नितळ श्रावण
नितळ श्रावण
आला श्रावण, श्रावण
घेऊ नेसून श्रावण
त्याच्या हिरव्या रंगाने
सारे भरावे अंगण !
रंग इंद्रधनुष्याचा-
जावा झोपडीच्या दारी
जिथे नित्याचा दुष्काळ
तेथ कोसळाव्या सरी !
श्रावण मासाच्या फुलांनी
जावी भरून ओंजळ,
अवघा माणूस भीजावा
व्हावा- सरींसा नितळ!
असा बरसो श्रावण,-
जागी होऊ देत भक्ती
झाडा- पाना-फुलांवर,
अशी जडावी आसक्ती !
असा झडावा श्रावण-
उरो नये डोळा पाणी,
त्याने रुजवून जावी
त्याची हिरवीकंच गाणी!