पाऊस आणि रातवा !
पाऊस आणि रातवा !
ग्रिष्माच्या ऊन्हानं जीवाची लाही लाही होवून पाण्यासाठी आसुसलेली धरणी जवळ जवळ आठ ते दहा दिवसांपासून मेघराजाला आर्त साद घालून त्रस्त झालेली असतांना आज अचानक आकाश मेघांनी दाटून आलं.आकाशात जणू काळ्या पांढऱ्या ढगांचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाल्याचं दिसू लागलं.वाऱ्याची थंडगार अशी हलकिशी झुळूकही आली अन हळू हळू वाऱ्याची गती वाढून वारा जोरानं वाहू लागला.ढगांना वाऱ्याचा स्पर्श होताच जरा हायसं वाटून क्षणातच पावसाच्या रिमझिम सरी बरसून धरणीला शांत करू लागल्या.तप्त ऊन्हानं तापलेल्या भूमिला पर्जन्याचा स्पर्श झाल्यानं ती तन-मनानं मोहरली अन शहारलीही. थोड्याच वेळात पावसाच्या पाण्यानं भिजलेल्या मातीचा सुंदर असा हवाहवासा कस्तुरी सुवास साऱ्या आसमंतात दरवळू लागला.सारी सृष्टी आनंदीत झाली.सृष्टीतील सारा चराचर सुखावला.असा हा आनंद देणारा जीवनदायी पाऊस पाहण्यासाठी मी घराच्या ओसरितील खुर्चीत बसून नाचत बरसत असलेल्या पाऊसधारांचं जलनृत्य पाहू लागले.काही वेळातच घरापुढील अंगणात असलेल्या बागेतील झाडं,वेली,झुडूपं पावसात न्हावून त्यांच्या अंगी असलेला हरित रंग पावसाच्या पाण्यानं अधिकच खुलवून दिलखुलासपणे डौलानं डोलत असल्याचं पाहून पर्जन्याच्या या किमयेनं माझं मनही प्रसन्न झालं.
बघता बघता पावसाचा जोर वाढून रिमझिम सरींनी मुसळधार पावसाचं रुप घेतलं.घरासमोरील रस्ता नीट नसल्यामुळं पायवाट जरा खोलवर गेलेली असून रस्त्यात काही जागी लहान मोठे खड्डे झालेले होते.मुसळधार पावसानं खोलवर असलेली पायवाट पाण्यानं भरुन जणू झऱ्याच्या रुपानं झुळझुळ वाहू लागली खड्ड्यातील खोल भागात पाणी साचून या खोलभागांना डबक्यांचं रुप आलं.आमचं घर कोपऱ्यावर असल्यामुळं घराच्या बाजुनं वाहणारा ओहळही खळखळून वाहू लागला.उठून मी हे सारं पाहिलं तर मला आधी पाण्यानं भरलेलं डबकं दिसल्यावर मला माझ्या लहानपणाची आठवण झाली.कारण आमच्या खेडेगावातही पावसाळ्यात अशीच पाण्याची डबकी साचायचीत.आम्ही सारी लहान मुलं मुली त्या डबक्यांमध्ये उड्या मारायचो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायचो अन मग घरी गेल्यावर चिखलाने माखलेले कपडे पाहून आईचा ओरडा तर कधी मारही सहन करायचो.पण तरिही पहिल्या पावसातील हा सारा आनंद काही औरच वाटत असे. डबक्याच्या आठवणीत रमले असतांना गल्लीतून झुळझुळ वाहणारा झरा पाहून आकारानं जरा मोठा असलेला गावाकडील झरा माझ्या नजरेसमोर आला.लहानपणी पडत्या पावसात झऱ्याचं पाणी ओंजळीत साठवण्याचा खेळ आठवून ओंजळीत पाणी साठवतांना त्या पाण्याच्या हाताला होणाऱ्या गुदगुल्यांचा छान असा स्पर्श मला आठवत असतांनाच गावाबाहेरील मोकळ्या जागेत असलेलं एक भलं मोठं तळंं मला दिसू लागलं.त्या तळ्याकडे लहान मुलांना येण्यास बंदी असल्यानं तरुण मुलं मुली तिथं जावून तळ्यात कागदी होड्या सोडून पावसाच्या सरीं सोबत नाचत नाचत,होडीमध्ये जणू स्वत: जोडीनं बसल्याचं स्वप्न रंगवत, पावसात चिंब भिजत तळ्यात सोडलेल्या कागदी होड्या दिसेनाशा होइपर्यंत पहात असतांना वेळ कसा निघून जाई याचं भानही आम्हाला रहात नसे.
हे सारे पावसातील प्रसंग चित्रपटासारखे डोळ्यांसमोरून जात असतांना मुसळधार कोसळणारा पाऊस थांबून स्वच्छ,निरभ्र,नितळ अशा आकाशाची निळाई मनमोहक वाटू लागली.छानसं पिवळं, तांबूस, कोवळं ऊन ही पडलं.या पिवळ्या उन्हाचा आनंद घेत असतांना क्षणातच मंद गतीनं पावसाच्या हलक्या सरी परत बरसू लागल्या.या बरसणाऱ्या सरीही पिवळ्या उन्हात सोनेरी दिसू लागल्या.असा हा ऊन पावसाचा मस्त मजेदार खेळ पाहण्यात मी दंग झाले अन अचानक ऊन नाहीसं झालं. पावसाच्या सरी मात्र शांतपणे बरसत असल्याचं लक्षात आलं अन मग मला गावापासून जवळच असलेली पावसाच्या पाण्यानं दुथडी भरुन वाहणारी नदी आठवली अन आम्ही दोघं राजाराणी नदीत करत असलेला नौकाविहार ही आठवला.किती किती छान होता तो नौकाविहार ! भर पावसात नदीच्या ऐलतीरावरून पैलतीरावर जात असतांना नदीची शांतता,शितलता,पवित्रता लक्षात आल्यावर अचानक पाण्याची पातळी वाढल्यानं नदीच्या वाहण्याला आलेल्या गती मुळे नौकेचं डगमगणं अनुभवून आम्हा दोघांना भिती वाटल्यानं आम्ही एकमेकांना घट्ट मिठी मारली.थोड्या वेळानं नदीचं पाणी जरा ओसरल्यानं आम्ही मिठी सोडून आम्ही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत,सुरुच असलेल्या पावसाचं पाणी अंगावर झेलत, मस्तपैकी गाणी म्हणत पैलतीर गाठला.नौकेतून उतरुन जरा फेरफटका मारून परतीच्या प्रवासासाठी परत नौकेत बसल्यावर या साऱ्या अनुभवांचे सुंदर,छान अशा अविस्मरणीय आठवणींचे क्षण मनात आणि निसर्गरम्य दृश्यांसह नदीचे मोहक रुप डोळ्यात साठवत साठवत करित असलेला नौकेतील पावसाळी प्रवासाचा आनंद खुपच मजेदार असल्याच्या गोड,मधूर आठवणींच्या आनंदात असतानाच शांतपणे बरसणाऱ्या पाऊसधारा थांबल्यानं सकाळी गुराख्यानं कुरणावर चारायला नेलेल्या गाईवासरांचा कळप गळ्यातील घुंगुर घंटेचा आवाज करत घराकडे परत जातांना दिसल्याचं पाहून गावाकडील पावसाळ्यातील दृश्य मला दिसू लागलेत.
पाऊस पडत असतांना गाईगुरांच्या गोठ्यातील पत्र्यावर पडत असलेल्या पावसाचा टपटप असा आवाज, झाडाच्या आडोशाला उभी असलेली काही गाई वासरं,पावसानं चिंब भिजून गारठ्यामुळे थुडथुड करत असलेली शेतातून परतलेली बाया-माणसं आणि उघडी नागडीच पावसात नाचणारी लहान मुलं ही सारी दृश्ये मला आठवू लागलीत तसेच गाईंच्या हंबरण्याचा आवाजही माझ्या कानावर येवू लागला.या साऱ्या आठवणी पावसामुळेच आठवून माझं मन आनंदी झाल्यामुळे मी पर्जन्याचे आभार मानले.पावसानं जरा उसंत घेतल्याचं लक्षात आल्यानं बाहेर जरा फेरफटका मारण्यासाठी आणि पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी मी छत्री न घेताच घराबाहेर पडले.
मी घरापासून थोड्याच अंतरावर गेले अन पावसाची रिपरिप परत सुरु झाल्यामुळे मला पावसाचा गार गार स्पर्श झाल्यानं खुपच छान वाटून हा पाऊस जणू मला भेटण्यासाठीच आला की काय ?असं भासल्याचं समाधानही माझ्या मनाला लाभलं.या पावसात मी खूप चिंबचिंब भिजले.या चिंब भिजण्यानं मी जणू माझ्या साजनाच्या प्रितीतच चिंब भिजल्या सारखं मला वाटल्या नंतर क्षणातच रिमझिमशा पावसात आकाशात खूप खूप शोभून दिसत असलेली छान,सुंदर,मनमोहक अशी ' इंद्रधनु ' ची कमान पाहून मला खूप वेगळाच असा आनंद झाला.या इंद्रधनुकडे पाहून मला पाऊस रुपानं जणू माझा साजन माझ्यावर प्रीत रंगाची बरसात करित असल्याचा भास होवू लागला. गरजत बरसत रिमझिम, सरसर,रपरप,सपसप अशा साऱ्या रुपांनी दिवसभर बरसणारा पाऊस जरा शांत झाल्यावर सायंकाळी मावळतीला सुंदर रमणीय अशी सांज खुलली.सांजेच्या या आगळ्या वेगळ्या पिवळ्या तांबूस प्रकाशात उजळून निघाल्यामुळे खुपच मनोहर दिसणारी सारी सृष्टी पाहून माझं मनही प्रसन्न झालं अन थोड्या वेळातच पाऊसधारा परत ओथंबू लागल्या.आता या ओथंबणाऱ्या पाऊसधारा जणू माझ्या प्रीय व्यक्तिच्या येण्याची चाहूल माझ्या मनाला देत असल्याचं मला वाटू लागलं.रात्र होत आल्यामुळं थोडा थोडा अंधार पसरायला सुरुवात झाली अन माझी पावलंही घराकडे वळलीत. घराजवळ आल्यावर मी गेटची कडी उघडली अन मेघ गर्जनेसह लख्खकन वीज चकाकून हसत,खेळत,नाचत हळूहळू बरसणाऱ्या पाऊसधारा गडगडणाऱ्या ढगांच्या नादात परत जोरदार बरसू लागल्या अन मग सारी रात रपरप,सपसप,धो धो बरसणाऱ्या या रातव्यानं माझ्याशी हितगुज करित जणू कधीच न परतणाऱ्या माझ्या जीवलगाशी माझी भेटच घालून दिली असं वाटल्यामुळे मी खुपच सुखावले. आनंदीत झाले अन मग मिळालेल्या या सुखानंदामुळे दिवसभर बरसून अविस्मरणीय अशा सुखद क्षणांच्या आठवणी ताज्या टवटवीत करणारा पाऊस आणि रात्रभर माझ्याशी हितगुज करुन जीवलगाच्या मृगजळी भेटीचा सुखानंद देणारा हा ' रातवा '! अशा या दोघांचे आभार मानून ऋतुचक्रानुसार येणाऱ्या प्रत्येक पावसाळयात या दोघांची मला अशीच साथ मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करित असताना पहाटे पहाटे साखर झोपेसाठी माझा डोळा कधी लागला हे मला कळलंच नाही.
विमल प्रकाश पाटकरी
देवपूर,धुळे
मो.नंबर- 9028055911

