मराठी म्हणी
मराठी म्हणी
आज खूप वर्षांनी आम्ही मित्रमैत्रिणी एकत्र आलो होतो . छोटी सहल म्हणा कारण आम्ही दोन दिवस राहायला म्हणून साधनाच्या घरी जमलो होतो आणि खूप गप्पा - गंमत करायची असं ठरलं होतं.साधनाचे आईवडील गावी गेले होते आणि तिचा भाऊ शिकायला दुसऱ्या शहरात होता त्यामुळे घर पूर्ण आमचंच होतं.
रात्री जेवण करून थोडं फिरून आलो आणि इतक्या लवकर कोण झोपणार जेव्हा मित्रमैत्रिणी बरोबर असतील तेव्हा. गप्पांच्या ओघात विषय निघाला मराठी भाषेचा म्हणजे आपल्या मातृभाषेचा .आमच्या सर्वांचं शालेय शिक्षण मराठीत झालेले होते . पण इंग्रजी ही जागतिक भाषा , कामा निमित्त ऑफिस मध्ये ही तीच भाषा जास्त वापरली जाते आणि हिंदी ही राष्ट्रीय भाषा म्हणून प्रचलित आहेच . तसेच हिंदी सिनेमा आणि गाणी ही हिंदी भाषेतील जास्त ऐकली जातात ,तर कुठेतरी आपली मातृभाषा आणि त्याचा वापर कमी होऊन जातो . तर आम्ही एक वेगळा खेळ खेळायचा विचार केला .
आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपल्याला असे काही अनुभव येतात की ते मराठीत प्रचलित असलेल्या म्हणीन वर आधारित असतात . आणि ह्या म्हणी आपल्या भाषेचा एक भाग होऊन गेल्या आहेत. तर प्रत्येकानी किमान एक म्हण आणि त्याचा अर्थ किंवा त्यावर आधारित आपला स्वतःचा अनुभव सांगायचा .
१) नव्याचे नऊ दिवस!
सुधा म्हणे जेव्हा माझ्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा ती म्हणे जोपर्यंत पाहुणे घरात असतात , हातावर मेहंदी असते , अंगावर दागिने असतात मांडव परतणी वगैरे अन्य प्रथा उरके पर्यंत नवी नवरी म्हणून खूप कौतुक होतं, सगळ्यांचं प्रेम मिळतं आणि हळू - हळू आपलं जीवन आधीसारखच होऊन जातं. रोजचा जीवनक्रम पुन्हा सुरू होतो आणि त्यात काही वावगं पण नाहीये म्हणा.
त्यावर सुभाष म्हणे हे नवीन वस्तूंच्या बाबतीत पण अगदी खरे आहे. नवीन मोटर सायकल म्हणा किंवा मोबाईल म्हणा नव्याचे नऊ दिवस त्याचं कौतुक असतं तसंच नवीन टेलिव्हिजन किंवा कोणती इतर वस्तू घरात नवीन घेतली की सुरुवातीला अगदी स्वच्छ पुसून ठेवतो नंतर थोडे दिवसातच त्या वास्तूचं महत्व म्हणा किंवा जे वेड असतं ते कमी होऊन जातं आणि आम्ही सर्वांनी , " हो अगदी खरं आहे " असं म्हणत हामी भरली.
२) दुरुन डोंगर साजरे!
ह्यावर नव्या म्हणाली दुरुन आपल्याला डोंगरावर हिरवळ दिसते आणि असं वाटतं हा डोंगर तर आपण सहज चढू शकू. पण आपण जेव्हा जवळ जाऊन पाहतो तेव्हा गवताबरोबर आणि हिरवळी बरोबर दगड धोंडे पण दिसतात , निसरडी जागा आणि अर्थात त्या डोंगराची खरी उंची आणि ते चढायला किती अवघड आहे ते कळते.
म्हणजे एखाद्या जागेचे वस्तूचे किंवा व्यक्तीचे पण खरे स्वरूप दुरुन कळू शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना दुरुन डोंगर साजरे.
३) दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं!
सुरुची म्हणे ह्याच सारखा आपल्या पैकी बऱ्याच जणांना अनुभव येतो नाही का? बऱ्याचदा आपण जाहिरात बघून वस्तू खरेदी करतो आणि दाखवतात तशी ती वस्तू नसते आणि आपण फसतो.माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलं की लग्नाच्या आधी तिला सगळं छान वाटलं आणि लग्न झाल्यावर कळलं की सासरची लोकं जशी दिसली , वाटली तशी नव्हती.
वाळवंटातील मृगजळ हे एक तंतोतंत म्हणीला लागू पडणारे उदाहरण आहे. वाटसरू ज्याला पाणी समजतात आणि त्या मृगजळामागे जातात ते पाणी नसून चमकणारे रेतीचे कण असतात , तीव्र सूर्यप्रकाशात ते चमकतात आणि दुरुन पाण्यासारखे दिसतात.
४) जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!
ह्या म्हणीचा अर्थ मी सांगितला. इथे वंशी ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता असं म्हटलं जातं की एखादं काम , कोणाची परिस्थिती तर कोणाची जागा आणि त्याचं वागणं हे आपल्याला तेव्हाच कळतं जेंव्हा आपण त्या परिस्थितीत येतो .
आई नेहमी म्हणते आपल्या मुलीला , तू जेव्हा आई होशील तेव्हा कळेल तसेच वडील मुलाला म्हणतात तू जेव्हा बाप होशील तेव्हा तुला कळेल .
नुसतच कोणाला नावं ठेवणं हे बरोबर नाही किंवा कोणाची टीका करणे , चुका काढणे हे सोपं असतं पण जेव्हा आपण त्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहिलं तर आपल्याला कदाचित त्याची जाणीव होते
५) अती तेथे माती!
सुनिता तिच्या चांगुलपणा बद्दल सांगत होती. बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव येतो की बरेच जण आपल्या स्वभावाचा फायदा घेवून निघून जातात. म्हणून व्यवहारात तरी अती चांगुलपणा आपल्याच अंगाशी येतो . कुठल्याही गोष्टीचं अती नकोच एक तोल सांभाळून जे आपण म्हणतो तसं आपलं वागणं आणि स्वभाव असायला हवा म्हणजे पश्चात्ताप करावा लागत नाही.
मैत्रीचंही तसच असतं म्हणून एका प्रमाणात ती असावी त्यामुळे कधी वाईटपणा येत नाही किंवा मैत्री तुटत नाही. कुठल्याही गोष्टीचं अती नेहमी टाळावं .
६) पिकतं तिथे विकत नाही!
विकास जो आत्तापर्यंत चूप होता तो म्हणे ही म्हण फक्त शेतकरी किंवा बागायत करणाऱ्यांसाठी नाही तर प्रत्येक व्यावसायिकाला हे लागू पडतं .
जसं धान्य , भाज्या , फळे ही जिथे पिकतात तिथे ती इतक्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात की तिथे ती विकली जात नाही , हवा तसा भाव त्याला मिळत नाही. पण तेच जर दुसऱ्या शहरात जाऊन विकलं तर त्याला भाव मिळतो .
शिक्षण आणि त्यानंतरची नोकरी ह्यातही हा अनुभव येतोच. जर आपण जागा बदलली , शहर बदललं म्हणजे जिथे आपल्या शिक्षणाची किंमत आहे अशा ठिकाणी जाऊन नोकरी केली तर आपल्याला हवे तसे काम आणि दाम म्हणजे पगार आणि हुद्दा मिळू शकतो.आम्ही सर्वांनी हामी भरली "हो अगदी खरं आहे" असं म्हणत .
आता आमच्या पैकी काही जांभया द्यायला लागले होते , आणि असही एकच जण म्हणजे विवेक राहिला होता कारण तो त्याच्या महत्वाच्या ईमेल पाहण्यात आणि त्याचे उत्तरं देण्यात व्यस्त होता. त्याचं म्हणणं होतं, जे आमच्या सगळ्यांचही म्हणणं होतं की....
७) जगी सर्व सुखी असा कोण आहे!?
अगदी बरोबर . प्रत्येकाला काहीना काही विवंचना , कशाचीतरी कमी जीवनात असतेच . जगाच्या पाठीवर असा कोणताही मनुष्य नसेल ज्याला असं म्हणता येईल की मी सर्वस्वाने सुखी आहे . कोणाला पैशाची कमतरता तर कोणाला मनासारखं शिक्षण मिळत नाही , कोणी चांगले मित्र नाही म्हणून तर कुणाकडे स्वतःच घर नाही म्हणून ते निराश असतात . अगदी महालात राहणारे सुध्धा कुणाला संपत्तीची काळजी तर कुणाला सुखाची झोप लागत नाही याची काळजी.
आपल्याला वाटतं अमेरिकेत आणि इतर परदेशात राहणारे आपल्यापेक्षा सुखी तर तसही नसतं. त्यांनाही विषम हवामानाचा त्रास सहन करावा लागतो बरीच कामं स्वतः करावी लागतात जरी खूप पैसे कमवत असले तरी.
अशी अनेक उदाहरणं असतील ज्याला ही म्हण लागू पडते आणि खरच जगी सर्व सुखी असा बहुतेक कोणीच नाही पण शेवटी सुख हे आपल्या मानण्यावर असतं. आपल्या आनंदी वृत्तीवर ते अवलंबून असते.
आता आम्ही सर्वच जणं झोपेमुळे पेंगायला लागलो होतो. तेव्हा हा म्हणींचा खेळ पुन्हा कधीतरी असाच चालू ठेऊ जेव्हा एकत्र येऊ असं म्हणत आम्ही आपापल्या जागी जाऊन निद्रस्त झालो.
