Sanjay Udgirkar

Inspirational

4.0  

Sanjay Udgirkar

Inspirational

नमस्कार

नमस्कार

4 mins
198


गावात सगळ्यात गरीब स्वभावाचा माणूस कोण असे जर विचारले तर कोणीही फक्त एकाचे नाव घेतील आणि ते नाव होते तुकाराम तावरे. अतिशय मवाळ स्वभावाचा धनी. त्याला आजपर्यंत रागात आलेला गावात तरी कोणी पाहिलेले नव्हते. आर्थिक परिस्थिती जेमतेमच. मेटाकुटीने जीवन व्यतीत होत होते. मध्यमवर्गीयांत तो अगदी शेवटच्या ओळीत होता. म्हणजे गरीबीच्या रेषेच्या खाली दहा टक्के व नव्वद टक्के गरीबीच्या रेषेच्या वर. घरात एक आहे तर एक नाही अशी परिस्थिती. जे सण साजरे करण्यासाठी कांही लागत नाही तसे सण साजरे करणारे कुटुंब. घरात बायको, दोन मुलं, वृद्ध माता पिता व एक दिव्यांग बहीण जिचे लग्न जमवायचे खुळ आता सगळ्यांच्या डोक्यातून निघून गेले होते. घरातील कमावणारे व्यक्ती म्हणजे स्वतः तुकाराम, तुकारामाची बायको व तुकारामाचे वृद्ध माता पिता. दोन्ही मुलं शाळेत जाणारी. बहीण घरात राहून काम करून जमेल तेवढे पैसे कमावणारी.

तुकाराम गावातील सर्वात धनाढ्य व्यक्ती मलिअप्पा वीरगे यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला होता. इथे मॅनेजर शब्दाचा अर्थ जाणून घेणे फारच आवश्यक आहे. तुकाराम सकाळी आठला मलिअप्पाच्या दारा समोर हजर असायचा. त्या क्षणापासून रात्री आठ पर्यंत मलिअप्पा व त्यांचे कुटुंबीयांनी तुकारामला उद्देशून जे फर्मान सोडले त्याची अमलंबजावणी करणे ह्या कामाचे वर्णन मलिअप्पा मॅनेजर म्हणून करायचे.

तुकारामाला मलिअप्पाच्या नातवाचे ढुंगण धुण्यापासून बॅंकेत जाऊन पैसे भरणे, वकीलाकडे जाणे. औषधे आणणे. थोडक्यात काय तर अबे तुक्या म्हणून आवाज आला की ज्या दिशेकडून तो आवाज आला आहे तिकडे धावणे व धावत असताना आलो जी, आलो जी असे ओरडणे ही ड्युटी. जे काम अंगावर पडेल ते झेलणे, ते करणे व लगेच दुसर्‍या कामासाठी सज्ज राहणे. मलिअप्पाच्या घरात सगळ्यात जास्त काही ऐकू येत असेल तर ते अबे तुक्या ही हाक. लहान पोरं टोरं सुद्धा तुकारामाला तुक्याच म्हणत. घरातील बाय बापड्या पण तुकारामाला तुक्याच म्हणून हाक मारीत. तुकाराम मात्र घरातील सर्व पुल्लिंगीना मालक म्हणून संबोधित असे व सर्व स्त्रीलिंगी तुकारामासाठी अम्मा होत्या. हा नियम मलिअप्पानी तुकारामाला कामावर ठेवताना बाध्य केला होता. मलिअप्पाने तुकारामाला नोकरीवर ठेवताना ज्ञानाच्या चार गोष्ट सांगितल्या, त्या काय म्हणजे गरीबाला आत्मसम्मान नसतो, गरीबाला स्वाभिमान शोभत नाही, गरीबाला अक्कल नसते व गरीबाला मानापमानाशी काही घेणे देणे नसते.

मलिअप्पा व त्यांचे कुटुंबीय तुकाराम तावरेचा केंव्हाही व कोठेही सर्रास अपमान करीत व हा प्रकार तुकारामाला त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सहन करावा लागत होता.

गावातील लोकसुद्धा तुकारामाला मलिअप्पा जसे वागवीत तसेच वागवत. गरिबी सारखा मोठा शाप जगात अजून कोणताच नाही. तुकारामाला परमेश्वराने गरिबीचा शाप व प्रचंड बुद्धीमत्ता व दुरदृष्टीचे वरदानही दिले होते.

स्वभाव गरीब व आर्थिक परिस्थिती खराब या दोन्हीच्या प्रभावा मुळे तुकाराम तावरे अतिशय विनम्र झाला होता. त्याला सहजच येता जाता वाटेत ओळखीचे कोणी भेटले तर नमस्कार करायची सवयच लागली होती आणि लोकांना त्या नमस्काराकडे दुर्लक्ष करायची सवय लागली होती.

तुकारामाचा अपमान करणे, त्याच्या विनम्र अभिवादनाचा अस्वीकार करणे. तो उपस्थित असला तर त्याची दखल न घेणे. तुकारामशी असे वागणे हे गावकर्यांच्या अंगवळणी पडले होते.

अशी म्हण आहे की परमेश्वर उकीरड्याचे सुद्धा कधीनाकधी पांग फेडतो. वेळ बदलत असते. - त्रिया चरित्रं पुरुषस्य भाग्यम, देवो न जानति कुतो मनुष्यं. - असे संस्कृत मधील एक सुभाषित आहे. ह्याचे जिवंत उदाहरण म्हणजे तुकाराम तावरे. त्याचा भाग्योदय झाला आणि असा काळ सुरू झाला की तुकाराम ज्याला हात लावील ते सोने. तुकारामाने पाचशे रुपया इतक्या किरकोळ रकमेने धान्याच्या दलालीचा व्यापार सुरू केला. तो तुकारामाच्याही कल्पनेच्या पलीकडे वाढला. परमेश्वराने तुकारामाला त्याच्या झालेल्या प्रत्येक अपमानाचा, दुःखाचा, त्रासाचा भरभरून मोबदला दिला. फक्त पाच वर्षाच्या कालावधीत तुकाराम तावरे गावातील सगळ्यात श्रीमंत माणूस झाला. गावातील सर्व लोक तुकारामाला आता मालक, सावकार, धनी अशी बिरूदे लावून बोलू लागली.

मलिअप्पा आता तुकारामाच्या धन-संपत्ती व ऐश्वर्या समोर भिकारडा वाटू लागला होता. मलिअप्पाला तुकारामासमोर उभा रहायचे धैर्य होत नव्हते. आज अशी परिस्थिती होती की सगळ्या गावाला तुकारामाच्या बाबतीत परमेश्वराने पश्चात्ताप करायची वेळ आणली होती.

तुकाराम व त्याच्या परिवारातील सदस्य मात्र पहिले जसे विनम्र होते तसे आजही होते. पैसे आले म्हणून कोणी उतले नाहीत की मातले नाहीत. आपला भुतकाळ विसरले नाहीत. एक बदल जो सर्व कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यात ते श्रीमंत झाल्यावर आला व जो सर्व गावातील मंडळींना प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे गावातील गरजू व गरीब लोकांना तावरे कुटुंबाची सढळ हाताने मदत.

तुकाराम आजही सकाळी आठ वाजता मलिअप्पाच्या दारासमोर जाऊन उभा राही. मलिअप्पा व त्यांचे कुटुंबीय बाहेर येत. तुकाराम तावरे सर्वांना आदरपूर्वक नमस्कार करी व पुढे आपल्या कामावर जाई. मलिअप्पाने मागच्या पाच वर्षांत तुकाराम तावरेला कितीदा तरी विनंती करून हा प्रकार थांबवण्यासाठी सांगितले पण तुकारामाने मलिअप्पाचे मनावर घेतले नाही. मलिअप्पा व त्याच्या कुटुंबीयांना रोज सकाळी तुकाराम तावरेचे घरासमोर येऊन उभे राहणे म्हणजे कडुनिंबाचा पाला तोंडात घेऊन तो चावून त्याचा कडू रस गिळण्यासारखे होते.

गावातील लोक तुकाराम तावरेला जेव्हा आदर युक्त नमस्कार करीत तेव्हा तुकाराम तावरे त्या नमस्काराचे प्रत्यूत्तर म्हणून फक्त एक शब्दाचा उच्चार करत असे आणि तो शब्द होता, सांगतो. तुकाराम तावरेला कोणी नमस्कार केले की तुकाराम तावरे प्रत्यूत्तर म्हणून हात जोडून सांगतो म्हणायचा.

बरेच दिवस लोकांना हा काय प्रकार आहे हे लक्षात आले नाही.

गावातील काही वयोवृद्ध लोकांनी एकदा तुकाराम तावरेला थांबवून विचारले की, "नमस्काराचे प्रत्यूत्तर नमस्काराच्या ऐवजी सांगतो हा काय चावटपणा आहे."

तुकाराम तावरे हसून म्हणाला, "आपण सर्वजण माझ्यापेक्षा वडील आहात व मला तुम्हा सर्वांबद्दल नितांत आदर आहे. मी नमस्काराचे प्रत्यूत्तर सांगतो म्हणून जे देतो त्याचे कारण हे आहे की तुम्ही सर्व गावकरी मंडळी जो नमस्कार मला अशात करत आहात तो मला करत नसून माझ्याकडे वस्तीला आलेल्या पैशाला करत आहात. म्हणून मी त्या नमस्काराचा स्वीकार न करता तो फक्त घेतो व घरी जाऊन त्या पैशाला सांगतो की गावकरी मंडळींनी आपल्याला नमस्कार सांगितला आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational