व्यथा तिची
व्यथा तिची
बस्स, बस्स झाले आता
हे निषेध नोंदवणे
पुरे झाले आता
ह्या पणत्या पेटवणे
जाहीर ते निषेध
आणि वराती मागून घोडे
प्रशासनाला शिव्या
आणि न्यायालयावर ओरखडे
अरे किती दिवस मिरवणार
हे षंढपणाचे ठोकताळे
उपटूनच टाका ना मग
मुळापासून हे किळसवाणे चाळे
किती निर्भया, किती मनीषा
संपवले, अब्रूचे धिंडवडे
शेळी जाते ना जिवानिशी आणि
खाणारे म्हणतात वातड आहे
विपरीत घडल्यावरचं का
जात पात आठवावी
जन्मकळा सोसतांना
असे विचारते का हो आई
स्त्री आणि पुरुष
फक्त लिंगाचा काय तो भेद
म्हणून त्यानेच करावा का
तिच्या जगण्याचा शिरच्छेद
विखारी वासनांचे का हे
नागसर्प वळवळती
हात पाय जोडत का
तिने व्हावे काकुळती
होतांना अत्याचार
तिथेही लाईन लावती
तुझे झाले की माझा
नंबर हमखास म्हणती
तेव्हा का आठवत नाही
यांना घरातली पणती
का नाही सुचत यांना
बहिणीची राखी अन आईची ओटी
देश, धर्म आणि संस्कृतीची
पार वाट लावली, मग
नुसत्याच कायद्याने सुटणार
आहे का ही घाणेरडी विकृती
फोडा त्यांचे डोळे
करा ना खांडोळी
फोडा करून नागडे
आणि दया ना खुलेआम सुळी
अरे हिम्मतच कशी होते
तुमची असे करण्याची
आणि पुन्हा सावरण्यासाठी
जाती धर्माची भाजताय पोळी
मुलींनो, सोडा नाजूकपणा
आणि वाट धरा रणरागिणीची
झाले पुरुष जरी षंढ
तरी स्वतः बना रणरागिणी
