किटी -पार्टी
किटी -पार्टी
आज काय भन्नाट मजा आली l कविता आपल्या नवऱ्याला सांगत होती , आज साधना कडे किटी पार्टी होती ना. हे ऐकून तिचा नवरा सुभाष म्हणे कोण साधना? तर कविता म्हणे , ते नाहीका आपल्या मागच्या अपार्टमेंट मध्ये नवीन राहायला आले आहेत , तिच्या घरी पहिल्यांदाच गेलो होतो आम्ही सगळे , काय सुंदर घर डेकोरेट केलं आहे .
त्यावर सुभाष म्हणे, तुम्हा बायकांना पण न गॉसिप गप्पा करायला काहीतरी कारण लागतं म्हणून अशा एकत्र येतात . तसं हे फारसं खोटं पण नाहीये , पण कालांतराने बरेच बदल घडत आले आहेत .
मुळात स्त्रिया म्हणजे चार जणी एकत्र आल्या की काही वायफळ , काही उपयोगी अशा विषयांवर गप्पा मारल्या जातात . त्यात क्वचित कोणाचा हेवा , द्वेष हे ही असतच , कुणाच्या चुगल्या करणं वगैरे वगैरे...अर्थात सगळ्या स्त्रिया त्यात मोडत नाही पण असते काही जणींना तशी सवय व स्वभाव.
आता कालांतराने त्यात कसा बदल घडत आला आहे तर खूप पूर्वी जेव्हा संयुक्त कुटुंब असायचे तेव्हा पुरुष मंडळी कामावर गेल्यावर स्त्रियांना मोकळीक मिळत असे. सासू - सूना , जावा, नणंद - भावजया अशी अनेक नाती . कामाबरोबरच छान गप्पा आणि संवाद होत असत. फारसे बाहेर शेजारी वगैरे कुठे जाऊन बसायची , मन मोकळं करायला अशी काही गरज भासत नसे .
हो पण संयुक्त कुटुंबातही उन्हाळ्याची भरपूर काम निघत , जात्यावर दळणे,वडे, पापड, कुरडया , तिखट आणि हळद, मसाले अशी वाळवणाची , कुटण्याची बरीच कामं करणं पूर्वी सर्व वस्तू घरी बनवल्या जात असत .
त्यात जर कुटुंबात कोणाचं लग्नकार्य, मुंज म्हंटले की मुहूर्ताचे वडे, पापड,गव्हले हे सर्व पदार्थ आणि पाहुणे येणार म्हणून जास्तीचे बनवावे लागणारे सर्व जिन्नस यात घरातील बायकांची दमछाक होत असे पण त्यातही ते काम कंटाळवाणे होवू नये म्हणून प्रत्येक प्रसंगासाठी गाणी, उखाणे घेण्याचा उपक्रम हे सर्व मनोरंजन त्याबरोबर असायचे . कधी शेजार पाजारच्या बायकांना मदतीला बोलावलं जातं असे . तेव्हढाच विरंगुळा आणि प्रत्येकाची विशिष्ट कामातील कलाकुसर याला वाव मिळत असे.
तेव्हाही संक्रांतीचा , चैत्र गौरीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, भजन - कीर्तन,मंगळागौर, हरितालिका पूजा, आणि सर्व स्त्रिया एकत्र येवून जागरणाचा उपक्रम, हे सर्व असेच आणि अजूनही बऱ्याच प्रमाणात ह्या परंपरा चालू आहेत . जिथे स्त्रियांचा रोजच्या चाकोरीच्या जीवनात थोडा बदल , नवीन साड्या नेसून दागिने घालून थोडं घरातून बाहेर पडून चार चौघिंमधे बसून गप्पा गोष्टी , चेष्टा मस्करी हे होतच असे.
त्यानंतर जेव्हा हळु - हळु विभक्त कुटुंब पद्धतीची सुरुवात झाली आणि त्याबरोबरच बरीचशी कामे सोपी झाली . काही बायकांनी घरातून बाहेर पडून नोकरी करायला सुरुवात केली. विकतचे पापड कुरडया , तिखट हळद असे जिन्नस बाजारात विकत मिळायला लागली किंवा अगदी घराचं कष्ट करून बनवण्या पेक्षा विकत आणायचा उपक्रम सुरू झाला . तसेच मिक्सर व ओव्हन आणि अश्या सुखसोयी आणि कष्ट कमी करणाऱ्या वस्तू घरात यायला लागल्या .
त्याही वेळी बऱ्याच संधी मिळत स्त्रियांना एकत्र यायला पण तरीही दर महिन्याला ठरलेली रक्कम प्रत्येकी कडून गोळा करून मग सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून एक चिठ्ठी उघडुन त्यावर ज्याचं नाव असेल त्याला ते पूर्ण पैसे मिळत असत. चहा फराळ वगैरे होत असे , कधी उखाणे घेण्याचा हट्ट , तर कोणी गाणं म्हणून दाखवणे असे चालत असे.
आजच्या आधुनिक काळात जसं कविता म्हणाली तसा किटी - पार्टी हा प्रकार प्रचलित आहे.त्यात म्हणे कुणी नवीन प्रकारचा ड्रेस , साडी घातली तर इतर बायकांमध्ये लगेच विचारपूस सुरू होणार , कुठून आणली , ऑनलाईन मागवली का वगैरे वगैरे . तसेच नवीन दागिने , पर्स अशा वस्तू जणू दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, आणि मग त्यातही चढा - ओढ.
बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यक्रमात आपल्या परंपरा चालू रहाव्या , जपल्या जाव्या असा प्रयत्न असतो , तर काही ठिकाणी नवीन - नवीन खेळ खेळून त्यात स्पर्धा व बक्षीस देण्यात येते. प्रत्येकाला नवीन काहीतरी करायची , शिकायची संधी त्यामुळे मिळते .
कविता सुभाषला म्हणता - म्हणता असं पण म्हणाली , ती साधना म्हणे की ती काही वर्ष दिल्ली, बँगलोर अशा मोठ्या शहरात पण राहून आली आहे आणि तिथे म्हणे बायका किटी पार्टीच्या निमित्ताने समाज कार्य पण करतात . डोनेशन गोळा करून एखाद्या सामाजिक संस्थांना मदत करणे तर काही दान अनाथाश्रमात पण देतात . म्हणजे जे उच्चभ्रू समाजातल्या बायका असतात त्या हे सगळं पुण्याचं ही काम करतात.
त्यावर सुभाष थोडा लक्ष देवून ऐकत असल्यासारखा म्हणे , कविता सामाजिक कार्य वगैरे चांगली गोष्ट आहे पण त्यात काही जणं नाही ते बरच काही करतात , कारण पैसा आहे , वेळ आहे आणि आधुनिकतेच्या नावाखाली जसं स्त्रियांनी सिगरेट ओढणे, रमी खेळणे , आणि त्याहीपुढे जाऊन ड्रिंक्स घेणे असेही प्रकार मोठ्या शहरात होतात जे अजिबात योग्य नाही.
त्यावर कविता म्हणाली आम्ही आमच्या किटी - पार्टीत तसं काहीही होवू देणार नाही , आणि बरंय बाई आपण इतक्या मोठ्या शहरात रहात नाही ते , अर्थात प्रत्येक गोष्ट लहान शहर किंवा मोठं शहर यावर अवलंबून नसते. शेवटी आपले संस्कार ठरवतात काय चांगल आणि काय वाईट , आपणच ठरवायचं असतं आपण कोणत्या साच्यात फिट बसतो आणि कोणत्या प्रकारचे शेजारी , मित्रमंडळ आपण निवडावे ते .मौज मजा ही प्रत्येकाने करावी पण आपल्या चाकोरीत राहून , मर्यादांचे पालन करून आणि एक चांगला समाज घडविण्यात आपला वाटा उचलून .
