवाला मनोभावे नैवेद्य दाखवायचा व मग आपण स्वतः जेवण करायचे. जेवण झाल्यावर सगळे आवरायचे व निवांत दोन तास देवळात झोप काढायची. संध्याकाळी चार वाजता त्याच देवळात कीर्तन करायचे. कोणी ऐकण्यासाठी येवो अथवा न येवो. मनोहर जोशींना त्याने काही फरक पडत नसे. मन रमेल तेवढे दिवस एका गावात रहायचे, मन त्या गावातून उठले की कथा पुराण आवरून घ्यायचे व पुढील गावासाठी प्रस्थान करायचे. सहा महिने झाले की आपल्या गावाकडे परतायचे.
मनोहर जोशी पत्रिका पहायचे. पंचाग पहायचे. मुहूर्त काढून द्यायचे. गावातील गरजू व अशिक्षित लोकांसाठी पत्र, अर्ज व इतर कसलेही लिहीण्याचे काम करून द्यायचे. मनोहर जोशींचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. व्याकरण उत्तम येत होते. लोकं त्यांच्या कडून खरेदी खत, गिरवी पत्र, किराया नामा, लग्ना चे ठराव, मुंजी व लग्नाच्या पत्रिकेचे मसुदे लिहून घ्यायचे. मनोहर जोशी हरफन मौला होते. सहा महिने फिरून ते पूर्ण वर्षाची प्राप्ती करून घ्यायचे. स्वभावाने अतिशय विनम्र. तोंडातील भाषा मधाळ. कसल्याही परिस्थितीशी जमवून घेण्याची मनाची तयारी. साधी राहणी. थोडक्यात काय तर परिस्थितीने मनोहर जोशी गरीब असले तरीही गुणांच्या बाबतीत अरबोपती होते.
मनोहर जोशी जेवण करीत असताना बोलत नसत. जेवताना स्वतःच्या ताटा शिवाय काही पहात नसत. हातवारे करीत नसत. ताटात वाढलेले टाकत नसत. अन्नाला यज्ञकर्म समजत व अतिशय प्रसन्न चित्त ठेवून एकाग्रचित्ताने जेवण करीत असत. ज्यांच्याकडे जेवण झाले आहे त्यांचे हात जोडून मनःपूर्वक आभार मानीत व खर्या व शुद्ध अंतःकरणाने यजमानाला व त्या कुटुंबाला शुभ आशीर्वाद देत असत.
मनोहर जोशी आज सकाळी अक्काच्या गावात दाखल झाले. अक्काच्या घराजवळच असलेल्या विठ्ठल रूकमाईच्या देवळात मुक्काम केला. अक्काचे घर जवळ हे, मुख्य कारण होते या देवळात मुक्काम करण्या मागे. मनोहर जोशी गावात आले आहेत ही बातमी तासाभरात सगळ्या गावात पसरली. अक्काला आनंद झाला. मनोहर जोशी कमीतकमी आठवडाभर तरी दुपारी व संध्याकाळी जेवणासाठी घरी येणार. अक्काने मनोहर जोशीसाठी ते गावात असेपर्यंत रोज सकाळी तांब्याभर निक्के व ताजे दूध देवळात पाठवण्याची सोय केली. मनोहर जोशी या गावात बर्याच दिवसांनी आले होते. म्हणून असेल आज सकाळ पासून मनोहर जोशींना भेटायला देवळात लोकांची गर्दी झाली होती. सगळ्यांचे काही न काही काम होते. लोकांची कामे आटोपून मनोहर जोशींचे स्नान व आन्हिक व्हायला दुपारचे दीड वाजले.
अक्काच्या घरी दुपारी एक वाजता सगळ्यांची जेवणे झाली. अक्का एकटीच मनोहर जोशींची वाट पहात जेवायची थांबली होती. सकाळी केलेली भाजी संपली होती म्हणून अक्काने घाई घाईने मनोहर जोशी व स्वतःसाठी पुन्हा भोपळ्याची भाजी केली व मनोहर जोशींचे पान तयार करून वाट पहात बसली.
मनोहर जोशी बरोबर एक वाजून चाळीस मिनिटाला अक्काकडे जेवायला आले. अक्काला मनोहर जोशींचे जेवणाच्या वेळी ते जे नियम पाळतात ते ठाऊक होते.
मनोहर जोशी पाटावर बसले. अक्काने ताट, वाटी, पाण्याचे तांब्या भांडे सर्व झाल्यावर वाढायला सुरुवात केली. वाढणे पूर्ण झाल्यावर मनोहर जोशींनी ताटा भोवती पाणी फिरवले, चित्राहुती घातली. त्यांची जेवण सुरू करायच्या आधीची प्रार्थना म्हणली व खाली मान घालून जेवणास सुरूवात केली.
भोपळ्याची भाजी कडु झाली होती. कडू म्हणजे कल्पना सुद्धा करवणार नाही इतकी कडू. मनोहर जोशींना हातवारे करायचे नव्हते, बोलायचे नव्हते, टाकायचे नव्हते. मनोहर जोशींची फजिती काय सांगावी. ते भोपळ्याची भाजी संपवत होते व अक्का वाढत होती. अगदी शेवटी अक्काने आपल्यासाठी घासभर भोपळ्याची भाजी ठेवून घेतली.
मनोहर जोशींच्या डोळ्यात पाणी येत होते. अक्काला ते आनंदाश्रू वाटत होते. होता होता भयंकर त्रासाने मनोहर जोशींनी जेवण संपवले. ते पान स्वच्छ करून पानावरून उठले. सरळ हात धुवून चुळ भरुन अक्काचा निरोप घेऊन देवळात येऊन बसले.
त्याना खात्री होती की अक्का पंधरा ते वीस मिनिटात देवळात पोहंचणार. अर्ध्या तासात अक्का देवळात आल्या. डोळे ओले. चेहर्यावर पश्चात्ताप. येऊन मनोहर जोशींचे पाय धरणार तेवढ्यात मनोहर जोशी यांनी अक्काचे हात धरले व म्हणाले पापात घालता काय. तुम्ही मला माझ्या आई समान आहात.
अक्का म्हणाली धन्य आहे जोशी तुमची. एवढी कडू भाजी खायची कांही गरज होती का. एक घास तोंडातून काढून बाहेर ठेवला असता तर माझ्या लक्षात आले असते की भोपळ्याची भाजी कडू झाली आहे म्हणून.
मनोहर जोशी म्हणाले अक्का एवढे मनावर घेऊ नका. मी जर तसे केले असते तर माझे कितीतरी वर्षे चालू असलेले ब्रीद मोडले असते.
अक्का आता असे करा उद्या मला तुमच्या हातच्या नाजूक, खरपूस पुरणपोळ्या, तूप आणी दूध खाऊ घाला म्हणजे झालं.
