STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract

2  

शुभांगी कोतवाल

Abstract

हरतालिका

हरतालिका

3 mins
28

आज हरतालिका , आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या . अगदीं एखाद्या उत्सवा सारखी उजवली जात असे हा दिवस. सगळीकडे उत्साहाचे वातावरण पहायला मिळत असे.

अगदीं आदल्या दिवसापासून तयारी सुरू होत असे. आदल्या दिवशी डोके धुवून न्हाऊन पूजेचं सामान गोळा करून ठेवणे . आणि आमचं संयुक्त कुटुंब असल्यामुळे सगळे सहभाग घेत असत. आणि तसा म्हंटले तर कॉलनीत राहणारे जितके महाराष्ट्रीयन कुटुंब होते त्यांच्यात घरोबा होता. फुलांचे गजरे आणून ओल्या कापडात गुंडाळून ठेवणे.पत्री , केवडा, बेलपत्र हे सर्व काही आणून ठेवणे.

आणि हरतालिका म्हणजे अळणी उपवास म्हणजे तिखट मीठ न खाता फक्त दूध , फळे ह्यावर राहायचे असते म्हणून आदल्या दिवशी काहीतरी तळलेले पदार्थ म्हणजे भजी वगैरे बनत असत. आणि अगदी आजी पासून तर आई ,काकु, आणि आम्ही तिघी बहिणी असा आमचा सगळ्यांचा उपवास असे.

पूजेच्या दिवशी मागच्या काकु म्हणजे ज्यांच्याकडे गुरुजी पूजा सांगायला येत असत त्यांच्याकडून सगळ्यांना वेळ सांगितली जात असे. जर त्याच दिवशी दुपारी गणेश चतुर्थी असली तर भटजी थोडे लवकर पूजा सांगायला येत असत तर सगळ्या स्त्रिया पहाटे उठून स्नान करून नवीन साड्या , ड्रेस घालून तयार होत असत अगदी वेणीला गजरा लावून , कोणी नाकात नथ घालून .

काकुंकडे म्हणजे ज्यांच्याकडे सार्वजनिक पूजा होत असे त्यांच्याकडे कोणी दोघी - तिघी जणी जाऊन काकु व त्यांच्या मुलींना मदत करत असत आणि आजी पण होत्या त्या मार्गदर्शन करत. दोन चौरंग ठेवून त्यावर वाळूने शंकराची पिंड आणि दोन सखी म्हणजे पार्वती आणि तिची सखी , रंगीत मूर्ती असं मांडलं जात असे. चौरंगा भोवती रांगोळी काढून उदबत्ती लावायला व्यवस्था , बाकी सर्व पूजेला लागणारे जिन्नस सर्व जण आपापल्या पूजेच्या ताटात घेऊन येत असे. अगदीं पाण्याचे तांबे , ताम्हण , आरतीसाठी लागणारी निरांजन, फळे व भडजिंना पूजा झाल्यावर दक्षिणा दिली जात असे. 

पूजा एका वेळेला सगळ्यांची होवू नाही शकली तर पुन्हा दुसऱ्या राऊंड ची पूजा . कारण संख्या जास्त असे पूजा करणाऱ्यांची. पूजेनंतर सर्व जण आपापल्या घरी जावून फराळाची तयारी करत . म्हणजे दूध - केळी, सफरचंद, मोसंबी आणि जी फळे असतील ती , काजू - बदाम जर आणलेले असतील तर. साबुदाण्याची खीर , बटाटे उकडून त्याचा शिरा , शेंगदाणे व गुळाचे लाडू असा फराळ असे . सर्व एकत्र बसून आम्ही घरचे फराळ करायचो.आणि हो, कुणी एक जण कहाणीच्या पुस्तकातून हरतालीकेची कहाणी वाचून दाखवत असे आणि आम्ही बाकी सगळ्या भोवती बसून कहाणी ऐकत होतो. 

रात्री पुरुषांची जेवणं आटोपली की परत आम्ही स्त्रिया तयार होऊन पुन्हा मागच्या काकूंकडे जायचो, जिथे सकाळी पूजा केली असेल त्या ठिकाणी परत सर्व जागरण करायला एकत्र येत होतो . कारण रात्री बारा वाजता आरती - प्रसाद आणि मग ती पूजा आणि व्रत संपन्न होत असे . अर्थात दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा आणि दही - भाताचा नैवेद्य दाखवला की पूजा पूर्ण होत असे.

रात्री किमान बारा वाजेपर्यंत जागे राहण्यासाठी सर्व मिळून गाण्याच्या भेंड्या , गप्पा गोष्टी , कुणी गाणी म्हणत तर कुणी नकला करून दाखवत. आम्ही काही मुली बाहेर खो - खो , लंगडी वगैरे खेळ खेळत होतो. खूप मज्जा , हसणं होत असे. एकाच वयाच्या , लग्न न झालेल्या मुली आम्ही खूप आनंदाने हा दिवस साजरा करत होतो म्हणजे सगळ्याच स्त्रिया , लग्न झालेल्या पण एकत्र गप्पा - गोष्टी आणि आनंदाने हरतालिका साजरी करत असत.

मोठे झाल्यावर , आणि वर्ष लोटल्यावर सर्व जण वेगवेगळ्या ठिकाणी जातात , कुणाची लग्न होवून सासरी जातात , बराच काळ लोटून गेला , वेळे प्रमाणे - काळाप्रमाणे बदल घडत जातात , सर्व बदलून जातं.पण आठवणी मनात राहतात आणि आज त्या आठवणी ह्या गोष्टीचा निमित्ताने ताज्या झाल्या .


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract