वेताळ वेताळा
वेताळ वेताळा
वेताळा वेताळा
लहानपणी बुडवली शाळा
शत्रू होता वर्गातील काळा फळा
झालो गुळाने बोबडा अन् लाडाने लुळा
वेताळा वेताळा
तारुण्यातील खेळच निराळा
सौंदर्याच्या मागे मी खुळा
स्वप्नात रंगून जायचो वेळोवेळा
वेताळा वेताळा
सोडव माझ्या जीवनातील घोटाळा
कर मला सगळ्यात निराळा
कर माझ्या एकाचे सोळा
वेताळा वेताळा
निर्माण कर सर्वांच्या मनात माझ्यासाठी जिव्हाळा
मला मात्र ठेव सर्वांपासून नामानिराळा
कर असे की मी सदैव दिसावा तरुण आणि कोवळा.
वेताळा वेताळा
लक्षात असू दे माझी रास आहे तुळा
जीवनात सदैव चालत रहावा आनंदाचा सोहळा
नसावा माझ्या भाग्याच्या भिंतीवर एकही दुःखाचा खिळा
वेताळा वेताळा
जशा मुंग्या येऊन चिकटती गुळा
जसा साप शोधे आयत्या बिळा
तसे मला कोणीही वापरू नये एकही वेळा
वेताळा वेताळा
थकलो आहे फिरून फिरून देऊळा देऊळा
पुण्यही बहुत झाले आहे गोळा
पण पूर्वसकृतांमुळे सर्वांवर फिरतो आहे बोळा
वेताळा वेताळा
सुखाच्या शेवटाला थांबू दे सुखदुःखांचा झोपाळा.
मनाच्या जमीनीवर पडू दे उडलेला भ्रमाचा धुराळा
असूनही खरकट्याने बरबटलेला, कर मला सोवळा
वेताळा वेताळा
तू आहेस सगळ्यात वेगळा
घेऊन तिळ देशी भोपळा
पारखून पाहिले आहे मी तुला कितीतरी वेळा
वेताळा वेताळा
वाहू दे माझ्या जीवनात यशाचा झरा झुळझुळा
कर मला बुद्धिमान आहे जरी मी बावळा
राजहंस कर मला असलो जरी मी कावळा
