Rutuja Thakur

Abstract Inspirational

3  

Rutuja Thakur

Abstract Inspirational

नाईक कुटुंब - एक वटवृक्ष

नाईक कुटुंब - एक वटवृक्ष

14 mins
576


निखिल, कुणाल, आणि मंजित....तिन्ही भावंडं. आपल्या आई वडिलांसोबत गुण्या गोविंदाने राहत होते. प्रचंड मोठा वाडा होता. वडील पोलीसदलातून रिटायर्ड झालेले, आणि आई शाळेची प्राध्यापिका म्हणून रिटायर्ड झालेली. त्यांच्या सोबत रामू ( त्यांवचा नोकर ) पण राहत होता. ह्या भावंडांमध्ये निखिल हा सर्वात मोठा, तर मंजीत सर्वात लहान होता. निखिल वडिलांच्या जागेवर नोकरीला लागलेला. आणि मधला कुणाल हा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. वाड्यात नेहमी अगदी प्रसन्न वातावरण असायचे. त्या घरात रामूला नोकर म्हणून नाही तर अगदी घराच्या सदस्याप्रमाणे वागणूक दिली जायची. निखिलचे आई वडील आता म्हतारे झाले होते, शरीराने थकले होते. त्यांची इच्छा होती की आता निखिलच लग्न लावून द्यावं. 

त्यादिवशी रात्री सगळे जेवणाच्या टेबलवर बसले असता, निखिलचे वडील म्हणाले, बाळा निखिल तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे..., निखिल म्हणाला- बोला की बाबा, काय बोलायचं आहे?


निखिलची आई म्हणाली आम्ही विचार करतोय की आता तू मोठा झालं आहेस, नोकरी करतोस, तुझं आता लग्न करावं.....,

निखिल म्हणाला, बाबा तुमच्या शब्दापलिकडे कधी गेलोय का मी??? तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा.

निखिलच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत जेवण संपवले. त्यादिवशी मात्र कुणाल आणि मंजीत, निखिलला प्रचंड चिडवत होते.


निखिलच्या बाबांचे एक मित्र होते त्यांची मुलगी नुकतीच बी. ए पास झाली होती, निकिता नाव होते तिचे. निखिलच्या आई वडिलांची इच्छा होती निखिलचं लग्न निकिता सोबत व्हावं, त्यांनी निकिताच्या बाबांना फोन केला. निकिताचे बाबा घरात नसल्याने फोन निकितानेच उचलला, निखिलचे बाबा म्हणाले रमेश आहे का घरी?? निकिता उत्तरली हो आहेत, पण आता बाहेर गेले आहे, आपण कोण?

निखिलचे बाबा म्हणाले मी दिलीप बोलतोय रमेशचा मित्र, रमेश आला की मला फोन करायला सांगशील? निकिता बोलली चालेल. थोड्यावेळाने रमेशचा फोन आला, निखिलच्या बाबांनी फोन उचलला. खूप दिवसांनी फोन केला म्हणून दोघांनी पुष्कळ गप्पा केल्या. निखिलच्या बाबांनी निकिताच्या बाबांना सांगितलं की, तुझी मुलगी आम्हाला निखिल साठी योग्य वाटते, जर तुझी इच्छा असेल तर आम्ही बघायला येऊ. निकिताच्या बाबांना खूप आनंद झाला, कारण ते लहानपणापासून निखिलला बघत आलेले होते. त्यामुळे निखिल त्यांना आवडत होता. निकिताच्या बाबांनी लगेच होकार दिला. २ ३ दिवसांत निखिलच कुटुंब निकिताच्या घरी तीला बघण्यासाठी गेले. निकिताच्या बाबांनी सगळ्यांचा आदरातिथ्य केला. चहा नाश्ता झाल्यावर निकिता बाहेर आली, निखिल- निकिता लहानपापासूनच एकमेकांना ओळखत होते, त्यामुळे निकिताला ते कुटुंब परकं वाटत नव्हतं. निखिल आणि निकिताला एकट्यात बोलण्यासाठी पाठवले. निकिताला निखिल आवडत होता आणि निखिलला निकिता आवडत होती. निखिलने निकिताला एकचं सांगितलं की, आमचं घर एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाला जोपासण्याची जवाबदारी तुझी ही तितकीच असेल जितकी घरातल्या प्रत्येक माणसाची आहे, निखिलचं बोलणं निकिताला खूप आवडलं आणि तिने होकार दिला.


मगं काय, दोन्ही कुटुंबात मस्तपैकी लग्नाची तयारी सुरू झाली. निकिता खूप आनंदी होती. कारण तिला हवं असलेला जोडीदार मिळाला होता. इकडे नाईक कुटुंबात सगळे लग्नाच्या कामात व्यस्त होते. बघता बघता लग्न जवळ आलं, नाईक कुटुंबाचा संपूर्ण वाडा रोषणाईने चकाकू लागला. घरात लग्नसराईचे गाणे वाजू लागले. अतिशय आनंदात निखिल आणि निकिताचं लग्न पार पडलं. निकिता आता नाईक कुटुंबाची मोठी सून झाली होती, निखिलच्या आई वडिलांना मुलगी नसल्यामुळे त्यांनी निकिताला सून नाही तर मुलगीच मानले होते. सगळं आनंदात सुरू होतं. निखिलची नोकरी उत्तम रित्या सुरू होती. निकिता घराची जबाबदारी अतिशय समर्पक होऊन सांभाळत होती. हे घर जणू निकिताचे माहेररच होते. तिला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. लग्नाला आता ६ महिने उलटून गेले होते. एके दिवशी निकिता घरात चक्कर येऊन पडली, तिच्या सासूने तिला उठवून बसवले, पाणी दिले. पण सासूला काळजी वाटली म्हणून तिने घरी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी निकिताला तपासून घरात सगळ्यांना आनंदाची बातमी दिली. त्यावेळी निखिलची मात्र बदली झाल्या कारणाने तो तिथे नव्हता. घरात पुन्हा आनंदाने न्हावून निघाले, कारण आता नाईक कुटुंबाची तिसरी पिढी उदयास येणार होती. निखिलचे आई बाबा प्रचंड खुश होते. निकिताने ही गोड बातमी निखिलला कळवली, निखिलच्या आनंदाला पारावर राहिला नव्हता, बातमी ऐकताच टचकन निखिलच्या डोळ्यातून अश्रु टपकले, कारण त्यावेळी त्याला घरी असायला हवं होतं असं त्याला वाटत होतं, पण निकिताने त्याची समजूत काढली, तुम्ही काहीही काळजी करू नका इथे सगळेजण आहेत माझी काळजी करायला. तुमची ड्युटी संपली की मग या तुम्ही आरामात. निखिलला निकिताच बोलणं ऐकून खूप समाधान झालं.


आता मात्र निकिताची आधीपेक्षाही खूप जास्त काळजी घेतली जात होती. रामू काका घरात निकिताला बिलकुल काम करू देत नव्हते, निकिताची सासू दररोज तिला रामायणचे थोडे थोडे भाग वाचून दाखवत असे. निखिल घरी नव्हता म्हणून निखिलचे दोन्ही भाऊ म्हणजे निकिताचे दिर निकीताची खूप काळजी घेत होते. अधूनमधून निकिता तिच्या माहेरी फोन करायची तिथेही आनंदाचे वातावरण होते.आता थोड्याच दिवसांत निखिल घरी परत येणार होता......!!!

खूप दिवसांनंतर नाईक कुटुंबात पाळणा हलणार होता, निकिताला आता सातवा महिना होता, निकिताच्या आईची इच्छा होती की सातव्या महिन्याचं ओटीभरणाचा कार्यक्रम निकिताचा माहेरी करावा. नाईक कुटुंबाची काहीही हरकत नव्हती. निकिताचे आई बाबा येऊन निकिताला घेऊन गेले, आणि सोबतच निकिताच्या सासरच्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण ही देऊन गेले.


निकिता थोडी उदास होती कारण निखिल येणार नव्हता म्हणून. कार्यक्रमाची मस्त तयारी झाली होती, नाईक कुटुंबाने कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रम छानरित्या पार पडला. असेच दिवस निघून गेले, आणि आता निकीताची कधीही प्रसूती होणार होती. अशातच निखिलची ड्यूटी संपवून तो घरी आला होता, त्याने निकिताला कळवले नव्हते की तो घरी आला आहे म्हणून.....,


दूपारून निकिताच्या आईचा तिच्या सासूला फोन आला की आम्ही निकिताला दवाखान्यात घेऊन जात आहोत, तिला प्रसूती वेदना सुरू झाल्यात, हे कळताच निखिल आणि त्याचे आई वडील लगेचच दवाखान्यात गेले. निकिता आत होती, आणि थोड्याच वेळात बाळाच्या रडण्याचा आवाज आला, डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले की मुलगा झालाय, निकीताची नॉर्मल प्रसूती झाली होती, दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदी वातावरण झाले होते, निकिताच्या सासऱ्यांनी संपूर्ण दवाखान्यात पेढे वाटले. निकिता शुद्धीवर आल्यानंतर निखिलला बघून तिला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी निकिता आणि बाळाला तिच्या माहेरी आणण्यात आलं. साधारण एक महिना निकिता तिच्या माहेरी होती, आता ती बाळासोबत तिच्या सासरी परतणार होती. नाईक कुटुंबामध्ये आई आणि बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती.... निखिल निकिताला आणण्यास गेला, थोड्याच वेळात आई आणि बाळाला घेऊन निखिल घरी परतला. निकिताच्या सासूने निकिताची आणि बाळाची पूजा करून नजर उतरवली, लाल कुंकवाचे बाळाच्या पायाचे ठसे घेतले, आणि त्यांना आत घेतले. घर अगदी बाळाच्या खेळण्यानी चक्क भरून गेले होते. बाळासाठी छान पाळणा ही आणला होता, घरात बाळ असल्याने सगळ्यांचा वेळ कुठे जायचा कळायचं देखील नाही. थोड्या दिवसातच बाळाचं नामकरण करण्यात आलं, नामकरण हा एक संस्कार असल्याने विधिवत प्रकारे करण्यात आला. सगळ्यांच्या आवडीने बाळाचे नाव नैतिक ठेवण्यात आले. त्याच दिवसांत निखिलचा मधला भाऊ कुणाल ह्याचा स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला होता, आणि त्यात कुणाल अव्वल नंबरने पास देखील झाला होता, आणि विशेष म्हणजे कुणालला आता सरकारी नोकरी मिळणार होती. घरात सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. हळूहळू नैतिक खेळत बागडत मोठा होऊ लागला, निकिताचे सासू सासरे नातवाबरोबर अख्खा दिवस घालवत असे.


निखिल परत आपल्या ड्युटीवर जायला निघाला. आता मात्र तो सहा महिन्यांसाठी जाणार होता, त्याच्या बाळापासून निखिलला दूर जावेसे वाटत नव्हते, पण करणार काय ना..., शेवटी नोकरी आहे जावं तर लागणारच. सगळ्यांचा निरोप घेऊन, बाळाचा मुका घेऊन निखिल निघून गेला. कुणालचीही नोकरीची ऑर्डर आली, कुणालला त्याच शहरात नोकरी लागली. पुढच्या दिवसापासून कुणाल ही नोकरीला जावू लागला. आता मात्र कुणालाचं ही लग्नाचं वय झाले होते, निकिताने आधीच कुणालसाठी मुलगी शोधून ठेवली होती, फक्त वेळ होती ती कुणालच्या होकाराची. निकीताने सासू सासर्याना कोमल बद्दल सांगितले (कोमल म्हणजे निकिताची मावस बहिण), निकिताच्या सासू सासर्यानी निकिताला सांगितले बाळा, जर तू मुलगी बघितली आहेस तर नक्कीच ती चांगली असणार तू फक्त एकदा संध्याकाळी कुणाल आला की त्याच्याशी बोलून घे....,संध्याकाळी कुणाल नोकरीवरून घरी आला, सगळ्यांनी एकत्र जेवणं केले, गप्पा गोष्टी केल्या, सासू सासरे बाळासोबत खेळत होते तेव्हा निकिता कुणालाच्या रूममध्ये गेली आणि कुणालला कोमलचा फोटो दाखवत म्हणाली, भावजी ही मुलगी कशी वाटते तुम्हाला, हीचं नाव कोमल आहे ही माझी मावस बहीण, ती शाळेत नोकरी करते.घरात सगळ्यांना आवडलीच आहे फक्त जर तुम्हाला पसंत असेल तर आपण पुढचं बोलणं करूया.... काय वाटत तुम्हाला????? 


कोमलचा फोटो बघताच कुणालला कोमल आवडली, तो निकिताला बोलला, वहिनी आजपर्यंत तुमचं मी ऐकलं नाही असं झालंय का??? तुमची पसंती ती माझी पसंती..., निकिताने पळत जावून ही आनंदाची बातमी तिच्या सासू सासऱ्याणा दिली. पुढचं बोलणं करण्यासाठी निकिताच्या सासूने निकिताच्या आईला फोन केला आणि कोमलबद्दल कळवले, निकिताच्या आईने देखील कोमल संस्कारी मुलगी आहे असं निकिताच्या सासूला सांगितले. पुढे बघण्याचा कार्यक्रम पार पडला, एकमेकांची पसंती झाली आणि तिथेच एक छोटा साखरपुड्याचा कार्यक्रम करण्यात आला. निकिताने ही आनंदाची बातमी निखिलला फोन करून कळवली, आण लग्न मात्र निखिल घरी आल्यानंतर त्याच्या उपस्थितीतच होणार होते, नैतिकच्या पहिल्या वाढदिवशी कुणालचे लग्न करण्याचे ठरवले, तेव्हा निखिल ही घरी परतणार होता........,


एकदा रात्री अचानक निकिताला भयंकर स्वप्न पडले, आणि ती जोरात दचकून ओरडली आणि उठली, तिची सासूही उठली, सासूने तिला पाणी दिले आणि विचारले काय ग काय झालं तुला? निकिताच्या डोळ्यात पाणी होते, ती सासूला म्हणाली, मलाना खूप भयानक स्वप्न पडले, स्वप्नात निखिल आपल्याला सोडून गेले अस पाहिलं मी आणि रडू लागली, तिची सासू म्हणाली अग बाळा स्वप्न होते ते, हवं तर सकाळी निखिलशी फोन करून बोलून घे, आता झोप म्हणून सासू झोपली पण निकिताला काही झोप मात्र येईना. कसेबसे सकाळचे ६ वाजले होते, आणि निकिताने निखिलला फोन केला फोन मात्र दुसऱ्यानेच उचलला, निकिताने विचारले निखीलशी बोलता येईल का मी त्याची पत्नी बोलतेय, इकडून निखिलचे सहकारी म्हणाले आता नाही बोलू शकत कारण एक नक्षलवादी हल्ला झालाय निखिल तिकडे आहे, पण घाबरण्याचे काही कारण नाही त्याच्यासोबत बाकी सहकारी पण आहेत, जसे ते परत येतील मी सांगतो निखिलला फोन करायला, म्हणून फोन ठेवला.


आता तर निकिताला अजुनच धास्ती भरवली. तिने घरात सांगितले फोनवर काय बोलणे झाले ते... तसं तर सगळ्यांनाच निखिलची चिंता होती, पण बाळ लहान असल्याने निकिताच्या सासूने निकिताला समजावले, की तू काही काळजी करू नकोस निखिल नक्की फोन करेल, तू बाळाकडे लक्ष दे.

साधारण ६/ ७ दिवस झाले होते, पण निखीलचा फोन काही येईना, टीव्हीवर सारख्या नक्षलवादी हल्ल्याच्या बातम्या येत होत्या. एकेदिवशी दुपारी निकिताचा फोन वाजला, निकिताने पटकन फोन घेतला बघते तर निखिलचा फोन होता, निकीता इकडून सुरू पडली की "मी किती चिंतेत होती एकतर मला भयानक स्वप्न पडलेलं त्यात ह्या बातम्या... कसे आहात तुम्ही ठीक आहात ना!!!".....


तिकडून निखिलचे सहकारी बोलत होते माफ करा पण मी निखिलचा सहकारी बोलतोय, निकिताने विचारलं निखिल कुठे आहे??? बोलवाना त्यांना मला बोलायचं आहे त्यांच्याशी...

निखीलचे सहकारी म्हणाले, "क्षमा असावी पण निखिल नक्षलवादी हल्ल्यात देशासाठी शहीद झाला आहे".

निकीताने हे ऐकताच ती चक्कर येऊन पडली. नंतर सगळ्यांना टीव्हीवरून निखिलची बातमी कळालीच....,

आज मात्र नेहमी आनंदी असणाऱ्या नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता........!!!!

आज ह्या हसत्या खेळत्या वटवृक्षाला जणू कोणाची नजरच लागली होती. निखिलच्या आई वडिलांना दुःख तर होतेच पण त्याहून जास्त त्यांना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटत होता, कारण आज तो भारतमातेसाठी शहीद झाला होता.

नीखीलचे पार्थिव शरीर अभिमानाने त्याच्या घरी आणण्यात आले, त्याच्यावर अंत्यसंस्कार करून त्याला सहकार्यांकडून मानवंदना देण्यात आली. निकिता मात्र कोणाशी काही न बोलता शांत बसून होती.... तिच्या सासू सासऱ्यांना निकिताचं दुःख बघवले जात नव्हते, त्यांनी तिला थोडे दिवस माहेरी पाठवले.


आता मात्र नाईक कुटुंबात भयाण शांततेचं वातावरण होतं, निकिताच्या सासूने "निकिताला पडलेलं स्वप्न खरं ठरलं म्हणून तिच्या सासर्याणा सांगितले." आज ह्या वटवृक्षाला फार मोठी इजा झाली होती, आणि ही इजा भरून निघेल की नाही ह्यातही शंकाच होती. एकीकडे घरात टाचणी पडेल इतकी शांतता होती, तर दुसरीकडे कुणालचं लग्न तोंडावर आलेलं, भावाच्या दुःखाने कुणाल लग्नासाठी नकार देत होता, कारण घरात सगळ्यांनाच निखिलच्या जाण्याने खूप मोठा धक्का हा बसलेला होता, त्यात नैतिक तर अजून वर्षाचा देखील नसताना त्याच्यावरून वडिलांचे छत्र हरवले होते.

निखिलचे बाबा घरात सगळ्यांना सांगायचे, की आपला निखिल हा खूप हसऱ्या स्वभावाचा होता, नेहमी आनंदी राहायचा, आपण जर असे रडत बसलो तर मात्र त्याला दुःख होईल तो नाराज होईल, म्हणून आपण आता त्याला त्रास होईल असं काहीच करायचं नाही.


दुसऱ्या दिवशी पहाटेच निकिता बाळाला घेऊन तिच्या सासरी परतली. नैतिकला बघताच निखिलच्या आईला जणू हा माझा निखीलच आहे, असा भास झाला आणि तिने नैतिकला घट्ट मिठी मारली. निकिताने मात्र आता स्वतःला सावरले होते, कारण निखिलची अर्धवट राहिलेली जवाबदारी आता निकिताला सांभाळायची होती, तसं वचन निकिताने लग्नाआधीच निखिलला दिले होते. हा वटवृक्ष तिला जपायचा होता, म्हणून ती स्वतःचे दुःख सावरून पुन्हा उभी राहिली. कुणालला ही निकीतानेच समजावले की तुमच्या भावालाही असे तूम्ही त्यांच्यामुळे लग्न नाही करत हे आवडणार नाही, त्यांचं कर्तव्य त्यांनी निष्ठेने बजावलं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आणि आपण जर असे वागू तर निश्चितच त्यांना आवडणार नाही. तुमचं लग्न आणि नैतिकचा वाढदिवस आपण नक्की साजरा करू, आणि हो निखिल आपल्या मनात नेहमी असतील.,


हळूहळू घरात नैतिकमुळे सगळेजण रमु लागले. निकिताही आपलं दुःख मनात ठेवून पूर्वीसारखी राहायला लागली, बघता बघता निखिलला जाऊन आता ६ महिने उलटले होते आणि कुणालचं लग्न आणि नैतिकचा वाढदिवस जवळ आला होता. घरात निखिलची कमी वाटत असल्याने कुणालचं लग्न आणि नैतिकचा पहिला वाढदिवस साध्या पद्धतीने करण्यात आला. आणि नैतिक कुटुंबाची दुसरी सून म्हणून कोमलचे घरात आगमन झाले. कोमल ही निकिताची बहिनच असल्यामुळे तिला निकिताच्या दुःखाची पूर्ण जाणीव होती. कुठलीही गोष्ट करताना ती नेहमी निकिताला विचारून करत असे. निखिलच्या वडिलांचं असे मत होते की नैतिक अजुन लहान आहे आणि निकिताच्या लग्नाला ही फक्त २च वर्ष झाली आहेत, का नाही आपण निकिताचं दुसरं लग्न करून द्यावं? निखिलच्या आईलाही हे योग्य वाटलं, त्यांनी निकिताच्या घरी फोन करून तिच्या आई वडिलांशी बोलणे केले, त्यांनी सांगितले जर निकिता तयार असेल तर आम्हाला काही हरकत नाही.


आता प्रश्न होता तो निकिताने होकार देण्याचा. निकिताची सासू आणि सासरे तिच्या रूम मध्ये गेले, ती नैतिकला झोपवतच होती, निकिता म्हणाली आई बाबा तुम्ही? काही बोलायचं आहे का??? तेव्हा बाबा म्हणाले हे बघ बाळा, वेगळा अर्थ घेऊ नकोस, पण आम्हाला असं वाटतंय की नैतिक अजुन खुप लहान आहे त्याला वडिलांची गरज आहे, आणि तुझं ही जास्त वय नाहीये, आम्ही विचार करतोय तुझं दुसरं लग्न केलं तर????

निकिताच्या डोळ्यात लगेच अश्रू आले, आणि ती म्हणाली बाबा आता निखिल आपल्याला सोडून गेले तर लगेच तुम्ही मला परका केलत ना??? नाहीतर असं बोललेच नसते, बाबा निकिताच्या डोक्यावरून हाथ कुरवाळत म्हणाले.... नाही ग, तसे नाही पण नैतिककडे बघून आणि तुझ्याकडे बघून बोललो बस बाकी काही नाही...,


त्यावर निकिता उत्तरली, आई बाबा ज्या दिवशी ह्या घरात मी पाहिलं पाऊल ठेवलेलं त्याच दिवशी निर्णय घेतलेला की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या घराची जवाबदारी सांभाळेल, भले ही कितीही कठीण प्रसंग असुदे, मी निभावणारच, आणि जर माझे पती निखिल ह्या देशासाठी शहीद झाले स्वतःचा, कुटुंबाचा विचार न करता... तर बाबा मीही त्यांची पत्नी आहे मी का खचेल? राहिला नैतिकचा विषय तर आपण सगळे आहोत ना नैतिकला सांभाळायला, आणि माझ्यासोबत निखिलच्या आठवणी आहेत त्यामुळे तुम्ही तो विचार मनातून काढून टाका, मी निखिलची होते आणि मरेपर्यंत निखीलचीच राहणार. हे ऐकुन निकिताच्या सासू सासर्याना अश्रू आवरेनासे झाले, आणि ते म्हणाले... आम्ही धन्य झालो पोरी... जी तुझ्यासारखी मुलगी ह्या घरात सून म्हणून आमची मुलगी बनून राहिली, खरच भगवंताचे खूप उपकार आहेत आमच्यावर. कोमलही हळूहळू घरात लक्ष देवून सगळे शिकून घेत होती, तसे रामू काका होतेच मदतीला. कोमल आल्यामुळे निकिताला आता फावला वेळ मिळत होता. ह्या फावल्या वेळाचा सदुपयोग करायचं असे निकिताने ठरवले.


दुसऱ्या दिवसापासून दुपारची जेवणं आटोपली, नैतिक झोपला की निकिता लिखाण करायची. असा तिचा रोजचा दिनक्रम झाला होता. कोमल आता घरात सगळ्यांशी एकरूप झाली होती. तिला ही घरात तेवढंच प्रेम मिळत होते जेवढे निकिताला मिळत होते. मंजित म्हणजेच निखिलचा लहान भाऊ दुसऱ्या शहरात हॉस्टेलमध्ये राहून अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होता. तोही रोज घरी फोन करून सगळ्यांशी बोलत असे, अगदी नैतिकशी सुद्धा.

आणि बरं का, नैतिक आता पूर्ण ३ वर्षांचा झाला होता हळूहळू घरात चालायला लागला, आणि नैतिकने सगळ्यात आधी बोलायला सुरुवात केली....

"बाबा" ह्या शब्दापासून.....,

किती सहज शब्द होता हा नैतिकसाठी...,

पण खूप कठीण प्रसंग होता तो घरातल्या प्रत्येकासाठी, कारण आज नैतिकने त्याच्या बाबाला आवाज दिला होता... जो आवाज ऐकण्यासाठी निखिल म्हणजेच नैतिकचा बाबा तिथे नव्हता.....!!!


निकिताने पोलीसदल, आर्मी, ह्या विषयांवर लिखाण सुरू केले, कारण तिला निखीलबद्दल खूप काही लिहून काढायचं होतं. आजोबा नातवासोबत दिवस घालवू लागले, नैतिक आता घरात पळू लागला होता, बोलू लागला होता. असेच दिवस निघत होते, निकिताचं लिखाण सुरूच होते, मंजीत म्हणजेच निखिलचा लहान भाऊ अभियांत्रिकी मध्ये शेवटच्या वर्षी उत्तम गुणांनी पास झाला होता, आणि आता तो काही दिवस घरी आला होता. घर अगदी पूर्वीसारखे भरलेले वाटू लागले... जणू काही गोकुळच. सगळे अगदी मिळून मिसळून राहत होते, थोड्याच दिवसात मंजीतचा एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू होता, तो त्याची तयारी करत होता, आणि एकीकडे निखिलला आता जाऊन वर्ष होणार होते, तर निखीलची आठवण म्हणून निकिताने लिहिलेलं पुस्तक त्याच्या स्मृतीपित्यर्थ त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी छापून सगळ्यांना भेट म्हणून द्यावे असे निकिताने ठरवले, तिने त्या पुस्तकात पोलिसांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, आणि देशाबद्दल लिहिले होते, आणि तिचं लिखाण अंतिम टप्प्यात आले होते. आणि त्याचबरोबर ती नैतिकला त्याच्या वडिलांबद्दल अगदी अभिमानाने सांगत असे, जेणेकरून नैतिकला त्याच्या वडिलांबद्दल, त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल माहिती असावी असे निकिताला वाटायचे.

पुस्तक लिहून झाल्यानंतर सगळ्यात आधी निकिताने ते पुस्तक तिच्या सासू सासऱ्यांना वाचायला दिले, आणि तिच्या कल्पनेबद्दल ही त्यांना सांगितले, निकिताच्या सासू सासरे ह्यांना निकिताची कल्पना खूप आवडली आणि निकिता निखिलची पत्नी आहे ह्याचा अभिमान देखील वाटला.


कुणालचा मित्र छाप कारखान्यात होता, निकिताने ते पुस्तक कुणालला देवून ह्याच्या १०० प्रती छापून आणा, म्हणून सांगितले. कुणालने पुढच्या आठवड्यातच सगळ्या प्रती छापून आणल्या. पुढच्या आठवड्यात निखिलची पुण्यतिथी असल्याने त्याची तयारी सुरू झाली. लोकांना आमंत्रण देण्यात आले, विशेष तयारी केली गेली.

आणि आज तो दिवस होता... निखीलची पुण्यतिथी. नीखिलची आठवण येवून सगळ्यांना अगदी भारावून गेले होते, आज निखिलला जावून एक वर्ष झाला होता. वाड्यात निखिलचा फोटो ठेवून पूजा करण्यात आली, पूजा झाल्यानंतर आलेल्या सगळ्या लोकांना निखीलची आठवण म्हणून निकिताने लिहिलेलं पुस्तक देण्यात आले, नैतिकच्या हातून गरिबांना जेवण देण्यात आले.


निकिताने त्या पुस्तकाला शीर्षक दिले होते... " नाईक कुटूंब - एक वटवृक्ष "! 👍


मंजीत हा एक कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेला होता, इकडे निकिताचं लिखाण सुरूच होते, कोमल आता गरोदर होती, निकिता कोमलची चांगलीच काळजी घेत होती, सासू सासरे हे नातवासोबत व्यस्त असायचे, आणि कुणाल आपल्या नोकरीत व्यस्त असायचा, सगळे अगदी सुरळीत सुरू होते, हा वटवृक्ष हळूहळू आता बहरू लागला होता, कारण त्या वटवृक्षाचे मूळ हे अगदी खोलवर गेले होते, निकिता ही नाईक कुटुंबाची मोठी सून होती, पण अगदी मोठ्या मुलीसारखं ती सगळे सांभाळत होती, कधीच तिच्या सासू सासरे ह्यांना नीखिलची कमी निकिताने भासू दिली नाही, शिवाय नैतिकची अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळ करत होती. थोड्याच दिवसांत कोमल प्रसूतीसाठी तिच्या माहेरी गेली, मंजित एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन आलेला, त्याला त्यादिवशी त्या कंपनी मधून फोन आलेला, त्याचे त्या कंपनीमध्ये सिलेक्शन झाले होते, त्यादिवशी मंजित खूप खुश होता, आणि घरचेही.

आज निखिलच्या आई वडिलांना त्यांचं जीवन सार्थक झाल्यासारखे वाटत होते.


इकडे कोमलला छान एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झाले होते. कोमलच्या आईने निकिताला फोन करून ही गोड बातमी दिली, निकिताने घरात सगळ्यांना ही आनंदाची बातमी दिली. कुणालच्या आनंदाला पारावार नव्हता, कारण आता तो बाबा झाला होता. सगळेजण आपल्या नवीन पाहुण्याला बघायला कोमलच्या घरी गेले, आणि त्या गोंडस परीला बघून अगदी आनंदी झाले. आता नाईक कुटुंबाची मुलगी (लक्ष्मी) आणि नैतिकची लहान बहीण आली होती.


नैतिक आता पूर्ण ५ वर्षांचा झाला होता, बोलू लागला होता, चालू लागला होता. वाडा पुन्हा अगदी आनंदाने फुलून गेला होता, फक्त हे सगळे बघायला निखिल तेथे नव्हता, निखिलची पदोपदी सर्वांना आठवण ही येतंच होती....!!!!


निष्कर्ष-

कुटुंबात सगळे आत्मनिर्भर होते, पण सगळे एकमेकांसोबत अगदी आनंदाने, मिळून मिसळून राहत होते. आणि एकमेकांची काळजी घेत होते.

प्रत्येक घरात सुख दुःख, अडी- अडचणी, चढ उतार हे येतंच असतात, वाईट वेळ हा निघून जाऊन चांगले दिवस ही येत असतात, फक्त निराश न होता सकारात्मक वृती जर असली तर नकारात्मक गोष्टीतून ही चांगलं हे शोधता येतं. फक्त कुटुंब हे नाईक कुटुंबासारखं असावं, आणि एक आदर्श सून ही निकिता सारखी असावी जी खचून न जाता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊन कुटुंबासाठी नेहमी तत्पर असते, असे पात्र खऱ्या आयुष्यात जर असले तर नक्कीच छोट्या रोपट्याचं रूपांतर हे एका वटवृक्षात झाल्याशिवाय राहणार नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract