गावातला पाऊस
गावातला पाऊस
आज खिडकीतून बाहेर धो - धो पडणारा पाऊस बघताना सहज मनात आले , कसा असेल गावाकडील पाऊस? लोकं काय करत असतील आपल्या दैनंदिन जीवनात?
शहरातील लोकांसारखे रस्ते मोकळे आणि प्रत्येक जण फक्त आपापल्या गरजे पुरतं बाहेर पडत असतील का? काही जिन्नस त्यांना जवळच्या मोठ्या गावात जाऊन किंवा शहरात जाऊन आणाव्या लागतात , तर पावसात कसं शक्य होत असेल?
तसं मी बरचसं ऐकून होते कारण माझी मैत्रीण स्नेहा बरेच वर्ष गावी तिच्या आजी - आजोबांच्या घरी रहात असे. तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ती शहरात तिच्या आई बाबांकडे राहायला आली. तर स्नेहा बऱ्याचदा तिच्या गावाकडील आठवणी सांगत असे . त्यादिवशी मीही त्या साऱ्या गोष्टी मनात आठवून विचार करत होते अगदी रात्री झोप येई पर्यंत आणि म्हणूनच की काय मी स्वप्नात एक गाव पाहिलं आणि तिथला पावसाळा.
पावसाची चाहूल लागताच आणि त्याहीपेक्षा थोडं आधीच प्रत्येक घराची कौलं नीट आहेत ना, कुठे पाणी गाळण्याची शक्यता आहे का? काही रिपेअर काम करायचे आहे का? हे घरातील कर्ता माणूस लक्ष देवून सगळं नीट पाहून घेत होते. तर घरावर , गुरांच्या गोठ्यावर पत्रे असल्यास ते नीट पक्के आणि मजबुत आहेत ना? भरघोस पावसात त्यांचा टिकाव लागेल न? कारण फक्त रहाती जागा नाही तर गोठे ही तितकेच महत्वाचे हे सर्व काम लगबगीने चालले होते.
शेतकरी तर पाऊस पडण्याआधी जमीन नांगरून त्यात पेरणी करून पावसासाठी सज्ज असतो. अधून - मधून शेतावर जाऊन सर्वकाही ठीक आहे ना? ढोरांनी काही नुकसान तर केले नसेल ना? कुठे जमीन कोरडी पडली असल्यास विहिरीचं पाणी देणे , शेता भोवती तारेचं कुंपण नीट आहे ना? दिवस - रात्र वरती टक लावून बसलेला असतो. पाऊस वेळेवर येईल ना? ह्या विवंचनेत असतो.म्हणूनच पायवाटेने जाताना शेतं आणि त्याची राखण करत बसलेले शेतकरी दिसत होते.
काही वाटसरू शेजारच्या मोठ्या गावात भरलेल्या बाजारातून रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू , धान्य व इतर जिन्नस थोड्या जास्त प्रमाणात घेवून जाताना दिसले . पाऊस सुरू झाला आणि बाजार करायला जायला जमले नाही तर घरात सर्व वस्तू असाव्या हीच प्रत्येकाची धडपड होती. घरातील गृहिणीला कुटुंबीयांना कशाची कमी नसावी.
म्हणूनच उन्हाळ्यात वर्षभराची हळद , लाल मिरची पावडर, मसाला करून ठेवणे . वडे - पापड कुरडया , बटाट्याचे वेफर्स करून नीट डब्यांमध्ये भरून ठेवणे . मेथी , हिरव्या मिरच्या , गवार शेंगा उन्हात वाळवून नीट साठवून ठेवणे हे खेडेगावात प्रत्येक घरी केलच जातं म्हणजे अडीअडचणीला हे कामास येते.
आणी तेव्हढ्यात सगळीकडे काळोख पसरतो , काळे ढग दिसायला लागतात आणि गडगडाट सुरू होतो. सर्व वाटसरू लगबगीने चालायला लागतात , काही जणं घर गाठतात पण आम्ही घरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि दूर शेतातून पाऊस दिसायला लागतो , आम्ही तरी चालत रहातो, जवळ एक मंदिर असतं ते गाठण्यासाठी भर भर चालू लागतो. थेंब थेंब पाऊस पडायला लागतो आणि समोर मंदिरही दिसू लागतं. तिथे आम्ही आत शिरतो . चप्पल बाहेर काढून वर ओसरीवर जातो तेव्हढ्यात मंदिरात राहणारे पुजारी येतात आणि आम्हाला , या या पोरींनो असं म्हणून सतरंजी टाकतात. आम्ही देवाचं दर्शन घेवून तिथे बसतो. तेव्हढ्यात आतून कोणीतरी आमच्यासाठी फळं आणि पेढे प्रसाद घेऊन येतात.
थोड्या वेळाने पाऊस थांबतो , मी आणि स्नेहा मंदिरातील पुजारी आणि त्यांच्या कुटुंबाला धन्यवाद करून नंतर घरी पोहोचतो. आजी - आजोबा वाटच पहात असतात. आजी आम्हाला टॉवेल देवून म्हणाली नीट डोकं पुसून घ्या , ड्रेस बदलून घ्या मी छान गरम - गरम चहा करून आणते बरं का मुलींनो.
आम्ही खाटेवर बसून चहा पीत होतो तेव्हढ्यात शेजारचे अण्णा दारात डोकावून म्हणतात , आल्या वाटतं पोरी ? आता आजीच्या जिवात जीव आला असेल , दाराकडे टक लाऊन बसल्या होत्या , आजोबा पण काळजीत होते.
आम्ही तिथेच खाटेवर थोडा आराम करत असतो आणि कोणीतरी ओरडत येतात , अरे राम्याची बैलगाडी रस्त्यात चिखलात फसली आहे कुणी मदतीला जा रे पोरांनो . गाडीत सामान भरून आणलय दुकानासाठी ते कसं तरी सावरून घेतलय पण कोणाची मदत लागेल ना . हे ऐकताच गण्या आणि त्याचा मित्र शंकर लगेच तयार होतात , हो काका आम्ही जातो राम्याची मदत करतो बैलगाडी काढायला आणि ते मोटरसायकल घेवून निघतात.
आजी आमच्यासाठी दुपारी छान गरम - गरम भजी बनवते आणि स्नेहाला म्हणते , पोरी हे शेजारच्या मावशीकडे देवून ये जा , सकाळी अण्णा आले होते न ते, त्यांच्याकडे . नंतर आम्ही दोघी आणि आजी आजोबा भजी आणि चहा घेताना छान गप्पा मारतो. आता पाऊस थांबला होता तरी हवेत गारवा होता.
रात्री राहून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला बस गाठायची असते . आजी - आजोबा पण येणार होते, त्यांना पावसाळ्याचे चार महिने आपल्याकडे राहायला बोलवू असं म्हणून स्नेहाच्या बाबांनी आम्हाला गावी पाठवलं होतं.
संध्याकाळी आता पाऊस थांबला होता आणि साठलेलं पाणीही ओसरून गेलं होतं. आजी आम्हाला दुसऱ्या एका देवळात घेवून जाते म्हणून आम्ही तिघी बाहेर निघालो , आजोबा झोपाळ्यावर बसून पुस्तक वाचत होते. निघताना आजी स्नेहाला म्हणाली , पोरी ती लाकडी खुंटीला अडकवलेली छत्री घे पाहू . तुमच्यात छोट्या फोल्डींगच्या छत्र्या नको. आणि त्यांचं म्हणणं बरोबर होतं कारण गावात ती मोठी छत्री घेवून निघाले की टेका म्हणूनही कामास पडते आणि जर पाऊस पडलाच तरी तिघींना ती एकच छत्री पुरते.
बरेचसे जणं रस्त्यात आजीला हालहवाल विचारत , नमस्कार म्हणून अभिवादन करत तर कुणी म्हणे, आजी नात आली वाटतं तुम्हाला घेवून जायला? जाऊन या , राहून या इथली घराची आणि शेताची काळजी करू नका . मंदिरातही बरेचसे ओळखीचे लोकं भेटले , पुजारी व त्यांच्या बायकोने पण विचारपूस केली .आम्ही घरी येवून गरम गरम जेवून रात्री लवकरच झोपलो.
थोडा - थोडा पाऊस पडत होता. कौलांवर , पत्र्यांवर पडणाऱ्या पावसाच्या धारांचा आवाज येत होता , गोठ्यातील गाई - म्हशी आणि वासरांचा हंबरण्याचा आवाज येत होता, पण केव्हा झोप लागली ते कळलेच नाही . सकाळी आजोबा आम्हाला सगळ्यांना म्हणे , उठा बर आता सूर्योदयाची वेळ झाली , आपल्याला साडे - आठ ची बस गाठायची आहे. अंघोळ पूजा न्याहारी करून निघायचं आहे.
आम्ही बसस्टँड वर जाण्यासाठी सज्ज होऊन उभे होतो तेव्हढ्यात शेतातला माणूस लगबगीने आला म्हणे , आजोबा भाजी , मकईची कणसं घेवून आलो .आजीने त्याला बरं केलं बाबा असं म्हणून ते सर्व एका मोठ्या पिशवीत भरून सामानात ठेवलं आणि कुलूप लावून शेजारी मावशींना सांगायला गेली तेव्हढ्यात अण्णा बाहेर आले आणि आम्हाला जपून जा बरं आणि पोहोचल्यावर कळवा. आजी - आजोबा इथली काळजी करू नका आम्ही आहोत तुमच्या घराकडे लक्ष द्यायला , शेताचा सुध्धा आम्ही बघतो हिशोब वगैरे लिहून ठेवू तुम्ही अगदी निश्चिंत रहा.
पाऊस काय शहरात पण पडतो पण गावाची गोष्ट काही वेगळीच असते . लोकं किती एकमेकांच लक्ष ठेवतात , मदत करतात तेही हसत मुखाने आणि आपुलकीने अगदी कुटुंब आप्त असल्यासारखे . म्हणूनच सर्व गोष्टी सहज आणि सोप्या होतात , त्यांच्यासाठी गाव म्हणजे एक मोठं कुटुंब असतं आणि शेजार पाजार म्हणजे आपले , आप्त.
आम्ही सगळे बसस्टँड वर पोहोचतो आणि थोड्याच वेळात बस येते . सर्व प्रवासी आपले समान घेवून बसमध्ये बसतात, मी आणि स्नेहा दोघी आपली खिडकी जवळची जागा धरतो . आजी - आजोबा पण बसतात. बस सुटायची वेळ होते आणि कंडक्टर जोरात शिटी वाजवून प्रवाशांना सांगतो की आपापल्या जागेवर बसा बस सुटते आहे. आणि त्या शिट्टीच्या आवाजाने माझी झोप उघडते . थोड्यावेळ मी त्या स्वप्नाच्या विचारात बसून राहते.
दुपारी खरंच स्नेहा घरी आली आणि माझ्या बरोबर येतेस का आजी - आजोबांच्या गावाला असं म्हणाली.मी तर खूप खुश झाले आणि सरळ मी हो म्हणाले . पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणतात पण ते इतक्या लवकर पूर्ण होईल ह्याचा मला खूप आनंद झाला .
