Vimal Patkari

Abstract Inspirational

3  

Vimal Patkari

Abstract Inspirational

अन् पुतळा बोलू लागला

अन् पुतळा बोलू लागला

9 mins
162


आज 11एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती.घरातील बैठकीत असलेल्या या महान महात्म्याच्या तसविरिला अभिवादन करुन घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या बागेत फिरायला जाण्यासाठी मी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. आज बागेत गेल्यावर बागेत न फिरता बागेच्या मध्यभागी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ मी आले.त्यांना हार अर्पण केला आणि अभिवादन करून पुतळ्यासमोरच एका मोठ्या झाडाखाली असलेल्या बाकावर मी बसले.बसल्या बसल्या पुतळ्याकडे पाहून महात्मा फुलेंच्या कार्याबद्दल अनेक पुस्तकांमधून, वक्त्यांच्या भाषणांमधून ऐकलेलं त्यांचं महान कार्य आठवून त्यांचे मनोमन आभार मानत असतांना माझ्या मनाला वाटू लागलं की ,खुप सारे कष्ट,त्रास,छळ,अपमान हे सारं काही सहन करुन,पचवून सर्वच क्षेत्रात क्रांती घडवून साऱ्या मानव जातीला मानवधर्म शिकवण्याचं एवढं महान कार्य या थोर महात्म्याने केलेलं आहे. असं मनाशी म्हणून मी बागेत फिरण्याचा विचार केला पण जाण्यापूर्वी परत एकदा नतमस्तक होवून या क्रांतिसूर्याला अभिवादन करावं असं वाटल्यामुळे मी पुतळ्याजवळ जाण्यासाठी उठले अन पुतळा माझ्याशी बोलू लागला....

  " अगं ए ताई बस ना गं तू या बाकावरच.मला कळलय की तू मला परत नमन करण्यासाठी उठलीस ते.अगं पण मी पाहीलंय ना आज तू बागेत न फिरता माझ्याकडेच आलीस. मला हार घालून अभिवादन सुद्धा केलस. अन मग आता परत का अभिवादन करतेस मला ? तसं पाहिलं तर मी काही केलेलं नाही बरं का. तर मी माझ्या कृतीतून फक्त माणसाला माणुसकीचं दर्शन घडविण्याचं काम केलय बघ."

 " अहो,नाही नाही ज्योतिबा.तुम्ही असं का म्हणताय ?" मी पुढं काही म्हणणार तोच "अगं ताई,तू जरा बस तरी या बाकावर.आज मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे बघ."

असं म्हणून त्यांनी मला बाकावर बसायला सांगितलं आणि ते परत माझ्याशी बोलू लागले.

  हे बघ ताई, सन 1827 हे वर्ष माझ्यासाठी खुपच भाग्याचं आहे असं मी समजतो. कारण 11एप्रिल 1827 रोजी मला सर्वश्रेष्ठ असा मानवजन्म मिळाला अन त्यामुळे मी आजही परमेश्वराचे मन:पूर्वक आभार मानतो.मी जन्माला आल्यामुळे माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी त्याकाळीही माझं बारसं करायचं ठरवलं. तू म्हणशील तुम्हाला जणू हे कळत होतं काय तेव्हा? तर तसं नाही गं ताई. हे मला माझ्या आईने नंतर सांगितलं होतं बरं का. हं तर मग बारशाचा दिवस जवळ आल्यावर मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं ' ज्योती ' नामकरणानं माझ्या बारशाचा सोहळा साजरा करण्यात आला. मायपित्याच्या ममतेच्या छायेत मी सुखानं वाढू लागलो. माझं कोडकौतुक होवू लागलंं. पण पुढं अशा आनंदात मी वाढणं कदाचीत नियतीला मान्य नसल्यामुळे क्रूर काळाने माझ्या आईला माझ्यापासून हिरावून नेलं.माझी आई मला सोडून देवाघरी निघून गेल्यानं मी आईविना पोरका झालो.पण आईनंतर माझ्या वडिलांनी मला आईच्या मायाममतेनंच वाढवलं. मी शाळेत जावं,खूप शिकावं असं वडिलांना खूप खूप वाटत होतं. म्हणून त्यांनी माझं नाव शाळेत दाखल केलं.मी शाळेत जावू लागलो.मला शिक्षणाची आवड असल्यामुळे मी शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देवू लागलो.परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवू लागलो. हे सारं पाहून वडिलांना खुप आनंद होत असे. पण त्यावेळच्या काही सनातनी लोकांना माझं शाळेत जाणं पसंत नव्हतं. मी शाळेत जावू नये म्हणून त्यांनी मला अनेक प्रकारे त्रास देणं सुरू केलं. त्रास सहन करुनही मी शाळेत जाणं बंद करीत नाही हे पाहून त्यांनी माझ्या वडिलांना ' ज्योतीला शाळेत पाठवण्याचे परिणाम चांगले होणार नाहीत ' अशा प्रकारे धमकावलेही. अन मग दुसऱ्या दिवसापासून वडिलांनी माझं शाळेत जाणं थांबवलं. पण यामुळे मला आणि त्यांनाही खूप वाईट वाटलं. मग मी वडिलांबरोबर मळ्यात,शेतात कामं करु लागलो.एके दिवशी मी असाच मळ्यात काम करीत असतांना तिथं ' लेजिट ' साहेब आलेत.त्यांनी मला शिक्षणाविषयी, शाळेत जाण्याविषयी विचारले असता मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटले.मग त्यांनी मला ' शिक्षण सोडू नकोस.शाळेत जावून शिक्षण पुर्ण कर.' अशा प्रकारे शिक्षणाची चालना दिली. पुढ़े मी मोठा झाल्यावर मला उच्चवर्णीयांच्या मिरवणुकीत जावसं वाटल्यामुळे मी त्या मिरवणूकीत सामील झालो. पण मिरवणुकीतील लोकांनी मला तुच्छ लेखून तुच्छतेच्या शाब्दिक बाणांनी अपमानीत केलं. हा माझा एकट्याचा अपमान नसून साऱ्या मानव धर्माचाच अपमान आहे असं मला वाटू लागलं आणि मग रवी,सरिता,पवन,धरा हे तर साऱ्यांनाच समान वागवतात पण मग मानवानच या जातीधर्माची अशी वाच्चता का करावी ? असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला.त्याकाळी होणारी विधवांची कुचंबणा आणि शुद्रांची झालेली केविलवाणी दशा पाहून माझं मन सुन्न होत असे. म्हणूनच समाजातील ही सामाजीक गुलामगिरी नष्ट करुन साऱ्या जनतेला मानवधर्म शिकवण्यासाठी मी माझी अधिकारी पदाची चाकरी लाथाडण्यासाठी सज्ज झालो. 

  पुढे सन 1848 ला मी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि सनातनांच्या पोटात गोळा उठला. त्यांनी शाळा बंद करण्यासाठी अनेक प्रकारची कारस्थानं सुरू केलीत. तरीही मी न डगमगता मुलींची शाळा सुरुच ठेवली."

  इतक्यातच परगावाहून आलेल्या मुलांची सहल बागेत दाखल झाली.बागेत गोंगाट सुरू झाला.सारी मुलं बागेत फिरुन सहलीचा आनंद घेवू लागलीत.थोड्याच वेळात शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पुतळ्याजवळ बोलावलं.त्यांना शिस्तीत उभं रहायला सांगून शांत केलं. आणि " हे बघा मुलांनो,आज 11 एप्रिल. आज या महान क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे." अशी सुरुवात करुन महात्मा फुलेंच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.नंतर सर्वांनी पुतळ्याला अभिवादन केलं आणि सारे जाण्यासाठी वळणार तोच मी सहल प्रमुखांना " अहो सर,आपण मला आपला थोडा वेळ दिला तर मी ही आपल्या विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंबद्दल काही माहिती सांगू इच्छिते." असं मी विचारल्यावर सरांचा होकार मिळताच

 " हे बघा विद्यार्थी मित्रांनो,आत्ताच तुमच्या सरांनी महात्मा फुलेंच्या कार्याविषयी माहिती सांगितली. महात्मा फुले यांनी माणसातील माणुसकी जागवण्यासाठी अनेक क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्याचप्रमाणे शिक्षणक्षेत्रातही काहीतरी बदल घडवून आणावा असं त्यांना नेहमी वाटत असे. साऱ्याच जनतेनं साक्षर व्हावं म्हणून 

 विद्येविना मती गेली!

 मतीविना नीती गेली!

 नीतीविना गती गेली!

 गतीविना वित्त गेले!

 वित्तविना शूद्र खचले!

 इतके अनर्थ एका अवीद्देने केले!

असा हा त्यांचा विचार ते साऱ्यांना सतत सांगत असत आणि म्हणूनच अविद्देमुळे होणारा फार मोठा अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी शिक्षणक्षेत्रात स्वत:ला झोकून घेतलं.त्यांच्या या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोलाचं सहकार्य केल्यामुळे आज तुमच्या या शैक्षणिक सहलीसाठी तुम्हा विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनी आणि शिक्षकांसोबत शिक्षिकाही येवू शकल्यात. आणि मी सुद्धा सरस्वतीच्या विद्यामंदिरात ज्ञानदानाचं पवित्र कार्य करुन माझी शिक्षण सेवा अत्यंत उत्तम प्रकारे पूर्ण करु शकले.अशा या महान क्रांतिसूर्य आणि क्रांतिज्योती या दोघांच्या कार्यामुळेच आम्हा स्रीजन्माचे सार्थक झाले आहे. हे आपण आजन्म लक्षात ठेवायला हवं.आपण मला आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. "

" मॅडम,आपणही आमच्या विद्यार्थ्यांना बहुमोल अशी माहिती सांगितल्यामुळे आम्ही सारे आपले आभारी आहोत.येतो मॅडम आम्ही. लांब जायचंय आम्हाला."

" हो सर.या आपण.आपला प्रवास सुखाचा होवो.बाय मुलांनो. "

" बाय मॅडम "असं म्हणून सारे मागे वळले.शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या रांगा केल्या आणि परत एकदा टाटा बायबाय करुन सहल परतीच्या प्रवासासाठी प्रवेशद्वाराच्या दिशेनं निघाली.सहलीच्या विद्यार्थ्यांकडे मोठ्या कौतुकानं पाहत असतांना मलाही माझ्या शाळेतील अनेक शैक्षणीक सहली आठवू लागल्या.जणू मी माझ्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांसोबत असल्याचा सुखानंद उपभोगत असतांनाच " ताई ए ताई असा आवाज आल्यामुळे मी वळून पुतळ्याकडे पाहिलं तर पुतळ्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव मला दिसल्यावर मी पुतळ्याकडे पाहतच राहिले.आणि मग बाकावर बसण्यासाठी मागे न वळता पुतळ्याकडे बघत बघतच चार सहा पावलं मागं जावून बाकावर बसले.अन पुतळा परत माझ्याशी बोलू लागला....

" अगं ए ताई,आज सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी आणि तू ही माझ्या कार्याविषयी माहिती सांगितली.तू तर माझ्या कार्यात मला माझ्या सावित्रीने केलेल्या सहकार्याची माहिती सांगून मला तिच्याबद्दल वाटणाऱ्या अभिमानात भर घातल्यामुळे मी तुझा आभारी आहे गं ताई. "

" अहो ज्योतिबा,आपण माझे आभार का मानताय ? आपण तर क्रांतीसूर्य आहात !"

" अगं ताई,असं काही नसतं बघ.तसं पाहिलं तर आपण सारे समान आहोत.मुळातच श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करणं मला कधी जमलंच नाही बघ.हं .तर सावित्रीबद्दल सांगायचं म्हणजे माझं तिच्याशी लग्न झालं त्या काळी मुलींनी शिक्षण घेणं म्हणजे महापाप समजलं जात असे. म्हणून माझी सावित्री देखील निरक्षरच होती.मी तुला मघाशी सांगितल्याप्रमाणे सन 1848 ला सुरू केलेली मुलींची शाळा नियमीतपणे सुरू होतीच.बघता बघता पुढे शाळेतील मुलींची संख्या वाढू लागली.ही वाढती संख्या पाहून त्यांचे पुढील शिक्षणकार्य झेपावण्याची चिंता मला वाटू लागली.एके दिवशी मी असाच सायंकाळी याच विचारात असताना" अहो,आज तुम्ही कसल्यातरी विचारात दिसताय.काय आणि कसला विचार करताय तुम्ही एवढा ? मला सांगा तरी काही. मी मघापासून बघतेय तुमचा चिंतातूर चेहरा.तुम्ही काहीच का बोलत नाहीत? "

तिचं हे बोलणं ऐकूनही मी काहीच बोलत नाही हे पाहून तिनं मला परत विचारल्यावर " अगं सावित्री हे बघ मी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेतील मुलींची संख्या वाढत आहे. पुढे इतक्या साऱ्या मुलींना कोण शिकवणार ? याचीच काळजी वाटतेय बघ मला. तू शिकवणार का मुलींना ? " यावर " हं काहीतरीच तुमचं.मी शिकलेली नाही हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे.अन मग तरीही तुम्ही असं का विचारताय मला ? "

" अगं सावित्री,हे बघ मी तुला आधी मुळाक्षरं,बाराखडी,अंक हे सारं काही शिकवेन आणि मग तुझं शिकून झाल्यावर तू मुलींना शिकवायचं. "

असं मी तिला सांगितल्यावर तीनं लागलीच स्वत: शिकण्याची तयारी दाखवली.अन मग दुसऱ्या दिवसापासून मी सावित्रीला शिकवायला सुरुवात केली. तीचं शिकून झाल्यावर ती मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जावू लागली. तीचं हे मुलींना शिकवणं काही कर्मठ लोकांना सहन होत नसल्यामुळे ती शाळेत जात असतांना रस्त्यात गाठून ते तीला अचकट विचकट बोलत असत.पण ती त्याकडे दुर्लक्ष करीत असे.हे पाहून मग ते तिच्या अंगावर शेणगोळे, दगडगोटे यांचा मारा करू लागले. तेही ती सहन करुन " तुम्ही माझ्या अंगावर शेणगोळे, दगडगोटे फेकत नसून जणू फुलंच उधळीत आहात असंच मला वाटतय.कारण मी तुमच्या आणि माझ्या भगिनींना शिकवण्याचं काम करतेय." असं नम्रपणे सांगून शिकवण्याचं कार्य तिनं सुरुच ठेवलं होतं बघ."

तिला अधिक त्रास होवू लागल्यावर शाळेत जाताना ती एका पिशवीत एक लुगडं सोबत घेवून जावू लागली. शेणगोळ्यांनी माखलेलं लुगडं शाळेत बदलवून सोबत आणलेलं लुगडं नेसून मुलींना शिकवण्याचं काम झाल्यावर परत खराब झालेलं लुगडं नेसून ती घरी जात असे.एवढा महतत्रास सहन करुनही तीनं शिकवण्याचं काम सुरुच ठेवलं होत. "

" हो ना ज्योतिबा तुम्ही सुरू केलेल्या शिक्षण कार्यास हातभार लावून,स्री शिक्षणाची शारदा होवून विद्यादानाचं हे पवित्र कार्य सावित्रीबाईंनी केल्यामुळेच आजची स्री चूल अन मूल ही संसारातील संयुक्त अशी जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळूनही सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. "

" हो गं ताई.मला याबद्दल तिचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणूनच ' एक पुरुष शिकला तर तो एकटाच शहाणा होतो पण एक स्री शिकली तर संपुर्ण कुटुंब शहाणं होतं.' हा माझा विचारही मी सार्थपणे पूर्ण करु शकलो.

अशा प्रकारे मानवमाता साक्षर केल्यानंतर मला शुद्रांची चिंता भासल्यामुळे साऱ्या मानवधर्माला साक्षर करण्याची प्रतिज्ञा मी माझ्या मनाशी करून सन 1852 ला नानापेठेत शाळा सुरू केली. त्यामुळे साऱ्याच पददलितांना आनंद झाला. इतकंच नाही तर यानंतर मी अस्पृश्य मुलींसाठीही शाळा सुरू केली.अगं ताई, 'पाणी म्हणजे जीवन ' हे ठाऊक असूनही स्पृश्य-अस्पृश्य भेदामुळे लोकांना दारोदार फिरुनही पाणी मिळत नव्हतं आणि मिळालंच तर ते अतिशय तुच्छतेनं मिळत असे.हे पाहून मी माझा स्वत:चा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करुन मानवधर्म जोपासण्याचं कार्य केलं.दीनदलीतांना सर्व दृष्टीने चालना मिळावी म्हणून मी नवे विचार माझ्या ' दिनबंधू ' या वृत्त पत्रामधून व्यक्त केलेत.शेतकरी बंधुंसाठी राष्ट्रीय सभेत जनजागृती केली.माझ्या कार्यामुळे पुढे कर्मवीर शिंदे यांनी मला ' जनतेचा जागा शेर ' म्हणून गौरविले.

   यानंतर महत्वाचं सांगायचं म्हणजे अनेक अनाथ बालकांचा सांभाळ करुन वात्सल्य सागरातील एक छोटासा बिंदू होण्याचाही मी प्रयत्न केला. या कार्यात सुद्धा मला माझ्या सावित्रीने पुरेपूर आणि मोलाचं सहकार्य केल्यामुळे आम्ही माय-बाप होण्याचं सदभाग्य आम्हाला लाभलं. पण आमचं हे कार्य ही काही लोकांना सहन होत नसल्यामुळे त्यांच्याकडून तर मला ठार मारण्याचा कट ही रचण्यात आला होता. एके रात्री बाहेर नीरव शांतता असतांना हातात पाजळलेल्या फरशा घेवून दाराआड उभे असलेल्या मारेकऱ्यांची अस्पष्ट छाया मला दिसल्यावर ' कोण तुम्ही ? इथं का आलात ? ' असं मी त्यांना विचारल्यावर "आम्ही खुनी.तुमचा खून करण्यासाठी इथं आलोत." असं त्याचं बोलणं ऐकून "मला ठार मारून तुम्हाला काही लाभ होणार असेल, तुमचं भलं होणार असेल तर मग मला खुशाल मारा.पण त्या आधी तुम्हाला माझी एक विनंती आहे की,मी गेल्यावर या साऱ्या अनाथ बालकांचा सांभाळ तुम्ही करा."असं म्हणत मी दिव्याची वात पुढे करताच दिव्याचा उजेड खोलीभर पसरला आणि साऱ्या अनाथ बालकांना सांभाळण्याचं मुर्तिमंत वात्सल्यदर्शन मारेकऱ्यांना घडताक्षणीच त्यांच्या हातातील 

पाजळलेल्या फरशा आपोआप खाली गळून पडल्यामुळे त्या मारेकऱ्यांनी माझ्यासमोर हात जोडून "तुम्ही अनाथांचे नाथ आहात. आम्ही चुकलो.आम्हाला क्षमा करा." असं म्हणत माझी क्षमा मागून मला आलिंगन ही दिले.आणि मग पुढे या मारेकऱ्यांनाही शिकवण्याचे काम मी पूर्ण केले. "

    ज्योतिबांचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटे आलेत.स्वत:ला ठार मारण्यासाठी आलेल्या मारेकऱ्यांनाही आपलेसे करुन त्यांना शिकवण्याचं महान कार्यही महात्मा फुलेंनी केलय.या विचारांनी मी अवाक झाले.डोळे मिटून मी शांत बसले असता या महान महात्म्याकडून अजुनही त्यांचं काही कार्य ऐकत रहावसं वाटत असतांनाच बागेचा माळी आणि रखवालदार दोघंही मोठ्यानं बोलत पुतळ्याकडे आलेत. मला बाकावर पाहून "मॅडम,आज तुम्ही बागेत फिरलाच नाहीत.आल्या पासून इथंच बसलेल्या आहात. बाग बंद करण्याची वेळ झालीय मॅडम आता.अजून किती वेळ थांबणार आहात आपण ? "

   असं त्यांनी विचारलं असता " अरे हरी,सदा आता निघणारच होते रे मी घरी जाण्यासाठी. हे बघा,आज 11एप्रिल. या महान महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आज.यांनी मोठ्या कष्टानं,विचारानं सर्वच क्षेत्रात खूप मोठी क्रांती करुन साऱ्या मानवधर्माला समता-बंधुता आणि एकतेची शिकवण दिलेली आहे.हे आपण सदैव लक्षात ठेवलं पाहिजे."

  " हो मॅडम अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं."

असं त्या दोघांनी म्हटल्यावर आम्ही तिघांनी क्रांतीसूर्याच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि घरी जाण्यासाठी बागेच्या बाहेर पडलो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract