अविस्मरणीय पाडवा !!
अविस्मरणीय पाडवा !!
लक्ष दिव्यांच्या तेजोमय अशा प्रकाशानं साऱ्या आसमंतासह मनं अन ह्रदयं ही उजळून सोनपावलांनी आलेल्या दिवाळीनं सोन्याहुनही अधिक असा सुखानंद माझ्या संपूर्ण परिवाराला दिल्यामुळे सुख समाधानी, आनंदी अशा एकसंघ कुटुंबासाठी मंगलमय दिवाळी ही एक पर्वणीच लाभल्याचा सुखद असा अनुभव मला आला.
नोकरी निमित्तानं परगावी असलेली माझी दोन्ही मुलं,सुना,नातवंड दिवाळी सणानिमीत्त गावी माझ्याकडे आल्यामुळे मला खूप छान वाटलं. आनंद झाला अन विशेष म्हणजे खूप असं मानसीक समाधानही मिळालं. गेल्या आठवड्यापासून घर गजबजलेलं असून नातवंडांशी खेळण्यात मी रमले. अशा या भरल्या गोकुळात दिवाळीचे हे तीन चार दिवस मजेत कसे निघून गेलेत हे कळलंच नाही.अन बघता बघता आज पाडव्याचा दिवस उजाडलाही. आज घरातील सगळेच लवकर उठले.सर्वांनी पटापट प्रातर्विधी आटोपून चहा पाणी झाल्यावर सुनांनी पुजेचं तबक तयार करुन पतिराजाला औक्षण करुन पाडवा साजरा केला.या कार्यक्रमात नातवंडांची लुडबुड सुरुच होती. हे सारं पाहून माझं मन आनंदानं भरुन आलं अन नकळतच डोळ्यातील अश्रू गालावर ओघळू लागलेत. पण क्षणातच हे ओघळणारे अश्रू पुसून परत येणाऱ्या आसवांना बांध घालून मी ते डोळ्यातच आटवलेत. औक्षण करुन,ओवाळून झाल्यावर सुनांनी उत्तम असा स्वयंपाक केला. साऱ्यांची जेवणं आटोपलीत. उद्या भाउबीज असल्यानं सुना त्यांच्या माहेरी जाणार असल्यामुळे त्यांच्या तयारीची लगबग सुरु झाली. यावेळी काही कारणानिमित्त माझी मुलगी दिवाळी सणासाठी येणार नसल्याचा निरोप तीनं दोन दिवसांपुर्वीच कळवला होता .मुलांची सुटी संपत आली अन उद्या भाउबिजेसाठी बहीण येणार नसल्यानं दोघं मुलंही परतीच्या प्रवासाला निघणार होती. सर्वांनी अजून काही दिवसतरी थांबावं, नातवंडात आपण आणखी रमावं असं मला सारखं वाटत असलं तरी मुलं अन सुनांची नोकरी,नातवंडांची शाळा यामुळे त्यांना थांबवता येत नव्हतं.अर्ध्या तासानं म्हणजे जवळ जवळ दुपारी बारा वाजेला सारे परतीच्या प्रवासासाठी घराबाहेर पडलेत.पण नातवंड धावत घरात आलीत अन त्यांनी मला घट्ट मिठी मारली.काही केल्या ही मिठी सोडवत नव्हती.माझ्याप्रमाणे त्यांचाही जीव माझ्यात गुंतत होता.शेवटी त्यांची समज घातल्यावर " बाय आज्जी " म्हणत ते गाडीत जावून बसलेत.दोन्ही मुलांच्या गाड्या सोबतच निघाल्यात. घरापासून गल्लीच्या वळणापर्यंत गाडीच्या खिडकितून डोकावून पहात टाटा बाय बाय करणारा त्यांचा इवलासा हात मला समाधानानं सुखावत होता.दोन्ही गाड्या वळण घेवून नजरेआड झाल्यावर मी घरात आले अन मघापासून डोळ्यात आटवलेल्या आसवांचा बांध फुटून आपसुकच त्यांची वाट मोकळी झाली.मनसोक्त रडल्या नंतर माझं मनही मोकळं झालं.आठवड्यापासून गजबजलेलं घर आज अगदीच रिकामं वाटू लागलं.नातवंडांचा गलबला थांबल्यानं सारं काही सुनं सुनं वाटू लागल्यानं मी जरा अस्वस्थ झाले.पण मग मीच माझ्या मनाला समज घालून घरातील आवरा आवर केली.समोरच सुनांनी तयार केलेलं औक्षणाचं तबक मला दिसलं. त्यातील विझलेल्या निरांजनीत तुपानं भिजलेली फूलवात ठेवून ती प्रज्वलीत केली अन मी यांच्या फोटोला औक्षण केलं.औक्षण करतांना भूतकाळातील यांच्या आठवणिंनी माझं मन गहिवरलं अन डोळ्यात आसवं दाटून आलीत. हातातील तबक टेबलावर ठेवून मी यांच्या फोटोला नमस्कार करुन जवळच असलेल्या कॉटवर पडल्या पडल्या वर्तमानपत्र वाचू लागले.
वाचता वाचता माझा डोळा केव्हा लागला ते कळलंच नाही. हातातलं वृत्तपत्र खाली पडलं अन मी कुशीवर वळले.थोड्या वेळानं पूर्वी नेहमी ऐकण्यात असलेला संगितमय टक टक टक असा दारावरील आवाज ऐकायला आला.पण मी झोपेतच " कसं शक्य आहे हे ? " असं म्हणत दुर्लक्ष केल्यावर परत पुढील तीन चार सेकंदात तो आवाज ऐकून मी झोपेतच दार उघडून पाहिलं तर काय ?तोच हसरा,शांत,सोज्वळ चेहरा त्याच महत्वाकांक्षी पाणीदार डोळ्यातून प्रणयाच्या नजरेनं माझ्याकडे पहात दारात उभे असलेल्या यांना पाहून मी तर आश्चर्यचकितच झाले.अन " अहो,तुम्ही असे अचानक कसे आलात ?तुम्ही तर बऱ्याच म्हणजे जवळजवळ तीस,बत्तिस वर्षापासून आपल्या या भरल्या घरातून निघून गेलात.अन हे काय ? तुमच्या हातात ही पिशवी कसली ?काय आहे त्यात ?अन दार उघडण्यासाठी दारावर केलेला टक टक टक असा आवाज ही अगदी आधी सारखाच केलाय तुम्ही !"
माझं हे असं आश्चर्याचं बोलणं ऐकून "अगं हो हो.मला आधी घरात तर येवू देशील का ? की,असं बाहेरच बोलणार माझ्याशी."
" नाही नाही.अहो,या ना.घरात या."
असं म्हणत मी त्यांच्या हातातील पिशवी घेवून आम्ही दोघं घरात आलो.पिशवी कॉटवर ठेवून " बसा मी पाणी आणते तुमच्यासाठी "
असं म्हणताच त्यांनी माझा हात हातात घेवून घट्ट धरुन ठेवला अन " हे बघ विला,मला पाणी वगैरे काही नको तर आज मला फक्त मनसोक्त बोलायचं आहे,जीवाभावाचं हितगुज करायचं आहे. तुझ्याशी "
असं यांनी म्हटल्यावर कॉटवर बसून आम्ही हितगुज करू लागलो.
अगं,मला कधीपासूनच तुम्हा साऱ्यांची खूप आठवण येत होती. म्हणून तुमच्या भेटीसाठी आलोय मी आज.पण मुलं दिसत नाहीत.आता कुठं बाहेर गेलीत की काय ?मला सांग आता मोठी झालीअसतील मुलं.त्यांचं लग्नही झालं असेल की आता हो ना."
" अहो,ऐकाना आपली दोन्ही मुलं बाहेरगावी शासकीय कार्यालयात कार्यरत आहेत.मोठी सून एका नामांकीत महाविद्यालयात प्राध्यापिका असून लहान सून प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी असा मुलांचा परिवार आहे.दिवाळीसाठी ते आले होते पण आता त्यांची सुटी संपल्यामुळे ते सारे आता थोड्यावेळापुर्वीच गेलेत."
हे ऐकून यांना वाईट वाटलं अन "अरेरे ! मी जरा लवकर यायला हवं होतं म्हणजे साऱ्यांची भेट झाली असती बघ.अन आपली माऊ गं ? कुठं आहे ती ? "
मुलगी ही बापाची लाडकी असल्यामुळे तिच्यावर बापाचं खूप प्रेम असतं अन म्हणूनच यांनी मला माऊ बद्दल विचारल्यावर मला लागलीच रडायला आल्याबरोबर यांनी मला जवळ घेवून माझी आसवं पुसलीत अन " अगं रडू नकोस.मला सांग ती आनंदात आहे ना.की कसल्या अडचणीत आहे ?तिची काळजी करण्या सारखं काही आहे का ? "
यांना वाटत असलेली माऊची काळजी पाहून " अहो,नाही तसं काहीही नाही.ती तर खूप मजेत आहे.ती सुद्धा शासकीय अधिकारी पदावर कार्यरत आहे अन जावायांची स्वत:ची कंपनी असून कंपनीची उत्तम अशी भरभराट आहे. माऊलाही दोन मुली आहेत. "
>" अरे वा ! आपल्या तिन्ही मुलांचा संसार असा सुखानं सुरू असल्याचं ऐकून मला खुप छान वाटतय बघ."
" अहो,काही सण समारंभासाठी हे सारे एकत्र आलेत की,आपलं घर हे घर नसून गोकुळच वाटतय बघा.तेव्हा या गोकुळात उणीव भासते ती तुमची.आपली तिन्ही मुलंही म्हणत असतात की, " आमची प्रगती पाहून आमचं अन आमच्या मुलांचं कौतुक करण्यासाठी आज आण्णा हवे होते गं आई " असं माझ्या अंतर मनातलं मुलांचं बोलणं ऐकून माझ्या हृदयात तुमच्या उणीवेमुळे कालवाकालव होवून मला खूप खूप वाईट वाटतं.पण माझा उदास चेहरा पाहून मुलांना वाईट वाटू नये म्हणून चेहऱ्यावर उसनं हसू आणून वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न मी करित असते."
" अगदी बरोबर आहे विला तुझं. योग्य वेळी मुलांचं मन जपणं अत्यंत महत्वाचं असतं बघ."
असं यांचं बोलणं ऐकल्यावर " अहो,आपण मघापासून फक्त आणि फक्त बोलतच आहोत.आल्यापासून तुम्ही पाणी देखील घेतलं नाही.मी पाणी आणते अन तुमच्यासाठी चहा टाकते."असं म्हणून मी उठले.
" अगं,नको नको.मी चहा सोडलाय बघ आता.नको मला चहा "
" अहो,मग खायला करते काही तरी. अरे हं दिवाळीचा फराळ आहे की,तो तरी घ्या आधी.मी आणते हं " असं म्हणत मी किचन मधे गेले. आम्हा दोघांसाठी फराळाची एकच डिश तयार करुन यांच्याकडे गेले तर हे तिथं नसल्याचं पाहून " अहो,कुठं गेलात तुम्ही ? हा फराळ घ्या ना." असा आवाज दिल्यावर..
" हो हो.आलो आलो."असा यांचा आवाज मला मागील रूम कडून आल्यावर मी ही तिथं गेले.मला पाहून
" अगं विला,मी आपलं घर बघतोय गं.आपण दोघांनी मनात रेखाटलेलं होतं अगदी तसंच अतिशय सुंदर घर साकारलय गं तू ! "
अशाप्रकारे यांनी माझं केलेलं कौतुक ऐकून मी मनोमन मोहरले अन स्मित हास्य करत " अहो,चला ना आता.मी फराळाचं आणलंय बघा.थोडं तरी खा की " असं मी म्हणत आम्ही दोघंही बैठकीत आलो अन फराळ करतांना " अगं विला,मी गेलो तेव्हा मुलांचं माध्यमिक शिक्षण सुरू होतं बघ.त्यांचं शिक्षण,लग्न अन आपलं स्वगृहाचं स्वप्न ही सारी जबाबदारी तुला एकटीलाच पेलावी लागली बघ.हे सारं काही निभावत असतांना तुला खूप त्रास झाला असेल ना ."
" अहो,पुरे झालं. त्या त्रासाचं काय विचारताय आता तुम्ही ? मुलांची प्रगती,त्यांचा संसार अन आपलं स्वगृहाचं स्वप्न हे सारं काही उत्तम प्रकारे साकार झाल्यामुळे मला झालेल्या त्रसाचं मला काहिच वाटत नाही बघा.पण या माझ्या साऱ्या यशाचं श्रेय मी तुम्हाला देते हं."
" अगं नाही विला तू असं का म्हणतेस ?"
" अहो,मी म्हणते ते बरोबरच आहे. कारण,आपलं लग्न झाल्यावरही तुम्ही मला शिकण्याची संधी दिली.एवढंच नाही तर शिक्षण पुर्ण झाल्यावर तुमच्या प्रयत्नामुळे नामांकीत अशा प्राथमिक शाळेत शिक्षिकेच्या पदावर माझी नियुक्ती झाली. अन यामुळे मी हे सारं काही करु शकले.पण हे सारं काही करित असतांना मला पदोपदी तुमची उणीव भासत असे.माझ्या सोबत तुम्हीपण असते तर मला हे सारं काही स्वर्गाहुनही सुंदर वाटलं असतं. पण तुम्ही तर आपल्या या संसार सागरातील नौका अशी अर्ध्यावरच सोडून निघून गेलात." असं म्हणत म्हणत मला अचानक रडतांना पाहून यांनी मला शांत केलं.मला पाणी दिलं.अन मग हे माझ्या जवळ बसून माझी समज घालू लागलेत.
" अगं विला,तू म्हणतेस तसा मी नाही गं.तू तर मला ओळखतेस ना ! मला ही माझी ही संसार नौका अशी अर्ध्यावर सोडून अजिबात जायचं नव्हतं गं.आपल्या या स्वच्छंदी जोडीचा सुखी संसार सोन्यासारखी माझी तिन्ही मुलं हे सारं काही सोडून मलाही जावंसं वाटत नव्हतं.पण माझं असं वाटणं नियतीला मान्य नव्हतं असंच म्हणावं लागेल. मी गेल्यापासून मला तुम्हा साऱ्यांची येत असलेली आठवण आज मला इथं घेवून आलीय बघ.वाटलं ही दिवाळी माझ्या कुटुंबासह साजरी करुन,मुलांची प्रगती पाहून,सुनांचे अन नातवंडांचे लाड पुरवून या गजबजलेल्या गोकुळातील स्वर्गसुखाचा साराआनंद लुटावा.पण मला येण्यास जरा उशीर झाल्यामुळे मी या साऱ्या आनंदाला मुकल्यामुळे मला चुकल्या सारखं वाटतय बघ.पण हे सारं सारं अनुभवण्यासाठी मी कधीतरी नक्कीच येईल."
यांचं बोलणं ऐकून " आं परत येईन म्हणताय मग आता कुठं निघालात तुम्ही ?ते काही नाही. आत्ताच तर आलात तुम्ही."
" अगं हो हो.मी नाही जात कुठंही.अगं आज पाडवा आहे ना.विसरलीस की काय तू ? " मला औक्षण कर की मग."
" अहो, नाही नाही.आहे की माझ्या लक्षात." असं म्हणत मी पुजेचं तबक आणून यांचं औक्षण केलं. औक्षण करतांना यांच्या डोळ्यात मला नेहमीप्रमाणेच हवंहवंस प्रेम दिसलं.औक्षणानंतर ओवाळून झाल्यावर मी तबक खाली ठेवताच येतांना सोबत आणलेल्या पिशवीतून यांनी काठा पदराची सुंदर अशी भरजरी साडी,मंगळसुत्रांची माळ,मोत्याची नथ,बांगड्या,जोडवे अन कुंकवाचा करंडा या साऱ्या वस्तू मला भेट म्हणून दिल्यावर " अहो,हे काय ? इतकं सारं का आणलय तुम्ही ? " असं मी म्हणताच
" अगं,तुला ही पाडव्याची भेट दिलीय मी.हे बघ आधी आपली आर्थीक बाजू जेमतेम असल्यामुळे मी तुला किमती वस्तूंची भेट न देता नेहमी सर्व साधारण अशीच भेटवस्तू देत असायचो.म्हणून यावेळी हे सारं सारं मी तुझ्यासाठी आणलंय बघ."
यांचं बोलणं ऐकून " अहो,भेटवस्तूची अशी किंमत बघायची नसून त्यातील प्रेमभाव महत्वाचा असतो. तुम्ही आज पाडव्यासाठी आलात.माझ्याकडून औक्षण केलस.हेच खूप महत्त्वाचं अन भाग्याचं असून माझ्यासाठी तर तुम्हीच माझा अत्यंत अनमोल असा दागिना आहात."
असं म्हणत यांच्या सह या साऱ्या सौभाग्य अलंकारांकडे पाहत असतांना माझं सौभाग्य माझ्या जवळच असल्याचा मला गगनांत मावेनासा आनंद झाल्यामुळे मी खुपच खूष असतांना अन अशा या सुखद आनंदाच्या गाढ झोपेत असतांना माझ्या मोबाईलची रिंग वाजली.मी उठून मोबाइल घेतल्यावर " हं.आई,आम्ही आत्ताच पोहोचलो बरं.आमचा प्रवास सुखकर झाला.तू काळजी करु नकोस.स्वत:ची काळजी घे.फोन ठेवतो हं आई."
फोनवर काय बोलावं हे सुचत नसल्यामुळं " हो हो ठेव." असं म्हणत मीही फोन ठेवला.घड्याळात पाहिलं तर सायंकाळचे साडेसहा वाजलेत. घरात , बाहेर अंधारलेलं.मी उठून घरातील लाईट सुरू केले. फ्रेश झाले.देवापुढे सांजवात लावून " हे देवा ! स्वप्नात का होइना पण आज पाडव्याला माझ्या सख्याचा सहवास लाभून जणू मृगजळातील वास्तव गवसल्याचं समाधान मिळाल्याचा मला आनंद वाटला."असं म्हणत मी प्रसन्न मनानं देवाला नमस्कार केला.
असा हा स्वप्नातील अविस्मरणीय पाडवा आजन्म माझ्या स्मरणात राहील.