Sanjay Udgirkar

Inspirational

3  

Sanjay Udgirkar

Inspirational

एक रूपाया

एक रूपाया

6 mins
1.3K


"हेलो, हेलो, आई मी दिनकर."

दिनकरला फोनच्या रिसीव्हरवर आईच्या हुंदक्यांचा आवाज आला. आई रडत होती हे दिनकरला जाणवले.

"हेलो, आई रडू नकोस. माझ्याशी बोल ना. मी खूप खटाटोप करून माझ्या व्यस्त दिवसातून दहा मिनीटे तुझ्याशी बोलण्यासाठी काढली आहेत. मला कल्पना आहे की तुझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई, आम्हालाही न सोसवेनासे आणि कधीही न संपणारे दुःख झाले आहेच. आम्ही आमचे वडील गमावले आहेतच."

सौ शकुंतला शांताराम कुलकर्णी यांचे सौभाग्य संपुष्टात आले होते. श्रीयुत शांताराम शंतनूराव कुलकर्णी यांचे पंचवीस दिवसांपूर्वी देहावसान झाले होते.

सौ शकुंतला कुलकर्णी आता नुसत्या शकुंतला कुलकर्णी राहिल्या होत्या. त्यांना त्यांची मुले, सूना, नाती, नातवंड आणि जावई, आई म्हणायचे. शकुंतलाबाईंनी आपल्या जीवनात नवरा, मुले, नातवंड, लेक आणि जावई यांच्याशिवाय जास्त कोणाला प्रवेश दिलाच नाही.

शकुंतलाबाईंना लग्नानंतर शिष्ट आणि तुसडी अशी विशेषणे चिकटली ती संपूर्ण हयातीसाठीच. खर तर शकुंतलाबाई तुसड्या किंवा शिष्ट नव्हत्या. त्या मितभाषी आणि अंतर्मुख, विचारवंत आहेत हे फक्त त्यांच्या सहवासात काही काळासाठी आलेल्यांना कळत असे.

कै. शांताराम शंतनूराव कुलकर्णी, भारतीय रेल्वेत अधिकारी म्हणून कामाला होते. शांताराम कुलकर्णींची नोकरी दर दोनतीन वर्षाने बदली होणारी असल्याने कुलकर्णी कुटुंबाचे कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी कोणाशीही घनिष्ठ संबंध झाले नाहीत.

वयाच्या पन्नासाव्या वर्षी शांताराम कुलकर्णींना त्यांच्या वडिलोपार्जित जायजादीतला हिस्सा मिळाला. पंधरा एकर शेत (कोरडवाहू) आणि गावातील वडिलोपार्जित आणि जुन्या जर्जर झालेल्या घरातील त्यांच्या कुटुंबीयांना राहण्यापुरता वाटा.

शांताराम आणि शकुंतलाबाई यांना दोन मुलगे आणि एक मुलगी. तिन्ही मुले अद्वितीय तल्लख बुद्धीमत्तेचे मालक. जन्मजात बुद्धिमान होते. तिन्ही मुले इंजीनियरिंग शिकून जाऊन अमेरिकेत स्थायिक झाले.

भारतात शांताराम आणि शकुंतलाबाई दोघेच रहायचे. मुले या दोघांना सुद्धा भारत सोडून, गाशा गुंडाळून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी या असा तगादा लावून होते.

शांताराम कुलकर्णींना आपल्या मुलांना भारतात स्वारस्य राहिले नाही हे कळाले होते. त्यांनी, त्यांना मिळालेल्या वडिलोपार्जित इस्टेटीतला हिस्सा आपल्याच भावंडांना विकून पैसा केला. आपल्या गावाला आणि भावंडांना राम राम ठोकला.

शांताराम कुलकर्णी व्यवहारात अतिशय चाणाक्ष आणि दुरदृष्टीचे धनी होते. त्यांनी ते जिवंत असतानाच, मुले कधीही अमेरिकेहून परत येणार नाहीत हे ओळखले होते. शकुंतला, स्वतः आणि त्यांना अमेरिकेत स्थाईक होऊ देणार नाही हेही शांताराम कुलकर्णींनी चांगल्या प्रकारे ओळखले होते.

ह्या सगळ्या पाश्र्वभूमीचा विचार करून कै शांताराम कुलकर्णींनी आपल्या आयुष्यातील सर्व कमाई, वडिलोपार्जित मालमत्ता यांचे रूपांतर रोख रकमेत केले आणि बँकेत मुदतबंद ठेवीत गुंतवून टाकली. बहुतेक त्यांना ते पुढे जाणार आहेत याचे सुप्त संकेत मिळाले असावेत कारण त्यांनी आपली सगळी संपत्ती शकुंतलाच्या नावावर करून ठेवलेली होती.

कै शांताराम शंतनूराव कुलकर्णी यांचे अंत्यसंस्कार, दिवसवार त्यांच्या पुतण्याने केले. वसंतराव (पुतण्या) गावाकडून खास याच कामासाठी आला होता. तेरावा झाल्यावर वसंतरावानी आपल्या काकूंचा प्रत्यक्षात, दिनकर दादांचा, दिलीप भाऊंचा आणि दत्तात्रय भाऊजींचा व्हाॅटससअपच्या व्हिडिओ काॅल वरून निरोप घेतला. वसंतराव बोलता बोलता सद्यस्थितीत त्यांच्या विदीर्ण आर्थिक परिस्थिती विषयी बोलले. शकुंतलाकाकूंच्या पाया पडून वसंतराव घराबाहेर पडले आणि त्यांच्या फोनवर त्यांच्या बँकेकडून एस एम एस आला की अमेरिकेहून त्यांच्या खात्यात एक लाख रुपये ट्रांस्फर करण्यात आले आहेत. वसंतरावनी मनोमन कै शांताराम काकांचे आभार मानले.

आजमितीला शकुंतलाबाईंच्या नावे बँकेत पंच्याहत्तर लक्ष रुपये मुदतबंद ठेवीत जमा झाले होते.

"आई बोल ना. काय ठरलय तुझे. तू येणार आहेस ना आमच्याकडे." दिनकर पुढे बोलला.

शकुंतलाबाईने स्वतःला सावरले आणि त्यांच्या मोठ्या मुलाशी, दिनकरशी बोलू लागल्या,

शकुंतलाबाई, "दिनकर, या आधीसुद्धा तुम्हा सर्वांना बरेचदा सांगितले आहे की मी अमेरिकेला येणार नाही. मी हरिद्वारला माझ्या गुरूच्या आश्रमात उर्वरित आयुष्य घालवणार आहे. मला त्यासाठी तुमची परवानगी घ्यावी लागेल का?"

दिनकर, "नाही आई, मी तसे म्हटले नाही. आम्हाला तू आमच्या जवळ असावीस असे मनापासून वाटते, दुसरे काही नाही. शेवटी तुला काय करायचे आहे ते तूच ठरवणार आहेस."

शकुंतलाबाई, "दिनकर मी ठरवले आहे. फक्त या घराचे आणि मुदतबंद ठेवीत असलेल्या रकमेचे काय करायचे ते तुम्ही सर्वजण ठरवून मला कळवा."

दिनकर, "आई त्या सर्व पैशांचे, घराचे तुला जे काय करायचे असेल ते कर आमची त्यासाठी काहीच हरकत नाही. तसेही बाबांनी सर्वकाही तुझ्याच नावावर करून ठेवलेले आहे. आम्हाला फक्त तू इथे हवी आहेस. बघ विचार कर."

शकुंतलाबाई, "दिनकर, आश्रमात उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय मी कितीतरी वर्षे विचार केल्यानंतर घेतला आहे आणि तो ठाम आहे. असो. माझी ईच्छा आहे की सर्व रक्कम कोणत्यातरी चांगले काम करणाऱ्या संस्थेला अथवा आश्रमाला अथवा देवळाला देऊन टाकावी. माझ्या उदरनिर्वाहासाठी तुझ्या वडिलांची अर्धी पेंशन भरपूर आहे. तसेही आश्रमात कशासाठीच पैसे लागत नाहीत."

दिनकर, "जर का पैसा आश्रमाला द्यायचा आहे तर मग तुझ्या गुरुंच्या आश्रमाला का देत नाहीस?"

शकुंतलाबाई, "आमच्या गुरूंच्या आश्रमात आता दान घेत नाहीयेत. येते शंभर वर्षे आरामात अनुदानशिवाय

चालू शकेल इतका पैसा आमच्या आश्रमाकडे जमा झाला आहे."

दिनकर, "घराचे काय करणार आहेस."

शकुंतलाबाई, "घरही विकून टाकणार आहे."

दिनकर, "ठीक आहे. एक मोबाईल फोन जवळ ठेव म्हणजे कमीतकमी हवे तेव्हा बोलता येईल. चल आई, मला आता फोन ठेवावा लागेल. मी करतो तुला फोन नंतर निवांत."

आईच्या उत्तराची वाट न पहाता दिनकरने फोन कट केला. त्याची फोन बंद करण्याची ही पद्धत शकुंतलाबाईंच्या अंगवळणी पडली होती.

थोड्याफार फरकाने दिलीप, दिप्ती आणि दत्तात्रय यांच्याशी हेच सर्व बोलणे झाले. सगळे घाईगडबडीत होते. आईसाठी मोठ्या मुश्किलीने दहा मिनिटे फोनवर बोलण्यासाठी काढत होते हेही काही कमी नव्हते.

शकुंतलाबाईंनी पैसे कोणाला द्यावेत याचे शोधकार्य सुरू केले. शोधकार्य काही सोपे नाही हे त्यांना शोधकार्य सुरू केल्यावर लक्षात आले. सहा महिने शोधूनही त्यांना योग्य संस्था मिळाली नाही.

शेवटी शकुंतलाबाईंनी स्वतः फिरून आणि संस्थाना भेट देऊन, तिथल्या तिथे निर्णय घ्यायचा असे ठरवले. या निमित्ताने तीर्थयात्राही होईल आणि दान देण्यासाठी सतपात्र शोधणेही होईल असा विचार शकुंतलाबाईंनी केला आणि तयारीला लागल्या.

सर्वात आधी शकुंतलाबाईंनी आपले घर कै शांतारामांच्या एका परममित्राला विकले. घराचा ताबा दिल्यावर त्या तीर्थयात्रेला निघाल्या. आता त्यांच्या नावावर एक कोटी पंधरा लाख रुपये जमा होते. आयकर वगैरे भरल्यावर त्यांच्याकडे जवळपास एक कोटी रुपये उरणार होते असे त्यांच्या सनदी लेखपालाने त्यांना सांगितले होते.

शकुंतलाबाईने संस्थेच्या योग्यतेची चाचणी करण्यासाठी काही परिक्षा आपल्या मनाने तयार केल्या होत्या त्यातील अगदी महत्वाची आणि पहिली चाचणी म्हणजे त्या संस्थेला भेट देऊन ते त्या संस्थेच्या प्रबंधकांना सांगायचे की, त्यांना त्यांच्या संस्थेला एक रुपया दान द्यायचा आहे.

बर्‍याचशा संस्था शकुंतलाबाई त्यांच्या संस्थेला एक रुपयाचे दान द्यायला आल्या आहेत असे ऐकताच शकुंतलाबाईंना हाकलून लावायचे.

वर्षभर फिरल्यावरही त्याना योग्य संस्था मिळाली नाही. त्या निराश झाल्या होत्या आणि त्यांना शेवटी असे वाटू लागले की रक्कम मुलांना देऊन टाकावी आणि आश्रमात रहाण्यासाठी जावे. पण मुले रक्कम घेण्यासाठी तयार नव्हती. मुले म्हणत होती रक्कम कोणालाही दे पण तू आमच्याकडे ये. दर आठवडय़ाला मुलांचे आणि शकुंतलाबाईंचे फोनवर बोलणे होतच असे.

शेवटी एका तीर्थक्षेत्री त्यांना एका महंताची माहिती मिळाली. ती माहिती अशी की त्यांच्या आश्रमामुळे गावात कोणताही अतिथी अथवा गावातील सदस्य कधीच उपाशी पोटी रहात नाही. रोज दुपारी एकच्या सुमारास त्या महंतांच्या आश्रमातील भोजनशाळा सगळ्यांसाठी उघडली जात असे. जेवण साधेसुधेच असे पण सकस आणि पोटभर मिळत असे

शकुंतलाबाईने त्या आश्रमाला भेट देण्याचे ठरवले आणि हा शेवटचा प्रयत्न राहील असेही मनोमन ठरवले. त्या आश्रमात पोहोचल्या. तिथे संस्थापक समिती वगैरे काही प्रकार नव्हता. ते महंतच सर्व काम पहात होते. शकुंतलाबाईंना ते संत आश्रमाच्या स्वयंपाक घरात भेटले. अंगावर एक ओला पंचा घातलेले. सर्वसामान्य शरीरयष्टीचे. गोरेपान. काळेभोर आणि कुरळे केस. मोठे भेदक डोळे. अतिशय प्रभावी व्यक्तिमत्त्व. शकुंतलाबाई संताचे दर्शन घेतल्यावर भारावून गेल्या. त्यांनी हिंदी भाषेतून शकुंतलाबाईंना विचारले,

महंत, "बोलो माई, कैसे आना हुआ?"

शकुंतलाबाई तोडक्यामोडक्या हिंदीत उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत हे महंतांच्या लक्षात आले, महंतानी शकुंतलाबाईंना तोच प्रश्न मराठीत विचारला,

महंत, "कसे काय येणे केलेत आई?"

महंतांचे मराठी बोलणे ऐकून शकुंतलाबाईना हायसे वाटले, त्या महंताना उत्तर देत म्हणाल्या,

शकुंतलाबाई, "महंत, मला तुमच्या आश्रमाला एक रूपया दान द्यायचे आहे आणि मी त्यासाठी इथे आली आहे."

यावर महंत काही बोलले नाहीत, त्यांनी आपला हात पुढे केला. शकुंतलाबाईंनी महंतांच्या हातावर एक रुपयाचा शिक्का ठेवला आणि आदरयुक्त भावनेने त्यांच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या.

महंत, "आई, आधी ते हात खाली करा. तुम्ही आई आहात. आईंने मुलांना नमस्कार करायचा नसतो. आईने मुलाला नमस्कार केला तर मुलाच्या आयुष्याचा क्षय होतो."

शकुंतलाबाईंशी बोलणे झाल्यावर महंतानी आपल्या एका शिष्याला बोलावले आणि शकुंतलाबाईंनी दिलेला एक रुपयाचा शिक्का त्याला देत म्हणाले,

महंत, "बाजारात जाऊन एक रूपयाचे मीठ घेऊन ये आणि ते मीठ आज बनवलेल्या आमटीत मिसळ. आजच्या जेवणाच्या पंगतीत जेवणार्यांना सांग की आज आमटीला चव या माईमुळे आली आहे."

एवढे बोलून महंत आपल्या कामात व्यस्त झाले.

महंत अजाणता शकुंतलाबाईंच्या चाचणीत पैकीच्यापैकी गुण घेऊन उत्तीर्ण झाले होते. जेवणे झाल्यावर शकुंतलाबाईंनी महंताना एक कोटी रुपये चेकच्या मार्फत दिले.

महंतानी शकुंतलाबाईंची विस्तृत विचारपूस केली आणि त्यांना कमीतकमी एका वर्षासाठी अमेरिकेत मुलांकडे राहून येण्यासाठी सांगितले.

अमेरिकेहून आल्यावर त्यांच्या गुरुंच्या आश्रमात आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याचा सल्ला दिला.

शकुंतलाबाईंनी अमेरिकाला जाईपर्यंत महंतांच्या आश्रमात मुक्काम केला.



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational