Vimal Patkari

Tragedy

4.3  

Vimal Patkari

Tragedy

साद ही अंतरिची ' !!

साद ही अंतरिची ' !!

7 mins
277


नारायणराव आणि लक्ष्मी या दाम्पत्याला असलेल्या सहा लेकरांपैकी तीन मुली आणि दोन मुलांची शिक्षणं अन लग्नाची जबाबदारी त्यांनी परिस्थिती नुसार पार पाडली.आता त्यांच्यावर जबाबदारी होती ती त्यांच्या लहान मुलिची .

 भूमी ही जुनी मॅट्रीक म्हणजे अकरावीला जावू लागली.पूर्वी लवकर म्हणजे वयाच्या सोळाव्या,सतराव्या वर्षीच लग्न करण्याची पद्धत असल्यानं तिच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी आमंत्रणं दिलेली होती.त्यापैकीच एक पाहुणे येणार असल्याचं नारायणरावांना कळलं.ठरल्यादिवशी,ठरल्यावेळी पाहुणे आले.भूमी दिसायला साधारण म्हणजे सावळा रंग,जाडसर बांधा,निटसं नाक अशी.तर आकाश रंगांनं गोरापान,लांब बारीकसं नाक,चकाकी असणारे पाणीदार डोळे असून हसरा,शांत,सोज्वळ चेहऱ्याचा. चहा-पोहेंच्या अल्पोपहाराने पाहण्याचा कार्यक्रम पार पडला. होकार-नकार घरी गेल्यावर कळवतो.असं सांगून पाहुणे परतिच्या प्रवासाला निघाले असता भुमिची परीक्षा आठच दिवसावर असल्यामुळे आकाश तिच्याकडे पाहून जणू ' चांगला अभ्यास कर. ' असं डोळ्यांनी खुणवून सांगत होता.कारण त्यावेळी प्रथमदर्शनी मुला-मुलींचं काही बोलणंच होत नसे.ते गेल्यावर जवळ-जवळ सहा,सात दिवसांनी मुलाकडील वडील मंडळींनी होकार कळवल्यामुळंं नारायणराव मोठ्या मुलासह वरपक्षाकडे गेले.तिथं देण्या-घेण्याची बोलणी झालीत.थोड्याच दिवसात साखरपुडा आणि विवाह सोहळाही पार पडला. 

    नंतर दोन दिवसांनी मुलाकडची मंडळी भुमीला न्यायला येण्याचा निरोप मिळाल्यामुळं तिच्या आईनं पाठवणिची योग्य ती तयारी केली.ठरल्या दिवशी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य,पाहुणचार आटोपून पाहुणे भुमिसह बसस्थानकावर जाण्यासाठी निघलेत.त्यांच्यासह भुमिचा भाऊही त्यांना सोडण्यासाठी बसस्थानकावर गेला.बसमध्ये बसल्यावर " हे बघ भुमी,सासरी नीट राहायचं.साऱ्यांचा मान राखायचा.उलटून कोणाला काहीच नाही बोलायचं." असा भावानं केलेला मोलाचा उपदेश ऐकून तिनं त्याला आसवं भरल्या डोळ्यांनी मानेनचं होकार दिला.तो बसमधून खाली आला अन बस प्रवासाला निघाली.

   बघता-बघता अडीच ते तीन तासात बसने प्रवास पूर्ण केला.पूर्वी ऑटो नसल्यामुळं बसस्थानकाबाहेर टांगा म्हणजे घोडागाडी सज्ज होतीच.गाडीत बसून या तिघांनी एकदाचं घर गाठलं.घरी आकाश जणू चातकावानी भुमिची वाटच पाहात होता.आईच्या पाठोपाठ भूमीही खाली उतरली अन आकाशचा चेहरा गुलाबावानी फुलला.तीनं उंबरठ्यावरील माप ओलांडून गृहप्रवेश केला.

    लग्नानंतर काही दिवसांनीच तिचा अकरावीचा निकाल लागला.त्यात ती दोन-तीन विषयात अनुत्तीर्ण झाली.त्यामुळं तिला संकोच वाटू लागला.पण, " अगं काही हरकत नाही भूमी. तू परत परीक्षा देवू शकतेस." अशा प्रकारे आकाशनं तिची समज घातली.काही महिन्यांनी तिनं परीक्षेसाठी पुनर्प्रवेश घेतला.

एकत्र कुटुंबात वाट्याला आलेली कामं आटोपून ती अभ्यासासाठी वेळ काढू लागली.जिद्दीनं अभ्यास करू लागली.परीक्षेचा कालावधी आल्यावर तीनं परीक्षा दिली अन त्यात ती उत्तीर्ण झाली.अशा या आनंदाच्या प्रसंगी 'अधिक उल्हास त्यात फाल्गुनमास ' असल्यागत त्यांच्या संसारात नव्या पाहुण्याच्या येण्याची चाहूल लागली.घरातील साऱ्यांना आनंद झाला.पुढे काही महिन्यांच्या कालावधीनं चिमुकल्या बाळराजाचं आगमनही झालं.

   बाळ हसत खेळत मोठा होवू लागला.तो दोन वर्षाचा झाला अन भुमीनंही पुढील शिक्षण करुन नोकरी करावी असा विचार आकाशच्या मनात आला.तो त्याने तिलाही बोलून दाखवला .तिनंही त्याला होकार दिला.पण यावेळी त्यांच्या संसारवेलीवर उमलेलं दूसरं फूल खुपच लहान म्हणजे दोन महिन्यांचच असल्यामुळं त्यांना जरा प्रश्न पडला.पण त्यासाठी अजून काही महिन्यांचा कालावधी असल्यामुळे पुढे पाहता येईल असं ठरवलं. 

    पुढं शहरातील दोन ते तीन अध्यापक विद्यालयात तिचा प्रवेशअर्ज दाखल केला असता योगायोगाने आकाश ज्या अध्यापन शाळेत अध्यापक पदी कार्यरत होता त्याच शाळेशी संबंधीत अधापक विद्यालयात तिला प्रवेश मिळाला.तिचं शिक्षण सुरू झालं.घरकामं आटोपून महाविद्यालयात जावून मधल्या वेळेत घरी येऊन तान्हुलीची भूक शमवून परत विद्यालयात जाणं. अशा प्रकारे तारेवरची कसरत करता करता तिच्या शिक्षणाची दोन वर्षे पूर्ण झालीत.

कुटुंबातील सारेच या दोन लहान बालकांशी खेळण्यात रंगून जात असत. असेच आनंदानं दिवस जात असताना कुटुंबात परत एका चिमुकल्याचं आगमन होवून आकाश अन भुमिच्या कुटुंबातील मुलांचा महत्वपूर्ण त्रिकोण पूर्ण झाला.

   बघता बघता तिन्ही लेकरं मोठी होवू लागलीत.पुढे एक ते दिड वर्षाचा काळ गेल्यावर दोन-तीन शिक्षण संस्थेत शिक्षकांच्या नेमणुकीबद्दलची जाहिरात आकाशनं वृत्तपत्रात वाचली.अन भुमिनही नोकरी करण्याचं स्वप्न साकार होण्याचा आत्मविश्वास त्याला वाटू लागला. त्यानं तिच्या शैक्षणीक कागदपत्रांची पुर्तता करुन जाहिरात असलेल्या संस्थांमध्ये अर्ज दाखल केला.जवळ- जवळ पंधरा दिवसांनी तिला एका नामांकीत संस्थेकडून मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. ठरल्या दिवशी ठरल्या वेळी तिची मुलाखत घेण्यात आली.त्यात ती पात्र ठरली.अन दोन दिवसांनी तिला शिक्षिका पदाच्या नेमणुकीचे आदेशपत्र मिळाले. दोघांना आणि कुटुंबातील साऱ्यांना आनंद झाला.ती शाळेत हजर झाली.तीला शाळेत कार्यरत होण्यास चार पाच महिने झालेत अन कुटुंबात काही कारणास्तव वाद सुरू झालेत.या वादानं मग दोघं भावांची कुटुंब विभक्त झालीत. शेजारीच असलेल्या भावाच्या एका घरात आकाश त्याच्या कुटुंबासह राहू लागला. 

 काही दिवसांनी वादाचं प्रकरण निवळलं.दोन्ही घरातील सारे एकमेकांकडे जावू लागले.दोन्ही कुटुंबांतील वातावरण पुर्ववत होवू लागलं.

भूमी ज्या शाळेत कार्यरत होती त्या शाळेला पूर्णपणे शासकीय अनुदान नसल्यामुळं तीला मिळणारे वेतन काहीशा अल्प प्रमाणात मिळत असल्यामुळे त्यांना थोडी आर्थीक चणचण भासत असे.पण अशा परिस्थितीत सुद्धा ही स्वच्छंदी जोडी अतिशय आनंदी रहात असे.

   आकाश हा फक्त शिक्षकच नसून तो उत्तम लेखक,गायक,ढोलकी वादक,नृत्य दिग्दर्शक असून विविध कवी संमेलनं गाजविणारा प्रतिभावंत असा कवी सुद्धा होता.

  पुढं आकाशनंही घर बांधण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा खरेदी केली.भुमिच्या म्हणण्या नुसार एकदोन रुम न बांधता सर्व सोयींनी युक्त असा बंगलाच बांधायचा.घरात आवश्यक ते फर्नीचर ही करायचं.असं त्याचं स्वगृहाचं स्वप्न होतं.त्याबद्दल त्यानं तिलाही सांगितलं होतं.

  अशा प्रकारे या स्वच्छंदी जोडीचा दृष्ट लागण्याजोगा सुखी संसार आनंदानं सुरू असतांना एके दिवशी सायंकाळी आकाश फ्रेश होवून आरशासमोर उभा राहून केस नीट करत असतांना रुममधील लिंटरपानाला लावलेला पडदा हवेनं पंख्यात कसा कोण जाणे अडकला ? अन त्याबरोबर भिंतीतील खिळा झटक्यात निघून तो आकाशच्या पायाजवळ पडला. तो खिळा त्यानं उचलला आणि " हे बघ भूमी,हा खिळा जर माझ्या डोक्यात पडला असता तर आज मी संपलो असतो.अन मग उद्याच्या वर्तमान पत्रात ' आकाश खानकरींची अंत्ययात्रा ' अशी बातमी आली असती बघ. " हे ऐकून "अहो,असं अभद्र का बोलताय ?माणसानं जरा शुभ-शुभ बोलावं " यावर " अगं,मरण काय कुणाच्या हातात असतं का ? " असं हसत,हसत म्हणतच तो घराबाहेर पडला. रात्री बाहेर कवी संमेलन असल्यानं तो घरी उशिरानं आला.आल्यावर त्यानं ग्लासभर दूध घेतलं आणि मग तो झोपला.

  सकाळी या दोघांना लग्न समारंभासाठी जायचं असल्यानं तिच्या शाळेची वेळ सकाळची असल्यामुळं तीनं शाळे नंतर परस्पर जायचं असं ठरल्यानं ती सकाळी लवकर उठली.तिनं मुलांसाठी स्वयंपाक केला.पटापट आवरून अंगणातील नियमीत सडा-रांगोळी करण्यासाठी तिनं अंगणात झोपलेल्या आकाशला उठवलं असता " अगं, झोपू दे ना मला थोडा वेळ "असं म्हणून त्यानं तोंडावर पांघरुण घेतलं.हे पाहून ती घरात गेली.तिनं थोडं आवरलं आणि परत बाहेर येवून तिंन त्याला उठवल्यावर तो उठला.घरात जावून त्यानं चूळ भरली.नंतर खाली पडलेली उशी घेण्यासाठी तो खाली वाकला.अन त्याचक्षणी त्याच्या छातीत कळ आल्यामुळंं तो कॉटवर उपडा झोपला.जोरानं श्वास घेवू लागला.नुकतीच झोपेतून उठून आलेली त्याची तिन्ही मुलं भिंतीला टेकून तर कुणी लांब पाय घालून बसलेली होती.

मुलांनी त्याला अशा अवस्थेत पाहिल्यावर " ए आई,आई,आण्णा बघ कसं करताय ? " मुलाचं हे बोलणं ऐकून आकाशच्या नेहमीच्या काही तरी गमती जमती करण्याच्या सवयींमुळं "ही काय वेळ आहे गंमत करण्याची ? " असं म्हणून तिनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं मुलांनी परत मोठ्यानं " ये ना गं आई लवकर .हे बघ ना खरंच कसंतरीच करताय ना. " यावेळी हे ऐकून तीनं हातातलं काम टाकलं आणि ती धावतच कॉटजवळ येवून पाहते तर काय त्याची अवस्था वेगळीच.तिला बापडीला काय ठावूक की यावेळी आपल्या आयुष्याचीच गंमत होणार असं.

धावत जावून तीनं आकाशच्या आईला आणि भावाला आवाज दिल्यावर तेही धावतच आले.त्यांनी आकाशला सुलट झोपवून आवाज दिला.हलकेच हलवलं.तिनंही हाताला धरुन उठवण्याचा प्रयत्न केला.असं करीत असतांना तिच्या कपाळाचं थोडं कुंकू त्याच्या चेहऱ्यावर पडल्याचा अशुभ संकेत जणू तिला मिळाला. परंतू, तिच्या आणि इतर कोणाच्याही ते लक्षात आलं नाही.त्याचे बंद असलेले डोळे त्यानं क्षणार्धात उघडले.लालबुंद झालेले डोळे मोठे मोठे करुन त्यानं तिन्ही लेकरांना डोळे भरून पाहिलं. अन डोळे मिटले ते कधीही न उघडण्यासाठी. त्याला ऊन लागलं असेल या शंकेनं घरी जमलेल्या मंडळींनी सांगितल्या प्रमाणं त्याच्या हातापायाला कांद्याचा रस लावला. रसाचे एकदोन थेंब नाकात टाकल्या बरोबर त्यानं थांबून थांबून दोनवेळा जोरानं श्वास घेतला अन तो शांत झोपला परत कधीही न उठण्यासाठी. हे पाहून तो बरा व्हावा या आशेनं त्याला हृदयरोगतज्ञ डॉक्टरांकडे नेलं असता तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

     झालं.साऱ्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.घरात,परिसरात स्मशान शांतता पसरली.त्याच्या मुखातून निघालेले ते काळरुपी शब्द आठवून तिच्या हृदयाची स्पंदनं कंप पावू लागलीत.पितृछत्र हरवल्यानं रखरखीत उन्हाची किरणं लेकराच्या नशिबी आलीत.असं निरस आयुष्य नशिबी आल्यानं तिला सारं काही संपल्या सारखं वाटू लागलं.

   अंत्ययात्रे नंतर दशक्रिया,गंधमुक्ती असे सारे सोपस्कार आटोपलेत. आलेली पाहुणे मंडळी आपापल्या गावी गेलीत.मुलंही शाळेत जावू लागलीत.घरातील एकटेपणा भुमीला नकोसा वाटू लागला.

   पुढे काहीच दिवसांनी तिनं घेतलेली सुटी संपली. " मुलांसाठी जगून आई-वडील अशा दोन्ही भुमिका तुला आता पार पाडाव्या लागतील." असा उपदेश तिला सांत्वन प्रसंगी अनेकांनी केलेला असल्यामुळं हा वास्तववादी उपदेश उराशी घेवून ती घराबाहेर पडून शाळेत हजर झाली.शाळेतून घरी आल्यावर सारं घर तिला आकाशच्या आठवणिंनी खुणवीत असे.वडिलांनी मुलांचं केलेलं कौतुक,पुरवलेले हट्ट,त्याचं स्वगृहाचं स्वप्न,डौलानं चालणारा संसाररथ, रथाचा कुशल सारथी अन दोघांच्या जिवाभावाच्या गुजगोष्टी या सर्वच बाबींशी निगडीत असलेला हवाहवासा भूतकाळ तिच्या हृदयाला आर्त साद घालू लागला.

    तिनही मुलांचं माध्यमिक शिक्षण सुरू असतांनाच असा बिकट प्रसंग आल्यामुळं तिला अधीक काळजी वाटू लागली.पुढे आकाशनं या जगाचा निरोप घेण्यास एक वर्ष झालं अन काही करणास्तव भुमिवर राहतं घर सोडण्याची वेळ आली.तिला यावेळी जरा वाईट वाटलं. पण मोठ्या धिरानं तिनं या घरापासून थोड्याच अंतरावर असलेलं एक घर भाड्यानं घेतलं अन तिन्ही मुलांसह ती तिथं राहू लागली.

आकाशच्या अनेक कलांपैकी एखादी कला अंगिकारुन तो कलेच्या रुपानं तरी सतत आपल्या सोबत असावा म्हणून तिलाही अवगत असलेली कविता करण्याची कला जोपासून ती कविता लिहू लागली.पुढे तीपण कवी संमेलनास जावू लागली.तिथं आकाशच्या मित्रांना पाहून तिला त्याची आठवण येत असे.संमेलनात अधून मधून आकाशच्या कवितांच्या काही ओळी म्हणून त्याचे मित्र त्याच्या आठवणी उजळीत असत.आणि  तिलाही आपुलकीची वागणूक देत असत.हे सारं पाहून तिचा उर भरून येवून तिला आकाशबद्दल अभिमान वाटत असे.

     पुढं चार ते पाच वर्षांनी तिनं आकाशचं स्वगृहाचं स्वप्न साकारलं.तिन्ही मुलांच्या शिक्षणाची आणि काही वर्षांच्या कालावधीनं योग्य त्या वयात त्यांच्या लग्नाची जबाबदारीही निभावली.हे सारं काही निभावत असतांना तिला पदोपदी आकाशची उणीव भासत असे.पण त्याच्या आठवणीवर जगूनच त्याच्या स्वप्नांची पूर्ती करायची असं तीनं ठरवल्यामूळंंच ती हे सारं काही करू शकली.आज त्यांची दोन्ही मुलं उच्च पदावर कार्यरत असून दोन्ही सुनाही उच्च शिक्षीत आहेत.मुलगी शासकीय अधिकारीपदी असून जावयांच्या स्वत:च्या कंपनीची भरभराट आहे.अशी या तिन्ही लेकरांची प्रगती,त्यांचा सुखानं भरलेला संसार शिवाय नातवंडांनी गजबजलेलं गोकुळ अनुभवण्यासाठी आकाशनं एकदातरी यावं असं तिला सारखं वाटत असतं. आणि म्हणूनचं 'क्षितिजपलिकडील प्रकाशवाट अंतरचक्षुंनी न्याहाळीत' आयुष्याच्या रंगमंचावरील दृष्ट लागण्याजोगा संसाराचा रथ अर्ध्यावरच सोडून गेलेल्या सारथीला ती आर्त साद घालीत असते.

 जीवलगा रे गेला  दुरी रे

  साद माझी ऐकुनी ये जवळी रे  !!


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy