तरीही ती लढा देतच आहे... - भाग चौथा
तरीही ती लढा देतच आहे... - भाग चौथा
काही दिवसांतच लक्ष्मण म्हणजेच सुजाताचे वडील हे देवाघरी गेले, घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जाण्याने अगदी सुन्न झाले होते. शामकुंज कुटुंबावर आज शोककळा पसरली होती, कारण घरातील कर्ता माणूस आज त्यांच्यातून गेला होता, गावातील दरारा आज संपूर्णपणें शांत झाला होता. सगळ्यांवर सतत माया करणारे, जीव लावणारे, वेळप्रसंगी कडक होणारे बाबा आज सोडून गेले होते. सुजाताला ही बातमी कळताच तिच्या पायाखालून जमीन सरकली होती, ती लगेचच माहेरी आली होती नेहमी सासरी खंबीर असणारी सुजाता आज मात्र वडिलांना बिलगून ढसाढसा रडली होती. कारण तो मायेचा हाथ, तो आशीर्वादाचा हाथ आज डोक्यावर नव्हता. वडिलांचा अंत्यविधी झाला, काही दिवस सुजाता आणि तिच्या बहिणी माहेरीच होत्या. सगळ्यांना वडील गेल्याने खूप दुःख झाले होते. पण वेळेनुसार सगळ्यांनी स्वतःला समजावून घेतले होते. लक्ष्मण गेल्यानंतर कमला म्हणजेच त्यांची पत्नी ही मुलांसोबतच गावी राहत होती.
वडिलांना जावून आता एक वर्ष झाले होते, गावात त्यांचे वर्षश्राद्ध केले गेले, त्यांच्या आठवणीत गावात कीर्तन ठेवले गेले. साक्षीने आता दहावीची परीक्षा दिली होती. साक्षी अधून मधून तिच्या आईकडे जावून येत असे, पण लहानपणापासून ती मामा मामिकडे वाढली असल्यामुळे तिला आईकडे करमत नसायचे, ती इथेच राहत असे.
सुजाता, वडिलांच्या प्रसंगातून उभरत असतांनाच नि
यतीने अजुन घात केला. सुजाताच्या पतींचा गाडीवरून जात असताना मोठा अपघात झाला होता, समोरून गाडीने जोरदार धडक दिल्याने सुजाताचे पती शैलेश हे गाडीवरून कोलांट्या घेत पडले होते, ही बातमी गावातल्या एका माणसाने घरी येऊन दिली...
आता तर मात्र सुजाताला काही सुचेनासे झाले, घरची परिस्थिती अशी असताना त्यात हे असे झाले होते, शैलेश ह्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले, लगेचच सुजाताची माहेरची मंडळी दवाखान्यात पोहोचली. शैलेश ह्यांचा अपघात मोठा असल्याने त्यांचे ऑपरेशन करावे लागणार होते, शरीरात खूप फ्रॅक्चर झाले होते, सुजाता हे ऐकूनच दवाखान्यात कोलमडून पडली, थोड्यावेळात शुद्धीवर आल्यावर तिला सगळ्यांनी धीर दिला. शैलेश ह्यांचे ऑपरेशन करण्यात आले. मात्र नेहमी शेतात राब राब राबणारे शैलेश मात्र आता शेतात काम करण्याच्या अवस्थेत राहिले नव्हते, कारण दोन्ही पायात फ्रॅक्चर्स असल्या कारणाने ते चालू शकत नव्हते, ही खूप मोठी धक्कादायक गोष्ट होती सुजातासाठी. पण तरीही तिने अगदी घट्ट मनाने तेही दुःख पचवण्याची क्षमता ठेवली, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून तिने त्या दुःखाला सामोरे जाण्याची तयारी दाखवली. माहेरच्यांनी त्यावेळेस तिला खूप मदत केली होती, आणि धीरही दिला होता. कदाचित म्हणूनच तिच्यात त्यावेळेस एवढे बळ आले होते, कारण तिचे माहेर तिच्या पाठीशी होते, तिची सावली बनून...
(क्रमशः)