वेंधळाच
वेंधळाच
माझ्यासाठी मार्ग एकटा मीच शोधतो
कोणासाठी जीव बिचारा उन्हात झरतो
काय गवसले उमजे ना मज रितीच झोळी
नशीब हसते खुदकन गाली देते टाळी
आज जराशी दूरच पळते माझी छाया
उन्हे तापती ही माथ्यावर जळते काया
दिशा कोणती बुचकळ्यात मी पुरता गोंधळ
जगण्यासाठी भांड भांडलो रितीच ओंजळ
आंधळाच मी वेंधळाच मी महामुर्खही
चुकलो मुकलो तरी धावतो पुन्हा गर्क मी
वेळ जावया खेळ खेळतो मी नशिबाशी
उलटे पडती सारे फासे माझ्यापाशी