चिऊताई
चिऊताई
नुकताच "जागतिक चिमणी दिवस" होवून गेला आणि मनात साठलेल्या सर्व आठवणी ताज्या झाल्या .
चिऊ चिऊ ये दाणा खा , पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून भुर्र उडून जा ! "
हे शब्द आपल्या पैकी सर्वांनी ऐकलेले आहेत अगदी लहानपणापासून . जणू चिमणी हा , दिसायला इवलासा पक्षी पण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि जणू आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे , मुख्यत्वे लहानपणी . म्हणूनच कदाचित तिला "चिऊताई" म्हंटले जाते. सगळ्या लहान मुलांची ताई .
अगदी जेव्हा मुल रडत असतं तेव्हा त्याला चूप करण्यासाठी आई , आजी वगैरे त्या लहान मुलाचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून " चिऊ आली ती पाहा तुझ्याशी खेळायला , आणि ते मूल कुतूहलाने त्या चिऊ कडे पहात रडणं विसरून जात असे . आणि खरंच पूर्वी इतक्या चिमण्या असायच्या की त्या कुठून तरी येवून कधी खिडकीतून तर कधी घराच्या ओट्यावर नेहमी दिसत असत . आताशा असं वाटतंय की त्यांची संख्या कमी तर नाही होत न ???
तपकिरी , पांढरा , काळा रंग असलेली आकाराने तशी लहान पण साधा सुंदर पक्षी ! त्यात थोडा जास्त तपकिरी आणि काळा रंग असणारा आणि आकाराने किंचित मोठा वाटणारा तो चिमणा आणि थोडा फिकट तपकिरी आणि लहान वाटणारी ती चिमणी , आणि आपल्या पिल्लांना चोचीने दाणा भरवणारी ती चिमणी
पण चिमणा - चिमणी चा पण संसार असतो , अगदी कुटुंब प्रिय असा प्राणी म्हणजे अर्थात पक्षी . जेव्हा चिमणीला अंडे द्यायचे असतील तेव्हा ते दोघं मिळून इकडून - तिकडून वाळक्या काटक्या गोळा करून आणून एखाद्या सुरक्षित ठिकाणी छानसं घरटं बांधतात आणि त्यात ती चिमणी अंडे देते . आणि मग त्या अंड्यातून पिल्ल बाहेर येई पर्यंत ते तिथेच सारखे येऊन बसतात .
तसं पाहिलं तर फक्त चीमणीच नाही तर त्याबरोबर कावळा , साळुंकी , कबुतर हेही तितकेच माणसांच्या वस्तीत वावरणारे पक्षी . चिऊ - काऊच्या कितीतरी गोष्टी आपण अजी - आई कडून ऐकलेल्या असतील . काही गाणी व कविता सुद्धा चिऊताई वर लिहिल्या गेल्या
लहान मुल जेव्हा वरण - भात असं काही घास खायला लागतं तेव्हा त्याला खाऊ घालताना " हा घे चिऊचा घास , हा काऊ चा घास " असं म्हणून खायचा कंटाळा करणाऱ्या मुलांना आई घास भरवते .
चिऊ - काऊ च्या गोष्टीत नेहमी चिऊ ही चांगली , स्वभावाने गरीब तर काऊ म्हणजे दुष्ट असं सांगितलं जातं असे , कावळा आकाराने चिऊ पेक्षा मोठा म्हणूनही असेल कदाचित . पण चिऊ च घर मेणाचं आणि कवल्याच घर शेणाच अशी गोष्ट आमची आई आम्ही लहान असताना सांगत असे ते अजूनही आठवतं. आणि एकदा खूप जोरात पाऊस येतो आणि कावळ्याचे घर वाहून जाते तर चिमणीचे घर सुरक्षित रहाते. आणि आम्ही पुन्हा - पुन्हा आईला चिऊ काऊ ची गोष्ट सांग असं म्हणत असू .
अजूनही बऱ्याच घरात चिऊ काऊचा घास भरवला जात असेल छोट्या मुलांना , गोष्टी सांगितल्या जात असतील , चिऊसाठी दाणा आणि प्यायला पाणी बाहेर ठेवलं जातं, पण तरीही आता अशी भीती वाटते चिमण्यांची संख्या कमी तर होत नाहीयेना ? पुढच्या अनेक पिढील असाच चिऊचा सहवास लाभेल ना ? अंगणात , गच्चीत , खिडकीत बसलेली चिऊताई आपल्याला नेहमी बघायला मिळेल ना ?
पक्ष्यांसाठी प्रेम आपल्याला लहानपणापासून चिऊ काऊ मुळेच निर्माण होतं , आपल्या मनावर ते संस्कार होतात , आणि ते खूप महत्वाचं आहे . आताशा टेलिव्हिजन , मोबाईलचा वापर प्रत्येक घरात वाढला आहे . अगदी लहान मुले पण हातात मोबाईल घेवून काहीतरी नवीन - नवीन शिकत असतात . व्हिडिओ गेम्स आणि बरच काही आणि निसर्गाशी जवळीक थोडी कमी होत चालली आहे .
अर्थात लहान मुलांना काय शिकवायचे , कसे संस्कार द्यायचे हे प्रत्येक आई वडिलांचा व अजी - आजोबा अशा घरातील मोठ्यांचा विषय आहे , त्यातही बऱ्याच जणांना विभक्त कुटुंब असल्याने आजी आजोबा यांचा हवा तितका सहवास मिळत नाही . काही घरांमध्ये आई सुद्धा नोकरी करत असेल तर ती तितका वेळ मुलांना देवू शकत नाही
... काहीही कारण असो पण चिमणी सारखा पक्षी कधीही लुप्त होवू नये असे वाटते .आणि चिऊताई ही अशीच आपल्या ओट्यावर , गच्चीत येवून बसलेली पाहायला मिळत राहो , त्यामुळे आपल्या लहानपणीच्या गोड आठवणी नेहमी आपल्याजवळ राहतील.
