Vimal Patkari

Children Stories Inspirational

3  

Vimal Patkari

Children Stories Inspirational

माझी शाळा आणि माझे विद्यार्थी

माझी शाळा आणि माझे विद्यार्थी

6 mins
172


  आज गुरुपौर्णिमा. सकाळी उठल्यापासूनच माझ्या मनाला एक वेगळीच हुरहूर लागली असल्यानं मला सारखी माझ्या विद्यार्थ्यांची आठवण येवू लागली अन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतांनाचा माझ्या शिक्षणसेवेतील बत्तीस वर्षांचा काळ आजही मला अगदी जसाच्या तसा आठवू लागला.विशेष महत्वाचं म्हणजे प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या इवल्या इवल्या हातांनी नमस्कारासाठी माझ्या पायांना झालेला स्पर्श आज पायांनाच नाही तर माझ्या अंतरमनालाही मोरपिसी अशा अविस्मरणीय स्पर्शाची अनुभूती देवू लागला. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील तो निरागस भाव,त्यांचं गोड असं स्मित हास्य अन माझ्या नमस्कारासाठी सुरू असलेली त्यांची रांगेतली धडपड हे सारं काही माझ्या ह्रदयाला आर्त साद घालीत असतांना विद्यार्थ्यांशी असलेल्या गुरु-शिष्य नात्याबरोबरच जिव्हाळ्याचं,आपुलकीचं असं स्नेहमयी नातं निर्माण झालेलं असल्यानं माझं मन आनंदानं भरुन आलं. माझे विद्यार्थी अतिशय ज्ञानवंत,गुणवंत,चौकस,जिज्ञासु आणि बुद्धिवंत असल्यामुळे त्यांना यशवंत,किर्तीवंत होत असतांना पाहून मला खुप छान वाटतंय.माझ्या सार्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर,काही इंजिनिअर,काही वकील,काही शिक्षक-प्राध्यापक, काही विविध क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तर काही विद्यार्थीत्यांच्या कुटुंबांच्या आर्थीक परिस्थितीनुसार व्यावसायिक तर काही मिळेल ते काम आनंदानं करणारे कामगारही होवून सुख समाधानानं आणि आनंदानं जीवन जगत असल्याचं पाहून मला माझ्या सार्याच विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतोय.यातील एखादा विद्यार्थी कुठंतरी योगायोगानं भेटला तर वाकून नमस्कार करुन गोड असं संभाषण केल्याविना जात नाही.अन मग त्यावेळी माझ्या सेवचं सार्थक झाल्याचं वाटून मी मनोमन खूपच सुखावते. खरं सांगायचं तर मला माझ्या काही अशा विद्यार्थ्यांचाही खूप अभिमान वाटतो की,जे रिक्षा चालक अन मालक ही आहेत.कधी कधी त्यांच्या रिक्षात बसण्याचा योग आलाच तर ते स्वतःच 

" बाई,तुम्ही कशा आहात? तब्ब्येत ठीक आहे ना ?तुम्ही रे.ग.माळी शाळेत शिक्षिका आहात ना "

" अरे, हो.तू ओळखलस तर मला."

" अहो बाई, मी तुषार.तुमचा विद्यार्थी मी "

" अरे, हो.हो.तुषार गोसावी का रे तू "

" हो बाई "

" अरे, मग पुढे शिकला नाहीस का तू ?"

" नाही ना बाई.माझ्या घरची आर्थीक बाजू चांगली नसल्यामुळे मी बारावी पर्यंत शिकून माझं शिक्षण थांबवलं आणि आता माझी ही स्वतःची रिक्षा चालवतोय मी." 

" अरे,छान आहे की मग आणि हे बघ,काम करतांना या आपल्या कामाबद्दल कमीपणा कधीच वाटून घ्यायचा नाही. बरं का ? "

" नाही बाई.मी माझं हे काम आनंदानं करतो."

असं आमचं बोलणं सुरू असतांनाच प्रवास संपल्याचं आमच्या लक्षातही आलं नाही.अन मग रिक्षेतून उतरल्यावर तो नाही नाही म्हणत असतांना मी त्याच्या शर्टच्या खिशात रिक्षेच्या प्रवासाचे पैसे ठेवून त्याला घरात येण्याचं सांगितल्यावर 

" नाही बाई.आता मुलांची शाळा सुटण्याची वेळ झालीय.मला मुलांना प्रत्येकाच्या घरी पोचवायचं आहे.परत कधीतरी येईल मी. काळजी घ्या बाई स्वतःची.येतो मी. "

  तुषारला बाय करुन मी घरात आल्यावर " काळजी घ्या बाई स्वतःची " त्याच्या या  आपुलकीच्या वाक्यानं माझ्या ह्रदय स्पंदनांनाही खूप सारं समाधान लाभल्याची अनुभूती आल्यानं माझ्या मनातील गुरु-शिष्य नात्याच्या आनंदात अधिकच भर पडून सेवाकालातील माझ्या विद्यार्थ्यांचा हा सहवास अनेक प्रसंग,घटना,गमती जमती सारं काही जणू कथा रुपानं माझ्या मन:पटलावर कायमस्वरुपी साकारल्या.

    देवपूर धुळे येथील महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे ' श्रीमती रे.ग. माळी प्राथमिक विद्यामंदीर ' या शाळेत उपशिक्षिका या पदावर माझी नेमणूक झाल्यावर मला इयत्ता तिसरी 'ब ' चा वर्ग मिळाला.पुढील वर्षी तोच वर्ग मला मिळा ल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इच्छूक विद्यार्थ्यांच्या अध्यापनाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली.त्यावेळी ही परिक्षा इयत्ता चौथी व सातवीच्या विध्यार्थ्यांसाठी होत असे.माझ्या शाळेत शिक्षकांच्या वर्गवाटणी साठी साखळी पद्धतीचा ( साखळी पद्धत म्हणजे इ.1ली ते 4थी किंवा शाळेतील वरच्या वर्गा पर्यंत एकाच शिक्षकाकडे तो वर्ग असणे.)अवलंब केलेला असल्यामुळे अशा प्रकारे पुढेही माझ्या सेवेत जवळ जवळ सहा ते सात वेळा मला शिष्यवृत्ती वर्गाचे अध्यापन करावं लागलं असता माझ्या शाळेचे कधी एक,कधी दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले तर कधी एकही विद्यार्थी न आल्याचाही अनुभव मला आला. नंतर एकदा माझ्याकडे चौथीचा वर्ग आल्यावर " विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी अधीक वेळ मिळावा म्हणून दररोज दुपारी चार ते सहा या वेळात शिष्यवृत्ती वर्गाच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करुन आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील असा प्रयत्न करावा." अशा आशयाचा मुख्यांनी मला दिलेला लेखी आदेश वाचून जणू हे आव्हानच असल्याचं वाटल्यामुळे माझ्या मनानंही ते स्विकारलं अन मग

दोन दिवसांनी शाळेतील इ.चौथीच्या अ,ब,क,ड अशा चारही वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेसाठी निवडचाचणी घेवून त्यात पात्र असलेल्या पंचवीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परिक्षेसाठी अध्यापन करायचे असं निश्चीत झाल्यावर मग याबाबत पालकांनाही सांगून एक जुलैपासून या वर्गाच्या अध्यापनाला मी सुरुवात केली. 

    सकाळी 7.20 ला शाळेत येवून दुपारी 12.30ला शाळा सुटल्यावर घरी जावून परत 4 ते 6या वेळेत या वर्गासाठी शाळेत येणं असा माझा आणि माझ्या विद्यार्थ्यांचा दिनक्रम सुरूझाला.

माझ्या शाळेतील इ.चौथीच्या चारही वर्गातील विद्यार्थी अतिशय हुशार असल्यामुळं त्यांना शिकवतांना मलाही खूप हुरुप येई.त्यावेळी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होत असल्यामुळे मी जवळ जवळ चार ते पाच महिन्या नंतर या पंचवीस विद्यार्थ्यां मधील अत्यंत हुशार अशा पाच ते सहा विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांच्या अध्यापनासाठी परत अधिक वेळ द्यावा असा निर्णय घेवून विद्यार्थ्यांच्या पालकांना या विषयी सांगितल्यावर त्यांना आनंद झाला.त्यांनीही मला यासाठी होकार दिला. अन मग दुसर्या दिवसापासून या सर्व विद्यार्थ्यांच्या वर्गाला चार ते सहा या वेळात अध्यापन केल्यानंतर शाळेपासून जवळच असलेल्या एका विद्यार्थ्याच्या घरी परत मी या निवडक सहा विद्यार्थ्यांना सायंकाळी सहा ते आठ या वेळात अध्यापन करु लागले.रात्री बरोबर आठ वाजेला या विद्यार्थ्यांचे पालक मुलांना नेण्यासाठी आले असता " बाई, आमच्या आई,वडिलांना थांबू द्या बाहेरच. थांबतील ते बाहेर.पण आपलं शिकवणं थांबवू नका बाई " असं मला विद्यार्थी म्हटल्यावर " अरे बाळांनो,घरी गेल्यावर मला अजून स्वयंपाक करायचा असतो. हा राहिलेला भाग आपण उद्या शिकू या." असं मला त्यांना सांगावं लागत असे अन मग घरी गेल्यावर माझ्या मुलांचं बोलणं ऐकून,त्यांचा राग ही सहन करावा लागत असे.पण मुख्यांनी केलेलं आव्हान स्विकारून ते पूर्ण करण्याच्या माझ्या ध्येयामुळे मी या अशा इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असे.अशा प्रकारे परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करून या सर्वच विद्यार्थ्यांकडून अनेक प्रश्नसंच सोडवून घेण्याचा खूप सराव ही मी करुन घेतला.बराच सराव करुन झाल्यावर मग ठरल्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा झाली.

    पुढे दोन ते तीन महिन्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. लवकरच निकालाचा दिवस उजाडला.आम्ही शाळेचा निकाल घेण्यासाठी निकालस्थळी गेलो असता तिथं एक फार मोठी गंमत झाली.तेथील फलकावर लावण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत दुसर्या,चौथ्या अन अठराव्या क्रमांकावर माझ्या शाळेच्या नावापुढे माझ्या विद्यार्थ्यांची नावं होती.हे पाहून प्रतिवर्षी गुणवत्ता यादीत येत असलेल्या एक ते पाच क्रमांकावर असणार्या एकाच शाळेचं अन त्या शाळेतील विद्यार्थ्यांच ही नाव नसल्यामुळे त्या शाळेतील शिक्षक " अरे,दुसरा अन चौथा क्रमांक गेला कुठं ? त्या क्रमांकावर तर माझ्या शाळेचं नाव नाही अन विद्यार्थ्यांच ही नाव दिसत नाही."असं बोलणं ऐकून " अहो सर, दरवर्षी गुणवत्ता यादीत एक ते पाच क्रमांकांवर येण्याचा मक्ता काय तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीच घेतलाय काय ? या वर्षी माझ्या मुलीच्या शाळेतील बाईंनी सुद्धा अध्यापनासाठी अधिक वेळ देवून, मेहनत घेवून मुलांकडून खूप सराव ही करुन घेतलाय. "असं माझ्या विद्यार्थिनिच्या पालकांनी म्हटल्यावर त्या दोघांनीही हातात हात घेतला.कारण ते दोघंही मित्रच होते.हे सारं ऐकून अन समक्ष अनुभवून मला खुपच आनंद झाला.

   मी घरी आल्यावर त्याच दिवशी सायंकाळी माझ्या शाळेच्या संस्थेचे सन्माननीय सर्व संचालक अन शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक पेढ्यांचा बॉक्स घेवून माझ्याघरी आलेत. " म्यडम,एक-दोन नाही तर यावर्षी आपल्या शाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेच्या गुणवत्ता यादीत आल्यामुळे तुमचं हार्दीक अभिनंदन म्याडम !! " असं म्हणून त्यांनी माझ्या हातात पेढयांचा बॉक्स दिला. " धन्यवाद सर " म्हणून मी त्यांना थांबण्याचा आग्रह केल्यावर " नाही म्याडम येतो आम्ही.बराच वेळ झालाय आता.पुन:श्च तुमचं अभिनंदन !! " असं म्हणत ते घराबाहेर पडलेत.

   संस्थेच्या सन्माननीय संचालकांनी,मुख्याध्यापकांनी स्वत: माझ्या घरी येवून माझं अभिनंदन करणं हे माझ्यासाठी खूप महान असून या दिवसाचा हा क्षण माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाचा असा एक अविस्मरणीय क्षण असून माझ्या विद्यार्थ्यांच्या अन माझ्या कष्टाचं,प्रयत्नांचं सुखद फळ म्हणून सदैवच मला हा क्षण सुखावत असतो.

    आम्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्यवेळी मार्गदर्शन करुन वेळोवेळी त्यांच्याकडून सराव करुन घेतल्यास नक्किच यश मिळून त्यामुळे शाळेचं नावलौ किकही वाढत असतं असं स्वानुभवातून माझ्या लक्षात आलं.कारण हे यश मिळवण्यासाठी शिष्यवृत्तीचा वर्ग सुरू झाल्यापासून तर परीक्षा होईपर्यंत माझा एकही विद्यार्थी एक दिवस ही गैरहजर न राहता त्यांनी उत्साहानं अन प्रामाणीक पणे अभ्यास केल्यामुळे ते यशस्वी झालेत.खरं सांगायच तर माझ्या विद्यार्थ्यांचे अथक प्रयत्न अन चिकाटीमुळेच मुख्यांनी मला केलेल्या आव्हानाला मी सामोरे जावू शकले.अशा अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात असतांना अनेक चांगल्या,वाईट अनुभवांची अनुभूती येत असतांना माझ्या सार्याच विद्यार्थ्यांचा मला वेळोवेळी उत्तम असा सहवास आणि सहभाग लाभत असल्यानं मी यशस्वी होत गेले.

    अशा या माझ्या पवित्र शिक्षणसेवेतून निवृत्त होवून आज मला सात वर्षे पूर्ण झालीत पण तरी अजूनही मी माझ्या शाळेत माझ्या विद्यार्थ्यांच्या समवेतच असल्याचं मला जाणवत असतं.हुषार विद्यार्थ्यांबरोबरच अल्लड,अवखळ अशा खोडकर,खेळकर,भांडखोर अन अन मस्तीखोर विद्यार्थ्यांची सुद्धा मला खुप आठवण येत असते.कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी एकतरी सुप्त असा कलागुण असल्यामुळे शालेय अथवा शाळेबाहेरील स्पर्धेत सहभागी होवून तेही यश मिळवत असतात.असा अनुभव मला माझ्या सेवेत आला आणि म्हणूनच मला हव्याहव्याशा अशा माझ्या सार्याच विद्यार्थ्यांना टाटा,बायबाय आणि सी यू.


Rate this content
Log in