तरीही ती लढा देतच आहे... - भाग दुसरा
तरीही ती लढा देतच आहे... - भाग दुसरा


सुजाता ही तिच्या माहेरी फक्त दरवर्षी रक्षाबंधनाला किंवा उन्हाळी सुट्टीतच येत असे. शैलेश म्हणजेच सुजाताचे पती दिवसभर भावासोबत शेतात असत. सासरे कडक असल्यामुळे सुजाता नेहमी घरात पदर घेऊनच असायची. ती प्रत्येक कामात खूप चपळ होती. त्यांचं घर मोठे असल्यामुळे दिवसभर कामात वेळ कसा निघून जायचा तिला कळायचे देखील नाही. सकाळी ५ वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा, सुरुवातीला तर त्यांना चुलीवर स्वयंपाक करावा लागत असे. सुजाताच्या सासरची परिस्थिती थोडी बिकट असल्याने तिने तिची पहिली मुलगी अगदी नऊ महिन्याची असतानाच स्वतःच्या काळजावर दगड ठेवून आपल्या भावाकडे म्हणजेच माहेरी ठेवली होती. इकडे भावाची बायको रमा अगदी स्वतःच्या पोटच्या मुलीप्रमाणे सुजाताची मुलगी म्हणजेच साक्षी हीचा सांभाळ करत होती, तेव्हा तिला मुलबाळ नव्हते, कारण नुकतेच तिचे लग्न झाले होते. साक्षी खूप लहान असल्यामुळे तिला काही कळत नव्हते की ती तिच्या आईकडे नसून मामीकडे राहत होती. इकडे सुजाताकडे तिची मधली मुलगी आणि लहान मुलगा होता.
सुजाताच्या माहेरचे सगळे खूप चांगले होते, सगळ्यांचा सुजातामध्ये खूप जीव देखील होता. कधी कधी वेळ अशी असायची की तिला राखीला माहेरी जाता येत नसे, तर तिच्या ३ न्हीं भावंडांपैकी कोणीही तिच्याकडे राखीला जाऊन येत असे, सुजाताला आपला भाऊ घरी आला, म्हणून ती आनंदी व्हायची.
इकडे माहेरी काही कार्यक्रम असला तरच तिचे येणे होत असे. लक्ष्मण म्हणजेच सुजाताचे वडील ह्यांचे त्यावेळी बायपास झाले होते, ते साठीत होते, बायपास झाल्यानंतर त्यांचा स्वभाव खूप चिडका असा झाला होता. तसे ते खूप कडक होते. आपल्या मुलांमध्ये, नातावंडांमध्ये त्यांचा खूप जीव होता. त्यांच्या दोन्ही मोठ्या मुलींचे सासर हे त्यांच्या गावाजवळच असल्यामुळे ते मध्ये मध्ये जावून त्यांना भेटून येत असे. फक्त सुजाता हीच त्यांच्यापासून खूप लांब राहत होती, त्यामूळे तिची भेट लवकर होत नसे.
एकेदिवशी सुजाताच्या भावंडांनी त्यांच्या शेतात छान असे देवीचे मोठे मंदिर उभारले होते, त्यांचे स्वप्न होते ते... तर ते मंदिर उभारून पूर्ण झाल्यानंतर त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर त्यावेळी लक्ष्मण ह्यांच्या तिनही मुली त्यांचा परिवार, सूना, मुलं, बाकीचे नातेवाईक सगळे ह्या कार्यक्रमासाठी आले होते. लक्ष्मण ह्यांच्या घरी जणू लग्नच होते एवढी गर्दी झालेली, घर अगदी गच्च भरून गेलेलं. त्यावेळी सुजाता ८ दिवसापासून त्या कार्यक्रमासाठी माहेरी आलेली. मोठ्या उत्साहात मूर्तीची संपूर्ण आंबेसराई गावात पालखीवरून जय्यत मिरवणूक काढण्यात आली, सगळे आनंदित होऊन खूप नाचले, नंतर शेतात पालखी घेऊन जाऊन मंदिरात मूर्तीची स्थापना करण्यात आली, महापूजा करण्यात आली, सगळ्यांना प्रसाद म्हणून महाभोग देण्यात आला. अतिशय उत्साहात देवी शेतात जावून तिच्या घरात बसली. सुजाताचे सासरचे मंडळी ही ह्या कार्यक्रमासाठी आले होते, कार्यक्रम आटोपल्यानंतर सुजाता परत तिच्या सासरी गेली. सुजाता ही तिच्या घरच्यांपासून खूप दूर राहत होती. पण तिचा तिच्या माहेरच्या लोकांमध्ये खूप जीव होता.
(क्रमशः)