खान्देश ची सैर....!!!
खान्देश ची सैर....!!!
खूप जणांना खान्देश बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती, की खान्देश मधील संस्कृती, सण, खाद्य, तर आज मी आपणास ह्या माझ्या खान्देश बद्दल सांगणार आहे..!!!
खान्देश ची सैर....
खूप जणांना माहीत ही नसतं खान्देश, खान्देश मध्ये धुळे, जळगांव, नंदूरबार ह्या जिल्ह्यांचा समावेश होतो. अहिराणी ही भाषा खान्देश ची मायबोली आहे. खूप साधी आणि सरळ अशी ही मायबोली. तिथली लोकं ह्याच बोलीत बोलतात. कदाचित तुम्ही संत बहिणाबाई चौधरी हे नाव ऐकून असाल, त्या एक उत्तम कवयित्री होऊन गेल्याय, त्या देखील खान्देश मधूनच होत्या, त्या अशिक्षित असल्यामुळे त्यांनी अहिराणी मायबोलीतच असंख्य अशा कविता केल्या आहेत, त्यांच्या कवितेच्या दोन ओळी तुमच्या समोर मांडते.
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर,
आधी हाताला चटके
तव्हां मियते भाकर !!!
बघा कदाचित कविता वाचूनच तुम्हाला त्याचा अर्थ समजला असेल, इतकी सोपी ही अहिराणी भाषा.
खान्देश मधून तापी नदी ही वाहते. तुम्ही जर रामायण बघितलं असेल तर त्यात जी शबरी आई होती श्री रामांना बोरं खाऊ घालणारी ती शबरी आई देखील खान्देश मधली आदिवासी होती. खान्देश मध्येही विविध जातीचे लोक अगदी प्रेमाने राहतात. ना जातपात, ना कसला भेदभाव.
आई एकवीरा माता ही खान्देश वासियांची ग्रामदैवत, मी खाली फोटो दिलाय तुम्ही बघू शकता. ह्या एकवीरा मातेची नवरात्री मध्ये मोठी यात्रा भरते, पूर्ण १० दिवस.मोठमोठे पाळणे, घरगुती साहित्य, विविध प्रकारचे पदार्थ, सर्व काही ह्या यात्रेत बघायला मिळतं. खान्देश मध्ये दसऱ्याच्या दिवशी रावण दहणाची प्रथा आहे, सगळ्या ठिकाणी मोठ्या उत्साहात हे रावण दहन केले जाते. कारण दसऱ्याच्या दिवशी श्री रामांनी रावणावर विजय मिळवला होता, म्हणून ही प्रथा.
खान्देश मध्ये श्रावण महिन्यात कानबाई चा उत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो, घरोघरी आई कानबाई बसते. ३ दिवसांचा तिचा हा थाट असतो, कानबाई येणार म्हणून घर स्वच्छ आवरलं जातं, खूप सारे पदार्थ बनविले जातात, कलश असतो त्यावर दागदागिने घालतात, मंगळसूत्र घळतात, त्याला गजरा लाऊन सजवतात म्हणजे थोडक्यात देवीचा मुखवटा तयार केला जातो, त्यालाच कानबाई म्हणतात, कानबाई ज्या दिवश
ी बसते त्या दिवशी रात्री जागरण केलं जातं, आणि कानबाई चे गाणे म्हटले जाते. दुसऱ्या दिवशी कानबाई ला जेवण असते, आणी तिसऱ्या दिवशी कानबाईचे विसर्जन.
गणपती ही अगदी थाटामाटात खान्देश मध्ये विराजमान होतात. पूर्ण १० दिवस त्यांची सेवा केली जाते, विविध कार्यक्रम राबविले जातात.
खान्देश मध्ये अजून एक सण साजरा केला जातो तो म्हणजे आखाजी, जे मागील पोस्ट मध्ये मी सांगितलेलं. आखाजी म्हणजे खान्देश वासियांची जणू दिवाळीच. घरोघरी लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी येतात. आखाजिचे गाणे म्हणत झोके घेतात, फुगड्या खेळताना. घरोघरी पापड,कुरडया, लोणचे बनविले जाते. आणि खास आखाजी साठी करंज्या, लाडू बनविले जातात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरोघरी खापरच्या पुरणपोळ्या केलेल्या असतात, त्याचा फोटो देखील खाली दिलाय मी, त्यासोबतच सार, भात, कुरडया, पापड, भजे आणि आंब्याचा रस हे जेवण बनवलं जातं. सगळ्यात आधी आपल्या पितरांना, देवाला नेवैद्य दिला जातो, आणि नंतर मग आपल्याला.
बैल पोळा ही तितक्याच उत्साहाने खान्देश मध्ये साजरा होतो. त्यादिवशी बैलांना आरामाचा दिवस असतो, वर्षभर केलेल्या कामासाठी शेतकरी ह्या बळीराजाची त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करत असतो. बैलांना छान अंघोळ घालून त्यांना सजवतात. त्यांच्यासाठी खास पुरणपोळी केली जाते. घरोघरी त्यांना सजवून फिरवलं जातं, सगळे जण बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना खाऊ घालतात. हे झालं खान्देश मधील सणांच्या बाबतीत.
आता आपण बघू, तिथे काय काय खाद्य जास्त प्रचलित आहे...
जर तुम्ही खान्देश मध्ये कधी आलात, तर तिथली शेवभाजी एकदा नक्कीच खाऊन बघा, अतिशय झणझणीत पण तोंडात चव रेंगाळेल अशी.
खान्देश चा गावरानी ठेचा आणि भाकरी... आहाहा, खूपच भारी. हा पण झणझणीत असतो पण एकदा खाऊन मन भरणारच नाही असा.
खान्देश ची मसालेदार खिचडी- हा प्रकार फारसा दुसरीकडे बघायला मिळत नाही एकतर आपण भात खातो नाहीतर मग पुलाव, पण ही खिचडी खान्देश मधील विशिष्ट मसाले टाकून बनवली जाते, जी की खायला खूपच चवदार लागते.
तर मित्रांनो ही होती आमच्या खान्देश ची सैर, मला जितकी माहिती होती तितकी मी तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग आहे ना आमचं खान्देश आगळं वेगळं. आनी आमच्या खान्देश बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविल्या बद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे.