STORYMIRROR

Sanjay Udgirkar

Thriller

3  

Sanjay Udgirkar

Thriller

झपाटलेले झाड.

झपाटलेले झाड.

5 mins
255

मी बांधार्यावर बसून शेतातील भले मोठे चिंचेचे झाड पहात होतो. आमच्या शेतात हे झाड कोणी लावले हे कोणालाही माहीत नाही. हे झाड कमीतकमी सत्तर ते ऐंशी वर्षाचे तरी असेल. ह्या झाडाचा पूर्ण गावात दबदबा होता. ह्या झाडामुळे आमच्या शेतात आमच्या परवानगी शिवाय पाय ठेवायची गावात कोणाचीही हिम्मत नव्हती. ह्या झाडावर कोणतेही पक्षी कधीही बसायचे नाहीत. ह्या झाडावर मुंग्या, मुंगळे व इतर कोणतेही किडे कधीही चढले नाहीत.


आमच्या शेताबद्दल गावकरी मंडळीमध्ये भीती होती. त्याचे कारण हे चिंचेचे झाड. गावकरी त्या झाडाला रुक्मिणीबाई म्हणून ओळखायचे. आमचे शेतसुद्धा रुक्मिणीबाईंचे शेत म्हणूनच प्रसिद्ध होते. ह्या झाडाला लागलेली चिंच कोणी खात नसत किंवा विकतही घेत नसत. 


आमच्या शेतात कधी चुकूनही कोणाचे जनावर शिरत नाही. आमच्या शेतातल्या विहिरीचे पाणी कधीही अटत नाही. आजपर्यंत आमच्या शेतातील विहिर कोरडी पडली नाही. 


या विहीरीचे पाणी आमच्या कुटुंबा शिवाय कोणी वापरत नाही.  एकूण काय तर आमच्या शेताची बातच काही और होती. माझी पणजी रुक्मिणीबाईची ही सर्व कृपा. माझे पणजोबा काही वैयक्तिक अडचणी मुळे हे शेत विकण्याचा विचार करत होते. त्यांनी ही गोष्ट माझ्या पणजीच्या कानावर माहिती म्हणून घातली.


माझ्या पणजीचा शेत विकण्यास प्रचंड विरोध होता. तिने माझ्या पणजोबाना खडसावून सांगितले की जर का शेत विकले तर ती त्या शेतातच आत्महत्या करून घेईल. माझ्या पणजोबावर तिच्या धमकीचा काही परिणाम झाला नाही व त्यांनी अगदी क्षुल्लक रकमेसाठी संपूर्ण शेताचा सौदा करून इसार्‍याची रक्कम घेतली व ही माहिती माझ्या पणजीला मिशीवर ताव देत सांगितली.


माझ्या पणजीने गप्प सगळ ऐकून घेतले. दुसर्‍या दिवशी पहाटे शौचाला निघाल्या सारखे करून सरळ शेतात पोहोचली. सकाळची वेळ असल्या मुळे कोणाला काही शंकासुद्धा आली नाही. 


माझी पणजी शेतातल्या गोठ्यातून एक चांगली सोल घेऊन सरळ या चिंचेच्या झाडावर चढली. तेव्हा हे झाड दहा वर्षाचे झाले होते असे गावकरी म्हणतात. माझ्या पणजीने चांगल्या मजबूत फांदीला सोल घट्ट बांधून सोलेच्या दुसरी बाजूने आपल्या गळ्याला फास लावून घेतला व त्या फांदीवरून खाली उडी मारली. कोणाला काही कळायचा आतच पणजीचा प्राण गेला व ती भूत होऊन चिंचेच्या झाडाला चिकटली.


तेव्हापासून ह्या शेताचे नांव रुक्मिणीबाईचे शेत असे पडले व कालांतराने त्या नावाचे फक्त रुक्मिणी असे नांव झाले. आता आमच्या शेताला रुक्मिणी म्हणून ओळखतात.  माझ्या पणजोबाला घोर पश्चात्ताप झाला व पणजी आपल्या हट्टीपणा मुळे गेली ही भावना मनात घर करून बसली. माझ्या पणजोबानी व शेत विकत घेतलेल्या इसमाने शेताचा सौदा रद्द केला.


माझ्या पणजोबानी माझ्या पणजीचे सर्व अंत्यसंस्कार अगदी व्यवस्थित पार पाडले. पणजीच्या पिंडाला काकस्पर्श झाला नाही शेवटी कंटाळून दर्भाच्या काकस्पर्शावर भागवावे लागले असे म्हणतात.  पणजीचे बस्तान चिंचेच्या झाडावर व्यवस्थित बसले. पुढे माझे पणजोबा सात वर्षानी वारले. ते पुढे निघून गेले पण आमची पणजी मात्र शेत काही केल्या सोडायला तयार नव्हती. 


हळूहळू आमच्या कुटुंबातील बरीच पिकलेली पाने गळून पडली व पुढे निघून गेली पण आमची पणजी साठ वर्षे झाली तरी चिंचेच्या झाडावर आरामात निवास करून होती. आमच्या घरच्या मंडळीनी पणजीला मोक्ष मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले. मांत्रिक, तांत्रिक, बाबा लोक, पीर, मुरशद, अंगात देवी येणार्‍या व हट योगी. काही विचारू नका. आमचे शेत व चिंचेचे झाड सगळ्या गावाचा करमणूकीचा व भीतीचा विषय झाला होता.


माझी पणजी पण खमकी होती, ती या सगळ्या मंडळींची वस्ताद निघाली. ते सर्व शेत सोडून पळून गेले पण माझी पणजी अजूनही तिथेच बसून आहे. कालांतराने लोकानी तिचा नाद सोडून टाकला. तसा तिचा कोणाला त्रासही नव्हता. फक्त शेताच्या व चिंचेच्या झाडाचा वाटेला गेले नाही की बस, मग माझ्या पणजीचा कोणाला कसलाही त्रास नव्हता.


तिचा तिला, सणावाराचा मानमराताब मिळाला की पणजी खूश असायची. काही ठराविक म्हातार्‍या बायकांच्या मार्फत माझी पणजी गावकरी मंडळीशी संवादही साधायची. काही चांगले सल्ले द्यायची. आमच्या शेतावर मात्र तिची एक हाती सत्ता होती. तिच्या जरबेमुळे आमच्या शेताकडे कोणीही वाकडा डोळा करून पहात नसे. आमच्या घरच्या मंडळीनी पण आमच्या पणजीचा तेवढाच मान राखला होता. प्रत्येक सणासुदीला तिचे पक्वान्नानी भरलेल ताट चिंचेच्या झाडासमोर पाटावर मांडले जायचे. तिला नैवेद्य दाखवल्यावरच आम्ही सर्व जेवत असू.


आमच शेत व चिंच आमच्या पणजीमुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. मी जेव्हा कॉलेजचे शिक्षण संपवून गावाकडे आलो तेव्हा मात्र अघटित घडले. माझ्या पणजीने गावातल्या एका म्हातारीच्या स्वप्नात येऊन सांगितले की तिची पण पुढे जाण्याची वेळ आता आली होती व ती आठ दहा दिवसातच शेत व चिंच सोडून जाणार होती.


तिने त्या म्हातारीला सांगितले की माझ्या पणजोबाचे तिला शेवटचे बोलवणे आले होते. तिने पुढे हे सांगितले की ती जायच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा स्वप्नात येऊन काय करायचे ते सगळे सांगून जाईल.


ही बातमी गावात आग पसरल्यासारखी पसरली. गावकरी मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला. सगळ्या गावात हीच चर्चा चालली होती की रुक्मिणीबाई शेवटच्या चालल्या. गावकरी मंडळी रुक्मिणीबाई चालल्या म्हणून आनंद साजरा करीत आहेत हे बहुतेक माझ्या पणजीला कळले असावे.दहाव्या दिवशी रात्री माझी पणजी पुन्हा त्याच म्हातारीच्या स्वप्नात पोहोचली. 


माझी पणजी त्या म्हातारीला म्हणाली, मी कायमची चालले आहे म्हणून सर्व गावकरी मंडळी खूप आनंदित झाले आहेत. मला तर त्यांना मी विनाकारण काही त्रास दिल्याचे आठवत नाही मग गावकरी मंडळीना माझ्या जाण्याचा इतका आनंद का व्हावा काय माहीत. 


माझी पणजी पुढे म्हणाली की एक दोन वर्षा पूर्वी शेजारच्या गावात एका तरूणीचा तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी जाळून प्राण घेतला होता. हे प्रकरण कोर्टात असल्याने त्या मुलीचा आत्मा अजून इथेच आहे. तिच्यावर घोर अन्याय झाला असल्याने माझ्या पणजीची तिला संपूर्ण सहानुभूती मिळाली होती.


माझ्या पणजीने तिचे चिंचेचे झाड ह्या मुलीला तिची इच्छा असेल तितके दिवस रहाण्यासाठी दिले व तिच्या नंतर तिने सुद्धा पुढे अश्याच कोण्या गरजूला हे झाड राहण्यासाठी द्यावे असेहि बजावले होते.  आम्हा कुटुंबीयांसाठी तिचा हा संदेश होता की आम्ही सर्व ह्या मुलीची सुद्धा तिची केल्या सारखीच सेवा करावी व ही मुलगी सुद्धा ती जशी शेताची देखरेख करीत होती तशी करणार होती. आम्हाला अजून एक चिंचेचे झाड लावण्याचा फर्मान होता.


हे नवीन झाड दहा पंधरा वर्षात तयार झाल्यावर भूत तिकडे रहायला जाईल व हे जुने झाड पाडता येईल.

पणजी पुढे म्हणाली गावकरी मंडळीना खुश व्हायचे काही कारण नाही. कोणते ना कोणते भुत चिंचेवर व शेतात सदैव वास्तव्य करून राहिल.फक्त भूत बदलत राहतील बाकीचे सर्व आहे तसेच राहणार आहे.  पणजीने पुढचा सगळा विचार व्यवस्थित केला होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller