Pratibha Tarabadkar

Thriller

4.5  

Pratibha Tarabadkar

Thriller

अष्टपाद-भाग ३

अष्टपाद-भाग ३

5 mins
254


 अजिंक्य भाऊ उठा,'दूरवरुन बारकूचा आवाज ऐकू येत होता.अजिक्यने डोळे किलकिले करून पाहिले.त्याच्या खाटेशेजारी बारकू,त्याचे आई-वडील चिंतातूर चेहऱ्याने उभे होते.मी इथे  बारकूच्या घरी कसा आलो? अजिंक्य विचार करु लागला.ते साधू महाराज,गढी, अष्टपाद.... अजिंक्य ने डोक्याला ताण देऊन आठवायचा प्रयत्न केला पण सत्य आणि स्वप्न यामधील फरक त्याला कळेना.'आम्ही समदे कामावरून परत आलो तवा तुमी खाटेवर बेशुद्ध पडला होतात.'बारकूने खुलासा केला.बारकूच्या मायनं घरातून मीठ मिरच्या आणून त्याची दृष्ट काढली आणि कानशीलावर कडाकडा बोटं मोडत अलाबला घेतली.

अजिंक्यला सारखं वाटत होतं की आपल्या वर कोणीतरी नजर ठेवून आहे,झाडाआडून आपल्याला न्याहाळत आहे.तो खाटेवरुन उठला आणि त्या झाडाच्या दिशेने धावला.एक आकृती वेगाने अदृष्य होताना दिसली.अजिंक्य सतर्क झाला.

 बारकूच्या माय बापूसच्या आग्रहामुळे अजिंक्य घरातच झोपला.पण झोप उडाली होती त्याची.असंख्य प्रश्न मनात पिंगा घालत होते.....गढीतील दृश्य डोळ्यासमोर नाचत होती.आणि आता बारकूच्या घरी आल्यावर कोण पाळत ठेवून आहे? आणि का?

     सकाळी बारकूला जंगलात सरपण आणायला जायचे होते तर माय बापूस मोहाची फुलं वेचायला जाणार होते.अजिंक्यने एकट्यानेच जंगलात फिरायचे ठरवले.'जपून रहा'तिघांनी त्याला बजावले.अजिंक्यने मान डोलावली आणि तो बाहेर पडला.

   प्रचंड वृक्ष,त्यांची हातभर पाने, मध्येच पक्ष्यांची किलबिल....सर्व जंगल कसे टवटवीत दिसत होते.अजिंक्य खुषीत येऊन शीळ घालू लागला.आणि अचानक त्याला परत एकदा तीच संवेदना जाणवू लागली की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे.अजिंक्य सावध झाला पण त्याने तसे दर्शविले नाही.त्या पाळतीवर असलेल्या व्यक्तीला बेसावध ठेवून चपळाईने तो त्या व्यक्तीसमोर उभा राहिला.ती व्यक्ती समोर अचानक उभ्या ठाकलेल्या अजिंक्यला पाहून गांगरली आणि पळ काढण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण अजिंक्यच्या मजबूत पकडीतून सुटणे सोपे नव्हते.अजिंक्यने त्या व्यक्तीला रेटत एका रुंद वृक्षाच्या बुंध्याला टेकविले आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे नजर टाकताच तो चक्रावला.या माणसाचा चेहरा आणि गढीतील साधूमहाराजांचा चेहरा यात कमालीचे साम्य होते.भेदक डोळे, उंची,बांधा...पण याच्या चेहऱ्यावर दाढीमिशांचे जंजाळ नव्हते.आणि कपडे साधेच...शर्ट पँट.अगदी त्यांचा जुळा भाऊच जणू!

 'अजिंक्य, मला काहीतरी सांगायचंय.'तो माणूस अजीजीने म्हणाला तशी अजिंक्य थक्क झाला.आवाजही डिट्टो साधू महाराजांसारखा! इतकं साम्य दोघांमध्ये? अजिंक्य थोडा सैलावला.त्याने झाडाखाली मातीतच फतकल मारले आणि त्या माणसालाही खुणेनेच खाली बसण्यास सांगितले.

    'अजिंक्य, मी रंगा.माझं कुटुंब....आई वडील, बायको, मुलं एका खेड्यात रहातात आणि मी गावोगावी जत्रांमध्ये जाऊन हिप्नॉटिझमचे प्रयोग करून सर्वांचे पोट भरतो.एकदा वीरप्पा वेशांतर करून माझा प्रयोग पहायला आला होता.'

   'कोण वीरप्पा?'

'तुला वीरप्पा माहित नाही?'रंगाने अजिंक्यला आश्चर्याने विचारले.अजिंक्यने नकारार्थी मान हलवली.रंगा सांगू लागला,'वीरप्पा या जंगलामधील फार मोठा तस्कर आहे.हस्तीदंत,चंदन, रक्तचंदन, प्राण्यांची हत्या करून त्यांची कातडी काढून विकणे हा त्याचा धंदा आहे.मौल्यवान चीजांची तो मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक करतो.या जंगलावर त्याचेच राज्य आहे म्हणेनास! अतिशय क्रूर आणि भडक डोक्याचा आहे तो!'

   'पण मग वनरक्षक त्याच्यावर कारवाई करत नाहीत का?'

   'छे, सारेच त्याला टरकून अाहेत.'

    'पण तुझा या वीरप्पाशी काय संबंध?'अजिंक्य अजूनही बुचकळ्यात पडला होता.

  'सांगतो,'रंगा सांगू लागला.'वीरप्पाला माझ्या संमोहनाचा कार्यक्रम आवडला आणि त्याने मला बोलावणे धाडले व जंगलात तो प्रयोग करायला लावला.कधीही बोलावणे धाडले की यायचं असं बजावून त्याने मला सोडलं.मी घाबरून गेलो होतो पार!'तुझा भाऊ यश जंगलात फेरफटका मारत असताना त्याला वीरप्पाच्या तस्करीच्या धंद्याचा सुगावा लागला आणि त्याने त्याचा पाठपुरावा सुरू केला.वनखात्याला त्याच्या विरुद्ध पुरावेही सादर केले पण वनखातेही वीरप्पाला इतके घाबरते की यशच्या पुराव्यांना त्यांनी केराची टोपली दाखवली.पण यशने आपले प्रयत्न थांबविले नाहीत.तो पुन्हा जंगलात आला.वीरप्पाने गढी मध्ये हस्तीदंत,अस्वलाची नखं,वाघांची कातडी...सर्वांचा साठा भुयारात करून ठेवला होता आणि यशला त्याचा सुगावा लागला होता.यश कधीतरी नक्कीच गढीत शिरणार याची वीरप्पाला कल्पना आली होती म्हणून त्याने मला बोलावणे धाडले.

  'तुला का बरं बोलावणं पाठवलं?'अजिंक्यने शंका विचारली. 

'मी संमोहनशास्त्र जाणतो ना!'

'म्हणजे हिप्नॉटिझम?'

'हो,हो,'रंगाने मान डोलावत होकार भरला.'जी माणसं मनाने कमजोर असतात त्यांच्यावर संमोहनाचा प्रभाव पडतो.आपण जी आज्ञा देऊ,जे सांगू त्यावर त्यांचा विश्वास बसतो.आणि ते त्याप्रमाणे वागतात.'अजिंक्य नवलाने ऐकत होता.'मी साधूचा वेष धारण करून यशला घाबरवायचे म्हणजे तो वीरप्पाच्या फंदात पडणार नाही असा प्लॅन होता.'

    'म्हणजे तूच स्वामी पूर्णानंद.....?

  'हो ,मीच तो! वीरप्पा च्या सांगण्यावरून मी यशला घाबरवण्याचा प्रयत्न केला पण तो बधला नाही.मी सांगितलेल्या काल्पनिक कहाणीवर त्याचा विश्वास बसला नाही.फार मजबूत होतं त्याचं मन!यश हट्टाने भुयाराचे झाकण उघडून आत उतरू लागला तशी लपून बसलेला वीरप्पा पुढे झाला आणि त्याने यशला अगदी जवळून गोळ्या झाडल्या.यश जागेवरच मृत्यू पावला.'रंगा सांगतांना थरथरत होता.

   'यशदादाला अशा त-हेने मरण आले ?'अजिंक्यच्या आवाजात कंप होता.'हो,रंगाने प्रयत्न पूर्वक आपल्या आवाजावर नियंत्रण आणले.'मी घाबरून थरथर कापू लागलो.गुन्हेगारी,खूनखराबा यापासून दूर रहाणारा मी, हे दृष्य पाहून किंचाळलो तशी वीरप्पाने माझ्या कानशीलावर बंदूक ठेवून बाहेर कुठे बोललास तर तुझी पण हीच गती होईल असे धमकावले आणि यशच्या प्रेताला गढी बाहेर नेऊन गाडून टाका असा वीरप्पा आदेश देताना ऐकले आणि भोवळ येऊन खाली पडलो.मृत यशच्या शरिराची टांगटोळी करत नेतांना पाहिल्याचे मला अंधुक आठवतंय',रंगा थांबून थांबून बोलत होता.

   आपल्या यशदादाला इतक्या क्रूर पणे मारुन जंगलात पुरलं..... अजिंक्यने मनावर ताबा मिळवला.' मला सांग, माझ्या घरात, माझ्या स्वप्नात येऊन तू गढी कडे इशारा कसा काय करत होतास?'

  'संमोहनशास्त्रातील पुढची पायरी आहे ती!माझी या विषयातील प्रगती पाहून माझ्या गुरूंनी मला ती शिकवली.मात्र यासाठी त्या व्यक्तीचे मन दोलायमान हवे तरच आपण त्याच्या मनात प्रवेश करु शकतो.यशच्या बेपत्ता होण्याने तू बेचैन झाला होतास त्यामुळे तुझ्या मनात शिरणे फारसं कठीण गेलं नाही.त्यात माझाही स्वार्थ होताच.'

  'तो कसा काय?'

  ' मला पण वीरप्पाच्या कचाट्यातून सुटका हवी आहे.मला माझ्या कुटुंबियांसोबत रहावयाचे आहे.गुन्हेगार बनून या सैतानांबरोबर रहावयाचे नाही.'रंगा कळवळून सांगत होता.

  'पण मग ते अष्टपाद.....?'

' सगळं खोटं, मायावी होतं ते!'

'तू बेशुद्ध पडलास म्हणून वाचलास.वीरप्पाच्या लोकांनी तुला बारकूच्या घराबाहेर आणून टाकलं.'


'

अजिंक्य आणि रंगा थोडा वेळ निःशब्द होते.मनातील आंदोलने अनुभवत.

  'रंगा,इथले फॉरेस्ट ऑफिसर इन चार्ज कोण आहेत?'

  'नवीनच बदलून आले आहेत.रंजनप्रसाद म्हणून.खूप कडक आणि प्रामाणिक आहेत म्हणे.'

  'चल उशीर झाला आता!'अजिंक्य उठत म्हणाला.' उद्या सकाळी आठ वाजता इथेच, या जागेवर भेट.'असे म्हणून अजिंक्यने रंगाचा निरोप घेतला.

  बारकूच्या घरी जेवण झाल्यावर अंगणात खाटा टाकल्यावर अजिंक्यने बारकूला सारा वृत्तांत सांगितला.यशला वीरप्पाने मारले असं सांगितल्यावर बारकू डोकं धरून बसला.

  ' काय सांगायचं अजिंक्यभाऊ तुम्हाला!आम्हालाबी त्या सैतानाची मानसं लैच तरास द्येतात.सरकारी मानसांकडे तक्रार केली तरी ते त्या सैतानावर कायबी कारवाई करत न्हाईत.यशभैय्या म्येला लैच वंगाळ झालं',बारकू परत परत म्हणत राहिला.अजिंक्यने बारकूला त्याच्याबरोबर फॉरेस्ट ऑफिसर कडे येण्यास सुचविले.बारकू ताबडतोब तयार झाला.

  अजिंक्य,बारकू आणि रंगा फॉरेस्ट ऑफिसर रंजनप्रसाद यांना भेटले.त्यांनी तिघांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले.वीरप्पावर कारवाई करण्याचे आदेश रंजनप्रसाद यांनी दिले.

 अजिंक्य घरी परतण्याची तयारी करु लागला.त्याला कानेरीगंजला सोडायला बारकू आणि रंगा दोघेही आले होते.

  थोड्याच दिवसात टि.व्ही., वर्तमान पत्र,सोशल मीडिया सगळीकडे बातमी झळकली.'मनहारी जंगलातील तस्करांचा तळ उद्ध्वस्त! प्रमुख तस्कर वीरप्पाला अटक. हे रॅकेट शोधून काढणारे कै.यश यांना पर्यावरण विभागाचा सर्वोच्च पुरस्कार... 'निसर्गमित्र' मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.

अजिंक्य आणि आईच्या डोळ्यातील अश्रू यशच्या आठवणीने खळत नव्हते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller