Vimal Patkari

Romance Classics

2.4  

Vimal Patkari

Romance Classics

हव्याहव्याशा आठवणी !!

हव्याहव्याशा आठवणी !!

3 mins
26


 नेहमीप्रमाणे आम्ही दोघं आजही पहाटे पहाटेच फिरायला बाहेर पडलो. सार्या सृष्टीला टाटा बायबाय करुन पावसाळा गेल्यानं हवाहवासा वाटणारा मंद मंद गार गार वारा हिवाळ्याची चाहूल देवू लागला.अशा या शुद्ध,आरोग्यदायी हवेत फिरतांना खूप प्रसन्न वाटू लागलं अन मग हिच प्रसन्नता मनात घेवून आम्ही घरी परतल्यावर " अगं,आपण आता दररोज सकाळी फिरण्यासाठी अधिक वेळ देवू या.कारण आता हिवाळ्याची चाहूल लागलीय बघ. " यावर " "अहो,खरच की आज सकाळी फिरतांना खूप छान वाटत होतं. देवू या आपण अधिक वेळ सकाळी फिरण्यासाठी." असं संभाषण करुन आम्ही सारी कामं भराभर आटोपून नोकरी निमित्तानं घराबाहेर पडलो.सायंकाळी ऑफीस सुटल्यावर घरी परतण्यास अंधार झाला.थंडीमुळे रस्त्यावरील लोकांची वर्दळ कमी झालेली दिसली.घराच्या परिसरात आल्यावर सर्वदूर शांत शांत वाटू लागलं.घरी आल्यावर आम्ही फ्रेश झालो.नंतर मी स्वयंपाक केल्यावर आमची जेवणंही आटोपलीत.

     अशाप्रकारे दिवसामागून दिवस जात असतांना मंद गार हवेतील थंडीचा गारवा हळूहळू वाढू लागला.या गारव्यामुळे सृष्टीतील सार्या चराचराच्या तन-मनाला नवचैतन्यमयी आनंद मिळू लागला.वार्याची मंद झुळूक जणू राग मारवा गावून प्रियजनांच्या मनातील प्रीत पारवा खुलवू लागली.थंडीच्या गारव्यातील गार गार हवेची गुलाबी शाल तन-मनावर प्रितीचं पांघरुण घालू लागली अन मग हिच प्रितीची शाल पांघरुन आम्ही भल्या पहाटे फिरावयास निघालो.

   आम्ही थोड्या अंतरावर गेलो असता सृष्टीला प्रीत ओलावा बहाल करणार्या दवबिंदुंचा साज तृणांकुरांवर अन झाडांच्या पानापानांवर मोत्यांसारखा चमकू लागला.दवबिंदुंचा निसर्गाप्रती असलेला हा प्रीत भाव जाणून आम्ही पुढं निघालो.थोड्याच अंतरावर असलेल्या डोंगर पायथ्याशी आम्ही पोचणार तोच अचानक धुकं पसरायला सुरूवात झाली अन पुढल्याच क्षणी सारीकडे दाट दाट धुकं पसरलं.या दाट धुक्यात आम्ही दोघं हरवतो की काय असं वाटू लागलं.आम्ही एकमेकांपासून खूप दूर गेलोत की काय ?असं वाटल्यामुळे आम्ही एकमेकांना शोधू लागलो,साद घालू लागलो अन साद येणार्या आवाजाच्या दिशेनेही जावू लागलो पण तरिही आमची भेट होत नसल्यानं मी जरा घाबरलेच.या धुक्यानंच जणू सूर्यकिरणांची वाट अडवलीय की काय ?अशी कल्पना माझ्या मनात आली असतानाच सार्या सृष्टीतील चराचराला कोवळ्या किरणांची ऊब मिळावी म्हणून जणू सूर्यनारायणाची आराधना करणार्या धरणीची विनवणी ऐकून धुक्याची मिठी सोडवीत सूर्य उदयास आला अन अचानक आम्ही दोघंही थोडया थोड्याच अंतराने अगदी एकमेकांच्या समोरच उभे असल्याचं पाहून आम्हाला खुपच आनंद झाला. " हिवाळ्यातील या दाट दाट धुक्यात लपंडाव खेळण्याचा मनमुराद आनंद आज आपण लुटलाय " असं नजरेच्या भाषेनंच बोलत आम्ही आनंदानं हातात हात घेवून डोंगर चढू लागलो.डोंगर चढून गेल्यावर तिथंच आम्ही थोडा वेळ विसावलो अन विसावता विसावता जरा जादुई जगात रमलो.

     थोड्याच वेळानं बर्फवृष्टी सुरू झाली अन बघता बघता सारा डोंगर बर्फाच्छादीत झाला.या बर्फावरुन घसरत घसरतच आम्ही डोंगर पायथ्याशी कधी आलो हे कळलंच नाही.डोंगराखालील सारी सृष्टीही बर्फानं धवलकांतीमय झालेली पाहून खुपच आगळा वेगळा अनुभव येवू लागला. या अनुभवासह आम्ही एकमेकांच्या अंगावर बर्फ फेकू लागलो.अन मग काही वेळानं बर्फ वितळू लागल्यामुळे चालतांना पायाखालची जमीनच सरकत असल्यासारखं वाटू लागलं.पुढं गेल्यावर बर्फानं गोठलेला एक मोठा तलाव आम्हाला दिसला.हा तलाव पाहून आम्हा दोघांनाही या तलावावरुन पलीकडे जावंसं वाटलं पण मघासारखा बर्फ वितळायला लागला तर मग काय करायचं ? असा विचार मनात आला पण तरीही मोठं साहस करुन एकमेकांना घट्ट धरून आम्ही हा तलाव पार केला.तलाव पार करतांनाची मज्जा,आनंद अन त्यात बुडण्याची भिती ही मनात घेवून काही अंतर गेल्यावर बर्फानं तुडूंब भरलेली नदी आम्ही पाहिली." अरे वा ! किती छान ! या नदीवर तर जणू कुणीतरी पांढर्याशुभ्र साड्याच पसरवल्यासारखं वाटतंय ! अन परत त्यावर पडलेले लहान मोठे विविध आकारातील बर्फाचे तुकडे तर किती छान चकाकताय ! नदीचं हे मनोहर दृश्य बघतच रहावसं वाटतय " असं म्हणत आम्ही नदीकाठी रमलो.जरा वेळानं नदीतील हिम वितळायला सुरुवात झाली.काही प्रमाणात हिम वितळल्यावर आम्ही नदीत उतरलो.नदीचं पाणी खुपच गार अर्थातच बर्फासारखं होतं.तरिही आम्ही एकदुसर्याच्या अंगावर पाणी उडवून नदीत पोहलो ही.अन मग आम्ही या जादुई जगातून बाहेर आलो.

    आता अलिकडे वास्तवातील सार्या सृष्टीवरही बर्फवृष्टी झाल्यामुळे थंडीचा गारठा वाढलाय.या गारठलेल्या थंडीमुळे अंगाअंगात चांगलीच हुडहुडी भरलीय अन या हुडहुडी बरोबरच गार गुलाबी हवा ही मनाला गुदगुली करू लागलीय.अशा या हिवाळ्यात सुक्या मेव्यानं युक्त असे शरीरात उष्णता निर्माण करणारे लाडू खाण्याचीही चंगळ आहे.शिवाय रात्री सार्यांसोबत शेकोटीची ऊब मिळवण्याचा आनंद काही औरच आहे.हिवाळ्यातील हे सारे प्रसंग परत अनुभवण्यास मिळून या सार्या आठवणी पुढील हिवाळ्यात द्विगुणीत होवून अजुनही काहीतरी नवे अनुभव यावेत म्हणून आम्ही प्रतिवर्षी हिवाळ्याची आतुरतेनं वाट पहात असतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance