अनघा - भाग सहावा
अनघा - भाग सहावा
केतकीने फोन ठेवताच अनघाला वाटलं केतकीला काही काम आले असेल म्हणून तिने कट केला असेल फोन. पण तिकडे केतकी मात्र वेगळ्याच विचारात होती. तिच्या पायाखालची जमीनच जणू सरकली होती. इकडे अनघा आवरून बाहेर आली सगळ्यांसाठी चहा टाकला, रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. अनघा शांत होती तिचे तिचे काम करत होती. सगळ्यांची जेवणं आटोपली अनघा तिच्या रूममध्ये जाऊन झोपायच्या तयारीत होती. तिने दार लोटून दिवे बंद केले आणि तिच्या पलंगावर झोपली तोच दार उघडण्याचा आवाज आला, अनघा दाराकडे बघू लागली....,
बघते तर काय, प्रशांत आत आला होता आणि आत येऊन तो तिच्या बाजूला येऊन झोपला ती जरा घाबरलीच, पण प्रशांत तिकडे तोंड करून झोपला होता. अनघाने हळुच पांघरूण प्रशांतच्या अंगावर टाकले, प्रशांत झोपी गेला. आज अनघाला मात्र थोडा आनंद झाला. कारण काही का असेना पण प्रशांत मात्र आज तिच्यासोबत होता. तिला खूप बरं वाटलं. आणि थोड्या वेळानं तीही झोपी गेली. सकाळी उठून बघते तर प्रशांत रूममध्ये नव्हता. अनघा आवरतच होती की तिला केतकीचा फोन आला. अनघाने फोन उचलताच केतकी म्हणाली, अनघा मला तुला भेटायचं आहे तुला जमेल का माझ्या घरी आज दुपारी यायला प्लीज नाही म्हणू नको, अनघाने होकार दिला. आणि केतकीने फोन ठेवला. अनघा खूप दिवसानी केतकीला भेटणार होती म्हणून जरा आनंदी होती. तिने पटकन आवरून नाश्ता बनवला, जेवणाची तयारी केली. आणि सासूला विचारले की माझ्या मैत्रिणीने आज घरी बोलावले आहे जाऊ का??? सासू म्हणाली, ठीक आहे तू जा स्वयंपाकाचं मी बघून घेईल. अनघा केतकीकडे जाण्यास निघाली....,
वाटेत थांबून तिने केतकीसाठी मिठाईचा बॉक्स घेतला आणि मग निघाली. केतकी तिची वाटच पाहत होती. अनघा केतकीकडे पोहोचली, केतकीने दार उघडताच अनघाने आणलेली मिठाई केतकीला देऊ केली आणि बोलली की तू लग्नाला आली नाही म्हणून ही लग्नाची मिठाई. केतकीने मिठाई घेऊन ठेवली आणि अनघाला भेटून रडू लागली. अनघा केतकीला बोलली आज तू दवाखान्यात नाही गेली का??? केतकी म्हणाली दुपारी जेवणासाठी घरी येते जाईल थोड्या वेळात, पण तुला मला महत्वाचे काहीतरी बोलायचे आहे. तू चल माझ्या रूममध्ये. अनघा म्हणाली हो जाऊ पण आधी मला बाबांना भेटू दे म्हणत ती बाबांना भेटली, त्यांच्याशी गप्पा केल्या. केतकीचा जीव वर खाली होत होता, कारण जे केतकी अनघाला सांगणार होती ते अनघा पचवू शकेल की नाही ह्याची तिला भीती वाटत होती. तितक्यात बाबांनी अनघाच्या हातात लग्नाचं पाकीट दिलं आणि अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला. अनघाच्या डोळ्यांत चटकन पाणी आले. बाबांनी विचारले अनघा बाळा, काय झालं सर्व काही ठीक आहे ना????
अनघा उत्तरली, हो बाबा तुम्हाला भेटून मला माझ्या बाबांची आठवण आली, म्हणून हे अश्रू आले. केतकीच्या बाबांनी अनघाच्या डोक्यावरून मायेने हाथ कुरवाळला....,
केतकी म्हणाली बाबा मी अनघाला आत घेऊन जातेय थोडावेळ, बाबा म्हणाले जा जा... खूप दिवसांनी भेटताय असं पण दोघी. आणि केतकी अनघाला घेऊन आत गेली. केतकीने अनघाला लग्नाचे फोटो दाखव म्हणून सांगितले. अनघाने फोटो दाखवण्यासाठी फोन काढला तर तो फोन बंद झाला होता, अनघा बोलली अग केतकी चार्जिंगला लावते फोन चार्ज नाहीये, तोपर्यंत तू बोल नं, तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना????
केतकी म्हणाली मी ते नंतर सांगेल आधी मला तुझे फोटो बघु दे. अनघा बोलली अग चार्ज होतोय, थांब की...., मग दाखवते तू सांग ना काय सांगणार होती. केतकी म्हणाली नाही मी जे सांगणार आहे ते तुझ्या फोटोंशी निगडित आहे म्हणून मला आधी फोटो बघणे गरजेचे आहे. अनघाला हसू आले, केतकी काय बोलत होती तिला काहीच कळत नव्हते. पण केतकी वेगळ्या विचारात होती. तिला अनघाच्या लग्नाचे फोटो बघणे अत्यंत गरजेचे झाले होते. त्याशिवाय ती निष्कर्ष काढू शकत नव्हती........,
असं काय बरं असेल अनघाच्या फोटोमध्ये, जे केतकी अनघाला सांगणार होती????
पाहूया पुढच्या भागात....!!!
