वारी
वारी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून
गर्दी ही भाविकांची जमली
शेकडो वर्षे उलटून गेली तरी
ही मंडळी अजून नाही दमली
तरुण पिढी एकदा जाऊ म्हणंत
दरवर्षी गर्दी ही वाढत आहे
अशीच भाविकांची मांदियाळी
वेगवान दुनियेत जरा वेळ काढत आहे
संतांनी लावलेले रोपटे
हे या वारीचे मोठे वृक्ष झाले
ऊन,वारा,पाऊस कशाचीच परवा नाही
'राम कृष्ण हरी' नामातच ते नाहून गेले
नाही कसली वयाची अट
ना कसला कोणाचा थाट
ना कोणाला बसायला पाठ
ना पंच पक्वान्नाचे ताट
तरी भाविकांची उसळते लाट
पायीच धरतात पंढरीची वाट
तरी ही गर्दी अफाट
ना कोणाला आमंत्रण
ना कोणाला निमंत्रण
फक्त सांगते अंतर्मन
विठ्ठलास करण्या वंदन
कपाळी असते चंदन
गळ्यात तुळशीची माळ
मुखी अभंग हाती टाळ
जो करेल वारी
त्याला विठ्ठल तारी
उभा असे तो पंढरपुरी
पायी जमते दुनिया सारी
आयुष्यात करावी एक वारी
एकदा तरी जीवनात करावी वारी
पांडुरंग हरी पांडुरंग हरी
