तरीही ती लढा देतच आहे - भाग पाचवा
तरीही ती लढा देतच आहे - भाग पाचवा


भाग पाचवा-
आता सुजाताच्या जीवनात महत्वाचे वळण येणार होते.
शैलेशला घरी आणण्यात आले, ऑपरेशन झाल्यामुळे शैलेशला चालता येत नव्हते, ते कितीतरी दिवस झोपूनच होते. त्यात आता शैलेशचे शेतात ही जाणे होत नव्हते. कारण परिस्थिती तशी होती, आणि सुजाता पुढे खूप मोठं आवाहन देखील होते. सुजाताने शिवण कामचा क्लास केलेला होता, त्यामुळे ती फावल्या वेळेत घरातील तसेच बाहेरील ड्रेस शिवत असे, त्यातून थोडे काही ती कमवत असे....,
आता खरी सुजाताची परीक्षेची वेळ होती, शैलेश शेतात जात नसल्यामुळे त्यांचे मोठे भाऊच शेतीकाम बघत होते, अशात सुजाताच्या जाऊने सुजाताचा छळ करण्यास सुरुवात केली, काही बायकांना सासूचे ऐकावे लागते, इथे गणित मात्र उलटेच होते, सासू चांगली होती, पण जाऊचा नवरा आता शेती बघत असल्यामुळे ती सुजाताला खूप त्रास देऊ लागली. सुजाताला तिथे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा त्रास होत होता, तिची जाऊ घरातले सगळी कामे सुजाताला करायला लावायची, स्वयंपाक घरात सुजाताला काही बनवण्याची परवानगी नव्हती, भाजीसाठी मसाले तयार करून देणे, पोळीचे कणीक मळून देणे, तयारी तिला करायला लावायची आणि मग स्वयंपाक जाऊ करायची, आणि उरलेली सगळी कामे सुजाताच्या वाटेला येऊ लागली, शैलेशचा अपघात झाल्यामुळे सुजाता आधीच तुटून गेली होती, ती अतिशय तब्येतीने बारीक झाली होती आणि त्यात आता जाऊचा छळ.
सुजाताची जाऊ तिचा इतका छळ करायची की तिला स्वतःच्या घरात साधा चहा बनवण्याची सुद्धा परवानगी नव्हती, तिच्या जाऊला असे वाटायचे की आता सुजाताचा नवरा शेतात जात नाही फक्त माझा नवरा शेती करतो, म्हणून ती सुजाताला त्रास देऊ लागली.
पण अशा कठीण परिस्थितीत ही सुजाता खचली नाही, कारण तिला मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचे होते, सुजाताला जेही पैसे मिळायचे ते ती साठवत असायची.
तिची सासू ही सुजाताच्या जाऊला कंटाळली होती, कारण ती घरात कोणाचंच ऐकत नसे, त्यामुळे कोणी तिला काही बोलत नसे. सुजाता आता खूप बारीक झाली होती, ती सासरी खूप काही सहन करत होती पण ह्याची जरादेखील चाहूल तिने कधीच तिच्या माहेरी लागू दिली नाही, कारण आपल्या भावांचा सुखी संसार बघूनच तिला विलक्षण सुख हे मिळत होते, कधी तिचे भाऊ किंवा माहेरून कोणीही तिच्याकडे गेले तर ती त्यांना बिलकुल समजू देत नसे की ती काय त्रास सहन करतेय......!!
किती उदारता होती ना सुजातामध्ये, आणि सहनशीलता तर त्याहून जास्त, आजच्या काळात कोणतीच मुलगी जाऊ काय पण सासूचे सुद्धा ऐकून घेत नाही, सरळ उत्तर देऊन मोकळी होते, पण गेली २० वर्षे सुजाता हा जाच सहन करून घेत होती, ही काही छोटी गोष्ट नाहीये....,
कारण सुजाताला तिच्यापेक्षा तिच्या घराण्याची, तिच्या माहेरची, तिच्या बाबांची अब्रू महत्वाची होती, आणि ती अब्रू तिला काही केल्या टिकवून ठेवायची होती, आणि म्हणूनच ती हे सगळे सहन करत होती.
किती महान होते ते लक्ष्मण आणि कमला.... ज्यांच्या पोटी सुजाता सारखी मुलगी जन्माला आली होती......!!!
पुढे चालू....,