STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories Children

4  

शुभांगी कोतवाल

Abstract Children Stories Children

बालपणीच्या गमती -जमती

बालपणीच्या गमती -जमती

4 mins
48

आज शेजारच्या पिंटुचा दात पडलेला दिसला आणि तो हसताना तोंडावर हात ठेवत होता ते इतकं मनोरंजक वाटलं आणि मनात विचार आला सर्वांचं लहानपण एकसारखं असतं खरच!

बालपण किती निरागस आणि सुंदर असतं नाही का! दुधाचे दात पडून परत नवीन दात येतात असं सांगितलं जातं आणि खरच कधी जेवता - जेवता तर कधी खेळताना , कधी शाळेतल्या मधल्या सुट्टीत पहिला दात पडतो आणि तो फेकून न देता सांभाळून घरी आणतो. आणि मग घरातील मोठी माणसं सांगतील तसच आपण करायचो. दात वाहत्या पाण्यात म्हणजे नदीत किंवा तलावात टाकावा . मग आता नदी जवळपास नसली तर तो दात सांभाळून ठेवणे आणि कुठे प्रवासाला जाताना गाडी म्हणजे रेल्वेतून तो नदीच्या पाण्यात फेकत असू. कुणाच्या म्हणण्याप्रमाणे तो दात एखाद्या झाडाजवळ मातीत खोल टाकून त्यावर परत नीट माती टाकून देणे . मग उगीच गंमत म्हणून कोणी सांगत असे की त्यातून झाड उगवेल आणि आपलं निरागस मन त्यावर विश्वास ठेवून झाड उगविण्याची रोज वाट पाहात असे.

अगदी पुढचा एखादा दात पडला तर मोठी मंडळी उगीच चिडवण्यासाठी म्हणत असत की आता तो दात नाही येणार आणि आपल्या मनात तशी शंका येत असे. बरं दात पडला की त्या जागेवर आपोआप जीभ फिरवायची सवय लागत असे आणि मग कुणी म्हणत असे , "असं जीभ फिरवू नको नाहीतर वाकडा दात येईल." त्यात खरच तथ्य असेल किंवा नाही माहित नाही. आणि असच वरती म्हंटल्याप्रमाणे दात पडला असला की हसलं तर सगळ्यांना कळेल म्हणून त्या पिंटुसारखा तोंडावर हात ठेवून हसायचे किंवा हसू आतल्याआत दाबून ठेवायचे. बरं नवीन दात आल्यावर दिसण्यात काहींचा फरक जाणवत असे.

आणि ह्या सगळ्या अनुभवातून आपण सर्वजण पसार झालेलो असतो .तसच आणखी अशाच गमती मधली आणखीन एक गंमत म्हणजे एखादं फळ खाताना ज्यात बी असते, म्हणजे मुख्यतः बोरं खाताना जर चुकून बोराची बी पण गिळली गेली तर मग आता तुझ्या पोटात झाड उगवेल बर का असं कुणी घरातील किंवा शेजारपाजारची मोठी मंडळी मनात भीती निर्माण करत आणि कुणी तर अमुक तमुक कोणाचं असं झालं होतं असं म्हणून आणखीन घाबरवून टाकत असत आणि आपल्या मनाची जी चलबिचल होत असे त्याची ते मजा घेत असत.त्यामुळे बोरं, जांभुळ, भोकरं ( जे चिकट आणि पिकलेले असले तर खूप गोड लागणारं असं फळ असतं) ही फळं खाताना सांभाळून खावी लागत.

खरच सांगा झालंय की नाही असं तुमच्या बाबतीतही?

आणि कुणीतरी कुठूनतरी भुताची गोष्ट ऐकून येत असे आणि सर्वजण जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी उनाडक्या करत बसायचो तेव्हा ती गोष्ट तर ऐकायचो...म्हणे अमुक - अमुक ठिकाणी भुत राहतं. ते पांढरी साडी घातलेलं असतं. कुणाचा तरी आत्मा म्हणे भटकतो त्या बंगल्यासारख्या मोठ्या घरात वगैरे वगैरे . किंवा कोणी जर तसा सिनेमा बघितला असेल तर त्याची पूर्ण स्टोरी अगदी मन लावून ऐकणे आणि मग ती गोष्ट आठवून रात्री भीती वाटत असे. रात्री जर तहान लागली आणि पाणी प्यायचं असलं तर कोणाला तरी उठवून बरोबर यायला सांगायचं इतकी भीती वाटत असे.क्वचित कधी लाईट गेले असले तर मग अंधारात जायची आणखीनच भीती वाटत असे. कोणीही कितीही समजावलं की भूत - बीत काही नसतं तरी विश्वास बसत नसे.

कधी सिनेमा बघायला गेलो तर हातात रुमाल अवश्य घेवून जात असू. सिनेमातील नटी किंवा नट रडला तर आपलेही डोळे भरून येत. एखादा भावनिक प्रसंग पहात असताना अगदी गालावर अश्रू अनावर होत आणि तेव्हा ते अश्रू पुसायला रुमाल कामास पडत असे. म्हणजे इतकं एकरूप होवून जायचो त्या पडद्यावरच्या सिनेमाशी की ते खरच आहे असं वाटे. तसाच टेलिव्हिजनच्या सीरियल - प्रोग्राम पाहताना काही हळवे प्रसंग किंवा भावनाशील प्रसंग पाहून रडू येत असे. 

आणखीन एक लहानपणीचा गमतीचा विषय म्हणजे तू अमुक - अमुक असं नाही केलं, किंवा अमुक असं केलं तर पुढच्या जन्मी तु गाढव , डुक्कर , बेडूक असा काही होशील. काहीवेळा अशी भीती दाखवली जात असे कोणती शिस्त लावण्यासाठी वगैरे. जसे की ताटात वाढलेलं अन्न टाकू नये , सगळे संपवून टाकावे , रोज आंघोळ करून शाळेत जावे कितीही कंटाळा आला असला तरी.मोठ्यांना उलट उत्तर देवून बोलू नये वगैरे.

बालपण हे निरागस , निष्पाप तर असतच आणि अज्ञान असतं, बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात.मोठ्या भावा - बहिणीने , आई - वडिलांनी किंवा शेजार पाजारचे कुणी मोठे , शाळेतील शिक्षक , मित्र - मैत्रिणी काही सांगतील त्यावर पटकन विश्वास ठेवला जात असे.

दसरा हा आपल्यासाठी एक महत्वाचा सण आणि थोरामोठ्याना नमस्कार करून आशीर्वाद आणि शमीची पानं गोळा करणं हे लहान मुलांसाठी आवडीचा विषय , कारण त्यादिवशी ती फक्त पानं नाही तर त्याला सोनं म्हणत त्यामुळे जेव्हढी जास्त पानं मिळवली तेव्हढे सोने मिळाले त्यामुळे त्यातही चढाओढ.

वाढदिवसाच्या दिवशी नवीन ड्रेस घालून तो शेजारी पाजारी दाखवायचा आणि मोठ्या मंडळींचा आशीर्वाद आणि कौतुक मिळवायचं हेही तितकच महत्वाचं .

आणि ह्यालाच आपण बालपणीचे संस्कार म्हणुया . तेव्हा जे बी रुजलं जातं, ज्या कल्पना आणि मान्यता असतात त्या जीवनभर पुरतात. अर्थात बऱ्याच गोष्टी कालांतराने बदलतात, आपणही मोठे होतो, समजूतदार होतो, आपल्या भावना बदलतात असं म्हणण्यापेक्षा आपल्या भावनांवर कसं आणि कुठे नियंत्रण करावं हे हळू - हळू आपल्याला समजायला लागतं. कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत आणि कशावर किती विश्वास ठेवावा हे शिक्षणामुळे आपोआप कळायला लागतं . 

आणि म्हणूनच बालपणी आपण जे काही वागलो , कशावर किती पटकन विश्वास केला ज्या फक्त भ्रामक कल्पना होत्या बहुतांशी ह्या सगळ्या आठवणी गमती - जमती म्हणून आपल्यासाठी हास्याचा आणि करमणुकीचा विषय होऊन जातात. अर्थात ती निरागसता आणि निष्पाप मनाची एक देणगी असच आपण म्हणुया.

बहुतांशी वाचक ह्या वरील सर्व गोष्टींशी सहमत होतील असं मला तरी वाटतं!



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract