Sanjay Udgirkar

Inspirational

4  

Sanjay Udgirkar

Inspirational

सत्यवचन बाबूराव

सत्यवचन बाबूराव

20 mins
979


विनायकराव महादेवराव जिंतूरकर उर्फ बाबूराव. महाराष्ट्र क्लाॅथ सेंटर इथे हेड सेल्समन म्हणून कालपर्यंत कार्यरत होते. बाबूराव आज सेवानिवृत्त होणार होते. 


बाबूरावांना आज दुकानात रोजच्याप्रमाणे नऊ वाजता जाण्याची आवश्यकता नव्हती. आज कधी नव्हे ते बाबूराव सकाळी साडेआठ वाजता उठले. नाहीतर बाबूरावांना रोज सकाळी पाच वाजता उठावे लागत असे. आज त्यांच्या आयुष्यातील त्यांना कळायला लागल्यापासूनचा, करण्यासाठी काहीही काम नसलेला हा पहिलाच दिवस होता. 


बाबूरावांनी मागच्या महिन्यात आपल्या आयुष्यातील चौसष्ट वर्षे पूर्ण केली. सुधाताई (बाबूरावांच्या अर्धांगिनी), सुंदर (बाबूराव आणि सुधाताई यांचा मोठा मुलगा), सुमंत (नबाबूराव आणि सुधाताई यांचा नंबर दोनचा मुलगा) सुलभा उर्फ सुलू (बाबूराव आणि सुधाताई यांची कन्या) या सगळ्यांनी बाबूरावांच्या मागे नोकरी सोडण्याचा पिच्छा लावला होता आणि खरे पाहता बाबूराव सुद्धा आता नोकरीला कंटाळून गेले होते. 


बाबूराव वयाच्या दहाव्या वर्षी महाराष्ट्र क्लाॅथ सेंटरमध्ये नोकरीला लागले होते. त्या काळी बाल श्रमिक विरोधी कायदे अस्तित्वात नव्हते. इंग्रजांची आणि स्थानिक राजांची अशी मेलमिलाप वाली राजवट चालले होती. 


महाराष्ट्र क्लाॅथ सेंटर हे नाव फक्त कागदोपत्री, दुकानाच्या फलकावर, बील बुकात, पावती पुस्तकात आणि पत्रव्यवहारात चलनात होते. 


गावातील लोक या दुकानाला भोपळ्यांचे दुकान म्हणूनच ओळखायचे. हे नाव पुढे बदलले आणि भोपळ्यांचे दुकानाच्या ऐवजी या दुकानाला नवीन नाव चिकटले. नवीन नाव पुढे कळेलच म्हणा. महाराष्ट्र क्लाॅथ सेंटर हे महाराष्ट्रियन लोकांच्या (त्यांच्या ऐपतीप्रमाणे) कपड्या विषयी आवडीनिवडी आणि गरजा भागवण्यासाठी, कै सदाशिवराव नारायणराव भोपळे यांनी चालू केले होते. सदाशिवराव नारायणरव भोपळे यांनी हे दुकान चाळीस वर्षे चालविले आणि आपल्या मृत्युपत्रात या दुकानाच्या संस्थापनाची जबाबदारी आपल्या जेष्ठ चिरंजीव रमाकांत याच्यावर सोपवली. मृत्युपत्रवर सह्या, शिक्कामोर्तब झाल्यावर सदाशिवरावांनी सहा महिन्यात आपली इहलोक यात्रा संपवली. 


बाबूराव जेव्हा या दुकानात हरकाम्या म्हणून कामला लागले तेव्हा हे दुकान दहा वर्षे जुने झाले होते आणि दुकानात सदाशिवराव नारायणराव भोपळे उर्फ काका यांची राजवट लागू होती. 


बाबूरावांना त्यांच्या विधवा आईने या दुकानात काकांच्या पाया पडून आणि विनवण्या करून कामाला लावले होते. आईच्या निधनापर्यंत बाबूरावांना, त्यांना दुकानात काम केल्याचा पगार किती मिळतो हेसुद्धा माहीत नव्हते. आपल्या आई आणि काका यांच्या मधला तो व्यवहार आहे एवढेच काय ते बाबूरावांना आईच्या देहावसानापर्यंत माहीत होते. बाबूरावांच्या गरजा पण फार थोड्या होत्या. दुकानात दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुकानातून दुकानातील सगळ्या कर्मचार्‍यांना त्यांच्या मागील वर्षातील केलेल्या कामगिरी अनुसार दोन नवीन कपड्याचे जोड मिळत असत. रहायला वडिलोपार्जित घर होते. घरी दिवसातून दोनदा आईच्या हातचे गरमागरम जेवण मिळत असे. काही आजारपण आल्यास, इलाजाची जबाबदारी काका घ्यायचे. 


बाबूराव आजपासून दुकानाच्या सेवेतून निवृत्त होणार म्हणून, आज दुकान दुपारी दोन वाजता जनतेसाठी बंद होणार होते. रमाकांतनी बाबूरावांच्या निवृत्ती दिनानिमित्त दुकानात सर्वांसाठी मिष्टान्न भोजनाची मेजवानी ठेवली होती. आज दुकानातील सर्व कर्मचारी बाबूरावांना विषयी संक्षिप्तात बोलणार होते. बाबूरावां विषयी आपले सोज्वळ मत मांडणार होते. बाबूरावसुद्धा आपल्या दुकानात नोकरीला लागल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंतचा चौपन्न वर्षाचा आपला अनुभव संक्षिप्तात सर्वांबरोबर सामायिक करणार होते. आज बाबूराव सोबत सुधाताई, सुंदर, सुमंत आणि सुलू हेही येणार होते. 


रमाकांतनी पंधरा दिवसांपूर्वी बाबूरावांना तपकिरी रंगाचा रेमंड कंपनीचा सुटाचा कपडा, आजच्या कार्यक्रमासाठी कोट शिवून घेण्यासाठी दिला होता. बाबूराव आणि त्यांचे कुटुंबीय दुकानात जाण्यासाठी हळूहळू तयार होत होते. बाबूरावांनी नवीन धोतर, कोटाच्या आत घालण्यासाठी पूर्ण बाह्याचा शर्ट, कोटाच्या खिशात ठेवण्यासाठी रूमाल, तपकिरी रंगाची टोपी. काकांनी त्यांची आठवण म्हणून दिलेले खिशात ठेवायचे चांदीची साखळी असलेले घड्याळ, हे सगळे काढून पलंगावर ठेवले. 


बाबूराव आज भुतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यात आवागमन करीत होते. त्यांच्या डोळ्यासमोर दुकानात केलेल्या नोकरीच्या चौपन्न वर्षाचा कालावधी एखाद्या चलचित्रपटासारखा धावू लागला. बाबूराव आयुष्यात जे काही शिकले ते अनुभवातूनच शिकले. ते कधी शाळेत गेलेच नाहीत. शाळेत जाण्यासारखी घरातील आर्थिक परिस्थिती नव्हतीच मुळी. बाबूराव आयुष्यात जे काही शिकले ते महाराष्ट्र क्लाॅथ सेंटरमध्ये आणि सदाशिवराव नारायणराव भोपळ्यांकडून शिकले होते. काका बाबूरावांसाठी पित्याच्या आणि गुरूंच्या ठिकाणी होते. 


मोडकळीस आलेल्या तीन लहान खोल्यांच्या घराशिवाय त्यांच्या विधवा आई जवळ काही नव्हते. विष्णू नावाचा एक लहान भाऊ होता, तोही पुढे सात वर्षांचा असताना मलेरिया होऊन मरण पावला. आई आणि ते अशे दोघेच राहिले. बाबूरावांच्या प्राप्तीवर दोघांचे पोट भरायचे. 


बाबूराव जेव्हा वीस वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे देहावसान झाले. त्यांच्या आईने आपल्या मुलाचे लग्न पाहिले नाही. 

आई गेल्यावर काकांनी बाबूरावांच्या हातात त्यांची पगार ठेवायला सुरुवात केली. 


आई गेल्यावर बाबूरावांच्या जेवणाचे वांधे व्हायला लागले. जेवणाचा डब्बा लावून पाहिला. खानावळीत काही दिवस जेवून पाहिले. असा बरेचसे प्रयोग झाले पण बाबूरावांना जेवण केल्याचे समाधान काही मिळत नव्हते. त्यांना आईच्या हाताच्या सुग्रास जेवणाची सवय झाली होती. 


जेवणाच्या त्रासाचा प्रभाव बाबूरावांच्या दुकानातील कामावर पडू लागला. काकांच्या लक्षात बाबूरावांची अडचण आली. काकांनी मध्यस्थी करून आणि बाबूरावांच्या नोकरीची स्वतः हामी देऊन बाबूरावांचे लग्न सुधाताईंशी जमवले. सुधाताईंनी बाबूरावांच्या घराची सुत्रे आपल्या हाती घेतली आणि काकांनी आता बाबूरावांचा पगार सुधाताईंना देण्यास सुरुवात केली. 


बाबूरावांच्या मागचा घराचा व्याप सुटला. जेवणाचा प्रश्न मिटला. अर्थातच याचा सकारात्मक प्रभाव बाबूरावांच्या दुकानातील कामात दिसून येऊ लागला. 


पुढील दहा वर्षात बाबूराव आणि सुधाताईना तीन अपत्ये झाली. काकांकडून वेळोवेळी मिळालेल्या, सढळ हाताच्या अर्थिक मदतीने, रमाकांताने वेळोवेळी दिलेल्या योग्य आणि अनमोल अशा सल्लामुळे, मार्गदर्शनामुळे आणि सुधाताईंच्या नियोजनामुळे आज बाबूरावांची मुले उच्चशिक्षित तर झालीच आहेत पण त्याहूनही विषेश म्हणजे तिघांनाही उच्चपदाच्या सरकारी नोकर्‍याही मिळाल्या आहेत. तिघांचे मिळून बाबूरावांच्या घरी दरमहा दोन लाख रुपये येत होते. 


बाबूरावांच्या मुलांनी जुने घर पाडून त्याच जागेवर तीन मजली नवीन घर बांधले. बाबूरावांच्या घरात कालमानानुसार सगळ्या सुखसोयी आल्या. मुलांनी आणि सुधाताईंने बाबूरावांच्या कष्टाचे चीज केले. बाबूरावांच्या घरात सुख आणि समाधान नांदायला लागले. 


भूतकाळातून वर्तमानकाळात येत असताना बाबूरावांचे डोळे पाण्याने डबडबले. मुलांनी -जे उच्चशिक्षित होते- कधीही बाबूरावांना ते निरक्षर असल्याची जाणीवसुद्धा होऊ दिली नाही. बाबूरावांची मुले, बाबूराव कपड्यांचा दुकानातील अतिशय साधेसुधे सेल्समन आहेत आणि त्यांनी आपल्या पहिल्या आणि शेवटच्या नोकरीची सुरुवात हरकाम्या या हुद्द्यापासून सुरू केली म्हणून कधी त्यांचा पाणउतारा केला नाही. बाबूरावांना आपल्या मुलांचा प्रचंड अभिमान होता. 


एक वाजत जिंतूरकर मंडळी तयार झाली. आज जिंतूरकर मंडळी महाराष्ट्र क्लाॅथ सेंटरमध्ये बाबूरावांच्या सेवानिवृत्ती निमित्ते जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्या अगोदर पंचेचाळीस मिनिटे सर्व सामान्य ग्राहक म्हणून जाणार होते. आज बाबूराव आणि सुधाताई सेल्स काँऊटरच्या इकडच्या बाजूला बसून दुकानातील माल बघणार होते. मुलांनी ह्या दिवसासाठी पन्नास हजार रुपये जमा केले होते. आज जिंतूरकर मंडळी महाराष्ट्र क्लाॅथ सेंटरमधे पन्नास हजार रुपयांचे कापड खरेदी करून जिंतूरकर कुटुंबीय महाराष्ट्र क्लाॅथ सेंटरचे अजन्म ऋणी असणार आहेत हे निदर्शनास आणून देणार होते.


-----


जिंतूरकर मंडळींनी अर्ध्या तासात कपडा खरेदी पूर्ण केली. त्यांचे बाबा कपडा खरेदीसाठी बरोबर असताना, मुलांना, सुधाताईंना आणि सुलूला कपड्याच्या रंगाची पंसतीचे काम उरलेले असे. 


आजच्या तारखेला कपड्याच्या गुणवत्तेच्या परिक्षणाच्या बाबतीत बाबूरावांचा हात धरणारे गावात कोणीही नव्हता. काकांच्या नंतर हा मान बाबूरावांना मिळाला. कपड्याची परख कशी करायची, कपड्याची योग्य किंमत कशी आखायची ही सर्व कला बाबूरावांना आणि रमाकांतना काकांनी आपल्या जवळ बसवून शिकवली. 


पुढे पुढे कपड्याच्या परिक्षणात बाबूरावांनी काकांना आणि रमाकांतना बरेच मागे सोडले. मागच्या कितीतरी वर्षांपासून बाबूरावांनी "कपड्यांचा राजा - सत्यवचन बाबूराव" हा मान गावात कोणाला मिळू दिला नाही. 


मागील कितीतरी वर्षांपासून, बाबूराव दुकानात येऊन रोज काकांच्या पाया पडून आणि रमाकांतना हात जोडून आदरयुक्त नमस्कार केल्यावर, गल्ल्यावर लावलेल्या देवादिकांच्या फोटोंना नमस्कार करून एकदा का आपल्या जागेवर बसले की, कपडा बाजारपेठेतील दुकानदार रमाकांतना फोन करून विचारायचे, "रमाकांतसेठ, सत्यवचन गद्दी पे बैठे क्या?" रमाकांतसेठनी होकारार्थी उत्तर दिले की शेजारपाजारच्या दुकानात, त्या दुकानाचे नोकर माणसे बाबूरावांना दाखवण्यासाठी कपड्याचे थान घेऊन यायचे. बाबूराव दुकानात आल्यावर कमीतकमी एक तास शेजारपाजारच्या दुकानदारांच्या कपड्याच्या नमुन्यांची तपासणी करून, त्या नमुन्यांचे मुल्यांकन करण्यात आणि गुणवत्ता ठरवण्यात जायचा. 


शेजारपाजारचे कपड्याचे दुकानदार, बाबूरावांना या कामाचा मोबदला देऊ करायचे पण बाबूरावांनी या कामाचे कधीही  पैसे घेतले नाहीत. काकांनी पैसे घेण्यासाठी मनाई केली होती. (काकांच्या कारकीर्दीत दर पंधरा दिवसांनी, रविवारी दुकानातील माल गणना व्हायची, आता हे काम रमाकांत संगणकाच्या मदतीने दिवसातून तीन चार वेळा आणि तेही बसल्या जागेवरून करतात) काकांनी एका रविवारी, दुकानातील माल गणना चालू असताना बाबूरावांना आणि रमाकांतना शेजारपाजारच्या दुकानदारांकडून त्यांनी पाठवलेल्या कपडा तपासणीचे काही पैसे घ्यायचे नाहीत अशी त्यांची शपथ घातली. 

बाबूरावांना तो दिवस आठवला आणि काकांची आठवण आली. लगेचच बाबूरावांचे डोळे पाणावले. 


जिंतूरकरांचे कपडा खरेदी होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. महाराष्ट्र क्लाॅथ सेंटर आतून बंद करण्यात आले. सर्वांनी मिळून आधी जेवण करून मग नंतर बाकीचे कार्यक्रम करायचे असे ठरवले. सगळेजण एकाच पंगतीत बसले. जेवण तयार करून आणायचे, जेवायला वाढायचे आणि नंतरची सर्व आवराआवर करायचे गुत्ते कॅटरिंग काँट्रॅक्टरच्या हवाली केले होते.


एका तासाभरात जेवणे झाली.


सगळेजण गिर्‍हाईकांना साड्या दाखवण्यासाठी जी जागा होती तिथे खाली मांड्या घालून बसले. ही बैठक म्हणजे गाद्या आणि त्यावर परीट घडीच्या पांढर्‍या चादरी घालून तयार केलेली होती. कार्यक्रमाची सुरुवात रमाकांतनी केली.


रमाकांत, "सत्यवचनच्या सगळ्या कर्मचार्‍यांनी मिळून बाबूरावांना काही भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मी सर्वांतर्फे सत्यवचनचे बाबूरावांनंतर जे सगळ्यात सिनियर आहेत असे मनोहरराव भावे यांना सर्वांतर्फे बाबूरावांना शाल पांघरून भेटवस्तू देण्याची विनंती करतो."


एका स्टीलच्या मोठ्या ट्रेमध्ये बाबूराव आणि सुधाताई यांना देण्यासाठी भेटवस्तू आणि इतर सामान ठेवले होते. भावेंनी ते ट्रे उचलले आणि बाबूराव आणि सुधाताई जिथे बसले होते तिथे आले. भावेंनी एका मोठी कागदी पिशवी बाबूरावांच्या हातात ठेवली. एक पिशवी सुधाताईंच्या हातात ठेवली. त्याच्यानंतर भावेंनी बाबूरावांच्या कपाळावर कुंकवाचा पट्टा ओढला. एक चांगली महागातील शाल बाबूरावांच्या दोन्ही खांद्यावरून पाठीवर पांघरली, डोक्यावर जरीकाठाची महागाची टोपी चढवली आणि एक लाल रंगाच्या रेशमी कपड्यांपासून तयार केलेला आणि भरपूर भरतकाम केलेला बटवा बाबूरावांच्या हातात ठेवून बाबूरावांना आणि सुधाताईंना नमस्कार केला. 


रमाकांत, "बाबूरावांच्या सगळ्या सहकर्मचार्यांनी मिळून, बाबूरावांना आणि सुधाताईंना पंचवीस हजार रुपये भेट म्हणून या लाल बटव्यात ठेऊन दिले आहेत."


सगळ्यांनी टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला.


त्यानंतर रमाकांतनी त्यांच्या बाजूला ठेवलेले ट्रे उचलेले. मनोहरराव भावेंनी जे केले तेच रमाकांतनी केले. फक्त बटव्याच्या ऐवजी एक नगदीस्वरूपात भेट देण्यासाठी वापरतात तसले गुलाबी रंगाचे पाकीट रमाकांतने बाबूरावांच्या हातात ठेवले. बाबूराव आणि रमाकांतनी, उभे राहून एकमेकांची गळाभेट घेतली.


सगळ्यांनी आग्रह केला म्हणून बाबूरावांनी ते कागदाचे पाकीट उघडले. आतमध्ये बाबूराव आणि सुधाताई यांच्या संयुक्त नावे पाच लाख रूपयांची नियत निक्षेप पावती होती. 


बाबूराव, रमाकांतनी आपल्याला एवढी मोठी रक्कम दिली म्हणून आश्चर्यचकित झाले आणि आनंदाने त्यांचे उर भरून आले. 


रमाकांतनी बोलायला सुरुवात केली, 


"बाबूराव हे या दुकानाचे कर्मचारी नव्हतेच मुळी आणि तसे पाहिले तर या दुकानात कोणीही कर्मचारी नाही. तुम्ही सर्वजण या दुकानाचे अविभाज्य अंग आहात. काकांच्या शेवटच्या काळात, काकांनी अगदी रहस्यमय पद्धतीने आपल्या कापड बाजारपेठेतील दुकानदाराना सम्मलित करून एक विश्वस्त मंडळ तयार केले. त्या काळी काकांनी आपल्या दुकानातील सर्व कर्मचार्यांना, ते सेवेतून निवृत्त झाल्यावर, त्यांचे उर्वरीत आयुष्य आरामात व्यतीत होण्यासाठी दुकानातर्फे काही मदत व्हावी म्हणून या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली अकरा लाख रुपये गुंतवले. विश्वस्त मंडळांनी ते अकरा लाख रुपये आपल्याच कापड बाजारपेठेत अगदी अल्पकालीन आणि अतिशय कमी व्याजदरावर देण्यास सुरुवात केली. म्हणजे बाजारपेठेतील कोणताही कपड्याच्या व्यापारी या विश्वासात मंडळाकडून एका दिवसासाठी पासून ते पंधरा दिवसासाठी जास्तीत एक लाख रूपये, एकूण पाचशे रुपये व्याजवर घेऊ शकत होता. मागील वीस वर्षांपासून हे विश्वस्त मंडळा हे काम करीत आहे. जसे आपल्या गावात या दुकानाची ओळख आता फक्त एक शब्दी आहे तशीच या बाजारपेठेत या विश्वस्त मंडळाची ओळखही एक शब्दी आहे. आपल्यापैकी कोणाला त्या विश्वस्त मंडळाची ती एक शब्दी ओळख माहीत आहे का?"


सगळे एकाच स्वरात म्हणाले "स्व सदाशिवराव नारायणराव भोपळे विश्वस्त मंडळा आणि संक्षिप्तात वापरण्यासाठी "काका". 


रमाकांत परत बोलायला लागले, "आज बाबूरावांना जे पाच लाख रुपये मिळाले आहेत ते काकांकडून मिळाले आहेत." 


रमाकांतनी इथे एक छोटासा ब्रेक घेतला आणि पुढे म्हणाले, 


"बाबूरावांनी कापड बाजारपेठेतील प्रत्येक दुकानदाराला कपड्यांच्या गुणवत्तेची पारख करून दिली आहे. कपड्यांच्या दुकानदारांनी कपडा विक्रीसाठी विकत घेण्यापूर्वी त्यांना कपड्यांचे योग्य मुल्यांकन वारंवार करून दिले आहे आणि त्यांच्या या मदतीमुळे दुकानदारांना वेळोवेळी बरचसा आर्थिक लाभही झाला आहे आणि बाबूरावांच्या कपड्याविषयी असलेल्या अफाट ज्ञानामुळे बाजारपेठेतील सर्व दुकानदारांना बाबूरावांनी निस्वार्थ भावनेनी केलेली मदत चांगल्या प्रकारे लक्षात आहे."


रमाकांतनी परत एकदा छोटासा ब्रेक घेतला आणि परत बोलू लागले, 


"बाबूराव काही दिवसात सेवानिवृत्त होणार आहेत ही बातमी हळूहळू कपडा बाजारपेठेत सगळ्यांपर्यंत पोहोचली. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की बाजारपेठेतील कपडा दुकानादारांची एक संघटना आहे आणि या संघटनेने बाबूरावांना माझ्या मार्फत पाच लाख रुपये दिले आहेत."


असे म्हणून रमाकांतनी आपल्या पँटच्या खिशातून एक पाच लाख रुपयांचा बाबूरावांच्या नावाने संघटनेने लिहून दिलेला धनादेश दिला. 


सगळ्यांनी परत एकदा टाळ्यांचा आवाज केला. बाबूरावांची कुटुंबीयांना आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. 


रमाकांत टाळ्यांचा आवाज निमाल्यावर परत एकदा बोलू लागले, 


"सत्यवचन मध्ये बाबूरावांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सत्यवचन आहे तोपर्यंत केव्हाही आणि कोणत्याही कपड्याच्या खरेदीवर तीस टक्के सुट राहील. बाबूराव आणि त्यांचे कुटुंबीय पन्नास हजार रुपयांपर्यंतची कपडा खरेदी तीन महिन्याच्या बिनव्याजी उधारीवर करू शकतील."  


"बाजारपेठेतील कपडा दुकानादारांच्या संघटनेने बाबूरावांना पार्ट टाईम जॉब देऊ केला आहे. बाबूरावांना रोज सकाळी संघटनेच्या कार्यालयात दोन तास बसून, जे कोणी दुकानदार कपडा घेऊन येतील त्यांच्यासाठी त्या कपड्यांची गुणवत्ता आखून द्यायची आणि त्या कपड्याचे रास्त मुल्यांकन करून द्यायचे. सकाळी दहा ते बारा, ही कामाची वेळ राहील. महिन्यातला वीस हजार रुपये पगार देण्यासाठी संघटना तयार आहे. बाबूरावांनी एक दोन दिवसात विचार करून जो निर्णय घ्यायचा असेल तो घ्यावा."


-----


रमाकांत बोलायचे थांबले आणि त्यांनी बाबूरावांना बोलण्यासाठी आमंत्रित केले. 


बाबूरावांनी बोलणे सुरू करण्याच्या आधी काकांच्या फोटोला दंडवत नमस्कार घातला. उठून उभे राहिल्यावर ते दोन तीन मिनिटे काकांचा फोटोकडे एकटक पहात उभे राहिले. बाबूरावांचे डोळे पाणावले होते. आपल्या कोटाच्या खिशातून बाबूरावांनी रुमाल काढला आणि आपले डोळे टिपले. बाबूरावांनी हलक्या आवाजात आपला घसा खाकरून मोकळा करून घेतला. खरेतर बाबूराव गदगदून गेले होते.


"दहा वर्षांचा होतो. मला तो दिवस आजही स्पष्टपणे आठवतो ज्या दिवशी माझी आई मला घेऊन या दुकानात आली होती. मला कळायला लागल्यावर, मी स्वतःला हा प्रश्न बरेचदा विचारला आहे की माझ्या आईने मला कामाला लावण्यासाठी हेच दुकान का म्हणून निवडले असेल. माझ्या डोक्यात हा प्रश्न उत्पन्न व्हायला लागला तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सगळ्यात योग्य व्यक्ती असलेली माझी आई हयात राहिली नव्हती."  


बाबूराव इथे काही क्षण थांबले. 


"या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी योग्य असे "काका" यांना हा प्रश्न विचारण्याचे मला कधी धैर्यच झाले नाही. 

त्यांच्याच पायावर डोके ठेवून माझ्या आईने मला कामावर ठेवून घ्या म्हणून त्यांना कळकळीची विनंती केली होती म्हणून मला असे वाटायचे की जर का मी त्यांना विचारले असते तर त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले असते." 


"काकांनी ती विनंती मान्य केली आणि मला आपल्या पंखाखाली घेतले. माझ्यासारख्या गरीब आणि परिस्थितीतने त्रस्त झालेल्या एका विधवेच्या मुलाला आधार दिला. काका माझे मालक न होता माझे सर्वेसर्वा झाले. माझा हात धरून माझे जीवन घडवले. आमच्या निराधार घराला मला कामावर ठेऊन आधार दिला. काकांमुळे आम्हाला दोनवेळेचे जेवण मिळू लागले. काकांमुळे अंग झाकण्यासाठी कपडा मिळू लागला."


बाबूराव परत थांबले. एकदोन मिनिटानी परत बोलू लागले, 


"काकांनी माझ्या मनात दुकान म्हणजे नुसते क्रय-विक्रय करण्याचे स्थान नसते हे बिंबवले. दुकान हे एखाद्या देवळापेक्षा कोणत्याही दृष्टीकोनातून कमी नसते हे शिकवले. माझे दुकानातील काम सकाळी सर्वात आधी सुरू व्हायचे. काकांचा सर्वात महत्त्वाचा आणि कडक नियम हा होता की दुकानात, दुकानाचे मालक असो अथवा कर्मचारी असो, स्नान करून शुचिर्भूत झाल्याशिवाय दुकानात प्रवेश करायचा नाही. आपण सगळेजण आजही तो नियम पाळतो." 


सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. सगळ्यांना काकांची आठवण झाली. 


"माझ्या आईला काकांनी त्यांचा हा नियम बहुतेक सांगितला असावा, आई स्वतःसुद्धा अंघोळ झाल्याशिवाय चुलीला हात लावत नसे. काकांनी नियम सांगितल्यावर माझी स्नान संध्यावंदना झाल्याशिवाय जेवायला वाढत नसे. जेवण करून दुपारच्या साठी डबा घेऊन मी सरळ काकांच्या घरी पोहोचे. चालतच जावे लागे. काका दुकानाच्या चाव्या त्यांच्या घराच्या बैठकीत एका विशिष्ट ठिकाणी ठेवीत असत. त्या चाव्या त्या जागेवरून घेऊन तिथून चालत दुकानात." 


दुकानात काम करणाऱ्या सगळ्यांना बाबूरावांच्या या दैनंदिनीची इथ्यंभूत माहिती होती पण आज सगळ्यांनी आधीच ठरवले होते की बाबूरावांना, ते बोलत असताना मध्येच काही बोलून त्यांच्या विचारांची तंद्री मोडायची नाही असे. 


उद्यापासून बाबूराव दुकानात येणार नाहीत हे सत्य अजून दुकानातील सर्वांना पचत नव्हते. बाबूराव या दुकानाचे प्राण होते. बाबूरावांमुळे दुकानात बरकत होती. 


बाबूराव सेवानिवृत्त होणार हे ऐकल्यापासून सर्व कर्मचार्यात दुकानातील रोजची विक्री किती टक्क्यांनी घसरणार याच्यावर पैसे लावून पैजा ठरू लागल्या. 


बाबूराव आपल्या भूतकाळात हरवले होते. ते परत बोलायला लागले, 


"तेव्हा दुकानाला आजच्यासारखे लोखंडी शटर नव्हते. लाकडाच्या फळ्यांचा दरवाजा होता. त्या फळ्यांना कडीकोयंडे लावलेली होती. त्या काळी चार ठिकाणी कुलूप लावलेले असायचे. हे दृश्य इथे बसलेल्यांपैकी मी, रमाकांत आणि मनोहरदादा भावे यांनी पाहिले आहे. बाकीच्यांनी शटर लावलेले दुकान पाहिले आहे. मनोहरदादा भावे या दुकानात, माझ्या आधी दोन वर्षे कमाला लागले होते. तेव्हा ते फक्त आठ वर्षाचे होते. माझ्याहून दोन वर्षांनी मोठे आहेत म्हणून काकांनी मला त्याना दादा म्हणायचे बंधन घातले. काकांनी बंधन घातले ते अगदी योग्य केले होते आणि त्यांनी फार पुढचा विचार करून आणि दुरदृष्टीने घातलेले हे बंधन होते. मला सख्खा भाऊ नाही. मनोहरदादाने ती जागा घेतली. आता या जगात माझे डोके मी ज्या पायांवर भक्तीने, आदराने, श्रद्धेने आणि आशीर्वादाच्या याचनेने ठेवता येईल ते पाय म्हणजे माझ्या मनोहरदादांचे आहेत." 


सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. बाबूरावांनी घोटभर पाणी पिले आणि परत बोलू लागले. 


"मी दुकान उघडून, दुकानासमोर झाडलोट करून सडा घालेपर्यंत मनोहरदादाही दुकानात यायचे. मनोहरदादा आणि मी, मिळून दुकानाच्या आतील साफसफाई करीत असू. मालावर फडके झटकून धुळ काढणे. गाद्यांवरच्या चादरी बदलणे. काका जिथे बसायचे ती जागा स्वच्छ करणे. देवांच्या तसबिरी साफ करून पुजेसाठी तयारी करून ठेवणे. पिण्यासाठी पाणी भरून ठेवणे. अकरा वाजेपर्यंत दुकान लखलखीत करून ठेवायचे ही माझी आणि मनोहरदादांची जबाबदारी होती. या कामासाठी आम्हाला विषेश मोबदला मिळायचा. बाजारपेठेत असलेल्या हाॅटेलात नाश्ता आणि चहा मिळायचा.


स्वर्गीय सदाशिवराव नारायणराव भोपळे ऊर्फ काका यांनी माझे विनायक महादेवराव जिंतूरकर हे नाव बदलून त्याचे फक्त बाबू असे केले (संक्षिप्त आणि उच्चारण करण्यासाठी सोपे). माझ्या खर्‍या नावापेक्षा बाबूराव हेच नाव जास्त प्रसिद्ध झाले आहे. माझ्या खर्‍या नावापेक्षा मलाही माझे बाबू हेच नाव आवडते. काकांनी ठेवलेले असल्याने. मी आणि रमाकांत एकाच वयाचे असल्याने काकांनी रमाकांतना दादा म्हणायची आमच्यावर कधी सक्ती केली नाही. आम्ही आधी एकमेकांशी ऐकरीनेच बोलायचो. रमाकांत जेव्हा काकांच्या जागेवर बसू लागले तेव्हा, मी आणि मनोहरदादा, रमाकांतना आदरार्थी संबोधित करायला लागलो. रमाकांतनी माझे बाबूचे बाबूराव केले. रमाकांत गल्ल्यावर बसायला लागल्यावर त्यांचे लग्न झाले. माझे मी बांबूचा, बाबूराव झाल्यावर झाले. रमाकांत गल्यावर बसू लागल्यापासून काका आमच्याबरोबर सर्वसामान्य सेल्समनसारखे खाली गादीवर बसू लागले."


सगळे तल्लीन होऊन ऐकत होते. बाबूरावांच्या घरच्यांना बाबूराव जे सांगत होते त्यापैकी बरेचसे माहीतही नव्हते.


"काकांना जे काही येत होते ते त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने शिकवले. तेही खूप त्रासातून आणि होरपळून बाहेर निघालेले होते. तेही माझ्यासारखेच कधी शाळेत गेले नाहीत. हे सर्व त्यांनी स्वतः मला सांगितलेले आहे. जेव्हा त्यांच्याकडे चार पैसे जमले तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःसाठी खाजगी शिकवणी लाऊन घेतली आणि लिहायला वाचायला शिकले. जेव्हा दुकानात गिर्‍हाईक नसायचे तेव्हा काका इथेच दुकानात बसून आभ्यास करायचे. काकांनी आम्हाला सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवीण्याचा सल्ला दिला पण आमच्या वेळी दुकानात गिर्‍हाईक नाही अशी वेळ कधी आलीच नाही."


बाबूराव आज बराच वेळ बोलतील याचा पूर्वानुमान मनोहरराव भावेंनी लावला होता आणि म्हणूनच त्यांनी आधीच सर्वांसाठी चहाची ऑर्डर देऊन ठेवली होती. बाबूरावांनी चहा पिताना, "माझे बोलणे आवरते घेऊ का?" असे विचारले. सगळ्यांनी एकसुरात "नको" असे उत्तर दिले. 


चहा पिणे झाल्यावर आणि बाबूराव परत बोलायला सुरू करण्याच्या अगोदर बाबूरावांच्या मोठ्या मुलाने, सुंदरने आपल्या वडिलांना विचारले, "बाबा, तुमचे नाव सत्यवचन बाबूराव कसे पडले आणि दुकानाचे नाव भोपळ्यांचे कपड्याचे दुकान याचे फक्त सत्यवचन कसे झाले ते सांगा ना." 


बाबूराव सुंदरला म्हणाले, "मी जर का सरळ तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले तर तुला मजा येणार नाही. तुला जे ऐकायचे आहे ते माझ्या बोलण्याच्या ओघात आणि योग्य वेळी येईलच आणि ते तेव्हाच ऐकण्यात मजा आहे."


-----


सुंदरच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर बाबूराव सर्वांना उद्देशून म्हणाले, "काकांनी जरी माझ्या दुकानातील नोकरीची सुरुवात, दुकानातील अगदी शेवटच्या कामापासून केली होती हे मला त्या वेळीही कळत होते पण त्यांना मला दुकानातील दुकानाच्या मालकाच्या खालच्या जागे पर्यंत न्यायचे आहे हे मात्र तेव्हा कळले नाही. 


जसे जसे मी एक एक कामात पारंगत होत गेलो तसे तसे काका मला दुकानातील नवीन काम सोपवायचे. उदाहरणार्थ मी दुकानातील झाडलोट या कामात त्यांच्या पसंतीस उतरल्यावर काकांनी मला बैठक सजवण्याची जबाबदारी दिली. 


बैठक म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात महागाचे कपडे ग्राहकांना दाखवले जातात ती जागा. ही दुकानातील एक विशिष्ट जागा असते आणि अतिशय खास आणि विषेश ग्राहकांना या बैठकीवर बसण्याचे आमंत्रण मिळत असे. 


आता तशी व्यवस्थाच राहिली नाही ही बाब वेगळी आहे म्हणा. 


त्या काळी बैठकीत बसलेल्या ग्राहकांना माल दाखवण्याचा मान दुकानातील सर्वात उत्तम कर्मचार्याला मिळत असे, एवढेच नाही तर बैठकीत ज्या कर्मचार्याचा हातावर जितक्या किमतीचा माल विकला जाई त्या एकूण रक्कमेचे दोन टक्के कर्मचार्याला प्रोत्साहन म्हणून मिळत असे.


दुकानातील सर्व कर्मचार्‍यांना बैठकीत बसायची लालसा असे. कर्मचाऱ्यांमध्ये तिथे पोहचण्याची चढाओढ चाललेली असायची. आपल्या दुकानाचे हल्लीचे संचालक रमाकांतना बैठकीत पोहचण्यासाठी पंधरा वर्षे लागली, तेही हे दुकान त्यांचेच असताना. या उदाहरणावरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल की काकांच्या हाताखाली काम करणे म्हणजे लोखंडी चणे चावण्यासारखे होते.


काकांनी परगावाहून आलेल्या मालाचे गठ्ठे कसे उघडायचे इथपासून ते रात्री दुकान बंद कसे करायचे, दुकानातील प्रत्येक काम, सगळ्यात उत्तम, सागळ्यात फायदेशीर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी पद्धती दुकानासाठी सगळ्यात जास्त फायदेशीर अशा पद्धतीने कसे करता येतील याची पूर्ण माहिती लिहून ठेवली. दुकानातील प्रत्येक काम कसे करायला पाहिजे किंवा दुकानातील प्रत्येक काम कसे व्हायला पाहिजे याची नियमावली तयार करून ठेवली आहे. 


कपड्याच्या गुणवत्ता कशी आखायची 

आणि कपड्याच्या जाती कशा ओळखायच्या हे काकांनी आम्हाला स्वतः शिकवले. हे शिकण्यासाठी चार वर्षे लागली आणि त्यात वाखाणण्याजोगे प्राविण्य मिळण्यासाठी दहा वर्षांचा अनुभव लागला. 


कपड्याचे विणकाम, कपडा विणण्यासाठी वापरलेला तागा, कपड्याचे रंग, कपड्याच्या विणकामात केलेले डिजाइन थोडक्यात काय तर कपड्यांचे आपले एक स्वतंत्र विश्व आहे. आमचे काका त्या विश्वाचे सर्वात निपूण जाणकार होते. मी त्यांचा हात धरून या विश्वात वावरलो. त्यांच्यामुळेच मला या विश्वाची ओळख झाली. त्यांना या विश्वाचे जे ज्ञान होते, ते सर्व त्यांनी निस्वार्थ आणि निरपेक्षपणे माझ्या सारख्या अनोळखी आणि निराधार मुलाच्या पदरात झुकत्या मापाने घातले"


बाबूरावांना काकांच्या अनंत उपकारांची आठवण येऊन हुंदका फुटला. ते बोलायचे थांबले. समोर बसून ऐकणार्‍यांचे डोळे पाणावले. सगळेजण पाणावलेल्या डोळ्यांनी काकां फोटोकडे पहात त्या फोटोला दोन हात जोडून नमस्कार केला. 


पाच मिनिटानंतर परत एकदा बाबूराव बोलायला लागले, 


"काकांना जेव्हा पटले की मी बैठक सजवण्यात निपूण झालो आहे तेव्हा त्यांनी मला परगावाहून आलेले मालाचे गठ्ठे कसे उघडायचे हे जातीने लक्ष घालून शिकवले. दुकानात काम करता करता आणि प्रत्येक विभागातील कामात नैपुण्य आत्मसात करण्यासाठी पंधरा वर्षांचा कालावधी लागला. आता डायरेक्ट काकांच्या हाताखाली माझी फायनल ट्रेनिंग सुरू झाली. 


काकांना ग्राहकाला कोणता कपडा किंवा कोणते कपडे आवडले आहेत हे अगदी अचूकपणे कळायचे. मी हे मला आलेल्या हजारो अनुभवावरून सांगतो आहे. ग्राहकांने एखाद्या कपड्याला हात लावला अथवा एखाद्या कपड्यावरून हात फिरवला अथवा एखाद्या कपड्याला विशिष्ट नजरेने पाहिले की काकांच्या ताबडतोब लक्षात यायचे की ज्या कपड्यावर ग्राहकांने हात फिरवला आहे तोच कपडा तो घेणार. काका तो कपडा काढून माझ्या हवाली करायचे. ग्राहक तसे त्याला दाखवण्यात येणार्‍या प्रत्येक कपड्यावरून हात फिरवायचा पण तो ज्या कपड्यावरून एका विशिष्ट पद्धतीने हात फिरवायचा ती पद्धत काका बरोबर टिपायचे. शेवटी ग्राहक काकांनी माझ्याकडे दिलेला कपडा मागायचा आणि काका जो भाव मागतील त्या भावात घासाघीस न करता विकत घ्यायचा. 


काकांनी मला आणि रमाकांतना ग्राहकांच्या मनातले ओळखण्याची कला शिकवली. ही कला पूर्णपणे आत्मसात होण्यासाठी आम्हला बैठकीवर काकांच्या मागे पाच वर्षे उभे रहावे लागले. 


मी आणि रमाकांत स्वतंत्रपणे आणि आमच्या स्वतःच्या आत्मविश्वासवर बैठकीवर माल विकू शकतो असे जेव्हा काकांना माझ्याविषयी आणि रमाकांतविषयी वाटले तेव्हा त्यांनी बैठक सोडली. काकांच्या नंतर बैठकीवर बसण्याचे मानकरी फक्त मी आणि रमाकांत होतो. मनोहरदादा बैठकीवर माझ्या मागे उभे रहायचे. 


काकांच्या आशीर्वादाने आणि मनोहरदादांच्या साह्याने बैठकीवर माझ्या हस्ते माल विक्रीचे नवे नवे विक्रमी उच्चांक गाठले. मी माझी आत्मस्तुती करत नाहीये फक्त वस्तुस्थिती सांगत आहे. मी जे सांगत आहे ते सर्व शंभर टक्के खरे आहे याची साक्ष इथे बसलेले सर्वजण देऊ शकतात. अक्षरशः मी बैठकीवर चढायची ग्राहक मंडळी वाट पहात ताटकळत उभी राहायची. मी काकांच्या आशीर्वादाने काकांचा विक्रीचा रेकॉर्ड मोडला आणि त्याहून कितीतरी पटीने जास्त माझ्या हातावर झालेल्या विक्रीचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला जो अजूनपर्यंत कोणीही तोडू शकले नाहीत. 


काकांनी आम्हाला ग्राहकांचे मन जिंकायला शिकवले. ग्राहकांशी कसे बोलावे, किती बोलावे, केव्हा बोलावे आणि काय बोलावे हे सर्व शिकवले. कपडा कसा दाखवावा, कपड्याचे वैशिष्ट्य कसे सांगावे, कपडा त्याच्या अंगीभूत असलेल्या गुणवत्तेच्या मानाने किमतीत किती स्वस्त आहे हे कसे पटवून द्यावे, काकांनी आम्हाला असे अनेकानेक धडे शिकवले. 


त्या काळात मनोहरदादांनी माझी ओळख सत्यवचन या शब्दाशी करून दिली. मी ग्राहकांना ताई, आई, काका, मामा, दादा अशा नावाने संबोधित करायचो. ग्राहक जेव्हा कपड्याची किमत कमी करण्यासाठी घासाघीस करायचे, तेव्हा मी माझ्या गळ्याची शप्पथ घेऊन, मी सांगितलेली किमत एकदम खरी आणि रास्त आहे असे सांगायचो. 


मनोहरदादांनी गळ्याची शप्पथ घेण्या ऐवजी फक्त सत्यवचन असे म्हणत जा असे सुचवले. मलाही मनोहरदादांची सुचना पटली आणि मी एका विशिष्ट पद्धतीने सत्यवचन या शब्दाचा प्रयोग करायला सुरुवात केली. 


त्या काळी मी एकटा एका दिवसात तीस ते चाळीस ग्राहकांना हाताळत असे आणि प्रत्येक ग्राहकाची विक्री पूर्ण करण्यासाठी मला सत्यवचन या शब्दाचा कमीतकमी पाच ते दहा वेळा उपयोग करवा लागत असे."


उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आग्रह केला म्हणून बाबूरावांनी त्यांच्या अद्वितीय आणि असामान्य विक्री करण्याच्या कलेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी सुधाताईंना अगदी लेटेस्ट आणि आजच आलेल्या मालातून काही अप्रतिम साड्या दाखवल्या. त्या साड्यांवर फक्त विकणार्यालाच कळेल अशा सांकेतिक भाषेत कमीतकमी आणि जास्तीत जास्त किमतीत विकण्याची रेंज लिहीलेली होती. 


सत्यवचन बाबूरावांनी सुधाताईंना आवडलेली प्रत्येक साडी ओळखली आणि सुधाताईंना जास्तीत जास्त किमतीत साडी विकली सुद्धा. त्यांच्या सत्यवचन या शब्दाच्या वापरावर सगळे मंडळी बेफाम खूश झाले. 


बाबूराव हे प्रात्यक्षिक झाल्यावर परत एकदा बोलायला लागले,


"काकांना माझे सत्यवचन शब्द वापरणे आवडले. सर्वात पहिले दुकानातील माझ्या सहकर्मचार्यांनी गम्मत म्हणून आणि माझी चेष्टा करण्यासाठी माझ्या नावाच्या आधी सत्यवचन लावले आणि त्या नवीन नावाची बाजारात आणि इतरत्रही भरपूर जाहिरात केली. माझ्या सहकर्मचार्यांनी सत्यवचन बाबूराव हे नाव वापरले आणि पसरवले. होता होता माझे हेच नाव पडले. माझ्याकडून कपडा विकत घेणारे माझ्या या नवीन नावाची मौखिक जाहिरात करू लागले. ग्राहक दुकानात येऊन सत्यवचन बाबूराव आहेत असे विचारु लागले. पाच सात वर्षात संपूर्ण गावात माझे नाव सत्यवचन बाबूराव प्रस्थापित झाले. पुढे दुकानाच्या नावाची गत ही तीच झाली. दुकानातील सगळ्यात प्रसिद्ध आणि यशस्वी विक्रेता म्हणून नाव झाले होते. लोक माझ्या नावाने दुकानाला ओळखू लागले. कपड्याच्या बाजारपेठेतील इतर व्यापारी मंडळीने भोपळ्यांच्या महाराष्ट्र क्लाॅथ सेंटरचे भोपळ्यांचे कपड्याचे दुकान झालेले पाहिले होते आणि त्या भोपळ्यांच्या कपड्याच्या दुकानाचे नवीन गोड आणि संक्षिप्त नाव सत्यवचन झालेले ही पहात होते. बाजारपेठेत सगळ्यांना एक शब्दी सत्यवचन हे नाव आवडले आणि त्यांनी हेच नाव वापरायला सुरुवात केली. हळूहळू काही दिवसात आमच्या दुकानाचे नाव सत्यवचन झाले आणि त्याआधी माझे नाव सत्यवचन बाबूराव झाले."


बाबूरावांनी आपले बोलणे संपवले. रात्रीचे आठ वाजले होते. बाबूरावानी आपले दुकानातील नाव दुकानात ठेवून दिले. रमाकांतना, आता पुढे नोकरी करण्याची इच्छा नाही हे सांगितले. 


रमाकांतनी बाबूरावांनी प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी सुधाताईंना विकलेल्या साडीचे पैसे घेण्यासाठी नकार दिला आणि म्हणाले, "वहिनी ही तुम्हाला तुमच्या सत्यवचन बाबूरावांकडून सप्रेम भेट आहे." 


विनायकराव महादेवराव जिंतूरकर आपल्या कुटुंबीयांसमवेत दुकानाच्या बाहेर पडले, बाकीच्या मंडळींना दुकान बंद करायचे होते, सर्वजण जिंतूरकर मंडळींना निरोप देण्यासाठी दुकानाच्या प्रवेशद्वारापाशी जमले. विनायकरावांनी दुकानाच्या उंबरठ्यावर आपले डोळे ठेवून दुकानाला साष्टांग दंडवत घातले. साश्रू डोळ्यांनी परत एकदा दुकान न्याहाळून पाहिले. रमाकांत, मनोहरदादा आणि त्यांच्या इतर समवयस्क सहकर्मचार्यांची गळाभेट घेतली. 


रमाकांतचे अश्रू विनायकरावांच्या खांद्यावर ओघळले आणि विनायकरावांचे रमाकांतच्या खांद्यावर. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational