उ:शाप
उ:शाप
संपतो खेळ जेव्हा,
कळते ना काय घडते?
उरतो सरूनही की
नुसतीच धूळ उडते?
माझ्या पुऱ्या खुणा ह्या
विसरून लोक जातील,
होता बरा बिचारा-
काही दिवस म्हणतील
संपून खेळ जाता
परततील तासभराने
सोबती,सखे नी जिवलग
रुजतील पुन्हा नव्याने
पुन्हा वसंत गाणी
बहरतील फांदीवरती
आणि पुन्हा नव्याने
होईल हिरवी धरती
फसवाच शोक सारा
विरणार की क्षणात
जाईल राख चितेची
वाहून ह्या नदीत
सांगा जग रहाटी
थांबेल का जराशी?
घेऊन कोण फिरते?
पर दुःख ते उराशी?
आहे सदैव ऋणी मी
परमेश जगपतीचा
ज्याने बहाल केला-
उ:शाप विस्मृतीचा...!
