व्यक्त व्हायला हवं होतं...
व्यक्त व्हायला हवं होतं...
पाच वर्षं झाली आज,
असेच भेटलेलो कॉलेज मध्ये
दोघंही लाजून लाजून,
शेवटी तीच म्हणालेली मग
तू खूप आवडतोस रे मला.
कधीच विसरू नाही शकत मी
ती संध्याकाळ
सगळं काही तसंच होतं
बदललेलं ते फक्त नातं
आमच्या दोघांतलं
मैत्रीतून प्रेमाकडे जाताना.
तिच्यासाठी म्हणुन मी लिहिलेली
ती पहिली कविता
आणि माझ्यातल्या कवीची
ती पहिली चाहती
प्रत्येक आठवड्यात
एक नवी कविता लिहायचो
आणि तीही डोळे बंद करून तिला दाद द्यायची...
कवितेचा आधार घ्यावाच लागायचा पण मला
माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी,
कधीच जमलं नाही.
वाटायचं खूप, शब्दही यायचे अगदी ओठांपर्यंत
पण तसेच जायचे आल्यापावली,
तिला बघितल की माझा रहायचोच नाही मी
ती ही घ्यायची समजून
पण वाटही बघत होती
माझ्या व्यक्त होण्याची
तेव्हा सुरू झालेला
तो प्रवास आजही आठवतोय
ती कविता आजही आठवतेय
वाईट वाटतय फक्त एवढच की
मी वेळीच व्हायला हवं होतं व्यक्त
आता फक्त विचार करत
नशिबाला दोष देतोय
का संपवलास हा सुंदर प्रवास
एका विचित्र वळणावर
