तरीही ती लढा देतच आहे - भाग तिसरा
तरीही ती लढा देतच आहे - भाग तिसरा


भाग तिसरा-
तसं तर सुजाताच्या दोन्ही बहिणींची घरची परिस्थिती ही सुजातापेक्षा चांगली होती, पण सुजाताने मात्र कधीच त्या गोष्टीचा हेवा केला नाही, उलट बहिणींचा नांदता सुखी संसार पाहून सुजाताला आनंदच होत असे, फक्त तिला एकाच गोष्टीची खंत मनात सतत वाटत असायची की तिच्या वडिलांनी तिला इतक्या लांब, सगळ्यांपासून इतके दूर का दिले होते??? बस.....,
पण तरीही तिने स्वतःला तिच्या सासरच्या त्या साच्यात पक्के बसवून घेतले होते. सुजाता आणि तिच्या जाऊचे घरात आधीपासूनच फारसे काही पटत नव्हते, कारण तिच्या जाऊचा स्वभाव हा सुजाता सारखा नव्हता, ती फक्त स्वतःचा आणि तिच्या कुटुंबाचाच नेहमी विचार करत असे, आणि प्रत्येक गोष्टीत सुजाताला टोमणे देत असे. पण सुजाता त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करत होती. कारण ती एक अशा आदर्श कुटुंबातून होती, ज्या कुटुंबाचे संपूर्ण गावात नाव निघत असत. आणि आधीपासूनच लक्ष्मण आणि कमला ह्यांनी आपल्या लेकरांवर चांगले संस्कार हे केलेले होते, हेच संस्कार, हीच शिकवण उपजत सुजाता मध्ये देखील होती.
सुजाता सासू सासऱ्यांची तसेच घरातील प्रत्येकाची काळजी घेत असे. सुजाताची जाऊ ही स्वयंपाक वगळता घरात कुठलेही काम करत नसे, बाकी सगळे सुजाता करत असे, तेही कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता. हळू हळू जाऊची मुलं मोठी होत गेली, तिला दोन मुली आणि एक मुलगा होता. सुजाताची मोठी मुलगी साक्षी इकडे मामाच्या घरी हळू हळू मोठी होऊ लागली होती.. आणि आता तर साक्षीसोबतच राशी म्हणजेच साक्षीच्या मामाला गोंडस मुलगी झाली होती, राशी नाव होते तिचे. रमा साक्षी आणि राशी दोघांचा सांभाळ करत असे, तसं तर घरात प्रत्येकजण दोघांना सांभाळायचे. रमा जेव्हाही माहेरी जायची ती दोघांना सोबत घेऊन जात असे, कारण आता साक्षी ही रमाच्या अंगावरची झाली होती. साक्षीला इथे गावात शाळेत टाकले होते, ती शाळेत जाऊ लागली. आणि मामकडेच मोठी झाली. हळू हळू तिला कळू लागले की ती आईपासून दूर आपल्या मामाकडे राहते आहे. इकडे सुजाता आपल्या घरात व्यस्त राहत होती.