प्रितझुल्यावर झुलतांना.....
प्रितझुल्यावर झुलतांना.....
*प्रितझुल्यावर झुलतांना.....*
अत्यंत अल्पपरिचीत असलेल्या आम्हा दोन जिवांच्या रेशीम गाठीचा मंगलमय विवाहसोहळा आटोपून घरातील साऱ्या मंडळींसह आम्ही दोघं ही घराकडे निघालोत थोड्याच वेळात घर आलं. मी उंबरठ्यावरील माप ओलांडल्यावर आम्ही दोघं घरात आलो. गृहप्रवेशानंतर मांडवातील आम्हा दोघांच्या आंघोळीचा कार्यकम आटोपल्यानंतर रीतिरिवाजानुसार पुढील विधी सुरु झालेत.हळदी नंतर आम्हा दोघांच्या हाताला बांधलेली काकणं आम्ही एकमेकांनी सोडून ती कोणीतरी पाण्यात टाकल्यावर आम्ही ती शोधायचीत असा खेळ सुरु झाल्यावर हाताला एकमेकांचा होणारा स्पर्श खुपच सुखद अन प्रेमळ वाटत असतांना असे विधी वर-वधूंना जवळीकतेची अनुभुती यावी म्हणूनच केले जात असतील असा विचार माझ्या मनात आला. यानंतर श्री सत्यनारायणाची पुजा,कुलदेवतेला जाणं हे सारं आटोपल्यावर आमच्या सुखी संसाराला सुरुवात झाली अन मग घरातील साऱ्यांची नजर चुकवून लाज लाजून चोरट्या नजरेनं एकमेकांकडे पाहत आमच्या प्रेमाला सुरुवात झाली.या प्रेमाला एकांत मिळावा म्हणून घरातील वडिलमंडळी काहीतरी कामा निमित्त घराबाहेर पडू लागलीत.
पाहता पाहता माझ्या सख्यानं विवाहासाठी घेतलेली सुटी संपत आली.तो शिक्षक असल्यानं शाळेत हजर होण्यासाठी निघत असतांना आम्हा दोघांचा चेहरा गोरामोरा झाला.अशातच आम्हा दोघांची प्रणयरुपी नजरभेटही झाली पण नाइलाजास्तव त्याला घराबाहेर पडावं लागलं.दिवसभरात तो घरी येण्याची मी वाट मी पाहू लागले.सायंकाळी तो घरी आल्यावर चहापाण्या नंतर रात्रीचा स्वयंपाक लगबगीनं करुन साऱ्यांची जेवणं आटोपल्यावर झोपेची वेळ होत आल्यामुळे आम्हा दोघांच्या होत असलेल्या खाणाखुणा घरातील व्यक्तींच्या लक्षात आल्यानं तेही सोयीनुसार आपापल्या रुम मध्ये निघालेत.
अशाप्रकारे दिवसामागून दिवस जात असतांना आम्ही आठवड्यातून दोन दिवस बाहेर फिरायला तर कधी चित्रपट बघायला जावू लागलोत.कधी काही कामानिमित्त मी बाहेर जाण्यासाठी नकार दिला तर "अगं विला,असं का करतेस ? चल ना जावू या ना फिरायला.तू आली नाहीस अन मी एकटाच गेलो तर
" काजवे वरुन जातांना खुणावतेय नदी
मला एकटाच पाहून हसेल गं फिदीफिदी !! "
अशी माझ्यासाठी प्रेमरसाची शीघ्रकविता करुन तो म्हणाला, " समजलय का ?चल ना मग आतातरी जावू की फिरायला " अन मग माझ्यासाठी केलेली अशी प्रेमाची गुलकंदीय कविता ऐकून मी छानपैकी तयार होवून आम्ही फिरायला जाण्यासाठी निघालो.
आम्ही आमचं असं आनंदी जीवन जगत असतांना योगायोगानं मलाही एका शाळेत प्राथमिक शिक्षिकेची नोकरी मिळाली.माझ्या सख्याच्या शाळेच्या वाटेवरच माझी शाळा असल्यानं आम्ही दोघं सोबतच घराबाहेर पडत असत.मला माझ्या शाळेत सोडल्यानंतर तो त्याच्या शाळेत जाई.अन मग शाळा सुटल्यानंतरही आम्ही सोबतच घरी येत असत.अशा या अधीक जवळीकतेमुळे आमच्या प्रेमाचा रंग अधिकच गडद होवू लागला अन मग या प्रेमाच्या जोडीला आम्हा दोघांच्या विश्वासाची भक्कम अशी साथही मिळाली.अशातच आम्हा दोघांचा पेशाही एकच असल्यामुळे शहरातील सर्व शाळांमधील शिक्षकांसाठी होत असलेली गटसंमेलनं,विविध प्रशिक्षणं तर कधी विद्यार्थ्यांसाठीच्या विविध आंतरशालेय स्पर्धांच्या निमीत्तानं सर्वच शाळांमधील शिक्षक नियोजीत स्थळी आल्यावर तिथं ही आम्ही दोघं भेटल्याचा आनंद काही औरच वाटत असे. शिक्षकांना ' गीतमंचच्या गाण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी माझ्या शाळेतर्फे माझी तर माझ्या सख्याच्या शाळेतर्फे त्याची निवड करण्यात आलेली असल्यानं प्रशिक्षणावेळी आम्ही जोडीनं गीतमंचाची गाणी सादर करीत असतांनाही आम्हाला प्रीतिच्या झुळ झुळ पाण्याचा सहवास लाभल्याचा आनंद होत असे. सांस्कृतिक स्पर्ध्येच्यावेळी तर संगितसाथ देतांना माझा सखा वाजवत असलेल्या ढोलकिच्या तालावर मी गाणी गात असतांना जणू संगीत हा आम्हा दोघांचा श्वास असून रंगमंचावरील आमची ही साथ हेच आमचं संगितमय जीवन असल्याचा सुखद असा अनुभव येत असे.
आमचं असं प्रीत संगितमय मजेशीरआनंदी जीवन जगत असतांना जवळ जवळ दीड ते दोन वर्षा नंतर आम्ही आमची संसारबाग फुलवण्यासाठी सज्ज झालोत अन मग काहीशा ठरावीक ठरावीक अंतरांनी आमच्या संसारबागेत साजिरी,गोजिरी अशी तीन फुले उमललीत.या फुलांच्या सुखानंदी सहवासात,कौतुकात,पालन पोषणात आम्ही पुर्णत: रममाण झालोत.पाहता पाहता आमची तिनही मुलं मोठी झालीत.उच्च शिक्षीत होवून उच्च पदावर कार्यरत झालीत अन विवाहबंधनानं सहकुटुंब संसारात रमलीत.
नेमेची येतो पावसाळा ! या उक्ती नुसार याही फेब्रुवारी महिन्यात गार गुलाबी थंडी सोबत प्रेमाचे वारे ही वाहू लागलेत.जवळ जवळ आठ ते दहा दिवसांपासून दूरदर्शनवरील विविध मालिकांद्वारेही ' प्रेम आठवडा ' साजरा होत असल्याचं पाहून मधूर अशा प्रेमाच्या आठवणींनी माझ्याही मनाला प्रीत गुदगुल्या होवू लागल्यात.माझ्या सख्याच्या रिमझिम अशा प्रेमाच्या आठवणींनी मी चिंबचिंब भिजू लागले.सख्याच्या गुलकंदी प्रेमाचा खूप असा सहवास लाभल्यामुळेच त्याच्या प्रितरंगी आठवणी मला सतत खुणावीत असल्यानं माझं मन आजही त्याच्या प्रेमातच गुंतलेलं असतं.संसारसागरातील लाटा कधी मनाला अलगद प्रीत स्पर्शाची साद घालतात तर कधी जोरांनं उफाळून मनाच्या किनाऱ्यांवर आदळतात. कारण कोणाचीही सहज दृष्ट लागण्याजोगी आम्हा राजाराणीच्या विमल अशा प्रकाशाची स्वच्छंदी संसार नौका आम्ही प्रतिकूल परिस्थितीतही आनंदानं वल्हवत असतांना संसारसागरात अचानक आलेल्या वादळानं डगमगली. दुर्दैवानं नौकेमधील राजा उफाळलेल्या सागरात हरवला... अन त्याची गोड मधूर वाणी ही सागरी लाटांमध्ये पार विरुन गेली.... क्षणार्धातच होत्याचं नव्हतं झाल.....
प्रेमळ अशा जीवलगाची प्रीत संगतच हरवल्यानं मला हे जीवन जगणं अत्यंत असह्य झालं.पण ' ठेविले अनंते तैसेची रहावे ' या उक्तिला स्मरुन सख्याच्या प्रेमळ आठवणींच्या प्रीत झुल्यावर झुलत झुलत मी जीवन जगू लागले.सर्व नाती गोती,सण समारंभ,विवाह तसेच इतर कार्य नाईलाजानं एकटीच सांभाळू लागली.
एकेठिकाणी मी साखरपुडा सोहळ्यासाठी गेले असतांना सोहळ्यानंतर आम्ही साऱ्या स्रीया जेवायला बसलो अन अवघ्या काही मिनिटात या सोहळ्यासाठी आलेले एक गृहस्थ माझ्याजवळ आलेत अन " आपण पाटकरी ?" मी " हो " म्हटल्यावर माझ्या चेहऱ्यावरील अनोळखी भाव पाहून त्यांनी समोरच असलेल्या माझ्या पुतण्याच्या घराकडे बोट दाखवत " मी या घराच्या पाटीवर असलेलं आडनाव वाचलं अन मला माझ्या गुरुंची आठवण झाली. तुमच्याच कॉलनितील माझ्याजवळ बसलेल्या व्यक्तीला मी विचारलं ' हे पाटकरी सरांचं घर का ? ' यावर ते म्हणाले ' नाही.हे त्यांच्या पुतण्याचं घर आहे.त्यांचं घर पुढल्या गल्लीत माझ्या घराजवळ आहे.पण ते सर आता हयात नाहीत.गेलेत ते देवाघरी. ' हे ऐकतांना मी हळहळलो.मला खूप खूप वाईट वाटलं.एवढ्यात तुम्हीही मांडवात आल्यात अन मग त्यांनी मला तुमचा सारा परिचय सांगितला. मी सरांचा विद्यार्थी. सर खुपच प्रेमळ अन आम्हा साऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेणारे होते.त्यांचं अध्यापन खुपच छान असून प्रभावी असल्यानं आजही ते माझ्या हृदयात आहेत.ते स्वत: सुंदर अशा कविता करीत. आम्हाला म्हणून दाखवित अन आमच्याकडून म्हणून सुद्धा घेत.त्यावेळी त्यांनी भारतमातेसाठी केलेली पोवाडा प्रकारातील कविता माझी अजुनही तोंडपाठ आहे.मी शिक्षक झाल्यावर सरांच्या त्या कवितेचा उपक्रम शहरातील सर्व शाळांमध्ये राबवला. " हे सारं ऐकत असतांना माझं जेवण थांबल्याच्ं अन डोळ्यांमधून अश्रू ओघळत असल्याचं लक्षात येताच त्यांनी माझं सांत्वन केलं. ' गुरुमाऊली ' म्हणत वाकून मला नमस्कार ही केला.नंतर मी त्यांना " घरी या आपण " म्हटल्यावर " हो हो येतो मी घरी.कारण घरी आल्यावर मला माझ्या गुरुंचा फोटो तरी बघायला मिळेल.गुरुंच्या फोटोला वंदन करण्यासाठी मी नक्कीच घरी येईन " " हो या नक्की या घरी " असं म्हणत मी घरी आले.अशाच प्रकारे प्रसंगानुरुप भेटलेल्या काही विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या सरांचं एकमेकांवर असलेलं प्रेम आठवून माझा उर भरून आल्यानं प्रेम हे फक्त प्रियकर-प्रेयसी,पती-पत्नी या नात्यांसाठीच मर्यादीत नसून ते सर्वच नात्यांशी घट्ट असतं.विविध नात्यांमधील भावनेनुसार प्रेमाच्या रंगछ्टा या रंग भरत असतात.विविध रंगछटांनी प्रेमरंग प्रत्येकाचं मन, जीवन खुलवीत असतो.आम्हा दोघांचं एकमेकांवर जीवापाड असं गुलकंदी प्रेम असल्यानं माझ्या सख्याच्या आठवणींच्या प्रीत झुल्यावर जीवन झुलत असतांना फक्त प्रेमदिनीच नाही तर आयुष्यभर माझ्या सख्याला मी मनाच्या मृगजळी सदैवच भेटत राहीन.

