भाषेचं सौंदर्य
भाषेचं सौंदर्य
त्या दिवशी ऑफिसच्या एका मीटिंग मध्ये, म्हणजे तसं आम्हा सर्वांसाठी ते पहिलच सेशन होतं ऑनलाईन मीटिंगचं, सर्वांना सरांनी स्वतःची ओळख करून द्यायला सांगितली , तेव्हा सहज आमची मातृभाषा पण विचारली. आणि खरंच तेंव्हा लक्षात आलं की इंग्रजी भाषा येणं अगदी जरुरी आहे कारण ती ऑफिस मधली भाषा आहे पण मातृभाषा ही नेहमी श्रेष्ठच असते.
आपल्या भाषेतील जे सौंदर्य, म्हणी, अलंकारिक शब्द हे ती भाषा माहीत असणाऱ्यालाच ते कळतात. किती शब्द असे असतात की ते बोलताना त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. कारण त्या शब्दाला काही पर्यायवाची शब्द नसतात. आणि काही शब्दांचा उच्चार करताना त्याचं सौंदर्य आपल्याला जाणवतं कारण ते सुंदर वस्तूंना दिलेले शब्द असतात आणि म्हणूनच कसं प्रसन्न वाटतं ते शब्द बोलताना आणि ऐकताना .असा अनुभव इंग्रजी भाषेत कदाचितच मिळतो.
जसं झरा - हा शब्द उच्चारताच असं हिरवळ असलेलं कुठल्यातरी जंगलातील ठिकाण आणि तिथून स्वच्छ पाण्याचा खळखळत वाहणारा असा झरा डोळ्यासमोर दिसतो .
सुंदर - हा शब्द आहेच सौंदर्य दर्शवण्यासाठी आणि म्हणूनच तो नेहमी छान वाटतो. जसं एखादं सुंदर नैसर्गिक ठिकाण किंवा फोटो पाहिल्यावर जे आपलं मन मोहून घेतं ते मनमोहक सौंदर्य.
ओंजळ - शब्द म्हंटला की एखादी निरागस मुलगी पावसाचं पाणी आपल्या ओंजळीत साठवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं काहीतरी चित्र डोळ्यासमोर दिसतं, ओंजळ हा शब्दच किती छान वाटतो.
नाजुक, - म्हंटले की एखादी सडपातळ तरुणी किंवा छोटंसं बाळ असं काहीतरी कल्पना करतो. हा एक शब्द मला मात्र इंग्रजीतही तितकाच भावतो - डेलिकेट
अबोली - म्हणजे नाजुक शेंदरी रंगाचं फुल आठवतं किंवा ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की खूपच कमी बोलणारी मुलगी किंवा कोणतीही व्यक्ती .
शब्दांमधला हा फरक ह्यामुळे जाणवतो कारण सर्व शब्दांना ते भाग्य लाभलेलं नाहीये फक्त मोजके शब्द असतात जे सौंदर्यवाची आणि खूप वेगळे असतात. त्याविरुद्ध काही शब्द असतात जसे, कटकट, कचकच, कडवट ह्यांचं उच्चारण व अर्थ दोन्ही इतके आवडत नाही. म्हणून काही सुंदर शब्द भाषेला अलांकराच्या रुपात लाभले आहेत ते भाषेला सुंदर बनवतात जसं स्त्री अलंकार धारण केल्यावर जास्त सुंदर दिसते अगदी तसच. आणखीन काही असे शब्द आहेत जसे की...
पैजण - म्हणजे पायात घातला जाणारा चांदीचा अलंकार. स्त्रियांचा हा आवडता दागिना आणि छोट्या मुलांना हे घातले जातात. आणि त्याला घुंगरू लावलेले असतात त्यामुळे चालल्याने त्या घुंगरुंचा आवाज कानाला गोड वाटतो . लहान मुलं जेव्हा चालायला म्हणजे पाऊल टाकायला शिकतात तेव्हा पैंजण घातल्याने ते खूप छान वाटते.
झंकार - म्हणजे आवाज पण साधा नाही तर जसं एखादं वाद्य ज्यातून संगीत ध्वनी निर्माण होतात ,त्याच्या तारा छेडल्याने त्यातून जो मधुर ध्वनी उत्पन्न होतो तो झंकार .
पाखरु - हा शब्द तसा पक्षी ह्या शब्दाचा पर्ययवाची शब्द पण आहे .पाखरु म्हणजे जे आकाशात उडते ते.भिरभिरत जमिनीवर फिरते ज्याला पंख असतात मग ते मोठे असो अथवा पिल्लू असो आणि म्हणूनच जे फुलांवर भिरभिरते ते फुलपाखरु .
अंकुर - म्हणजे एका नवीन जीवाची उत्पत्ती . जसं शेतकरी बी रोपून त्याला पाणी घालून ह्याची वाट बघत असतो की त्याला अंकुर केव्हा फुटेल . " बीज अंकुरले .... असं काहीतरी प्रसिध्द गाणं सुध्दा आहे. म्हणजे अंकुर फुटल्यावर त्यातून नवीन रोप तयार होतं. जसं कडधान्याला भिजवून त्यातलं पाणी काढून त्याला झाकून किंवा कापडात बांधून ठेवलं तर त्याला मोड येतात जे अंकुर असतात.
निसर्ग - म्हंटल्यावर हिरवळ , झाडं , पाने , फुले , सूर्योदय व असे सर्व निसर्गातील घटक आपल्या डोळ्यासमोर येतात ज्यात कृत्रिम असं काही नाही तर जे शुध्द आहे , पवित्र आहे , उपयोगी आहे आणि मनाला आनंद देणारं आहे त्या सगळ्याचा ज्यात समावेश होतो तो निसर्ग .
दव, दवबिंदू - सुंदर शब्द आहेच पण त्याची अनुभूती , त्याचं दर्शन किती सुखावह असतं. थंडीत पानांवर , फुलांवर पहाटे पडणारे दव, दवबिंदू.जे मोत्यासारखे चमकतात.
पहाट - म्हंटल्यावर खेडेगावातील अगदी सूर्योदय होण्यापूर्वीच होणारी पहाट आठवते. अंधारातच घरात चिमणी व कंदील लावून सकाळच्या उठण्या पासुंन तर बाकी सर्व कामांना सुरूवात होते.
वन - जंगल हाही शब्द आहे पण त्यापेक्षा वन ह्या शब्दाला आपलं एक सौंदर्य आहे .जे नैसर्गिक रित्या निर्माण झालेलं आहे त्याला कोणी माणसांनी बनवलं नाहीये तर ते निसर्गाचं रूप आहे , निसर्गातील बराचसा वाटा वन, त्यातील वृक्ष , पशू - पक्षी ह्यांचा आहे. अरण्य हाही त्याच अर्थाचा व तितकाच सुंदर शब्द आहे ज्याचा वापर प्राचीन काळातील अनेक घटना व गोष्टी ह्यामध्ये केलेला आहे.
तसेच संगीतातील बरेचसे वाद्य आहेत जे सुंदर ध्वनी निर्माण तर करतातच पण त्याबरोबर त्यांची नावं ही तितकीच सुंदर आहेत , जसं की मृदंग, वीणा, जल तरंग , सरोद व अशी बरीचशी नावे.
पर्णकुटी - खुप प्राचीन शब्द आहे पण किती सुंदर आहे . पानांची म्हणजे झाडाच्या पानांपासून बनवलेली कुटी ती पर्णकुटी आणि अर्थातच अरण्यात ऋषीमुनी, साधु ह्यात रहात असतं.
मधुर - ह्याचा अर्थच मुळी गोड असा होतो. नैसर्गिक फळांमधला गोडवा हा काही विलक्षणच असतो म्हणून ते मधुर असतात.
मोहक - जे फक्त सुंदरच नाही पण मोह निर्माण करणारं, मनाला आनंद देणारं आणि मन मोहून घेणारं असतं ते मोहक . श्रीकृष्णाचे रूप , त्याच्या लीला सगळंच कसं मोहक असावं.
पळस - अतिशय शुभ आणि खूप पूर्वी पासून ज्या झाडाला आपल्या संस्कृतीत स्थान आहे . " पळसाला पानं तीन " अशी एक म्हण सुध्धा प्रचलित आहे. पळस म्हणतानाच कसं पवित्र आणि शुभ विचार येतात.
झुळझुळ - हा शब्द वाऱ्याच्या संदर्भात वापरला जातो. जसं झुळझुळ वाहणारा वारा हे पूर्ण वाक्यच कसं मनाला एक प्रसन्नतेची अनुभूती करून देतं.
झालर - एखाद्या छोट्या मुलीच्या फ्रॉकला लावली असलेली झालर किती सुंदर वाटतं. झालर असलेला एखादा ड्रेस अथवा सजावटीचा काही सामान जसं की पडदे, उशांचे कव्हर वगैरे.
शेंदरी - ह्या रंगाला आपण आध्यात्म ह्याच्याशी जोडतो. शेंदरी रंग पण असतो , फुलं पण असतात. शेंदरी रंगाची वस्त्र जी सात्विक आणि आध्यात्मिक कामात , पूजा करण्यासाठी , साधू सन्यासी अशी लोकं वापर करतात .
पुष्पांजली - हा शब्दच किती सुंदर आहे. ओंजळीने हातात पुष्प म्हणजे फुलं जेव्हा देवाला अर्पण केले जातात ती पुष्पांजली .
असे अनेक शब्द आपल्या भाषेत आहेत जे आपल्याला सौंदर्याची अनुभूती करून देतात .ते शब्द उच्चारताच आपल्याला प्रसन्न आणि आनंदी वाटतं. प्रत्येकांसाठी ते निरनिराळे असू शकतात . किंवा मी इथे म्हंटल्या प्रमाणे अजूनही बरेच शब्द आहेत आणि असतील . तीच तर आपल्या मातृभाषेची किमया आणि गंमत आहे .
जशी आपली आई आपल्यासाठी नेहमी श्रेष्ठ असते तसच आपली मातृभाषा आपल्यासाठी नेहमीच श्रेष्ठ असते .
