चहा
चहा
दुपारच्या चहाची वेळ झाली होती व रोजच्या सवईप्रमाणे मी माझ्या बायकोला चहा करण्यासाठी सांगितले.
थोडया वेळाने आमच्या ह्या चहा घेऊन आल्या.
आमचा बर्याच दिवसा पासूनचा अलिखीत नियम आहे, आम्ही चहा एकत्र घ्यायचो.
चहा बरोबर गप्पा, कधी घरातल्या काही कामाबद्दल किंवा कधी मुलां बद्दल बोलत बोलत चहा संपवायचा.
आज चहा घेताना माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण आजतागायत बायकोने केलेला किती कप चहा पिला असावा.
मग आम्ही दोघे गम्मत म्हणून हिशोब केला.
आमच्या लग्नाला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत.
हा पूर्ण काळ बहुतांशी आम्ही एकत्रच आहोत.
छत्तीस वर्ष म्हणजे जवळपास १३,००० दिवस.
आम्ही फक्त १३,००० दिवस धरून हिशोब केला तर कमीतकमी रोज दोन कप चहा ह्या मापानी २६,००० कप चहा होतो.
नुसती कल्पना करुन बघा किती कष्टाचे काम आहे हे, ह्या व्यतिरीक्त इतर अनेक कष्ट आहेतच जसे जेवण, फराळाचे तयार करणे, मुलांचे सर्व काही करणे, सोयरे, पाहुणे, मित्र यांची आदरातिथ्य करणे, घरातली इतर मंडळीची सेवा, घराची देखरेख, सण इत्यादी.
मी नुसत चहाचा विचार करूनच हबकलो.
मी माझ्या मनातल्या मनात विचार केला की ह्या सगळ्या कष्टांची, प्रेमाची परतफेडीची कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे.
मी हा हिशोब झाल्यावर माझ्या बायकोकडे अवाक् दृष्टीने पाहत राहिलो आणि ती माझ्याकडे मंद स्मित करीत पाहत होती.
