Vimal Patkari

Abstract Classics

3  

Vimal Patkari

Abstract Classics

छान माझं ' सुंदर ' गाव !

छान माझं ' सुंदर ' गाव !

7 mins
14


छान माझं ' सुंदर ' गाव !


    वाफाळलेल्या चहाचा कप हातात घेऊन मी घराच्या पुढील बागेतील झुल्यावर जावून बसले. चहाच्या एका एका घोटाचा आस्वाद घेत असतांना माझे गाव,गावातील गोतावळा,हिरवंगार शेतशिवार, भाज्यांचे वाफे अन फुलाफळांच्या बागा असं सारं काही आठवत असतांना कपातला चहा कधी संपला हे कळलंच नाही.काही क्षणात चहा संपल्याचं लक्षात येताच मी उठून जवळच असलेल्या टीपॉयवर चहाचा कप ठेवून परत झुल्यावर बसले अन क्षणातच माझ्या ' सुंदर ' गावातील आठवणीत रमले.

     माझं गाव तसं खेडंच पण खूप मोठं. या गावात साऱ्याच समाजातील लोक रहात असत.सारे आपापल्या कामात व्यस्त असत.यातील काही कुशल कारागीर व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल गावापासून काही अंतरावर असलेल्या शहरातून आणून रोजच्या जीवनातील जिवनोपयोगी वस्तू गावातच अत्यंत आकर्षकरित्या तयार करत असल्यानं आठवडे बाजाराच्या दिवशी माझ्या गावाच्या बाजाराला शहरी बाजारपेठेचं स्वरुप येत असे.

    गावातील सारेच लोक मिळून मिसळून तसंच आपुलकीनं वागत असल्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीतील सारे सण,उत्सवही एकत्रितपणे साजरे होत असत. मराठी वर्षाची सुरुवातच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी गाववेशिच्या प्रवेशद्वारावर प्रतिवर्षी आळीपाळीने एका एका कुटुंबातील जोडप्याच्या हस्ते गुढी उभारून होत असे.या गुढीच्या उभारणी नंतर मग सर्वजण आपापल्या घरावर गुढी उभारत असत.अशा या नवचैतन्यमयी गोड पाडव्यानंतर पुढल्याच महिन्यात येणारा अक्षयतृतिया हा सणही मोठ्या उत्साहानं साजरा केला जाई.खास अक्षयतृतियेसाठी सासरहून माहेरी आलेल्या माहेरवाशिणिंसाठी शेतात असलेल्या आमराइतील आंब्याच्या झाडाला झोके बांधून त्यावर गौराइची गाणी म्हणत या माहेरवाशिणी मनमुरादपणे झोका खेळण्याचा आनंद लुटत असत. हे दृष्य पाहून प्रत्येक आईवडिलांना खुपच समाधान वाटत असे.आंब्यांची रेलचेल असल्यामुळे आंब्याचा सिझन असेपर्यंत गावातील नात्यागोत्यातील लोक आळीपाळीनं एकमेकांकडे आमरस अन पुरणपोळीच्या अमृतमय भोजनाचा आस्वाद घेत असत. हे सारं करित असतांना लोकांमधे कोणत्याही प्रकारे हेवा-दावा,राग-द्वेष किंवा भेदभाव नसून सारं काही एकोप्यानं सुरू असायचं.

     पुढे वटपौर्णिमा या सणाच्या दिवशी आमच्या शेतातील वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी नऊवारी साडी,नाकात नथ, कपाळावर ठसठशीत कुंकू,हातात काचेच्या बांगड्या अन केसात फुलांच्या वेण्या अशा मराठमोळ्या सौंदर्यानं नटून थटून आलेल्या माझ्या साऱ्या सुवासिनी भगिनी खुपच सुंदर दिसत असत.आम्ही साऱ्या सुवासिनींनी वटवृक्षाची पूजा केल्यावर तिथं असलेल्या नात्यातील मानापानाच्या स्रीयांना नमस्कार करुन मग आम्ही घराकडे जात असत. हा सण साजरा झाल्यावर पुढल्याच महिन्यात आषाढी एकादशी निमीत्त गावातील काही भक्तमंडळी पायी पायी पंढरीच्या वारी साठी निघाली असता त्यांच्या डोक्यावरील छोट्याशा तुळशीवृंदावनातील तुळशीची पुजा करून,फुलं वाहून गावातील सारी जनता या दिंडीला गाववेशी पर्यंत सोडायला जात असे अन मग दिंडी परत आल्यावर आम्ही त्यांचा नमस्कार करुन त्यांनी आणलेला विठ्ठलाचा प्रसाद घेत असत.याच वेळी पावसाच्या रिमझिम सरी सुरू असतांना काही दिवसांनीच सणांचा मेळा घेवून आलेला श्रावण महिना सुरु झाल्यावर श्रावण सणांची मौजमजा तर काही औरच येत असे.या साऱ्या सणांची मज्जा अनुभवल्यावर मग श्रावण आमावस्येला शेतकऱ्यांच्या आनंदाचा अन आवडता सरजा राजाचा सण म्हणजे ' बैलपोळा ' या दिवशी बैलांना नदीवर नेऊन,त्यांची आंघोळ घालून,बाशिंगं रंगवून,अंगावर झूल टाकून, सायंकाळी त्यांची पूजा करुन, सन्मानानं पुरणपोळीचं जेवण खावू घालून,त्यांची सेवा करुन अन त्यांना पोळ्यात मिरवून बैलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली जात असे.

     या नंतर गावात होणारे सार्वजनिक गणेशोत्सव अन नवरात्री उत्सव ही खुपच उत्तम प्रकारे साजरे होत असत.या उत्सवात लहान मोठ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यात सारे लोक तल्लीन होऊन कलाकारांचं कौतकंही करत असत.असे हे सारे सण साजरे होत असतांना साऱ्या गावात आपले राष्ट्रीय सणही अतिशय उत्साहानं साजरे होत असत.शाळेच्या आवारात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर वैयक्तिक,सामुहीक देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणानंतर शाळेच्या आवारातच हलवायाकडून तयार करण्यात येत असलेल्या गरमा गरम गुळाच्या जिलेबिचा आस्वाद घेण्याचा आनंद गावातील साऱ्यांनाच मिळत असे.

      ऐन सुगिच्या दिवसात शेतीची सारी कामं करूनही दिवाळीतील पाच दिवसांचे सण ही रुढी परंपरेनुसार अत्यंत आनंद अन उत्साहानं साजरे केले जात असत.

      हे सारं काही छान सुरळीत सुरु असून माझ्या एवढ्या मोठ्या गावात साक्षरतेचं प्रमाण फारच कमी असल्याची खंत सतत माझ्या मनाला सतावत असे.

गावात फक्त चार ते पाच कुटुंबातीलच काही सदस्य साक्षर होते.त्यात माझ्या कुटुंबातील माझे पती गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या शहरातील एका खाजगी अनुदानीत शाळेत शिक्षक असून मी माझ्या गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका पदावर कार्यरत होते.या प्रमाणे इतर कुटुंबंही नोकरी निमित्तानं बाहेरगावी असायचीत.गावातील लोकांना शिक्षणाचं महत्व नसून शेतीची कामंच महत्वाची वाटत असत.मी रोज सकाळी शाळेत गेले असता शाळा सुरु होते वेळी पन्नास ते साठ विद्यार्थी मधल्या सुट्टी नंतर पंचवीस ते तीस विद्यार्थी अन शाळा सुटेपर्यंत शाळेत जेमतेम दहा ते बारा विद्यार्थ्यांचीच उपस्थिती रहात असे.हा अनुभव रोजच अनुभवून आम्हा शिक्षकांना खूप वाईट वाटत असे.पण आम्ही करणार तरी काय ? कारण एवढ्या मोठ्या गावात शिक्षणाचा बदल घडवून आणण्याचं काम आम्हा एकट्या दुकट्या कडून होणारं नसून त्यासाठी गावातील साऱ्यांचीच साथ हवी असं आम्हाला मागील अनुभवावरुन वाटत असे.

     एकदा साक्षरता सर्वेक्षणाचं परिपत्रक गावातील आमच्या शाळेला प्राप्त झालं असता दुसऱ्या दिवशी ते परिपत्रक मुख्याध्यापकांनी आम्हा साऱ्या शिक्षकांना वाचण्यास देवून त्यावर आमची स्वाक्षरी घेवून दुसऱ्या दिवसापासून शाळेचं कामकाज आटोपल्यानंतर गावातील साक्षरता सर्वे करण्यासंबंधिच्या आवश्यक सुचना आम्हाला दिल्यात.त्यानुसार आम्ही शाळा सुटल्यावर सर्वेसाठी गावात गेलो असता आम्ही प्रत्येकानं एक एक गल्ली वाटून घेतली.सर्वे करतांना निरक्षरतेमुळे लोकांचं अज्ञान आमच्या लक्षात येवू लागलं.आम्ही विचारीत असलेली माहिती आम्हाला कुणीही नीट सांगत नव्हतं. तर "यापासून आम्हाला काय फायदा होणार आहे ? गॅस मिळणार का ? की सरकार नोकरी देणार आहे आम्हाला ? " असे अनेक प्रश्न आम्हाला विचारण्यात येवू लागले असता " अहो,दादा,काका,ताई,मावशी हे बघा आपल्या गावातील अनेक लोकं शिकलेले नाहीत मग साऱ्यांनीच शिकलं पाहिजे म्हणून शासनाकडून हा सर्वे केला जात आहे बघा." असं सांगितल्यावर " पण आत्ता आम्ही काय आणि कसं शिकणार ? आमचं काय वय आहे आता शिकायचं ? चला या तुम्ही.आम्हाला शेतावर जायचंय कामासाठी." असं म्हणत हे लोक चालायला लागल्यावर त्यांना थांबवत " अहो दादा,शिक्षणासाठी काही वयाचं बंधन नसतं बघा.तर आता तुम्हालाही शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था सरकारनं केलेली आहे बरं का." असं आम्ही त्यांना सांगितल्यावर ते " हो हो " म्हणत शेताची वाट चालत असत.

     अशा प्रकारे दोन तीन दिवस सर्वे करुन झाल्यावर एके दिवशी मी सर्वे करीत असलेल्या गल्लीतील घराच्या पाच सहा घरांच्या पलीकडील घरातील मावशींचा मोठमोठ्यानं रडण्याचा आवाज आला त्याबरोबर आजु बाजुच्या घरातील स्रीयांही तिथं आल्यावर त्या मावशी अधिक मोठ्यानं रडू लागल्या असता मी ही तिथं गेले.त्यांना शांत करण्याचा प्रयत्न आम्ही साऱ्यांनीच केला.पण त्यांचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. रडताना त्या मधून मधून " माझा मुलगा मला काही दिवसांपूर्वीच तर भेटून गेला.त्याचं तर काही बरंं वाईट तर झालं नसेल ना "असं म्हणत असतांना " अहो मावशी,काय झालय ते तर सांगा आधी " असं मी म्हटल्यावर " यांच्याकडे पोस्टमन आताच अर्धपत्र देवून गेलाय ताई. म्हणून या रडताय " असं तेथील एका स्रीनं सांगितल्यावर " अन कुठं गेलाय यांचा मुलगा ?" 

" तो तीन वर्षापासून सैन्य दलात भरती झालेला आहे ताई." असं या भगिनीचं बोलणं ऐकल्यावर " अहो मावशी,अशा रडू नका ना मग तुम्ही.काय लिहिलंय पत्रात ? कुणी वाचलं तरी का ते ? दाखवा बरं मला ते पत्र. " असं मी म्हणताच एका ताईंनी ते पत्र माझ्या हातात दिलं.अन मावशी परत मोठ्यानं रडू लागल्या.मी पत्र वाचलं अन मावशींना रडणं थांबवायला सांगितलं.तरिही त्या " ताई काय लिहिलंय त्यात ?माझा मुलगा ठीक आहे ना ? "असं म्हणत त्यांनी परत रडणं सुरु केल्यावर मग मी मात्र रागावून अन मोठ्यानं " मावशी,जरा थांबा.तुम्ही हे पत्र कोणाकडूनही वाचून न घेता अशा रडायलाच का लागल्यात ? "

" ताई, हे अर्ध पत्र आहे ना म्हणून माझ्या मुलाचं काही झालं की काय असं मला वाटल्यामुळे मी रडतेय ताई " हे ऐकून " मावशी... मावशी... असं बरं वाईट काहीच झालेलं नाही बरं का.अन् तुम्हाला कोणी सांगितलं की अर्ध पत्र हे मरणाच्या मजकुराच असतं असं.अहो,तुमच्या मुलानं तर मागील महिन्यात झालेल्या ' कारगील ' युद्धात खुपच महत्वाची अन मोलाची अशी चांगली कामगिरी केल्याबद्दल तेथील लष्कर प्रमुखांनी तुमच्या मुलाचं कौतुक करण्यासाठी ही अभिनंदनाची पत्रिका तुम्हाला पाठवलीय मावशी. किती छान मजकूर लिहिलाय यात ! अन तुम्ही हे कुणाकडूनही वाचून न घेता रडायलाच लागल्यात." 

    असं माझं बोलणं ऐकून " असं का ताई " म्हणत मावशी उठल्या. त्यांनी डोळे पुसलेत अन घरात जावून साखरेचा डबा आणला.जमलेल्या साऱ्यांना साखर वाटली.साऱ्यांसह मलाही आनंद झाला.पण क्षणातच या निरक्षरतेच्या अज्ञान अंध:कारानं माझ्या मनाचा ताबा घेतल्यावर मी " येते मावशी " असं म्हणत तेथून निघाले.

     माझे सहकारी शिक्षक बंधू-भगिनी नुकतेच शाळेत पोहोचले असतांना मी ही शाळेत आले.मी अनुभवलेला प्रसंग थोडक्यात या साऱ्यांना सांगितला.खूप उशीर झालेला असल्यामुळे इतर शिक्षक शाळेपासून बऱ्याच अंतरावर असलेल्या त्यांच्या गावी परतीच्या प्रवासाला निघालेत अन मी ही माझ्या घरी गेले.

       निरक्षरतेच्या अज्ञानामुळे घडलेल्या आजच्या या प्रसंगानं रात्रभर माझ्या मनात काहूर माजवला.दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर आम्ही सर्व शिक्षकांनी घडलेला हा प्रसंग मुख्याध्यापकांना सांगून आपल्या गावात निरक्षरतेचं प्रमाण अधिक असून या अज्ञानामुळे लोकांना त्यांचे आनंदाचे क्षणही सुखानं अनुभवता येत नाहीत.तर यापुढं असं होवू नये म्हणून आपल्या गावातील सर्वांनाच साक्षरतेचं महत्व पटवून देणं खुपच आवश्यक आहे. त्यासाठी आपण साक्षरता अभियानाच्या प्रमुख अन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आपल्या गावात साक्षरतेची जनजागृती करण्याची विनंती करण्याविषयी सांगितल्यावर आमचं हे म्हणणं आमच्या मुख्यांनाही पटलं.

मग दोन-तीन दिवसानंतर ते साक्षरता अभियानाचं कामकाज सुरु असलेल्या शहरातील ऑफीसला गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांशी गावातील निरक्षरतेबद्दल चिंता व्यक्त करतांना "लोकांमधील अज्ञान अंध:कार दूर करण्यासाठी गावागावात साक्षरतेचे महत्व सांगून जनजागृती केली तरच सारी जनता साक्षर होवून महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची साक्षरतेविषयी असलेली तळमळ पुर्ण होवून शासन राबवत असलेलं अभियानही खऱ्या अर्थांन सार्थ ठरेल. " अशा प्रकारे चर्चा केल्यानंतर अधिकारी ही आमच्या गावात जनजागृतीसाठी येणार असल्याचं सांगून त्यांनी गावात येवून वर्षातून तीन ते चार वेळा जनजागृती करुन साक्षरतेचं महत्व लोकांना पटवून दिल्यामुळे माझ्या गावातील प्रत्येक व्यक्ती साक्षरता वर्गात जावून शिकू लागली अन त्याचप्रमाणे कुटुंबातील मुलांना दररोज शाळेत पाठवून त्यांच्या शिक्षणाकडे लक्षही देवू लागली. म्हणुन तर आज माझं गाव साक्षर झालेलं पाहून तसच सारी मुलं शिक्षण घेत असतांना पाहून मला माझ्या गावाचा सार्थ अभिमान वाटतो.

    अशा या माझ्या ' सुंदर ' गावाच्या अभिमानात मी दंग असतानाच 

" आज्जी आज्जी.. चल ना आपण खेळू या ना आता .चल ना गं लवकर खेळायला "असं म्हणत माझा हात ओढत माझी नात मला झुल्यावरुन उठवू लागल्यावर मी झुल्यावरुन उठले अन नातिशी खेळू लागले.



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract