गाव
गाव
*वृत्त:-लवंगलता*
*मात्रा:- ८+८+८+४*
【प|प|प|+निश्चित गुरू】
काही केल्या गाव माझिया मनातुनी ना जाते
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुला नेहमी घेते
खळखळणारी नदी शुभ्रसी वेगे वाहत जाते
गावोगावी दौडत जाता किती जोडते नाते
मला खुणावे काळी काळी शेतामधली माती
खळखळणारे पाट दुधाचे मंजुळ गाणे गाती
घेउन ऐसे सुंदर आठव गावी जाउन आलो
गाव बदलले राव बदलले निराश होउन आलो
रस्त्याकाठी उभी एकटी घेउन काटे बोरी
तिच्यासंगती उभी बाभळी उदास जैसी छोरी
पडकी शाळा एक मराठी दुभंगलेल्या भिंती
इंग्रजाळली पोरे आता ट्विंकल ट्विंकल गाती
आभासाची दुनिया होती प्रत्येकाच्या हाती
तिथे पोचले हेच हलाहल विरत चालली नाती
विकली शेती विकली माती दुष्काळाच्या पायी
पडले गोठे गुरे वासरे खंगत गेल्या गाई
खळखळणारी शुभ्र तटीनी मुकी होउनी गेली
हिरवे हिरवे गार गालिचे कुठे घेउनी गेली?
*---पद्माकर भावे*
8149765478
