Vimal Patkari

Abstract Horror Thriller

2.8  

Vimal Patkari

Abstract Horror Thriller

अंधश्रद्धा बाळगू नकोस

अंधश्रद्धा बाळगू नकोस

10 mins
227


माझा सखा हे जग सोडून जाण्यास आज बरोबर बत्तीस वर्षे झालीत.आज चोवीस जून. माझ्या सख्याचा ' स्मृतिदिन '.आज सकाळपासूनच माझ्या अस्वस्थ जीवाला हुरहूर लागलेली असल्यानं डोळ्यांच्या पापण्यांनाही अधुनमधून अश्रूंची साथ मिळत होती.स्वयंपाक करित असतांना मला त्यांच्या म्हणजे माझ्या सख्याच्या आवडीचे पदार्थ आठवून ते माझ्या समोरच जेवायला बसलेले आहेत असा भास होवून मी जणू त्यांच्याशी बोलत असतानाच माझा मुलगा,सून आणि नात हे तिघंही आज परगावाहून स्मृतिदिनासाठी घरी आलेत.माझी बडबड ऐकून " अहो आई, इथं तर कोणीच नाही.मग कोणाशी बोलताय तुम्ही ? आणि हे काय ? तुमच्या डोळ्यात पाणी? नका रडू हो आई. " हे सारं काही बोलत असतांना माझं तिच्याकडे लक्षच नाही हे सुनबाईच्या लक्षात आल्यावर तिनं मला परत "अहो आई काय झालय " असा आवाज देत माझा नमस्कार केला.मी स्वयंपाक थांबवून या तिघांशी बोलले.नातीला जवळ घेतलं अन मग नंतर स्वयंपाकाला सुनेनं मदत केल्यामुळे स्वयंपाक लवकर होवून जेवणंही वेळेतच आटोपलीत. थोडया वेळानं ही तिघं आरामासाठी झोपण्याच्या खोलीत गेलीत अन मी कॉटवर पडल्या पडल्या बैठकीतील भींतीला असलेल्या यांच्या फोटोकडे पाहात गतस्मृती आठवू लागले.यांच्या अनेक स्मृतींमधून एक गमतीशीर म्हणजे भिती घालवणारी आठवण माझ्या मन:पटलावर अगदी जशीच्या तशी आठवू लागली.

    हे असतांनाचा हा प्रसंग आहे.माझी मुलगी लहान असताना अधिक घाबरत असेल तर ते म्हणजे मध्यरात्रीनंतर शिटी वाजवत वाजवत गस्त घालणार्या गुरख्याला.तिला आम्ही सारेच रोज समजावत असुनही तिच्या मनातील भिती काही जाइना.मग एके दिवशी मी नेहमीप्रमाणे माझ्या तिन्ही मुलांसह शेजारीच राहात असलेल्या माझ्या दिरांकडं टिव्ही पाहण्यासाठी गेले असता थोड्या वेळानं हे तिथं आलेत.माझ्याकडून चावी घेवून घरी गेलेत अन फ्रेश होऊन यांनी यांचा स्काऊटचा गणवेष घातला. हातात शिटी घेतली अन ती वाजवत घराच्या अवतीभवती,परिसरात फिरू लागले. शिटीचा आवाज ऐकताच ही बसल्या जागेवरून उठून आजीजवळ गेली. ' आज हा गुरखा इतक्यातच कसा आला ? अजून तर नऊच वाजताय. ' असं सारेच आश्चर्यानं म्हणत असतांनाच हे शिटी वाजवत थेट घरात आलेत अन मग ही डोळे गच्च मिटून आजीच्या कुशित तोंड लपवून बसली. यांच्या इशाऱ्यानं आम्ही सारे क्षणभर शांत झालोत अन मग " गेला गं माऊ तो गुरखा. "असं यांचं म्हणणं,आवाज ऐकून तिनं डोळे उघडून " आण्णा तुम्ही ? कधी आलात तुम्ही ? "असं विचारल्यावर " अगं माऊ,आज मीच गुरखा झालोय बघ.हा बघ माझा गणवेष अन ही शिटी.असाच असतो गुरखा.अगं तोसुद्धा माझ्यासारखा माणुसच आहे. हवं तर आज रात्री तुला गुरखा दाखवतो मी.म्हणजे तुझ्या मनातील भिती जाईन." अन मग खरच मध्यरात्रीनंतर आलेला गुरखा अगदी जवळून पाहिल्यावर तिच्या मनातील भिती गेली.अशाप्रकारे मुलांच्या मनातील भिती,शंका स्वकृतीतून ते घालवीत असत.

    सायंकाळचे सहा वाजलेत.सकाळी आलेले हे तिघंही परतिच्या प्रवासाला निघालेत.ते घरातून बाहेर पडल्यावर परत मी एकटीच घरात असल्यामुळे मनाची हुरहूर वाढून माझा सखा गेल्यानंतरचे काही घटना माझ्या मनात काहूर माजवू लागल्यात.

   हे गेल्यानंतर पाच ते सात वर्षांनंतरची ही घटना. एके दिवशी सासूबाई मला म्हणाल्या, " अगं,काल माझ्या स्वप्नात माझा प्रकाश आला. अन मला म्हणाला, 'आई, तू कशी आहेस ?ठीक आहेस ना ? मला तुझी आठवण आली म्हणून मी तुला भेटण्यास आलोय गं आई आज."

 " हो का आई .छान झालय मग " असं मी म्हणताच " अगं फक्त छान झालय काय म्हणतेस ?"यावर 

 " मग मी तरी काय करणार आई ? तुम्हीच सांगा. "

 " अगं बाई, तू काहीच करू नकोस.तर मी जे सांगतेय ते नीट ऐकून होकार दे.हे बघ आपण माझ्या प्रकाशला घडवून बसवू या "

 " म्हणजे काय करायचं असतं ते ? "

 " अगं,मुर्तिकाराच्या हातानं प्रकाशच्या रुपाची मुर्ती तयार करुन या मूर्तीची बैलगाडीतून साऱ्या गावातून मिरवणूक काढायची.अन मग आपल्या घराच्या आंगणातील मोकळ्या जागेत एक छोटंसं मंदीर बांधून त्यात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची " असं त्यांचं म्हणणं ऐकून मी तर अवाकच झाले.मला काहीही सुचेनासं झालं. बरं एकवेळ हे खेडेगाव असतं तर ठीक वाटलं असतं.पण आपण तर या मोठ्या शहरात राहत असून आपण सारे सुशिक्षीत आहोत.मी शिक्षिका असून असल्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर ते योग्य वाटणार नाही.या विचारात मी असतानाच सासुबाईंनी मला विचारले असता 

 " नाही आई. हे मला जमणार नाही आणि मी असलं काही करणारही नाही." असं मी म्हटल्यावर त्या घरातून तडक बाहेर पडल्या अन रागारागानं अंगणात असलेल्या बाजेवर जावून बसल्या.त्यांचा राग निवळल्यावर काही दिवसांनी त्या मला एका जोगतिणी कडे घेवून गेल्यात.त्या जोगतिणीच्या अंगात येतंय म्हणे. तिच्या अंगात आल्यावर " माझा मुलगा माझ्या स्वप्नात येतोय " असं सासुबाईंनी तिला सांगितल्यावर " तुम्ही त्याला घडवून बसवा " असं जोगतिणीनं सांगितलं.पण माझा या सांगण्यावर विश्वास नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यावर त्या माझ्याकडे रागानं पाहू लागल्या.नंतर आम्ही दोघी काहिच न बोलता घरी परतलो अन मग या गोष्टीवरुन सासुबाईंनी माझ्याशी वाद घातला.काही वेळ अबोलाही धरला.नंतर मग दुसऱ्या दिवसापासून शेजाऱ्यांना,नातलगांना " माझी सून स्वत:ला शहाणी समजतेय बघा. मी माझ्या मुलाच्या प्राणप्रतिष्ठापने विषयी सांगतेय तर ती याकडे अजिबात लक्ष देत नाही." असं त्या सांगू लागल्या.असं त्यांच्या या बोलण्याबद्दल मला इतर लोकही सांगू लागलेत.मग पुढे एके रात्री हा प्रसंग आठवून तो मनात घोळवत असतानाच माझा डोळा लागला अन अक्राळविक्राळ रुप धारण केलेला काळाकुट्ट पोशाखाचा भयावह माणूस माझ्या समोर येवून उभा राहिला. त्याला पाहून मी अतिशय घाबरले. माझ्या अंगाला दरारुन घाम सुटला.तो माझ्याकडे रोखून पाहू लागल्यावर आता हा मला काय करणार? या भितीनं मी झोपेतच मोठ्यानं रडायला लागले.माझं रडणं ऐकून जवळच झोपलेल्या सासुबाईंनी मला आवाज दिला पण माझं रडणं थांबत नाही हे पाहून त्या माझ्या जवळ येवून मला गदगदा हलवून " अगं,जरा कुशी पालटून झोप बरं."असं त्या म्हणाल्यावर मी कुशीवर वळले अन क्षणातच तो भयंकर माणूस परत माझ्या स्वप्नात आला. " अगं विला,काय झालय गं ?आज तू इतकी का घाबरतेय मला ? मी तर तुला भेटायला आलोय गं आज.अगं तू घाबरल्यामुळे किती घाम आलाय बघ तुला ?अन एवढ्या मोठ्यानं का रडत होतीस तू ? मला ओळखलं नाहीस वाटतं तू " त्याचं हे बोलणं आणि आवाज ऐकून हा माझा सखाच आहे अशी माझी खात्री झाल्यावर " अहो,तुमचं सोज्वळ,शांत रुप सोडून तुम्ही हे असं रुप घेवून आलात म्हणून तर घाबरले मी." यावर ते मला हसतच म्हणाले, " हो का.मग आता घाबरु नकोस आणि मला खरं खरं सांग तू कसला विचार करित होतीस इतका ते.?"

   " अहो,काही नाही.हे बघा आपल्या घराच्या पुढील अंगणातील मोकळ्या जागेत एक छोटंसं मंदीर बांधून त्यात तुमच्या रुपाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची असं ठरवलंय आईंनी.पण हे काही मला पसंत नाही बघा.आपल्या मुलांनाही मी याबद्दल सांगितल्यावर त्यांनीही नापसंतीच दाखवली.आणि म्हणुनच आई माझ्यावर खूप रागावल्या आहेत.आता तुम्हीच सांगा मी काय करावं ते ? "

  " अगं हे बघ आई जुन्या विचारांची असल्यामुळं मी मूर्ती रुपानं तरी तिच्याजवळ रहावं असं तिला वाटत असल्यामुळेच ती असं सांगत असेल असं मला वाटतं. पण ही तिची अंधश्रद्धा आहे गं.म्हणून तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देवू नकोस अन ती सांगते तसंही करु नकोस.कारण मुर्तीत एखाद्या मृत व्यक्तीची प्राणप्रतिष्ठापना करुन ती काही जीवंत होत नसते.ही सारी अंधश्रद्धा आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे विला.माझी मुर्ती साऱ्या शहरातून मिरवतांना काही लोक तुला अशिक्षीत म्हणतील. म्हणून या अंधश्रद्धेवर तू अजिबात विश्वास ठेवू नकोस.असं करण्यापेक्षा या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या खर्चाइतकी रक्कम एखाद्या अनाथालयाला,वृद्धाश्रमाला किंवा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थीक मदत म्हणून देवू या असं तू आईला समजावून सांग.तसं पाहिलं तर प्राणप्रतिष्ठापना म्हणजे तरी काय ?तर मांत्रिकाला भरपूर पैसे द्यायचेत अन मुर्तिच्या बाजूच्या खोल मोकळ्या जागेत केलेल्या स्वयंपाकातील पदार्थ काही प्रमाणात पुरुन तो भाग नंतर वरुन बंद करायचा. किती हा खुळेपणा. खरंतर आपल्या भागातील कितितरी लोक एकवेळ उपाशी राहून जगत असतात. मग त्यांना हे अन्न देऊन आपण त्यांची एकवेळची भूक नक्कीच भागवू शकणार.असा विचार करायला हवा. हो की नाही ? " " हो.हो.अहो,अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं." आमचं हे असं बोलणं सुरू असतांनाच पहाटे पाचला नेहमीप्रमाणे घड्याळाचा गजर झाला. मी पटकन उठले.सारी कामं आवरून स्वयंपाक केला अन सकाळी सात वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडले.

   शाळा सुटल्यावर मी घरी आले असता टेबलावर असलेली एक पत्रिका दुरुनच पाहील्यावर मी सासुबाईंना " कोणाची लग्नपत्रिका आलीय आई ?" असं विचारले असता " ही लग्नपत्रिका नाही तर आपल्याच जवळच्या नातलगांकडे ' मुंजा ' बसविण्याचा कार्यक्रम आहे उद्या. त्याचीच ही पत्रिका आहे."

" मुंजा बसवायचा म्हणजे काय असतं ते ?" असं मी विचारल्यावर  "अगं,एखाद्या कुटुंबातील लहान मुलगा दगावलेला असेल अन पुढे कुटुंबात काही अडचणी येत असतील तर त्या येवू नयेत म्हणून लहान मुलाच्या मूर्तीची स्थापना करायची असते.या कार्यक्रमासाठी तुलाच जावं लागणार आहे उद्या. म्हणजे तो कार्यकम पाहून तुलाही कळेल की मी कधीपासून काय सांगतेय ते.म्हणून तू उद्या शाळेतून सुटी घे."

हे असं बोलणं ऐकून माझ्या मनात नसतांनाही मी जाण्यासाठी होकार दिला. सकाळी मी लवकर उठले अन या कार्यक्रमासाठी एका खेडे गावी जाण्यास निघाले. मी बसमधून खाली उतरल्यावर मला वाजा वाजण्याचा आवाज ऐकायला आला त्या दिशेनं मी जावू लागले. थोडे अंतर चालल्यावर बैलगाडीत एका लहान मुलाची मुर्ती सर्वांना दिसेल अशाप्रकारे ठेवलेली असून पांढरी शुभ्र नविन कपडे घातलेली पाच लहान मुलंही बसलेली दिसलीत. ही मिरवणूक मुंजाच्या नियोजित स्थळी एका शेतात बांधलेल्या मंदिराजवळ थांबल्यावर त्या मूर्तीला अन लहान मुलांना सन्मानपूर्वक खाली उतरवण्यात आलं.नंतर मांत्रीकाच्या मंत्रोच्चारात या लहानग्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.मंदिरातील मुर्तिच्या बाजुलाच असलेला एक मोकळा खोल भाग पाहून मी माझ्या जवळ असलेल्या स्रीला " हा खोल भाग कशासाठी आहे?त्यात कोणी पडलं तर? " असं विचारल्यावर " आज केलेल्या पुरणपोळीच्या स्वयंपाकातील अकरा पुरणपोळ्या आणि सर्व प्रकारचा स्वयंपाकही काही प्रमाणात या खोल भागात ' भोजन ' म्हणून पुरुन या भागावर टाइल्स ठेवून हा भाग बंद करायचा असतो." 

   असं या स्रीचं बोलणं ऐकून माझ्या स्वप्नातील सख्याचं बोलणं आठवून मलाही वाटलं की,खरंच इतकं चांगलं अन्न जमिनीत पुरण्यापेक्षा मुंजाला नैवेद्य देवून हे पुरण्यात येणारं सारं अन्न काही भुकेल्या जीवांना खाऊ घातल्यास त्यांची भूक भागवून त्यांचा आत्माही तृप्त होईल. पण काय करणार ?अन मी एकटी तरी कशी बोलणार ? या याबद्दल.अशी समज मनाला घालीत शेवटी ' श्रद्धा आणि अंधश्रद्धा ' यातील फरक लक्षात घेवून हे सारं काही नाइलाजानं निमुटपणे पहात राहिले.

   कार्यक्रम आटोपून मी घरी आल्याआल्या " पाहिलं का ?कसं करावं लागतय ते ? मग ते लोक वेडे आहेत की काय ? पण तू तर अजिबात लक्षच देत नाहीस माझ्या सांगण्याकडे. अगं आपण त्याला घडवून बसवलं नाही तर अनेक अडचणी येतील आपल्या महत्वाच्या कामांमध्ये.आता हेच बघ ना तुझ्या मुलीचं म्हणजेच माझ्या नातीचं लग्नाचं वय झालय तरिही तिचं लग्न जमत नाही अजुन. म्हणूनच मी सांगतेय की माझं हे म्हणणं तू लवकर मनावर घे."

   सासुबाईंच्या या बोलण्यानं मी खूप अस्वस्थ झाले.माझी मानसीक अवस्था दोलायमान झाली.पण तरिही माझं मन सासुबाईंचा विचार स्विकारण्यास तयार होत नव्हतं म्हणून " पाहू अजून पुढं काय करायच ते " असं बोलून मी वेळ निभावून नेली.रात्रीचं जेवण आटोपून सारे झोपायला गेलेत.अन मग मी ही पडल्या पडल्या " आपल्या मुलीचं पोस्ट ग्रॅज्युएशन होवून ती जॉब करतेय.अन आता तिचं लग्नाचं वयही झालय तरी अजून लग्न जमत नाही.असा विचार करित असतांना यावेळी मात्र सासुबाईंचं म्हणणं ही मला क्षणभर पटायला लागलं.पण असं असूनही पुढल्या क्षणीच माझं मन या गोष्टीला थारा देईनासं झालं.अर्धी रात्र उलटून गेल्यावरही मला झोप येइनाशी झाल्यावर केव्हातरी माझा डोळा लागला अन यावेळी मात्र पांढऱ्या शुभ्र पोषाखात माझा सखा माझ्या स्वप्नात आला.चेहरा तर सख्याचाच होता पण पांढरे लांब लांब केस,डोळ्यांच्या अवतीभवती पांढरी काळी वलयं, दाटदाट केसांच्या पापण्या आणि भुवया अन बाहेर आलेले वेडेवाकडे मोठे दात.असं रुप पाहून मला खुपच घाबरायला झालं. हल्ली माझा सखा मला घाबरवण्या साठीच येतोय की काय ? प्रेमानं हितगुज तरी कधी करणार का हा माझ्याशी ?" असे अनेक प्रश्न मी स्वतःला विचारु लागले असतानाच मोठमोठ्यानं हसण्याचा आवाज आला.हसतानाचं त्याचं हे भयंकर अवसान पाहून मी आधीपेक्षाही खुपच घाबरुन हे खरोखर भूत च तर नाही ना ! असच मला वाटू लागल्यानं मी झोपेतच कॉटवर उठून बसणार तोच मला त्यानं दोन्ही हातानं धरुन ठेवल्यावर मी मोठ्यानं ओरडले.पण यावेळी मात्र सासूबाई रागारागानं अंगणात झोपलेल्या असल्यामुळे माझ्या स्वप्नातील सख्यानच मला शांत करून " का गं. का ओरडलीस अशी ?अन यावेळी कुठं जात होतीस अशी उठून ?अजून तर पहाट ही झालेली नाही गं. " असं बोलणं ऐकून " अहो,तुम्ही तुमच्या वास्तव रुपातच यायचस ना.अशी विचित्र रुपं घेवून का येताय तुम्ही?"

  असं मी विचारता क्षणीच " अगं विला,हे बघ.आता मला माझ्या मानवी रुपात येता येत नाही ना म्हणून तर मी या अशा रुपात येतोय तुला भेटायला. हं.तर मला हे सांग आता की तू कसला विचार करत होतीस इतका? बराच वेळ तर तू झोपलीच नव्हतीस. झोप येत नव्हती का गं तुला ?"

  " अहो नाहीना.कारण आपली मुलगी माऊ हिचं शिक्षण पुर्ण होवून ती जॉब करतेय आता.पण अजूनही तिचं लग्न जमत नसल्यामुळं आई सततच तुमच्या प्राणप्रतिष्ठापनेचा विषय सांगत असतांना मला टोचून बोलत असतात.मग अशावेळी मी काय करावं?असा मला प्रश्न पडतो बघा. "

  " अगं,प्राणप्रतिष्ठापना आणि मुलीचं लग्न यांचा काहीच संबंध नाही बघ.तुझी देवावर श्रद्धा आहे ना.मग हेच महत्वाचं आहे.आणि लग्नाचं म्हणशील तर योग जुळून आल्यावर जमलं तर येत्या आठवड्यातही तिचं लग्न जमू शकतय.हं.पण तू आईच्या या अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवू नकोस.तर मी सांगत असलेल्या लग्नाच्या योगायोगावर श्रद्धा ठेव. इतकच मी तुला सांगू इच्छितो बघ. "

   असं ते बोलत असतांनाच नळाला पाणी आल्याचा कॉल शेजाऱ्यांनी केल्यामुळे मोबाइलची रिंग वाजली अन मला जाग आली.उठल्या उठल्या मी यांच्या फोटोला नमस्कार करुन  " हे काय चालवलय तुम्ही ?असं दररोज माझ्या स्वप्नात येवून काय पोरीचं लग्न होणार आहे का ?त्यासाठी तुम्हीपण काहीतरी प्रयत्न करा ना " अशी कळकळीची विनंती करुन मी पाणी भरण्यासाठी गेले. अन मग खरंच दुसऱ्या दिवशी माझा मुलगा ऑफीसमध्ये असतांना त्याच्या मोबाइलवर कॉल आला. " हॅलो "

" हं.अरे,तू प्रकाशचा मुलगा ना?"

" होय मीच बोलतोय. आपण कोण?"

" अरे, मी पवार बोलतोय ?"

" स्वारी सर.पण मी ओळखलं नाही आपणाला."

" अरे,मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे.तुझी बहीण लग्नाची आहे.असं मला कळल्यामुळे मी तुझा मोबाइल नंबर मिळवून तुला फोन केलाय. माझ्या नात्यातील एक मुलगा आहे लग्नाचा.त्याच्या लग्नाविषयी बोलायचं होतं."

" हो का? मग बोला काका "

" अरे, तू उद्या माझ्याकडे ये.मग आपण बोलूया. मी तुला माझा पत्ता पाठवतो "

" चालेल. धन्यवाद काका."

   असं फोनवर झालेलं त्यांचं बोलणं त्यानं मला सांगितल्यावर मलाही थोडं बरं वाटलं.सकाळी तो ठरल्याप्रमाणं पवारांकडे गेल्यावर मग या दोघांनी मुलाकडील मंडळींना आमंत्रण दिलं.अन मग दोन दिवसानंतर चहापोह्यांनच्या कार्यक्रमानं सुरूवात होवून पुढील विवाह सोहळाही थाटात संपन्न झाला.

  अन मग दोन,तीन वर्षाच्या अंतरानं माझ्या दोन्ही मुलांचाही विवाह झाल्यावर मी जरा निश्चिंत झाले.

   थोडक्यात खरं सांगायचं तर शेवटी माझ्या सख्याच्या रुपानं त्यांच्या मित्रानं केलेल्या पुरेपूर प्रयत्नांमुळेच माझ्या मुलीचा विवाह पार पडल्यामुळे 'अंधश्रद्धे पेक्षा श्रध्दाच श्रेष्ठ असते.' याची मला तंतोतंत अनुभूती आली. इतकंच नाही तर ' मनात श्रद्धा ठेव पण अंधश्रद्धा बाळगू नकोस ' असा विचार माझ्या सख्यानं मला स्वप्नात येवून सांगीतल्यामुळे नेहमीच असलेल्या श्रद्धेनं माझ्या मनात अढळ स्थान मिळवलं आणि मनात कधीच नसलेल्या पण प्रसंगी डळमळीत करणाऱ्या अंधश्रद्धेनं माझ्या मनातून आपोआपच काढता पाय घेतला. 


म्हणून ' आपण कोणीही अंधश्रद्धा बाळगू नये 'असं मला वाटतं. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract