विद्रोह
विद्रोह
मी त्यांच्याकडे घेऊन गेलो विचार
ते म्हणाले, तू हो लाचार'
आणि त्यांनी बांधले माझे हात
त्यांच्या गुलामीच्या बेडयांत
तरीही मी काही बोललो नाही,
मग माझ्या पोटावर जेव्हा त्यांनी मारली लाथ
तेव्हाही मी समजावले माझ्या लाचार भुकेला,
एवढयावरही भागले नाही म्हणून की काय
ते माझ्या गावात आले
फिरवू लागले बुलडोझर
माझ्या घरदारावर अन शिवारावर
गडयांनो,मग मात्र माझा तोलच सुटला
आणि मी भिरकावून दिले माझे नागरिकत्व
त्यांच्या वचननाम्याच्या भेंडोळ्यावर
ज्याकडे आज कुत्रं देखील ढुंकून बघत नाहीये
आता मात्र मी वाट पाहतोय
माझ्या पूर्वजांच्या रक्ताघामाने
वर्षानुवर्षे पेटत असलेल्या विद्रोहाच्या आगीत
या पाशवी सुलतानांचे मनसुबे
पुरते भस्मसात होण्याची.
