Vimal Patkari

Tragedy

3  

Vimal Patkari

Tragedy

प्रवास हा भेटीचा

प्रवास हा भेटीचा

4 mins
171


  आज सायंकाळी मी परसबागेतील हिरवळीवर रमले असता माझं लक्ष अचानक परतीच्या प्रवासाला निघालेल्या माझ्या सख्याकडे गेलं.त्याच्याकडे मी पाहत असतांनाच तो हळू हळू दिसेनासा झाला अन मग माझी अस्वस्थता वाढून मी अधिकच बेचैन झाले. जणू माझ्यातील प्राणच निघून गेल्यानं मी अगदी गलितगात्र झाले.तो निघून गेल्यानंतही मी बराच वेळ त्याच्या परतिच्या वाटेकडे बघतच राहिले.अन मग मला पुन्हा पुन्हा त्याची आठवण येवू लागली.तसं पाहिलं तर तो रोजच मला भेटायला येवून माझी काळजी घेत असतो. इतकंच नाही तर माझ्या लेकरांच्या पालन पोषणासाठी आवश्यक ती सारी मदतही तो मला करित असतो. पण तरीही त्याच्या भेटी वाचून झालेली माझी ही अस्वस्थता पाहून माझं मन मला म्हणू लागलं, ' अगं आज या क्षणी तू अशी उदास का झालीस ? तुला तर जे हवंय ते सारं काही तुझ्या सख्याकडून मिळत असतंय ना मग अजून काय हवय तुला ? '

  यावर " असं काही नाही रे मना.हे बघ जरी माझा सखा मला रोजच भेटत असला अन तुझ्या म्हणण्यानुसार मला सारं काही देत असला पण तरी अजुनही आम्हा दोघांची प्रत्यक्ष भेट कधी झालीच नाही रे. तो मला भेटावा,त्यानं माझ्याशी हितगुज करावं असं मला खूपखूप वाटतंय बघ.पण हे घडणार कसं?आणि कधी ? असे प्रश्न मला रोजच खुणवीत असतात.मग अशावेळी मी करणार तरी काय ? कारण तो कधीच येत नाही ना मला भेटायला अन मला तर सतत त्याच्या भेटीची आस लागलेली असते. जावू दे आता.तो काही येणार नाही भेटायला असंच मला वाटतय.आणि म्हणूनच ही भेटीची आस पूर्ण करण्यासाठी त्याला भेटायला जाण्याचा निर्णय आता मी घेतलाय बघ."

   असं माझ्या मनाशी बोलून मी सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री जरा लवकरच झोपले.पण प्रीतिच्या अल्लड,अवखळ अशा भेटीच्या ध्यासामुळे मला काही केल्या झोपच येत नव्हती.मग जेमतेम झोपेची एक डुलकी घेतल्यावर मी उठून पाहिलं तर रात्र संपत आल्याचं लक्षात येताच मी झटकन उठले.साऱ्या साजशृंगारानं तयार झाले. डोळ्यांवर आलेल्या केसांच्या बटा हलकेच हाताने सावरल्या अन झुंजूमुंजू पहाटेच्या साथीनं,दाटदाट धुक्यातून वाट काढीत काढीत मोठ्या लगबगीनं साजन भेटीच्या प्रवासाला निघाले.

   या प्रवासात मी माझा सखा येण्याच्या वाटेकडे पाहून त्याची आराधना करू लागले अन इतक्यातच प्रभात कधी झाली हे मला कळलच नाही.मग या प्रभातिची लाली गालांवर माखून,साजनाचं रुप डोळ्यात साठवून अन मोरपिसी स्वप्न मनात झुलवून लाजत,मुरडत " अरे,मला भेटून आपल्या भेटीची आस पूर्ण करण्यासाठी तू कधी येशील रे सख्या?"अशी साद मी माझ्या साजनाला घातली असता जणू माझी साद ऐकून क्षणातच 

" अगं ए सखे,ऐक ना जरा माझं. अगं,मी तर दररोजच दिवसाच्या प्रत्येक प्रहरी माझं रुप पालटून तुला भेटण्याचा प्रयास करीत असतो बघ.अगं रोज मी आल्या आल्या प्रथमदर्शनी तुलाच पाहून.ही माझी प्रभातिची सारी लाली तुझ्यावर अगदी मनसोक्त पणे उधळतो अन मग ही लाली तुझ्या गालावर आल्यानं तुझं आनंदानं लाजण पाहून मला खुपच आनंद होतोय गं सखे."

असं त्याचं बोलणं ऐकून 

" असं होय. बरोबरच आहे की मग तुझं हे म्हणणं. कारण तुझ्या या लालीमुळेच माझं मन आनंदानं मोहरुन येतय इतकंच नाही तर माझ्या साऱ्या चराचरालाही नवचैतन्याचा हुरुप येतोय.हे सारं पाहून तुझी ही प्रभातलाली सदैव माझ्या रुपास अशीच खुलवीत रहावी असं मला वाटत असतं रे सख्या "असं माझं बोलणं संपत नाही तोच

" अगं हो.हो.थांब तरी तू थोडं. मलाही बोलू दे ना जरा.हे बघ.तुझा हा आनंद पाहून मलाही आनंद होवून खूप छान वाटतंय गं.पण आता मध्यान्ह प्रहर असल्यानं मी अगदी बरोबर तुझ्या माथ्यावर आल्यानं माझी तापलेली किरणं तुझ्या अंगावर विखुरतांना तुझ्या जीवाची होणारी लाही लाही पाहून मला माझाच खूप खूप राग येतोय गं सखे "

  त्याच्या या बोलण्यातून त्याचं माझ्यावरील प्रेम पाहून माझ्या मनाची प्रीत लतिका बहरुन म्हणू लागली, 

   "अरे,नाही रे सख्या.असं काही नाही बरं.याबद्दल तू स्वत:ला मुळीच दोष देवू नकोस.कारण हे बघ,तुझ्या अन माझ्या भेटीसाठी तुझ्या तापलेल्या उन्हाची ही किरणं नसून ती जणू शरद पुनवेचं चांदणं होवुन माझ्या मनाचं अंगण शिंपतय असच मला वाटतंय बघ."

माझं हे बोलणं मध्येच थांबवत 

" अगं हो गं प्रिये,तुझी ही भेटीची तळमळ पाहून मलाही तुला भेटावंसं खूप खूप वाटतयं बघ.पण तरी तुला भेटण्यासाठी मी येवू शकत नाही ना.यामुळे मला खूप वाईट वाटतय बघ.अगं, उजाडल्यापासून तुझ्यासोबत असल्याचा आनंद मी दिवसभर अनुभवत असतांना मला माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याचं थोडं तरी सुख समाधान लाभतंय गं.पण आता तुला सोडून माझा परतीचा प्रवास सुरू करतांना तुझ्या भेटीच्या ओढीची माझ्या जीवाला सारखी हुरहूर लागते.पण असं असूनही निसर्गनियमानुसार मला जावंच लागणार असल्यानं तुझं साजिरं,गोजिरं रुप डोळ्यात साठवून, तुझ्या भेटीची आस उरी घेवून अत्यंत उदास अंत:करणानं अन जड पावलांन अस्तालयी जाण्याचा प्रवास मी रोजच करीत असतोय गं सखे."

   अशाप्रकारे दिवसभराच्या या साजनभेटीच्या प्रवासानंतर सायंकाळी असलेल्या गारगार मंद हवेच्या रमणीय अशा सांजवेळी माझा साजन माझ्या जवळी असावा असं मला माझ्या रोमरोमातील प्रितीचा शहारा सांगत असतांनाच मला माझा साजन मघाशी सांगत असतांना त्याची झालेली केविलवाणी अवस्था आठवून मी देवापुढे सांजदिवा लावला.दिव्याच्या शांत, शितल, सोज्वळ ज्योतिकडे पाहून 'अरे देवा,मी भूमी आणि माझा साजन भास्कर आहे. आम्हा दोघांची ही वाट तर समांतर अशी आहे.मग आमची भेट तरी कशी होणार ? हे तर अशक्यच आहे.' असा हा विचार माझ्या मनात आला अन मग मी माझ्या मनाला समज घालून देवाला नमस्कार करतांना " हे परमेश्वरा, आमच्या या समांतर वाटेवरील प्रवासाला निदान अशीच ही नजरभेटीची पर्वणी तरी आम्हाला आजन्म लाभू दे.जेणेकरुन मी अन माझा सखा आम्हा दोघांचाही भेटीचा प्रवास कधीच संपणार नाही."

अशी प्रार्थना दयाघनाला करुन माझ्या साजनाच्या मृगजळातील भेटीसाठीचा या समांतर वाटेवरील प्रवास मी निरंतर सुरुच ठेवण्याचा निर्णय आनंदानं घेतलाय.  


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy